Revised Common Lectionary (Semicontinuous)
परमेश्वराचा खास सेवक
42 “माझ्या सेवकाकडे पाहा.
मी त्याला आधार देतो.
मी ज्याला निवडले आहे असा तो एक आहे
आणि मी त्याच्यावर खूष आहे.
मी माझा आत्मा त्याच्यात घालतो.
तो न्यायमार्गाने राष्ट्रांना न्याय देईल.
2 तो रस्त्यात आवाज चढवणार नाही.
तो रडणार अथवा किंचाळणार नाही.
3 तो सभ्य असेल तो पिचलेला बांबूसुध्दा् मोडणार नाही.
मिणमिणणारी वातसुध्दा् तो विझविणार नाही.
तो प्रामाणिकपणाने न्याय देईल आणि सत्य शोधून काढेल.
4 जगाला न्याय प्रस्थापित करीपर्यंत तो दुर्बळ होणार नाही
वा चिरडला जाणार नाही.
दूरदूरच्या ठिकाणचे लोक त्याच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवतील.”
परमेश्वर जगाचा अधिपती व निर्माता आहे
5 परमेश्वराने, खऱ्या देवाने या गोष्टी सांगितल्या: (परमेश्वराने आकाश निर्माण केले. परमेश्वराने ते जगावर पसरले. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट त्यानेच निर्माण केली. पृथ्वीवरील सर्व लोकात त्याने प्राण घातला, चालणाऱ्या प्रत्येक माणसात चैतन्य घातले.)
6 “मी, परमेश्वराने, तुला योग्य गोष्टी करण्यासाठी बोलाविले आहे.
मी तुझा हात धरीन आणि तुझे रक्षण करीन.
मी लोकांबरोबर केलेल्या कराराची तू खूण असशील.
सर्वांना प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखा तू असशील.
7 आंधळ्यांचे डोळे तू उघडशील आणि ते पाहू शकतील.
खूप लोक तुरंगात आहेत, त्यांना तू मुक्त करशील.
खूप लोक अंधारात राहतात, त्यातून तू त्यांना बाहेर काढशील.
8 “मी परमेश्वर आहे
माझे नाव यहोवा,
मी माझे गौरव दुसऱ्यांना देणार नाही.
माझ्याकरिता असलेली स्तुती मी मूर्तीच्या (खोट्या देवांच्या) वाट्याला येऊ देणार नाही.
9 काही गोष्टी घडतील असे मी सुरवातीलाच सांगितले होते
त्या गोष्टी घडल्या
आणि आता काही गोष्टी घडायच्या पूर्वीच मी त्याबद्दल सांगत आहे
आणि भविष्यात तसेच घडेल.”
5 परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे.
तुझी इमानदारी ढगांपेक्षा उंच आहे.
6 परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे
तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे.
परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस.
7 तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यांत किंमती आहे.
माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात.
8 परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो.
तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस.
9 परमेश्वरा जीवनाचे कारंजे तुझ्यातून उडते.
तुझा प्रकाश आम्हाला प्रकाश दाखवतो.
10 परमेश्वरा जे तुला खरोखरच ओळखतात त्यांच्यावर प्रेम करणे तू चालूच ठेव.
जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी तुझा चांगुलपणा असू दे. [a]
11 परमेश्वरा गर्विष्ठ लोकांना मला सापळ्यात अडकवू देऊ नकोस.
वाईट लोकांना मला पकडू देऊ नकोस.
नव्या करारामप्रमणे उपासना
11 पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा मुख्य याजक म्हणून आला आहे. तो मनुष्याच्या हातांनी बांधला नव्हता अशा महान तसेच सर्व दृष्टींनी परिपूर्ण अशा मंडपामध्ये, या निर्मितीमधील, 12 बकरे किंवा वासरू यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन परमपवित्रस्थानात गेला; व त्याने सर्व काळासाठी स्वतःच एकदाच अर्पण करून आपल्याला कायमचे तारण मिळवून दिले.
13 कारण बकरे व बैल यांचे रक्त; तसेच कालवडीची राख त्यांच्यावर शिंपडले तर त्याची अपवित्र शरीरे शुद्ध होतात, 14 तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरू शकेल! ख्रिस्ताने सदाजीवी आत्म्याद्वारे आपल्या स्वतःचे डागविरहित आणि परिपूर्ण असे अर्पण केले. त्याचे रक्त आपल्या निर्जीव कर्मामुळे मरून गेलेली आपली सदसदविवेकबुद्धि शुद्ध करील. आशासाठी की, आपण जिवंत देवाची उपासना करू शकू.
15 पहिल्या काळात ज्या चुका झाल्या, त्या चुकांपासून सुटका व्हावी म्हणून देव आपल्या वचनानुसार अनंतकालच्या वतनासाठी ज्या लोकांना बोलावितो, त्यांच्याकरिता ख्रिस्त हा नवीन कराराचा मध्यस्थ झाला आहे.
येशू आपल्या मित्रांबरोबर बेथानी येथे(A)
12 मग येशू वल्हांडण सणाच्या अगोदर सहा दिवस असताना बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता. 2 म्हणून तेथे त्यांनी त्याच्यासाठी संध्याकाळचे भोजन आयोजित केले. मार्था जेवण वाढत होती आणि लाजर त्यांच्याबरोबर जेवायला बसला होता. 3 तेव्हा मरीयेने अर्धा किलो शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या पायावर ओतले व आपल्या केसाने त्याचे पाय पुसले व सर्व घर त्या सुवासाने भरले.
4 पण त्याच्या शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर त्याचा विश्वासघात केला होता, त्याने विरोध केला. म्हणून तो म्हणाला, 5 “हे सुगंधी द्रव्य विकून आलेले पैसे गरिबांना का देण्यात आले नाहीत? ते तेल चांदीच्या तीनशे रुपयाच्या किमतीचे होते.” 6 गरिबांचा कळवळा आला म्हणून त्याने असे म्हटले नाही, तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पेटी होती व तिच्यात जे पैसे टाकण्यात येत, ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला.
7 “तिला एकटे सोडा,” येशूने उत्तर दिले, “मला पुरण्याच्या दिवसासाठी ते तेल राखून ठेवण्यात आले. 8 तुमच्यात गरीब नेहमीच असतील, पण मी तुमच्यात नेहमी असणार नाही.”
लाजराविरुद्ध कट
9 मग तो तेथे आहे हे यहूदीयांतील बऱ्याच जणांना कळले. तेव्हा फक्त येशूसाठीच नव्हे तर ज्याला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्या लाजराला पाहावे म्हणून ते आले. 10 तेव्हा मुख्य याजकांनी लाजराला मारण्याचा कट केला. 11 कारण त्याच्यामुळे पुष्कळ लोक येशूकडे जात होते व त्याच्यावर विश्वास ठेवीत होते.
2006 by World Bible Translation Center