Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 105:1-15

105 परमेश्वराला धन्यावाद द्या.
त्याच्या नावाचा धावा करा.
    राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
परमेश्वराला गाणे गा; त्याची स्तुतिगीते गा.
    तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
    तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
शक्तीसाठी परमेश्वराकडे जा.
    मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार
    आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात.
    तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
परमेश्वर आपला देव आहे.
    परमेश्वर सर्व जगावर [a] राज्य करतो.
परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा.
    हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा.
देवाने अब्राहामा बरोबर करार केला.
    देवाने इसहाकाला वचन दिले.
10 नंतर त्याने याकोबासाठी नियम केला.
    देवाने इस्राएल बरोबर करार केला.
    तो सदैव राहील.
11 देव म्हणाला, “मी तुला कनानची जमीन देईन.
    ती जमीन तुझ्या मालकीची होईल.”
12 अब्राहामाचे कुटुंब लहान होते, तेव्हा देवाने हे वचन दिले.
    ते केवळ काही वेळ तिथे घालवणारे परके लोक होते.
13 ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात,
    एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत होते.
14 पण देवाने लोकांना त्यांना वाईट वागणूक देऊ दिली नाही.
    देवाने राजांना त्यांना दुख: न देण्याची ताकीद दिली.
15 देव म्हणाला, “मी निवडलेल्या माणसांना दुख: देऊ नका.
    माझ्या संदेष्ट्यांचे काही वाईट करु नका.”

स्तोत्रसंहिता 105:16-41

16 देवाने त्या देशात दुष्काळ आणला.
    लोकांना खायला पुरेसे अन्न नव्हते.
17 पण देवाने योसेफ नावाच्या माणसाला त्यांच्या पुढे पाठवले.
    योसेफ गुलामा सारखा विकला गेला.
18 त्यांनी योसेफाच्या पायाला दोर बांधले.
    त्यांनी त्याच्या मानेभोवती लोखंडी कडे घातले.
19 योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला.
    परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द् झाले.
20 तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले.
    राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुरुंगातून बाहेर काढले.
21 त्याने योसेफाला आपल्या घराचा मुख्य नेमले.
    योसेफाने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.
22 योसेफाने इतर प्रमुखांना सूचना दिल्या.
    योसेफाने वृध्दांना शिकवले.
23 नंतर इस्राएल मिसरमध्ये आला.
    याकोब हामच्या देशातच राहिला.
24 याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले.
    ते त्यांच्या शत्रूंपेक्षा खूप बलवान झाले.
25 म्हणून मिसरचे लोक याकोबाच्या कुटुंबाचा द्वेष करु लागले.
    त्यांनी त्याच्या गुलामांविरुध्द योजना आखल्या.
26 म्हणून देवाने त्याचा सेवक मोशे आणि
    देवाने निवडलेला त्याचा याजक अहरोन यांना पाठविले.
27 देवाने मोशे आणि अहरोन यांचा हामच्या देशात
    अनेक चमत्कार करण्यात उपयोग करुन घेतला.
28 देवाने अतिशय दाट काळोख पाठवला,
    पण मिसरमधल्या लोकांनी त्याचे ऐकले नाही.
29 म्हणून देवाने पाण्याचे रक्तात रुपांतर केले
    आणि सगळे मासे मेले.
30 त्यांचा देश बेडकांनी भरुन गेला.
    राजाच्या शयनकक्षात देखील बेडूक होते.
31 देवाने आज्ञा केली आणि
    माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती.
32 देवाने पावसाचे गारात रुपांतर केले.
    सर्व देशांत विजा पडल्या.
33 देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली.
    देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले.
34 देवाने आज्ञा केली आणि टोळ व नाकतोडे आले.
    ते संख्येने इतके होते की ते मोजता येत नव्हते.
35 टोळ व नाकतोड्यांनी देशातली सर्व झाडे खाऊन टाकली.
    त्यांनी शेतातली सर्व पिके खाल्ली.
36 आणि नंतर देवाने त्यांच्या देशातल्या सर्व पहिल्या अपत्यांना ठार मारले.
    देवाने त्यांच्या मोठ्या मुलांना मारले.
37 नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले.
    त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली.
    देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.
38 देवाचे लोक गेल्याचे पाहून मिसरला आनंद झाला.
    कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती.
39 देवाने ढग पांघरुणासारखे पसरले.
    देवाने अग्नीच्या खांबाचा रात्री प्रकाशासाठी उपयोग केला.
40 लोकांनी अन्नाची मागणी केली आणि देवाने लावे आणले.
    देवाने त्यांना स्वर्गातली भाकरी भरपूर दिली.
41 देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले.
    वाळवटांत नदी वाहू लागली.

स्तोत्रसंहिता 105:42

42 देवाला त्याच्या पवित्र वचनाची आठवण होती.
    देवाला त्याचा सेवक अब्राहाम याला दिलेल्या वचनाची आठवण आली.

2 इतिहास 20:1-22

यहोशाफाटवर युध्दाचा प्रसंग

20 यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनीलोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटवर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशाफाटला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करुन येत आहे. ती हससोन-तामार!” (म्हणजेच एन-गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा.) यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वराला काय करावे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली. तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले. यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांमध्ये तो उभा राहिला. तो म्हणाला,

“आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रांमधल्या सर्व राज्यांचा तूच शास्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही. तूच आमचा परमेश्वर आहेस या प्रदेशातील रहिवाश्यांना तू हाकलून लावलेस. तुझ्या या इस्राएलांदेखतच तू हे केलेस. तुझा मित्र अब्राहाम याच्या वंशजांना तू ही भूमी कायमची बहाल केलीस. अब्राहामाचे वंशज या प्रदेशात राहिले आणि तुझ्या नावाखातर त्यांनी मंदिर बांधले. ते म्हणाले, ‘तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे. संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु. आमची हाक ऐकून तू आम्हाला सोडव.’

10 “पण यावेळी अम्मोन, मवाब आणि सेइर पर्वत या भागातले हे लोक आहेत. इस्राएल लोक मिसरहून आले तेव्हा इस्राएल लोकांना तू त्यांच्या प्रदेशात प्रवेश करु दिला नाहीस. त्यामुळे इस्राएल लोकांनी तिकडे पाठ फिरवली आणि त्यांचे उच्चाटन केले नाही. 11 पण तेव्हाच त्यांचा नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हाला आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हाला बहाल केला आहेस. 12 देवा, या लोकांना चांगले शासन कर. आमच्यावर चाल करुन येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हाला काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आम्ही मदतीसाठी तुझ्याकडे आलो आहोत.”

13 यहूदातील सर्व मंडळी आपल्या बायका आणि तान्ह्या मुलांसकट सर्व मुलाबाळांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती. 14 तेव्हा यहजीएल याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. यहजीएल हा जखऱ्याचा मुलगा. जखऱ्या बनायाचा मुलगा. बनाया यईएलचा मुलगा. आणि यईएल मत्तन्याचा मुलगा. यहजीएल लेवी असून आसाफच्या वंशातला होता. या सभेत 15 यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरुशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. ‘एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे. 16 उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल. 17 तुम्हाला या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हाला आढळून येईल. यहूदा आणि यरुशलेम लोक हो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.’”

18 यहोशाफाटने मस्तक भूमीपर्यंत लववले. यहूदा आणि यरुशलेममधील सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे दंडवत घातले. त्या सर्वांनी परमेश्वराची आराधना केली. 19 कहाथ आणि कोरह या घराण्यांतील लेवी इस्राएलच्या परमेश्वर देवाची भजने म्हणण्यास उभे राहिले. उच्च स्वरात त्यांनी परमेश्वराची भजने म्हटली.

20 यहोशाफाटचे सैन्य भल्यासकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले. ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला, “यहूदा आणि यरुशलेम नगरांमधील लोकहो, ऐका. आपल्या परमेश्वर देवावर श्रध्दा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा. जय तुमचाच आहे.”

21 यहोशाफाटने लोकांना प्रोत्साहन दिले व सुचना दिल्या.परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यांनी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले,

“परमेश्वराचे स्तवन करा
    कारण त्याची प्रीति सर्वकाळ आहे.”

22 लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने चाल करुन आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेइर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली.

लूक 13:22-31

अरुंद दरवाजा(A)

22 येशू गावागावांतून आणि खेड्यापाड्यांतून जात असता व यरुशलेमाच्या दिशेने वाटचाल करीत असता तो लोकांना शिकवीत होता. 23 कोणीतरी त्याला विचारले, “प्रभु, फक्त थोड्या लोकांचेच तारण होईल का?”

तो त्यांना म्हणाला, 24 “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हांला सांगतो की, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही. 25 जेव्हा घराचा मालक उठून दार बंद करील, तेव्हा तुम्ही बाहेर उभे राहाल व दार ठोठवाल. आणि म्हणाल, ‘प्रभु, आम्हांसाठी दार उघडा!’ परंतु तो तुम्हांला उत्तर देईल, ‘तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.’ 26 नंतर तुम्ही म्हणाल, ‘आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!’ 27 आणि तो तुम्हांला म्हणेल, ‘तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, जे तुम्ही दुष्टपणा करता ते सर्व माझ्यापासून निघून जा.’

28 “तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला, आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर फेकलेले असाल. 29 आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील. 30 लक्षात ठेवा की, जे शेवटचे आहेत ते पहिले होतील, व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील.”

येशू यरुशलेमामध्ये मरण पावेल(B)

31 त्यावेळी काही परुशी येशूकडे आले. आणि ते त्याला म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हांला ठार मारणार आहे.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center