Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 26:1-11

पहिले उत्पन्न

26 “लौकरच तुम्ही तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात पाऊल टाकून तेथील जमिनीचा ताबा घेऊन, तेथे राहाल. तेथील परमेश्वराने दिलेल्या शेतजमिनीचे सर्व उत्पन्न गोळा कराल. तेव्हा पहिले पीक टोपल्यात भरुन त्या घेऊन तुमचा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या त्याच्या पवित्र निवासस्थानी जा. त्यावेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन सांगा की परमेश्वराने आमच्या पूर्वजांना आम्हांला जमीन देण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे मी येथे पोहोंचलो आहे, हे सांगायला मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दारी आलो आहे!

“मग तो याजक तुमच्या हातून ती टोपली घेईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर तो ती खाली ठेवील. तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यासमोर असे म्हणावे, ‘आमचा पूर्वज हा भटकणारा अरामी होता, तो खाली मिसरमध्ये जाऊन राहिला. तिथे पोहोंचला तेव्हा त्याचा परिवार लहान होता. पण मिसरमध्ये त्याचे महान व सामर्थ्यशाली राष्ट्र बनले. तेथे मिसरी लोकांनी आम्हाला वाईट वागणूक दिली. आम्हाला गुलाम बनवले. जबरदस्तीने कष्टाच्या कामाला जुंपले व छळ केला. मग आम्ही परमेश्वर जो आमच्या पूर्वजांचा देव ह्याचा धावा केला. त्यांच्या बद्दलची गाऱ्हाणी सांगितली. परमेश्वराने आमचे ऐकले. त्याने आमचा त्रास, आमचे कष्ट आणि छळ त्याने पाहिले. मग त्याने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हाला मिसरमधून बाहेर आणले. तेव्हा त्याने मोठे चमत्कार प्रताप दाखवले आणि उत्पात घडवले. आणि येथे आम्हाला आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हाला दिली. 10 आता हे परमेश्वरा, त्या भूमीतील पहिले उत्पन्न आम्ही आणले आहे.’

“मग तो उत्पन्नाचा वाटा परमेश्वरासमोर ठेवून परमेश्वराला वंदन करा. 11 त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यात लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करुन घ्या.

स्तोत्रसंहिता 91:1-2

91 तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता.
    तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.
मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला,
    माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”

स्तोत्रसंहिता 91:9-16

का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता.
    परात्पर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे.
10 तुमचे काहीही वाईट होणार नाही.
    तुमच्या घरात रोगराई असणार नाही.
11 देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल
    आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील.
12 तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून
    ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरतील.
13 तुमच्याजवळ सिंहावरुन आणि
    विषारी सापांवरुन चालण्याची शक्ती असेल.
14 परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन.
    जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.
15 माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो.
    ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन.
    मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन.
16 मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.
    आणि त्यांना वाचवीन.”

रोमकरांस 10:8-13

नाही! शास्त्र काय म्हणते? “ते वचन तुमच्याजवळ, तुमच्या मुखात, तुमच्या अंतःकरणात आहे.” [a] ते वचन हे आहे की, जर तू तुझ्या मुखाने “येशू प्रभु आहे” असा विश्वास धरतोस आणि आपल्या अंतःकरणात देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा विश्वास धरतोस तुझे तारण होईल 10 कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंतःकरणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो.

11 शास्त्र सांगते, “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.” [b] 12 याचे कारण की, यहूदी आणि ग्रीक यांच्यात भेद नाही. कारण प्रभु हा सर्वांचा प्रभु आहे. जे हाक मारतात त्या सर्वांवर दया करण्या इतका तो संपन्र आहे. 13 कारण “जे कोणी प्रभूचे नाव घेऊन हाक मारतील, त्यांचे तारण होईल.” [c]

लूक 4:1-13

येशूची परीक्षा(A)

येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरुन यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले. तेथे सैतानाने त्याला चाळीस दिवस मोहात टाकले. त्या दिवसांत येशूने काहीही खाल्ले नाही. जेव्हा ती वेळ संपली, तेव्हा येशूला भूक लागली.

सैतान त्याला म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस, तर या दगडांची भाकर करुन दाखव.”

येशून त्याला उत्तर दिले, “असे लिहिले आहे:

‘मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.’” (B)

मग सैतान त्याला वर घेऊन गेला. आणि एका क्षणात जगातील सर्व राज्ये त्याला दाखविली. सैतान त्याला म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व गौरव देईन कारण ते मला दिलेले आहे. आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो. जर तू माझी उपसना करशील, तर हे सर्व तुझे होईल.”

येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे:

‘तू प्रभु तुझा देव याचीच उपासना केली पाहिजे,
    आणि फक्त त्याचीच सेवा केली पाहिजे.’” (C)

नंतर त्याने त्याला यरुशलेमाला नेले. आणि मंदिराच्या उंच टोकावर त्याला उभे केले. आणि तो म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार! 10 असे लिहिले आहे:

‘तो मुझे संरक्षण करण्याची
    देवादूतांना आज्ञा करील.’ (D)

11 आणि असेही लिहीले आहे:

‘ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील,
    त्यामुळे तुझा पाय दगडावर आपटणार नाही.’” (E)

12 येशून उत्तर दिले. “पवित्र शास्त्रत असेही म्हटले आहे,

‘तु प्रभु, तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस.’” (F)

13 म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे भुरळ घालण्याचे संपविल्यावर, योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center