Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 4-5

दबोरा, स्त्री न्यायाधीश

एहूदच्या मृत्यूनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली. तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन याला इस्राएल लोकांचा पराभव करु दिला. हासोर नावाच्या नगरात हा राजा राज्य करत होता. सीसरा हा त्याचा सेनापती होता. हरोशेथ या नगरात सीसरा राहात होता. सीसराकडे नऊशे लोखंडी रथ होते. त्याच्या जुलमी राजवटीत इस्राएल लोक वीस वर्षे होते. तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली.

तेव्हा दबोरा नांवाची एक संदेष्ट्री होती. ती लप्पिदोथ नांवाच्या माणसाची पत्नी होती. ती इस्राएल लोकांची न्यायाधीश होती. एक दिवस ती खजुरीच्या झाडाखाली बसलेली असताना सीसराबद्दल विचार विनिमय करण्यासाठी इस्राएल लोक तिच्याकडे आले. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा व बेथल यांच्यामध्ये हे खजुरीचे झाड होते. तिने बाराक नामक माणसाला बोलावणे पाठवले. बाराक हा अबीनवामचा मुलगा होता. तो नफतालीच्या भागातील केदेश या नगरात राहात असे. दबोरा त्याला म्हणाली, “इस्राएल लोकांच्या परमेश्वराची तुला आज्ञा आहे की, नफताली आणि जबुलून यांच्या वंशातील दहाहजार पुरुषांना गोळा कर. त्यांना घेऊन ताबोर डोंगराकडे जा. मी सेनापती सीसरा याला रथ आणि सैन्य यासह किशोन नदीकडे तुझ्या दिशेला यायला लावीन. तेथे सीसराचा पराभव करायला मी तुला मदत करीन.”

त्यावर बाराक दबोराला म्हणाला, “तूही माझ्याबरोबर येणार असलीस तर मी हे करीन. तू नसलीस तर मात्र करणार नाही.”

दबोरा म्हणाली, “अर्थातच मी येणार आहेच पण तुझ्या अशा वृत्तीमुळे सीसराचा पराभव होईल तेव्हा तुझी प्रतिष्ठा राहणार नाही. परमेश्वर एका स्त्रीच्या हातून सीसराचा पराभव करणार आहे.”

आणि दबोरा बाराक बरोबर केदेश नगराला गेली. 10 तेथे बाराकने जबुलून आणि नफताली यांच्या वंशातील लोकांना बोलावून दहाहजार जणांना घेतले. दबोराही बाराक बरोबर होती.

11 हेबेर नावाचा एक माणूस केनी लोकांमध्ये होता. तो आपल्या लोकांपासून वेगळा झाला होता. (केनी लोक होबाबचे वंशज होते. होबाब म्हणजे मोशेचा सासरा) केदेशजवळच्या साननीम येथे एलोन वृक्षाजवळ हेबेरने तळ दिला होता.

12 अबीनवामचा मुलगा बाराक ताबोर डोंगरापाशी आला असल्याचे कोणीतरी सीसराला सांगितले. 13 तेव्हा सीसराने आपले नऊशे लोखंडी रथ आणि सर्व सैन्य एकत्र केले हरोशेथपासून त्या सर्वांनी किशोन नदीच्या दिशेने मोर्चा वळवला.

14 तेव्हा दबोरा बाराकला म्हणाली, “आज सीसराचा पराभव करायला परमेश्वर तुला मदत करणार आहे. त्याने आधीच तुझा मार्ग मोकळा केला आहे हे तुला माहीतच आहे.” तेव्हा बाराक ताबोर डोंगरावरुन दहाहजार माणसांसह निघाला. 15 त्यांनी सीसरावर हल्ला चढवला. लढाईत सीसरा, त्याचे रथ, सैन्य यांच्यामध्ये परमेश्वराने गोंधळ माजवला त्यांना काय करावे हे सुचेना. बाराक व त्याचे सैन्य यांनी सीसराच्या सैन्याचा पराभव केला. सीसरा रथ सोडून पळाला. 16 बाराकने सीसराच्या सैन्याशी लढाई चालूच ठेवली. त्याने व त्याच्या सैन्याने सीसराच्या रथांचा व सैन्याचा हरोशेथपर्यंत पाठलाग केला. तलवारीने ते सैन्य कापून काढले. एकालाही जिवंत ठेवले नाही.

17 पण सीसरा पळून गेला होता. तो हेबेरची बायको याएल हिच्या तंबूकडे आश्रयाला गेला. केनी हेबेर आणि हासोरचा राजा याबीन यांच्यात सलोख्याचे संबेध होते. म्हणून सीसरा तेथे गेला. 18 याएलने त्याला येताना पाहिले, तेव्हा त्याला भेटायला ती पुढे झाली व म्हणाली, “आत या, व निर्धास्त राहा.” सीसरा आत आला. तिने त्याच्यावर जाजम टाकून त्याला लपवले.

19 सीसरा याएलला म्हणाला, “मला खूप तहान लागली आहे. आधी मला थोडे पाणी प्यायला दे.” याएलने त्याला, चामड्याच्या बुधल्यात ती दूध भरुन ठेवत असे ते प्यायला दिले. मग तिने त्याला पुन्हा लपवले.

20 तो तिला म्हणाला, “तू तंबूच्या दारात जाऊन उभी राहा आणि ‘आत कोणी आहे का?’ असे कोणी विचारले तर ‘नाही’ म्हणून सांग.”

21 मग याएलने तंबू ठोकायची मोठी मेख व हातोडी घेतली. व हळूच त्याच्याजवळ गेली. सीसरा खूप थकून गाढ झोपला होता. तिने ती मेख त्याच्या कानशिलाजवळ ठेवून हातोडीने ठोकली. त्याच्या डोक्यातून ती आरपार घुसून पार जमिनीत रुतली. सीसरा मरण पावला.

22 तेवढ्यात सीसराला शोधत बाराक याएलच्या तंबूपाशी पोहोंचला. याएल त्याला पाहून बाहेर गेली व म्हणाली, “आत या तुम्हाला हवा असलेला माणूस मी दाखवते.” तेव्हा याएल बरोबर बाराक आत शिरला तेथे त्याला मेख मारलेल्या अवस्थेत मरुन पडलेला सीसरा दिसला.

23 त्या दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी कनान्यांचा राजा याबीन याचा पराभव केला. 24 या याबीनला नामोहरम करत शेवटी त्याचा नाश करीपर्यंत इस्राएल लोकांचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले.

दबोराचे गीत

इस्राएल लोकांनी सीसराचा पराभव केला त्या दिवशी दबोरा आणि अबीनवामचा मुलगा बाराक यांनी हे गीत गायले:

“इस्राएलचे लोक युध्दाला तयार झाले [a]
    ते स्वेच्छेने युध्दासाठी सज्ज झाले.
परमेश्वराचा धन्यवाद करा.

“राजांनो ऐका,
    लक्ष द्या अधिपतींनो,
मी परमेश्वराचे,
    इस्राएल लोकांच्या परमेश्वराचे
गीत स्वतः गाईन.
    त्याचे स्तुति स्तोत्र म्हणीन.

“परमेश्वरा, पूर्वी जेव्हा तू सेईरमधून आलास,
    अदोम भूमीतून तू कूच केलेस.
तेव्हा पृथ्वी थरारली.
    आकाशाने वर्षाव केला
    ढगातून वृष्टी झाली.
पर्वतांचाही थरकाप झाला परमेश्वरापुढे.
    सीनाय पर्वताच्या देवापुढे.
    इस्राएलांचा देव परमेश्वरापुढे.

“अनाथचा मुलगा शमगार याच्या
    आणि याएलच्या कारकिर्दीत राजमार्ग
    ओस पडले वाटसरुंचे तांडे आडवाटेने जाऊ लागले.

“दबोरा तू येईपर्यंत इस्राएलची माता म्हणून तू उभी राहीपर्यंत [b]
    इस्राएलमध्ये सैनिक नव्हते.
    नावालाही सैनिक नव्हते.

“नगराच्या वेशीपाशी युध्द करायला
    परमेश्वराने नवे नेते निवडले. [c]
तेव्हा चाळीस हजार इस्राएल लोकांत
    कोणाकडेही भाला किंवा ढाल नव्हती.

“ज्यांनी स्वेच्छेने युध्दावर जाण्याचे पत्करले
    त्या इस्राएल लोकांच्या सेनाधिपती बरोबर माझे हृदय आहे.
परमेश्वराचा धन्यवाद करा.

10 “पांढऱ्या गाढवांवर बसणाऱ्यांनो,
    खोगिराच्या बिछायतीवर बसणाऱ्यांनो
    आणि वाटेने चालणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या.
11 गुरांच्या पाणवठ्यावर आम्हाला झांजांचा
    नाद ऐकू येतो.
जेंव्हा नगराच्या वेशीपाशी परमेश्वराच्या
    लोकांनी लढाई केली
आणि ते जिंकले तेव्हा लोक परमेश्वराच्या पराक्रमाची गाथा गातात,
    आणि इस्राएलच्या सैनिकांचे स्तुतिस्तोत्र म्हणतात.

12 “ऊठ दबोरा,
    जागी हो, गाणे म्हण!
बाराका ऊठ,
    अबीनवामाच्या मुला शत्रूंना बंदिवान कर.

13 “उरलेल्या मानकऱ्यांनो आता आपल्या नेत्यांकडे जा.
    परमेश्वराचे लोकहो, तुम्ही माझ्यासाठी सैनिकांबरोबर जा.
परमेश्वराने इस्राएलच्या वीरांना विजय मिळवून दिला.
    इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक बलवान लोकांवर विजयी झाले.

14 “अमालेकच्या डोंगराळ प्रदेशातून एफ्राइमचे लोक आले.
    हे बन्यामीन तुमच्या पाठोपाठ ते आले
माखीरच्या वंशातूनही सेनापती आले.
    जबुलूनच्या लोकांतील सरदार तांब्याचा अधिकारदंड घेऊन आले.
15 इस्साखारच्या नेत्यांचा दबोराला पाठिंबा होता.
    तसेच ते बाराकशीही प्रामाणिक होते.
    ते खोऱ्यात पायी चालत आले.

“रऊबेनी, तुमच्याही सैन्यात अनेक शूर सैनिक आहेत.
16     मग तुमच्या मेंढवाड्याच्या कुंपणाजवळ [d] बसून का राहिलात?
शूर रऊबेनी टोळीच्या सैनिकांनी युध्दाचा गांभीर्याने विचार केला.
    पण तरी शेव्व्यामेंढ्यांसाठी वाजवलेला पावा ऐकत ते घरीच थांबले.
17 गिलाद लोक यार्देन नदीपलीकडल्या आपल्या छावणीत तसेच बसून राहिले.
    आणि दान लोकांनो, तुम्ही आपल्या गलबतांजवळ नुसते बसून का राहिलात?
आशेर लोक समुद्रकाठी,
    सुरक्षित बंदरात तळ ठोकून राहिले.

18 “पण जबुलून आणि नफताली यांनी मात्र डोंगरावरच्या त्या युध्दात प्राणांची
    पर्वा न करता पराक्रम केला.
19 कनानी राजेही लढाईत उतरले.
    कनानच्या राजांनी तनाखमध्ये,
मगिद्दोच्या जलाशयाजवळ लढाई केली.
    पण कोणतीही लूट बरोबर घेऊन ते गेले नाहीत.
20 स्वर्गातून आकाशातील तारे आपल्या
    कक्षेतून सीसराशी लढले.
21 किशोन या प्राचीन नदीने सीसराच्या
    सैन्याला वाहून नेले.
चला, प्राणपणाने झुंजू या.
22 घोड्यांचे खूर जमिनीवर आपटले.
    सीसराच्या दणकट घोड्यांना पळता भुई थोडी झाली.

23 “परमेश्वराच्या दूताने सांगितले, ‘मेरोज शहराला,
    त्यातील रहिवाश्यांना शाप द्या,
ते सैनिकांबरोबर परमेश्वराच्या मदतीला
    धावून आले नाहीत.’
24 याएल ही केनी हेबेरची पत्नी सर्व
    स्त्रियांमध्ये तिचा धन्यवाद होईल.
25 सीसराने पाणी मागितले
    याएलने त्याला दूध दिले
राजाला साजेशा पात्रात
    तिने त्याला साय दिली
26 मग याएलने आपला हात पुढे केला आणि तंबूची मेख घेतली.
    कारागिराची हातोडी उजव्या हातात घेतली.
सीसरावर तिचा प्रयोग केला.
    त्याच्या डोक्यावर आरपार घाव घातला.
27 याएलच्या पायांमध्ये तो कोसळला.
    तो पडला तिथेच तो राहिला याएलच्या पायाशी
तो कोसळला तिथेच तो पडला.
    तेथे तो आडवा झाला तिथेच गतप्राण झाला.

28 “सीसराच्या आईने खिडकीतून पाहिले आणि तिने आकांत केला.
    सीसराची आई पडद्याआडून पाहू लागली
‘सीसराच्या रथाला एवढा उशीर का?
    त्याच्या रथांचा आवाज कसा ऐकू येत नाही?’

29 “तिच्या चाणाक्ष दासीने,
    होय दासीने, तिला उत्तर दिले.
30 ‘माझी खात्री आहे.
    त्यांनी युध्द जिंकले.
आता ते पराभूत लोकांकडून लूट गोळा करत आहेत ती आपसात वाटून घेत आहेत.
    प्रत्येक सैनिकाला एक-दोन मुली ही मिळाल्या आहेत.
बहुधा सीसराला भरतकाम केलेल्या रंगीत वस्त्रांची लूट मिळाली.
    होय, सीसराला बहुमोल कापडच मिळाले असावे,
    पराक्रमी सीसराला पांघरण्यासाठी.’

31 “परमेश्वरा, तुझ्या शत्रूंची अशीच अखेर होवो!
    आणि तुझ्यावर प्रेम करणारे लोक उगवत्या सूर्याप्रमाणे उत्तरोत्तर सामर्थ्यवान होवोत!”

अशाप्रकारे त्या प्रदेशात चाळीस वर्षे शांतता नांदली.

लूक 22:35-53

संकटासाठी तयार राहा

35 येशू शिष्यांना म्हणाला, “जेव्हा मी तुम्हांला थैली, पिशवी व वहाणांशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हांस काही कमी पडले का?”

ते म्हणाले, “काहीही नाही.”

36 तो त्यांना म्हणाला, “पण आता, ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी व त्याने पिशवीसुद्धा घ्यावी. आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला झगा विकावा आणि एक विकत घ्यावी. 37 कारण मी तुम्हांस सांगतो, हा शास्त्रभाग माझ्यामध्ये परिपूर्ण झालाच पाहिजे:

‘आणि तो अपराधी असा गणला गेला.’ (A)

होय, हा माझ्याविषयीचा संदर्भ पूर्ण होत आहे.”

38 ते म्हणाले, “प्रभु, पहा, येथे दोन तरवारी आहेत.”

तो त्यांना म्हणाला, “तेवढे पुरे!”

येशू प्रेषितांना प्रार्थना करण्यास सांगतो(B)

39-40 तो निघाला आणि नेहमीप्रमाणे जैतूनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. तो त्या ठिकाणी आला तेव्हा त्यांना म्हणाला, “तुम्ही मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा.”

41 तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले. आणि अशी प्रार्थना केली, 42 “पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माइयाकडून घे. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” 43 स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्याला सामर्थ्य देत राहिला 44 दु;खाने ग्रासलेला असतानासुद्धा त्याने अधिक काकुळतीने प्रार्थना केली. आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता. 45 आणि जेव्हा प्रार्थना करुन तो उठला आणि शिष्यांकडे आला तेव्हा ते त्यांच्या दु:खामुळे थकून जाऊन झोपी गेलेले आढळले. 46 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का झोपत आहात? उठा, आणि मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा.”

येशूला अटक(C)

47 तो बोलत असता लोकांचा जमाव आला. आणि बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एक जण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला.

48 परंतु येशू त्यास म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा तू विश्वासघात करतोस काय?” 49 त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे पाहून म्हणाले, “प्रभु. आम्ही तलवारीने मारावे काय?” 50 त्यांच्यापैकी एकाने मुख्य याजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला.

51 येशूने उत्तर दिले, “असे काही करु नका.” त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्याला बरे केले.

52 नंतर येशू मुख्य याजक, मंदिराचे मुख्य अधिकारी आणि वडील जे त्याच्यावर चालून आले होते, त्यांना म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन माझ्यावर चालून आलात, जसा काय मी लुटारु आहे. 53 मी तर तुम्हांबरेबर दररोज मंदिरात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची आणि अंधाराची राज्य करण्याची वेळ आहे.”

स्तोत्रसंहिता 94

94 परमेश्वरा, तू लोकांना शासन करणारा देव आहेस.
    असा तू देव आहेस जो येतो आणि लोकांसाठी शासन आणतो.
तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस.
    गर्विष्ठ दुष्ट माणसांना योग्य अशी शिक्षा दे.
परमेश्वरा, दुष्ट लोक किती काळ मजा करीत राहाणार आहेत?
    परमेश्वरा किती काळ?
आणखी किती काळ हे गुन्हेगार त्यांनी केलेल्या
    गुन्ह्यांबद्दल गौरवोद्गार काढणार आहेत?
परमेश्वरा, ते तुझ्या माणसांना त्रास देतात.
    त्यांनी तुझ्या माणसांना यातना भोगायला लावल्या.
ते दुष्ट लोक विधवांना आणि आपल्या देशात आलेल्या परकीयांना ठार मारतात.
    ते अनाथ मुलांचा खून करतात.
आणि ते म्हणतात की या वाईट गोष्टी करताना परमेश्वर त्यांना बघत नाही.
    ते म्हणतात की जे काही घडते आहे ते इस्राएलाच्या देवाला माहीत नाही.

तुम्ही दुष्ट लोक, मूर्ख आहात.
    तुम्ही तुमचा धडा कधी शिकणार?
तुम्ही वाईट लोक किती मूर्ख आहात!
    तुम्ही समजण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.
देवानेच आपले कान केलेत
    तेव्हा त्यालाही कान असलेच पाहिजेत
आणि जे काही घडते ते तो ऐकू शकतो.
    देवानेच आपले डोळे केलेत.
तेव्हा त्यालाही डोळे असलेच पाहिजेत
    आणि जे काही घडते ते तो पाहू शकतो.
10 देव त्या लोकांना शिस्त लावेल.
    देव लोकांना काय करायचे ते शिकवेल.
11 लोक काय विचार करतात ते देवाला माहीत असते.
    लोक म्हणजे वाऱ्याचा झोत आहे हे देवाला माहीत आहे.

12 परमेश्वर ज्या माणसाला शिस्त लावेल तो सुखी होईल.
    देव त्या माणसाला जगण्याचा योग्यमार्ग शिकवेल.
13 देवा, तू त्या माणसाला संकटात शांत राहाण्यास शिकवशील.
    तू त्या माणसाला वाईट लोक थडग्यात जाईपर्यंत शांत राहाण्यास मदत करशील.
14 परमेश्वर त्याच्या माणसांना सोडून जाणार नाही.
    तो त्याच्या माणसांना मदत केल्याशिवाय सोडून जाणार नाही.
15 न्याय प्रस्थापित होईल आणि तो न्यायीपणा आणेल आणि
    नंतर प्रामाणिक आणि चांगले लोक तेथे येतील.

16 वाईट लोकांशी लढायला मला कोणीही मदत केली नाही.
    वाईट कृत्य करणाऱ्या लोकांशी लढण्यासाठी माझ्या बरोबरीने कोणीही उभे राहिले नाही.
17 आणि जर परमेश्वराने मला मदत केली
    नसतीतर मी मेलो असतो.
18 मी पडायला आलेलो आहे हे मला माहीत आहे,
    पण परमेश्वराने त्याच्या भक्तांना आधार दिला.
19 मी खूप चिंताग्रस्त आणि उदास होतो.
    परंतु परमेश्वरा, तू माझे सांत्वन केलेस.

20 देवा, तू दुष्ट न्यायाधीशांना मदत करीत नाहीस.
    ते वाईट न्यायाधीश कायद्याचा दुरुपयोग करुन लोकांचे आयुष्य कठीण करतात.
21 ते न्यायाधीश चांगल्या माणसांवर हल्ला करतात.
    ते निरपराधी लोक अपराधी आहेत असे म्हणतात आणि त्यांना ठार मारतात.
22 परंतु परमेश्वर माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहे.
    देव माझा खडक माझी सुरक्षित जागा आहे.
23 देव त्या दुष्ट न्यायाधीशांना त्यांनी केलेल्या वाईटकृत्याबद्दल शिक्षा करेल.
    त्यांनी पाप केले म्हणून देव त्यांचा नाश करेल.
    परमेश्वर आपला देव त्या दुष्ट न्यायाधीशांचा सर्वनाश करेल.

नीतिसूत्रे 14:3-4

मूर्ख व गर्विष्ठ माणसाचे शब्द त्याच्यावर संकटे आणतात. पण शहाण्या माणसाचे शब्द त्याला वाचवतात.

जर काम करायला गायी नसल्या तर धान्याचे कोठार रिकामे राहील. लोक गायीच्या शक्तीचा उपयोग चांगले पीक काढण्यासाठी करुन घेऊ शकतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center