Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 12:1-4

वल्हांडण

12 मोशे व अहरोन अद्याप मिसरमध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, “हा तुमच्या वर्षाचा पहिला महिना असे. [a] ही आज्ञा इस्राएलच्या सर्व जनसमूहासाठी आहे; ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक माणसाने आपल्या कुटुंबातील माणसाकरिता एक कोकरा घ्यावा. जर तो संपूर्ण कोकरा, घरातील माणसांना सरणार नसेल तर त्याने आपल्या भोजनात वाटेकरी होण्यासाठी आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना निमंत्रण द्यावे.

निर्गम 12:5-10

तो कोकरा, एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निरोगी असावा तो कोकरा मेंढ्यातला किंवा बकऱ्यातला असावा. ह्या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्या मेढ्याची किंवा बकऱ्याची निगा राखावी व त्यावर लक्ष ठेवावे. चौदाव्या दिवशी सर्व इस्राएल लोकांनी कातरवेळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर व अंधार पडण्यापूर्वी आपापल्या मेंढ्याचा किंवा बकऱ्याचा वध करावा. त्यांचे रक्त गोळा करून ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दाराच्या कपाळ पट्ट्यांवर व दोन्ही बाजूंच्या चौकटींना लावावे.

“त्याच रात्री तो मेंढा किंवा बकरा विस्तावावर भाजावा आणि कडू भाजी व बेखमीर भाकरी बरोबर त्याचे सर्व मांस खाऊन टाकावे; तुम्ही त्याचे मांस कच्चे किंवा पाण्यात शिजवून खाऊ नये तर विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतंडी ही सुद्धा भाजून खावीत. 10 त्या रात्रीच ते सर्व मांस खावे; त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि जर काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे.”

निर्गम 12:11-14

11 ते खाण्या अगोदर तुम्ही प्रवासास जाण्याच्या तयारीने अंगावर कपडे घालावेत, पायात जोडे घालावेत आणि हातात काठी घ्यावी आणि मग घाईघाईने ते मांस खावे; कारण हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.

12 “आज रात्री मी मिसर देशभर फिरेन आणि त्यातील प्रथम जन्मलेल्या मुलांना व जनावरांतील नरांना मी मारून टाकीन, आणि मिसरमधील सर्व दैवतांना धडा शिकवून दाखवीन की मी परमेश्वर आहे. 13 परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक विशेष खूण असेल. मी जेव्हा ती पाहीन तेव्हा ते घर ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसरच्या लोकांना मारीन तेव्हा कोणतीही विनाशकारी पीडा तुम्हांवर येणार नाही व तुम्हाला अपाय करणार नाही.

14 “अशा रीतीने आजची रात्र कायमची तुमच्या आठवणीत राहील. हा दिवस तुम्हासाठी विशेष उत्सवाचा म्हणजे सणाचा दिवस असेल. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा नियम म्हणून पाळावा.

स्तोत्रसंहिता 116:1-2

116 परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो
    ते मला खूप आवडते.
मी त्याला मदतीसाठी हाक मारतो
    आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते.

स्तोत्रसंहिता 116:12-19

12 मी परमेश्वराला काय देऊ शकतो?
    माझ्या जवळ जे आहे ते मला परमेश्वरानेच दिले आहे.
13 त्याने मला वाचवले म्हणून मी त्याला पेय अर्पण करीन
    आणि मी परमेश्वराला त्याच्या नावाने हाक मारीन.
14 मी परमेश्वराला कबूल केलेल्या गोष्टी देईन.
    आता मी त्याच्या लोकांसमोर जाईन.

15 परमेश्वराच्या एखाद्या भक्ताचा मृत्यू परमेश्वराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतो.
    परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
16 मी तुझा सेवक आहे.
    मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे.
    परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.
17 मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन.
    मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
18 मी कबूल केलेल्या गोष्टी परमेश्वराला देईन.
    आता मी त्याच्या सर्व लोकांसमोर जाईन.

19 मी यरुशलेम मध्या मंदिरात जाईन.

परमेश्वराचा जयजयकार करा.

1 करिंथकरांस 11:23-26

23 कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हांला दिले. प्रभु येशूला ज्या रात्री मारण्यासाठी धरुन देण्यात आले. त्याने भाकर घेतली. 24 आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, “हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.” 25 त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने द्राक्षारसाचा प्याला घेतला आणि म्हणाला, “हा द्राक्षारसाचा प्याला माझ्या रक्ताने स्थापित केलेला नवा करार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही द्राक्षारस प्याल तेव्हा माझी आठवण करण्यासाठी हे करा.” 26 कारण जितके वेळा तुम्ही ही भाकर खाता व हा द्राक्षारसाचा प्याला पिता, तितके वेळा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.

योहान 13:1-17

येशू त्याच्या शिष्यांचे पाय धुतो

13 मग वल्हांडण सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून पित्याकडे जावे असा समय आला आहे, हे जाणून आपले स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीति केली.

मग संध्याकाळचे भोजन होण्याच्या वेळेस सैतानाने शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याच्या मनात त्याला शत्रूंच्या हाती घावे असे आधीच घालून दिले असताना, आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो आणि आता देवाकडे जातो हे ओळखून, येशू जेवणावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन आपल्या कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला. आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने पुसू लागला.

मग तो शिमोन पेत्राकडे आला; पण पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, तू माझे पाय धुणार काय?”

येशूने उत्तर दिले, “मी आता जे करीत आहे, ते तुला आता कळणार नाही, तर पुढे तुला कळेल.”

पेत्र त्याला म्हणाला, “तू माझे पाय कधीही धुवायचे नाहीत.”

येशूने उत्तर दिले, “जर मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही.”

शिमोन पेत्राने उत्तर दिले,“मग प्रभु माझे पायच नव्हे तर हात व डोकेही धुवा.”

10 येशूने उत्तर दिले, “ज्याची आंघोळ झाली आहे, त्याचे फक्त पाय धुतले तरी चालेल, कारण तो स्वच्छच आहे. तुम्ही स्वच्छ आहात पण सर्वच नाहीत.” 11 आपल्याला कोण धरून देणार हे येशूला माहीत होते, म्हणून “तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत” असे तो म्हणाला.

12 जेव्हा त्याने त्याचे पाय धुण्याचे संपविले तेव्हा त्याने आपली बाह्यवस्त्रे घातली व आपल्या जागेवर आला. त्याने त्यांना विचारले, “मी काय केले हे तुम्हांला समजले काय? 13 तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभु’ म्हणता आणि योग्य म्हणता, कारण मी तोच आहे. 14 म्हणून मी जो प्रभु आणि गुरु असूनही मी तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे. 15 कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला उदाहरण घालून दिले. 16 मी खरे सांगतो, दास आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नाही आणि पाठविलेला ज्याने पाठविले त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. 17 या गोष्टी जर तुम्ही समजता आणि त्या तुम्ही जर केल्या तर तुम्ही आशीर्वादित आहात.

योहान 13:31-35

येशू त्याच्या मरणाविषयी बोलतो

31 तो गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे. 32 देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे गौरव लवकर करील.”

33 “माझ्या मुलांनो, अजून थोडा वेळ मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूद्यांस सांगितले की, जेथे मी जातो तेथे तुमच्याने येता येणार नाही, तसेच मी तुम्हांलाही आता सांगतो.

34 “मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. जशी मी तुम्हांवर प्रीति केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीति करा. 35 तुमची एकमेकांवर प्रिति असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center