Revised Common Lectionary (Semicontinuous)
9 परमेश्वरा, माझ्यावर खूप संकटे आली आहेत.
म्हणून माझ्यावर दया कर.
मी इतका दुखी: कष्टी झालो आहे की माझे डोळे क्षीण झाले आहेत,माझ्या पोटासह माझे आंतले अवयव दुखत आहेत.
10 माझ्या आयुष्याचा दु:खात शेवट होणार आहे
माझी वर्षे सुस्कारा टाकण्यात निघून जाणार आहेत.
माझी संकटे माझी शक्ती पिऊन टाकत आहेत.
माझी शक्ती मला सोडून जात आहे.
11 माझे शत्रू माझा तिरस्कार करतात
आणि माझे सगळे शेजारी सुध्दा माझा तिरस्कार करतात
माझे सगळे नातेवाईक मला रस्त्यात बघतात
तेव्हा ते मला घाबरतात आणि मला चुकवतात.
12 मी हरवलेल्या हत्यारासारखा आहे
लोक मला पूर्णपणे विसरुन गेले आहेत.
13 लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो.
ते लोक माझ्याविरुध्द गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत.
14 परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे.
तूच माझा देव आहेस.
15 माझे जीवन तुझ्या हाती आहे.
मला माझ्या शत्रूंपासून वाचव.
काही लोक माझा पाठलाग करीत आहेत
त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
16 कृपा करुन तुझ्या सेवकाचे स्वागत कर आणि त्याचा स्वीकार कर.
माझ्यावर दया कर आणि माझे रक्षण कर.
पवित्र सण
23 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना असे सांग. परमेश्वराने नेमलेल सण, पवित्र मेळे भरवण्यासाठी म्हणून तुम्ही जाहीर करावे; ते माझे नेमलेले पवित्र सण असे.
शब्बाथ दिबस
3 “सहा दिवस कामकाज करावे, परंतु सातवा दिवस, विसाव्याचा शब्बाथ दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये; तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.
वल्हांडण सण
4 “परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे; ते हे, 5 पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळापासून परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
बेखमीर भाकरीचा सण
6 “त्याच निसान महिन्याच्या पंधराव्या दिवशी बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही सात दिवस बेखमीर-खमीर न घातलेली भाकर खावी. 7 सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये. 8 सात दिवस तुम्ही परमेश्वराकरिता अग्रीत हव्य अर्पावे आणि सातव्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी काही काम करु नये:”
यहूदी पुढारी येशूला ठार मारावयास टपतात(A)
22 नंतर बेखमीर भाकरीचा सण ज्याला वल्हांडण म्हणतात, तो समय जवळ येत होता. 2 आणि मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, येशूला कसे मारता येईल हे बघत होते. कारण त्यांना लोकांची भीति वाटत होती.
यहूदा येशूचा शत्रु होतो(B)
3 नंतर सैतान यहूदामध्ये, ज्याला इस्कर्योत म्हणत, व जो बारा जणांपैकी एक होता, त्याच्यात शिरला. 4 यहूदा मुख्य याजक व मंदिराचे अधिकारी यांच्याकडे गेला आणि येशूला त्यांच्या हाती कसे धरुन देता येईल याविषयी त्याने बोलणी केली. 5 त्यांना फार आनंद झाला व त्यांनी त्याला पैसे देण्याचे मान्य केले. 6 म्हणून त्याने संमति दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरुन त्यांच्या हाती देण्याची संधि शोधू लागला.
वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी(C)
7 बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला. 8 तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठविले की, “जा आणि आपणांसाठी वल्हांडण सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ.”
9 पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही ते कोठे करावे अशी तुमची इच्छा आहे?”
10 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हांला भेटेल. तो ज्या घरात जाईल तेथे जा. 11 आणि घरमालकांस सांगा, ‘गुरुजींनी तुम्हांला विचारले आहे की, माझ्या शिष्यांसह वल्हांडण सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे?’ 12 तो मनुष्य तुम्हांला माडीवरील सजविलेली खोली दाखवील. तेथे तयारी करा.”
13 तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
2006 by World Bible Translation Center