Revised Common Lectionary (Semicontinuous)
99 परमेश्वर राजा आहे
म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या.
देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो
म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.
2 सियोन मधला परमेश्वर महान आहे.
तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.
3 सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे.
देवाचे नाव भीतीदायक आहे.
देव पवित्र आहे.
4 बलवान राजाला न्यायीपणा आवडतो.
देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि
प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.
5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि
त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.
6 मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते
आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता.
त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली
आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7 देव उंच ढगांतून बोलला.
त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या
आणि देवाने त्यांना नियम दिले.
8 परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस,
तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस
आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
9 त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा.
परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे.
सोन्याचे वासरु
15 “मग मी मागे फिरुन डोंगर उतरुन आलो. डोंगरावर आग धगधगत होती. माझ्या हातात आज्ञापटाच्या दोन पाट्या होत्या. 16 “मी पाहिले की तुमचा देव परमेश्वर याच्या इच्छेविरुद्ध वागून तुम्ही पाप केले होते. तुम्ही वासराची सोन्याची ओतीव मूर्ती केली होती. तुम्ही परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळण्याचे थांबविलेत! 17 तेव्हा मी धरलेल्या त्या आज्ञापटाच्या पाट्या हातातून फेकून दिल्या आणि तुमच्या समोर त्यांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. 18 मग मी परमेश्वरापुढे जमिनीवर डोके टेकून पूर्वीप्रमाणेच चाळीस दिवस अन् चाळीस रात्र पालथा पडून राहिलो. तुमच्या घोर पापामुळे मी हे केले. परमेश्वराच्या दृष्टिने तुम्ही हे फार वाईट केले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतलात. 19 परमेश्वराच्या कोपाची मला भिती वाटत होती कारण संतापाच्या भरात त्याने तुमचा संहार केला असता. पण या ही वेळी परमेश्वराने माझे ऐकले. 20 अहरोनला तर तो संतापाने ठारच करणार होता. पण मी त्याच्यांसाठी प्रार्थना केली. 21 मग तुमचे ते पापीकृत्य तुम्ही केलेली वासराची मूर्ती मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करुन भस्म करुन टाकले व डोंगरावरुन वाहाणाऱ्या ओढ्यात फेकून दिले.
इस्राएल लोकांना क्षमा करणे बाबत मोशे देवाला विनंती करतो
22 “नंतर तबेरा, मस्सा व किब्रोथ-हत्तव्वा येथेही तुम्ही परमेश्वराला संतप्त केलेत. 23 परमेश्वराने तुम्हाला कादेश-बर्ण्या सोडण्यास सांगितले तेव्हाही तुम्ही त्याचे ऐकले नाहीत. त्याने तुम्हाला तो देत असलेला प्रदेश काबीज करायला सांगितले पण त्याचे सांगणे ऐकले नाहीत. त्याच्यावर भरवसा ठेवला नाहीत. त्याची आज्ञा पाळली नाहीत. 24 जेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो तेव्हापासून तुम्ही परमेश्वराचे ऐकण्यासाठी नेहमीच नकार दिलेला आहे.
येशू पित्याला प्रार्थना करतो(A)
21 त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात उल्हासित झाला, आणि म्हणाला, “हे पित्या, स्वार्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभु मी तुझी स्तुति करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे बरे वाटले ते तू केलेस.
22 “माइया पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या. आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रगट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.”
23 आणि शिष्यांकडे वळून तो एकांतात बोलला, “तुम्ही जे पाहता ते पाहणारे डोळे धन्य. 24 मी तुम्हांस सांगतो, अनेक राजांनी व संदेष्ट्यांनी तुम्ही जे पाहता ते पाहण्याची इच्छ बाळगली, परंतु त्यांनी ते पाहिले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते ऐकले नाही.”
2006 by World Bible Translation Center