Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 34:29-35

मोशेचा सतेज चेहरा

29 मग मोशे, पवित्रकरार लिहिलेल्या त्या दोन दगडी पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरला; परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजाने तळपत होता, परंतु ते त्याला ठाऊक नव्हते. 30 अहरोन व सर्व इस्राएल लोक यांनी मोशेच्या चेहऱ्यावरील तेजस्वी किरणे पाहिली तेव्हा ते त्याच्या जवळ जाण्यास घाबरले; 31 परंतु मोशेने त्यांना बोलावले तेव्हा अहरोन व इस्राएल लोकांचे वडीलजन त्याच्याकडे गेले तेव्हा तो त्यांच्याशी बोलला. 32 त्यानंतर सर्व इस्राएल लोक मोशेकडे आले आणि त्याने त्यांना परमेश्वराने त्याला सीनाय पर्वतावर दिलेल्या आज्ञा दिल्या.

33 लोकांशी आपले बोलणे संपविल्यावर मोशेने आपला चेहरा आच्छादनाने झाकला. 34 जेव्हा कधीही मोशे परमेश्वराबरोबर बोलावयास त्याच्या समोर जाई, तेव्हा तो आपल्या चेहऱ्यावरील आच्छादन काढीत असे; मग तो इस्राएल लोकांकडे येऊन परमेश्वराने दिलेल्या आज्ञा त्यांना सांगत असे. 35 मोशेचा तेजाने तळपणारा चेहरा इस्राएल लोक पाहात तेव्हा तो पुन्हा आपला चेहरा झाकून घेई; आणि तो बोलावयास पुन्हा परमेश्वराकडे जाईपर्यंत आपला चेहरा झाकून ठेवी.

स्तोत्रसंहिता 99

99 परमेश्वर राजा आहे
    म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या.
देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो
    म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.
सियोन मधला परमेश्वर महान आहे.
    तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.
सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे.
    देवाचे नाव भीतीदायक आहे.
    देव पवित्र आहे.
बलवान राजाला न्यायीपणा आवडतो.
    देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि
    प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.
परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि
    त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.
मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते
    आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता.
त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली
    आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
देव उंच ढगांतून बोलला.
    त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या
    आणि देवाने त्यांना नियम दिले.
परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस,
    तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस
    आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा.
    परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे.

2 करिंथकरांस 3:12-4:2

12 म्हणून आम्हांला अशी आशा असल्यामुळे, आम्ही फार धीट आहोत. 13 आम्ही मोशेप्रमाणे नाही, ज्याने तोंडावर आवरण घेऊन त्याच्या चेहऱ्याच्या तेजामुळे (इस्राएली लोकांचे डोळे दिपून जाऊ नयेत) त्याचा चेहरा लोकांना दिसणार नाही म्हणून तोंड झाकून घेतले, जरी त्या वेळेला त्याचे तेज कमी होत चालले होते. 14 पण त्यांची मने मंद करण्यात आली होती. कारण आजपर्यंत तोच पडदा (आवरण) राहतो, जेव्हा जुना करार वाचला जातो. तो हटवण्यात आलेला नाही. कारण केवळ ख्रिस्तामध्येच तो बाजूला घेतला जाईल. 15 तरी आजपर्यंत जेव्हा मोशेचे ग्रंथ वाचतात तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन राहते. 16 पण जेव्हा केव्हा कोणी प्रभूकडे वळतो तेव्हा ते आवरण काढून घेतले जाते. 17 प्रभु आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे. 18 तर आपण सर्वजण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभुचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता, प्रभु जो आत्मा याच्यापासून गौरवातून गौरवात असे त्याच्या प्रतिरुपात रुपांतरीत होत जातो.

मातीच्या भांड्यातील आध्यत्मिक ठेवा

म्हणून देवाच्या दयेद्वारे आम्हाला ही सेवा मिळाली आहे, आम्ही धीर सोडत नाही. तर आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी सोडून दिल्या आहेत, आम्ही कपटाने वागत नाही. आणि कपटदृष्टीने देवाच्या वचनाचा उपयोग करीत नाही, तर देवासमोर खरेपण प्रगट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सदविवेकबुध्दिला पटवितो.

लूक 9:28-36

मोशे, एलीया आणि ख्रिस्त(A)

28 मग असे झाले की, तो असे बोलल्यावर साधारणपणे आठ दिवसांनंतर, आपल्याबरोबर पेत्र, योहान व याकोब यांना घेऊन डोंगरावर प्रार्थना करण्यास गेला. 29 मग असे घडले की, तो प्रार्थना करीत असताना त्याच्या चेहऱ्याचे रुप पालटले व त्याचे कपडे डोळे दिपविण्याएवढे पांढरेशुभ्र झाले. 30 आणि तेथे दोघे जण त्याच्याबरोबर बोलत होते. ते एलीया व मोशे होते. ते गौरवामध्ये प्रगट झाले होते, 31 आणि ते येशूच्या मरणाविषयी, जे तो यरुशलेमामध्ये पूर्ण करणार होता, त्याविषयी बोलत होते. 32 पण पेत्र व त्याच्याबरोबर असलेले सर्व झोपी गेले होते, जेव्हा ते जागे झाले, त्यांनी येशूचे गौरव पाहिले, आणि दोन मनुष्यांना त्याच्याबरोबर उभे असलेले पाहिले. 33 मग असे झाले की, ते दोघे जण येशूपासून विभक्त होत असताना, पेत्र येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही येथे आहोत ते चांगले झाले. आपण तीन मंडप तयार करु या, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” (तो काय बोलत होता हे त्याचे त्याला कळत नव्हते.)

34 पण तो या गोष्टी सांगत असता एक मेघ खाली आला आणि त्याने छायेने झाकून टाकले. त्यांनी मेघामध्ये प्रवेश केल्यानंतर ते घाबरले. 35 आणि त्यानां वेढलेल्या ढगातून एक वाणी ऐकू आली; ती म्हणाली, “हा माझा पुत्र आहे; तो माझा निवडलेला आहे, त्याचे ऐका.”

36 जेव्हा वाणी झाली तेव्हा येशू एकटाच तेथे होता. आणि याविषयी ते गप्प राहिले. त्यांनी त्यावेळी जे काही पाहिले होते त्याविषयी कोणालाही काही सांगितले नाही.

लूक 9:37-43

येशू भूतग्रस्त मुलाला बरे करतो(A)

37 नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की, जेव्हा ते डोंगरावरुन खाली आले तेव्हा मोठा जमाव येशूला भेटण्यासाठी आला. 38 आणि त्याचवेळी जमावातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, “गुरुजी, मी तुम्हांला विनंति करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे. 39 एकाएकी त्याला अशुद्ध आत्मा धरतो व तो अचानक किंचाळतो, आणि तो त्याला झटके देईपर्यंत पिळतो, त्यामुळे त्याच्या तोंडाला फेस येतो, तो त्याला सोडीत नाही व त्याला गलितगात्र करतो. 40 मी तुमच्या शिष्यांना तो अशुद्ध आत्मा काढण्याची विनंति केली, पण त्यांना ते शक्य झाले नाही.”

41 येशू म्हणाला अहो, “अविश्वासू व चुकलेल्या लोकांनो! मी तुमच्याबरोबर किती काळ राहू व किती काळ तुमचे सोसू? त्या मुलाला इकडे आणा.”

42 परंतु तो येत असतानाच भुताने त्याला पाडले आणि पिळवटले. येशूने अशुद्ध आत्म्याला धमकावले. त्याने मुलाला बरे केले आणि त्याला त्याच्या वडिलांजवळ परत दिले. 43 देवाचा महिमा पाहून ते सर्व फार आश्चर्यचकित झाले.

येशू त्याच्या मरणाविषयी सांगतो(B)

पण सर्व लोक येशूने जे केले त्याविषयी आश्चर्य व्यक्त करीत असताना, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center