Revised Common Lectionary (Semicontinuous)
150 परमेश्वराची स्तुती करा.
देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा.
2 देव ज्या महान गोष्टी करतो त्याबद्दल त्याची स्तुती करा.
त्याच्या सर्व मोठेपणाबद्दल त्याची स्तुती करा.
3 तुतारी आणि कर्णा वाजवून देवाचे गुणगान करा.
सतारीवर आणि वीणेवर त्याचे गुणगान करा.
4 डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा.
तंतुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा.
5 जोर जोरात टाळ वाजवून देवाची स्तुती करा.
झणझणणाऱ्या झांजांवर त्याचे गुणगान करा.
6 प्रत्येक जिवंत वस्तू परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती कर.
19 तुझे भाऊ शौल आणि इतर इस्राएली सैनिक यांच्या बरोबर एलाच्या खोऱ्यात आहेत. पलिष्ट्यांबरोबर त्यांची लढाई आहे.”
20 दुसऱ्या दिवशी दावीदाने आपली मेंढरे दुसऱ्या एका मेंढपाळाच्या हाती सोपवली आणि तो इशायच्या म्हणण्याप्रमाणे सर्व सामान घेऊन निघाला. दावीद आपली गाडी घेऊन तळाशी पोचला तेव्हा सर्व सैनिक रणगर्जना करत आपापल्या युध्दव्यूहातल्या जागांवर चालले होते. 21 इस्राएलचे सैन्य आणि पलिष्टी समोरासमोर उभे होते.
22 आपले सामान रसदीच्या राखणदारावर सोपवून दावीद सैन्याकडे धावला. भावांचा शोध घेऊन. 23 त्याने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. तेवढ्यात पलिष्ट्यांचा गथ येथील झूंजार सैनिक गल्याथ आपल्या सैन्यातून बाहेर येऊन नेहमी प्रमाणे इस्राएलला आव्हान देऊ लागला. ते सर्व दावीदाने ऐकले.
24 गल्याथला पाहून इस्राएल सैनिकांनी भीतीने पळ काढला. 25 त्यातला एक इस्राएली म्हणाला, “बघितलंस त्याला? पाहून घे. हा गल्याथ पुन्हा पुन्हा येऊन इस्राएलची निर्भत्सना करतो. जो कोणी त्याला ठार करील त्याला शौल राजा भरपूर द्रव्य देईल. आपल्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून देईल. शिवाय इस्राएलमध्ये त्याचे घराणे स्वतंत्र करील.”
26 दावीदाने आपल्या आसपासच्या लोकांना विचारले, “काय म्हणाला तो? या पलिष्ट्याला ठार करुन इस्राएलवरचा कलंक पुसून टाकणाऱ्याला इनाम काय आहे? आणि हा गल्याथ तरी एवढा कोण? बोलूनचालून परका. [a] एक पलिष्टी आमच्या जीवंत परमेश्वराच्या सैन्याविरुद्ध बोलतो म्हणजे काय?”
27 तेव्हा इस्राएली सैनिकांनी पुन्हा एकदा दावीदला इनाम काय ते सांगितले. 28 अलीयाबने दावीदला सैनिकांशी बोलत असताना पाहिले. त्याला दावीदचा राग आला. अलीयाबने दावीदला रागाने विचारले, “तू इथे का आलास? आणि वाळवंटात आपळी मेंढरे कोणापाशी सोडून आलास? मला माहीत आहे तू इथे का आलास ते! तुला जे करायला सांगितले ते करायला नको. नुसती लढाई बघत बसायला आलास.”
29 दावीद म्हणाला, “माझं काय चुकलं? मी फक्त बोलत होतो.” 30 दावीदाने मग इतरांनाही तेच विचारले. पूर्वीसारखीच उत्तरे त्याला मिळाली.
31 काहींनी दावीदला बोलताना ऐकले. त्यांनी त्याला शौल कडे नेले आणि दावीदचे शब्द त्याच्या कानावर घातले. 32 दावीद शौलाला म्हणाला, “गल्याथच्या बोलण्याने लोकांनी खचून जाता कामा नये. मी तुमच्या सेवेला हजर आहे. त्या पलिष्ट्याचा मी सामना करतो.”
यहूदी प्रेषितांना मना करण्याचा प्रयत्न करतात
17 प्रमुख याजक आणि त्याचे सर्व मित्र (सदूकी नावाचा एक गट) यांना फार हेवा वाट लागला. 18 त्यांनी प्रेषितांना धरले आणि तुरुंगात टाकले. 19 पण रात्रीच्या वेळी देवाच्या दूताने तुरुंगाचा दरवाजा उघडला. देवदूताने प्रेषितांना बाहेर आणले आणि म्हणाला, 20 “जा आणि मंदिरात उभे राहा. येशू ख्रिस्तामधील जे नवीन जीवन आहे त्याविषयी लोकांना सांगा.” 21 जेव्हा प्रेषितांनी हे ऐकले, त्यांनी ती आज्ञा पाळली आणि मंदिरात गेले. ती पहाटेची वेळ होती, आणि तेथे लोकांना शिक्षण देऊ लागले, प्रमुख याजक व त्याचे मित्र सभास्थानात आले.
त्यांनी यहूदी पुढाऱ्यांची सभा आणि सर्व वडीलजन, जे यहूदी लोकांचे नेते होते यांची एकत्र सभा बोलाविली. मग प्रेषितांना तेथे घेऊन येण्यासाठी काही जणांना तुरुंगात पाठविले. 22 जेव्हा शिपाई तुरुंगामध्ये त्यांना पाहावयास गेले, तेव्हा त्यांना आतमध्ये प्रेषित आढळले नाहीत. म्हणून त्यांनी परत जाऊन यहूदी पुढाऱ्यांना त्याविषयी सांगितले. 23 शिपाई म्हणाले, “तुरुंगाची दारे बंद केलेली व त्यांसा कुलुप लावलेले होते. तसेच पहारेकरीही दारावर पहारा देत आहेत. परंतु आम्ही जेव्हा दार उघडले, तेव्हा आतमध्ये कोणीच आढळले नाही!” 24 मंदिराच्या पहारेकऱ्यांच्या सरदाराने आणि प्रमुख याजकाने हे शब्द ऐकले. ते गोंधळात पडले, व यानंतर काय होईल याबद्दल बुचकळ्यात पडले.
25 नंतर कोणी एक आला आणि म्हणाला, “ज्या लोकांना तुम्ही तुरुंगात टाकले ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत!” 26 तेव्हा कप्तान व त्याचे लोक बाहेर गेले व प्रेषितांना पुन्हा घेऊन आले. त्यावेळी त्यांनी बळाचा वापर केला नाही, कारण त्यांना लोकांचे भय वाटले व असे वाटले की लोक कदाचित त्यांना दगडमार करतील.
2006 by World Bible Translation Center