Revised Common Lectionary (Semicontinuous)
कनानमधील पहिला वल्हांडणाचा सण
9 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुम्ही मिसरमध्ये गुलाम होतात. आणि या गोष्टीची तुम्हाला लाज वाटत असे. पण आज मी हा कलंक धुवून काढला आहे.” म्हणून यहोशवाने त्या जागेचे नामकरण “गिलगाल” असे केले. आजही गिलगाल म्हणूनच तो भाग ओळखला जातो.
10 यरीहोच्या पठारावर गिलगाल येथे मुक्काम असताना इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा सण साजरा केला. ती त्या महिन्याची चतुर्दशीची संध्याकाळ होती. 11 वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी तेथे त्यांनी पिकलेल्या धान्याचा हुरडा खाल्ला. तसेच बेखमीर भाकर त्यांनी खाल्ली. 12 दुसऱ्या दिवसापासून स्वर्गातील खास अन्न म्हणजेच मान्ना येणे बंद झाले. कनानातील भूमीत पिकलेले अन्न लोकांनी खाल्ल्यानंतर हे झाले त्यावेळेपासून इस्राएलांना स्वर्गातील खास अन्न मिळाले नाही.
दावीदाचे एक स्तोत्र.
32 ज्याच्या अपराधांची क्षमा केली गेली
आहे तो अत्यंत सुखी आहे
ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.
2 परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे.
जो स्वत:चे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे.
3 देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली
परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही
प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.
4 देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास,
मी उष्ण उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो.
5 परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला.
परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले.
आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
6 याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी.
संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
7 देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस.
तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस
तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस
म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो.
8 परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे
या विषयी मार्गदर्शन करीन.
मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.
9 म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा.
या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”
10 वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल,
परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा.
शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!
16 म्हणून आतापासून जगिक दृष्टीकोनातून आम्ही कोणाला मानत नाही, तरी एकेकाळी आम्ही ख्रिस्ताला अशाप्रकारे मानले. पण आता आम्ही तसे करीत नाही. 17 म्हणून, जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी उत्पत्ति आहे. जुने गेल आहे. नवीन आले आहे! 18 हे सर्व देवापासून आहे त्याने ख्रिस्ताद्वारे आमच्याशी स्वतःचा समेट केला आणि आम्हांला समेटाची सेवा दिली. 19 देव ख्रिस्तामध्ये जगाशी स्वतःचा समेट करीत होता. मनुष्यांची पापे त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हता. आणि त्याने आम्हांला समेटाचा संदेश दिला आहे. 20 म्हणून आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काय देव आमच्या द्वारे त्याचे आवाहन करीत होता. ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हांला विनंति करतो. देवाशी समेट करा. 21 ज्याच्याठायी पाप नव्हते त्याला आमच्यासाठी देवाने पाप केले. यासाठी की त्याच्यामध्ये आम्ही देवाचे नीतिमत्व व्हावे.
स्वर्गातील आनंद(A)
15 सर्व पापी लोक त्याचे ऐकायला त्याच्याकडे येत होते. 2 तेव्हा परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करु लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर जेवतो!”
3 मग येशूने त्यांना ही गोष्टी सांगितली.
घर सोडून गेलेला मुलगा
11 मग येशू म्हणाला, “एका मनुष्याला दोन मुलगे होते. 12 त्यापैकी धाकटा म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या.’ आणि वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये विभागली.
13 “नंतर फार दिवस झाले नाहीत तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली. 14 त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर, त्या देशांत भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली. 15 मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करु लागला. त्या नागरिकाने त्याला डुकरे चारावयास पाठविले. 16 तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होई, पण कोणी त्याला काहीही दिले नाही.
17 “नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, ‘माझ्या पित्याच्या घरी किती तरी मजुरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे! 18 मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वार्गाविरुद्ध (देवाविरुद्ध) आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. 19 तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. मला आपल्या रोजंदारीवरील मजुरांसारखे ठेवा.’ 20 मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला.
मुलगा परततो
“तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्यात पडले आणि त्याचे मुके घेतले. 21 मुलगा त्यांना म्हणाला, ‘बाबा, मी स्वार्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.’
22 “परंतु वडील आपल्या नोकरांस म्हणाले, ‘त्वरा करा, चांगला झगा आणून त्याला घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. 23 आणि पुष्ट वासरु आणून कापा, आपण खाऊ आणि आनंद करु! 24 कारण हा माझा मुलगा मेला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ व ते आनंद करु लागले.
मोठा मुलगा येतो
25 “त्याचा मोठा मुलगा शेतात होता. तो घराकडे निघाला. जेव्हा तो घराजवळ आला, तेव्हा त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला. 26 त्याने एका नोकराला बोलावून विचारले, ‘हे सर्व काय चालले आहे?’ 27 तो नोकर त्याला म्हणाला. ‘तुमचा भाऊ आला आहे. तो सुखरुप आला म्हणून तुमच्या वडिलांनी पुष्ट वासरु कापले आहे.’
28 “मोठा मुलगा रागावला त्याला आत जाण्याची इच्छा होईना. तेव्हा वडिलांनी येऊन त्याची समजूत काढली. 29 परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, ‘पाहा, इतकी वर्षे मी तुमचीसेवा केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही! मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी बकरीसुद्धा दिली नाही. 30 ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांसाठी उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरु कापले!’
31 “वडील त्याला म्हणाले, ‘माझ्या मुला, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. 32 आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.’”
2006 by World Bible Translation Center