Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यहोशवा 5:1-7:15

तेव्हा इस्राएल लोक नदी ओलांडून येईपर्यंत परमेश्वराने यार्देनचे पात्र कोरडे ठेवले हि हकीकत यार्देनच्या पश्चिमेकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी तसेच भूमध्य समुद्राजवळील सर्व कनानी राजांनी ऐकली. आणि भीतीने त्यांचा थरकाप उडाला. त्यानंतर इस्राएल लोकांचा सामना करण्याचे धैर्य त्यांच्यात उरले नाही.

इस्राएल लोकांची सुंता

यावेळी परमेश्वराने यहोशवाला सांगितले, “गारेच्या दगडाच्या सुऱ्या करून इस्राएल लोकांची सुंता कर.”

तेव्हा यहोशवाने गारेच्या सुऱ्या केल्या आणि गिबअथहा-अरालोथ येथे इस्राएल लोकांची सुंता केली.

4-7 यहोशवाने त्यांची सुंता करण्याचे कारण असे; इस्राएल लोकांनी मिसर सोडले तेव्हा सर्व लढवय्या पुरूषांची सुंता झालेली होती. वाळवंटात असताना यापैकी बऱ्याच जणांनी परमेश्वराचे ऐकले नाही. तेव्हा धांन्याने संपन्न असा हा देश या लोकांना पाहायला मिळणार नाही असे परमेश्वराने शपथपूर्वक सांगितले हा देश आपल्याला देण्याचे परमेश्वराने आपल्या पूर्वजांना वचन दिले होते. पण या लोकांमुळे परमेश्वराने सर्वांना या वाळवंटात चाळीस वर्षे रखडवले. या काळात ही माणसे मरून जावीत म्हणूव अशा प्रकारे त्या लढण्यास पात्र अशा माणसांचा त्या काळात मृत्यू झाला आणि त्यांच्या मुलांनी त्यांची जागा घेतली. पण त्या प्रवासात, वाळवंटात जन्मलेल्या मुलांपैकी कोणाचीच सुंता झाली नव्हती म्हणून यहोशवाने हे काम केले.

यहोशवाने सर्वांची सुंता केल्यावर जखम भरून येईपर्यंत सर्वजण तेथेच राहिले.

कनानमधील पहिला वल्हांडणाचा सण

तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुम्ही मिसरमध्ये गुलाम होतात. आणि या गोष्टीची तुम्हाला लाज वाटत असे. पण आज मी हा कलंक धुवून काढला आहे.” म्हणून यहोशवाने त्या जागेचे नामकरण “गिलगाल” असे केले. आजही गिलगाल म्हणूनच तो भाग ओळखला जातो.

10 यरीहोच्या पठारावर गिलगाल येथे मुक्काम असताना इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा सण साजरा केला. ती त्या महिन्याची चतुर्दशीची संध्याकाळ होती. 11 वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी तेथे त्यांनी पिकलेल्या धान्याचा हुरडा खाल्ला. तसेच बेखमीर भाकर त्यांनी खाल्ली. 12 दुसऱ्या दिवसापासून स्वर्गातील खास अन्न म्हणजेच मान्ना येणे बंद झाले. कनानातील भूमीत पिकलेले अन्न लोकांनी खाल्ल्यानंतर हे झाले त्यावेळेपासून इस्राएलांना स्वर्गातील खास अन्न मिळाले नाही.

13 यरीहोजवळ असताना यहोशवाने समोर पाहिले तर एक माणूस पुढे उभा असलेला त्याला दिसला. त्या माणसाच्या हातात तलवार होती. यहोशवाने पुढे होऊन त्याला विचारले, “तू आमच्या बाजूचा आहेस की शत्रूच्या गोटातील?”

14 त्यावर तो उत्तरला, “मी तुमचा शत्रू नव्हे. परमेश्वराच्या सैन्याचा सेनापती या नात्याने नुकताच येथे तुझ्यासमोर आलो आहे.”

यावर यहोशवाने त्याला जमिनीवर डोके टेकवून आदरपूर्वक अभिवादन केले आणि विचारले, “स्वामीची काय आज्ञा आहे? मी आपला सेवक आहे.”

15 परमेश्वराच्या सैन्याचा सेनापती म्हणाला, “तुझी पादत्राणे काढ कारण जेथे तू आत्ता उभा आहेस ती जागा पवित्र आहे.” यहोशवाने त्याचे ऐकले.

यरीहो शहराच्या वेशी बंद होत्या. इस्राएल लोक यरीहो जवळआल्यामुळे नगरातील लोक घाबरले होते. कोणी नगराच्या बाहेर पडत नव्हते की आत येत नव्हते.

तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुमच्या हातून मी यरीहो शहराचा पराभव करवीन. या शहराचा राजा आणि सर्व योध्दे याचा तुम्ही पराभव कराल. रोज एकदा सर्व सैन्यासह शहराभोवती फेऱ्या घाला. असे सहा दिवस करा. सात याजकांनी मेंढ्यांच्या शिंगापासून केलेली रणशिंगे घेऊन पवित्र करार कोशापुढे चालत जायला सांग. सातव्या दिवशी शहराभोवती सात फेऱ्या घाला. सातव्या दिवशी याजकांना रणशिंगे फुंकीत फेरी घालायला सांग. याजक रणशिंगांचा एकच कर्णकटू ध्वनी करतील तेव्हा तो ध्वनी ऐकताच लोकांनाही मोठ्याने आरोळ्या मारायला सांगावे. तसे केल्याने शहराची तटबंदी कोसळून पडेल आणि लोक सरळ आत घुसतील.”

यरीहो काबीज

तेव्हा नूनाचा पुत्र यहोशवाने सर्व याजकांना बोलावले त्यांना तो म्हणाला. “परमेश्वराचा पवित्र करारकोश घेऊन चला. तसेच सात याजकांना रणशिंगे घेऊन करार कोशापुढे चालायाला सांगा.”

मग तो लोकांना म्हणाला, “आता निघा आणि शहराला फेऱ्या घाला. सशस्त्र सैनिकांनी परमेश्वराच्या करार कोशापुढे चालावे.”

यहोशवाचे सांगून झाल्यावर सात याजकांनी परमेश्वरापुढे चालायला सुरूवात केली. आपली सात रणशिंगे फुंकीत ते चालले होते. परमेश्वराचा पवित्र करारकोश वाहणारे याजक त्याच्यामागून चालले होते. सशस्त्र सैन्य सर्व सतत वेळ याजकांच्या पुढे चालत होते आणि पवित्र करार कोशामागून पृष्ठरक्षक चालले होते आणि रणशिंगे फुंकली जात होती. 10 यहोशवाने लोकांना युध्दगर्जना न करण्यास बजावले होते. तो म्हणाला, “आरडा ओरडा करू नका. मी सांगेपर्यंत एक चकार शब्दही तोंडातून काढू नका. सांगेन तेव्हाच गर्जना करा.”

11 मग यहोशवाने याजकांना परमेश्वराचा करारकोश घेऊन नगराभोवती एक फेरी मारायला लावली. नंतर सर्वांनी छावणीत परतून ती रात्र काढली.

12 यहोशवा पहाटे उठला. याजकांनी परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलला. 13 सात याजक सात रणशिंगे घेऊन सज्ज झाले. परमेश्वराच्या पवित्र करारकोशापुढे रणशिंगे वाजवत ते पुढे चालू लागले. सशस्त्रधारी सैनिक त्यांच्यापुढून चालू लागले. परमेश्वराच्या पवित्र कोशामागून पृष्ठ संरक्षक निघाले सर्व सतत वेळ रणशिंगे फुंकली जात होती. 14 दुसऱ्या दिवशी त्या सर्वांनी नगराभोवती एकदा फेरी मारली. मग ते छावणीत परतले. असे त्यांनी ओळीने सहा दिवस केले.

15 सातव्या दिवशी ते पहाटे उठले. त्यांनी नगराला सात वेळा फेऱ्या घातल्या. त्यांनी सर्व पूर्वी प्रमाणेच केले, फक्त फेऱ्या तेवढ्या सात घातल्या. 16 सातव्यांदा नगराभोवती फेरी घालताना याजकांनी रणशिंगे वाजवली. ती ऐकताच यहोशवाने आज्ञा केली, “गर्जना करा हे शहर परमेश्वराने तुम्हाला दिले आहे. 17 हे शहर आणि यातील सर्वकाही परमेश्वराचे आहे. [a] फक्त रहाब ही वेश्या आणि तिच्या घरातील मंडळी यांना धक्का लावू नका. रहाबने आपल्या दोन हेरांना लपविले तेव्हा तिच्या घरातल्यांना मारू नका. 18 बाकी सर्व गोष्टींचा नाश करा. लक्षात ठेवा त्यातील काहीही घेऊ नका. तेथील एखादी वस्तू घेतलीत आणि तळावर आणलीत तर तुमचा नाश होईल. सर्व इस्राएल लोकांचाही त्यामुळे नाश होईल. 19 सोन्याचांदीच्या तसेच तांब्या-लोखंडाच्या सर्व वस्तू परमेश्वराच्या आहेत. त्या परमेश्वराच्या भांडारात जमा केल्या पहिजेत.”

20 याजकांनी रणाशिंगे वाजवली. लोकांनी ती ऐकून मोठ्याने जयघोष केला. त्याने तटबंदी कोसळली आणि इस्राएल लोक सरळ नगरात घुसले. त्यांनी नगराचा पाडाव केला. 21 लोकांनी शहरातील सर्व गोष्टींचा नाश केला. तरूण आणि वृध्द पुरूष, तरूण आणि वृध्द स्त्रिया, जनावरे, शेळ्या मेंढ्या, गाढवे अशा सर्व सजीवांची त्यांनी हत्या केली.

22 यहोशवा त्या दोन हेरांशी बोलला. तो त्यांना म्हणाला, “त्या वेश्येच्या घरी जा आणि तिला व तिच्या घरातल्यांना घेऊन या. तिला तुम्ही तसे वचन दिले आहे तेव्हा त्यांना तेथून बाहेर काढा.”

23 तेव्हा ते दोन हेर रहाब कडे गेले आणि त्यांनी तिला तसेच तिचे आईवडील भावंडे, घरातील इतर माणसे यांना बाहेर काढले इस्राएल लोकांच्या छावणीबाहेर या सर्वांना त्यांनी सुरक्षित जागी ठेवले.

24 मग इस्राएल लोकांनी त्या नगराला आग लावली. फक्त सोने, चांदी, तांबे व लोखंड यांच्या वस्तू परमेश्वराप्रीत्यर्थ वगळून सर्व काही भस्मसात केले आणि त्या वस्तू परमेश्वराच्या खजिन्यात जमा केल्या. 25 यहोशवाने रहाब तिचे कुटुंबीय व तिच्या बरोबर असलेली इतर माणसे यांना संरक्षण दिले. कारण यरीहोला त्याने पाठवलेल्या दोन हेरांना तिने मदत केली होती. रहाबच्या कुटुंबाचे वास्तव्य आजही इस्राएल लोकांमध्ये आहे.

26 यावेळी यहोशवाने एक महत्वाची शपथ घातली. तो म्हणाला:

“जो कोणी यरीहो पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करील
    त्याला परमेश्वराचा शाप भोगावा लागेल.
जो या नगराची पायाभरणी करेल
    त्याचा ज्येष्ठ पुत्र मरण पावेल.
जो याच्या वेशी उभारील
    त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.”

27 याप्रमाणे परमेश्वराने यहोशवाला साथ दिली आणि यहोशवाची सर्व देशात ख्याती पसरली.

आखान चे पातक

पण इस्राएल लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. यहूदाच्या वंशातील झिम्रीचा नातू व कर्मीचा मुलगा आखान याने काही वस्तू स्वतःसाठी ठेवून घेतल्या. त्या नष्ट करून टाकल्या नाहीत. तेव्हा परमेश्वराचा इस्राएल लोकांवर कोप झाला.

यरीहोचा पाडाव केल्यावर यहोशवाने काही माणसे आय येथे पाठवली. आय नगर बेथेलच्या पूर्वेला बेथ-आवेन जवळ होते. तेथे जाऊन त्या प्रांतातील कच्चे दुवे हेरायला त्याने त्यांना सांगितले. त्याप्रमाणे हेर तिकडे गेले.

नंतर ते यहोशवाकडे परतून आले. ते म्हणाले, “आय हा दुर्बल प्रांत आहे. तेव्हा सर्वांनी तेथे जाण्याची गरज नाही दोन-तीन हजार माणसे तेथे लढायला पुरेशी होतील. सर्व सैन्य लागणार नाही. कारण ते लोक थोडे आहेत.”

4-5 तेव्हा सुमारे तीन हजार माणसे आय येथे गेली. आयच्या लोकांनी इस्राएलांची सुमारे छत्तीस माणसे ठार केली. आणि इस्राएल लोकांनी पळ काढला. त्यांचा आयच्या लोकांनी गावाच्या वेशीपासून ते दगडाच्या खाणीपर्यंत पाठलाग केला. आयच्या लोकांनी त्यांना चांगले चोपून काढले.

इस्राएल लोकांनी हे पाहिले तेव्हा घाबरून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. यहोशवाने हे ऐकले तेव्हा दु:खाने त्याने आपली वस्त्रे फाडली. पवित्र करार कोशापुढे त्याने लोटांगण घातले. संध्याकाळपर्यंत तो तसाच पडून राहिला. इस्राएलच्या प्रमुखांनीही तसेच केले. दु:खाने, त्यांनीही आपल्या डोक्यात माती घालून घेतली.

यहोशवा म्हणाला, “हे प्रभू परमेश्वारा आम्हाला तू यार्देन पार करून आणलेस. अमोऱ्यांच्या हातून आमाचा नाश व्हायला का आम्हाला येथपर्यंत आणलेस? नदीच्या त्या तीरावरच आम्ही सुखासमाधानाने राहिलो असतो. परमेश्वरा मी माझ्या जिवाची शपथ घेतो. मला आता बोलण्यासारखे काही उरले नाही. इस्राएल शत्रूला शरण गेला आहे. आता कनानी तसेच या देशातील इतर लोक हे ऐकतील. आणि आमच्यावर हल्ला करून आम्हाला ठार करतील. तेव्हा आपले नाव राखण्यासाठी तू काय करणार आहेस?”

10 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तू असा जमिनीवर पालथा का पडला आहेस? ऊठ उभा राहा. 11 इस्राएल लोकांनी पाप केले आहे. त्यांनी आज्ञाभंग करून माझ्याशी केलेला करार मोडला आहे. मी नष्ट करून टाकायाला सांगितलेल्या वस्तूपैकी काही त्यांनी ठेवून घेतल्या आहेत. त्यांनी चोरी केली आहे. खोटे बोलून त्यांनी त्या स्वतःसाठी ठेवल्या आहेत. 12 म्हणून इस्राएलाच्या सैन्याने युध्दात पाठ फिरवून पळ काढला. त्यांच्या हातून चूक घडल्यामुळे ते असे वागले. त्यांचा संहारच केला पाहिजे. मी आता तुम्हाला मदत करणार नाही. मी सांगितले ते सर्व नष्ट करून टाकल्याशिवाय मी तुम्हाला साथ देणार नाही.

13 “आता जा आणि लोकांना शुध्द कर, त्यांना सांग, ‘शुध्द व्हा. उद्याची तयारी करा. नष्ट करायला सांगितलेल्या वस्तू काही जणांनी ठेवून घेतल्या आहेत असे इस्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे आहे. त्या वस्तूंचा त्याग केल्याखेरीज तुम्हाला शत्रूचा पराभव करता येणार नाही.

14 “‘उद्या सकाळी सर्वजण परमेश्वरासमोर उभे राहा. सर्व वंशांच्या लोकांनी परमेश्वरासमोर यावे. मग परमेश्वर एका वंशातील लोकांना निवडील. तेव्हा त्यांनीच फक्त पुढे यावे त्यातील एका कुळाची निवड करील. तेव्हा फक्त त्या कुळातील लोकांनी परमेश्वराला सामोरे जावे. मग त्या कुळातील प्रत्येक कुटुंबावर परमेश्वर दृष्टिक्षेप टाकील आणि एका कुटुंबाला निवडील. मग त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिकडे परमेश्वर पाहील. 15 नष्ट करून टाकायला पाहिजे होती अशी वस्तू त्याच्याकडे सापडल्यास तो पकडला जाईल. तेव्हा त्या माणसाला जाळून टाकावे. तसेच त्याच्याकडे असलेले सर्व काही त्याच्याबरोबर आगीत टाकावे. या माणसाने परमेश्वराचा करार मोडून इस्राएल लोकांना कलंक लावणारी गोष्ट केली आहे.’”

लूक 15

स्वर्गातील आनंद(A)

15 सर्व पापी लोक त्याचे ऐकायला त्याच्याकडे येत होते. तेव्हा परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करु लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर जेवतो!”

मग येशूने त्यांना ही गोष्टी सांगितली. “जर तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानांत सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय? आणि जेव्हा त्याला ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो. आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्याना एकत्र करुन म्हणतो, ‘माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरु सापडले आहे.’ मी तुम्हांस सांगतो, त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांपेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल.

“समजा एका बाईजवळ चांदीची दहा नाणी आहेत. जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून ते मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय? आणि जेव्हा तिला ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’ 10 त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हांस सांगतो.”

घर सोडून गेलेला मुलगा

11 मग येशू म्हणाला, “एका मनुष्याला दोन मुलगे होते. 12 त्यापैकी धाकटा म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या.’ आणि वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये विभागली.

13 “नंतर फार दिवस झाले नाहीत तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली. 14 त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर, त्या देशांत भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली. 15 मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करु लागला. त्या नागरिकाने त्याला डुकरे चारावयास पाठविले. 16 तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होई, पण कोणी त्याला काहीही दिले नाही.

17 “नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, ‘माझ्या पित्याच्या घरी किती तरी मजुरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे! 18 मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वार्गाविरुद्ध (देवाविरुद्ध) आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. 19 तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. मला आपल्या रोजंदारीवरील मजुरांसारखे ठेवा.’ 20 मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला.

मुलगा परततो

“तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्यात पडले आणि त्याचे मुके घेतले. 21 मुलगा त्यांना म्हणाला, ‘बाबा, मी स्वार्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.’

22 “परंतु वडील आपल्या नोकरांस म्हणाले, ‘त्वरा करा, चांगला झगा आणून त्याला घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. 23 आणि पुष्ट वासरु आणून कापा, आपण खाऊ आणि आनंद करु! 24 कारण हा माझा मुलगा मेला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ व ते आनंद करु लागले.

मोठा मुलगा येतो

25 “त्याचा मोठा मुलगा शेतात होता. तो घराकडे निघाला. जेव्हा तो घराजवळ आला, तेव्हा त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला. 26 त्याने एका नोकराला बोलावून विचारले, ‘हे सर्व काय चालले आहे?’ 27 तो नोकर त्याला म्हणाला. ‘तुमचा भाऊ आला आहे. तो सुखरुप आला म्हणून तुमच्या वडिलांनी पुष्ट वासरु कापले आहे.’

28 “मोठा मुलगा रागावला त्याला आत जाण्याची इच्छा होईना. तेव्हा वडिलांनी येऊन त्याची समजूत काढली. 29 परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, ‘पाहा, इतकी वर्षे मी तुमचीसेवा केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही! मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी बकरीसुद्धा दिली नाही. 30 ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांसाठी उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरु कापले!’

31 “वडील त्याला म्हणाले, ‘माझ्या मुला, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. 32 आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.’”

स्तोत्रसंहिता 81

प्रमुख गायकासाठी गित्तीथ चालीवर बसवलेले आसाफये स्तोत्र.

81 आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा,
    इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
संगीताची सुरुवात करा.
    डफ वाजवा.
    सतार आणि वीणा वाजवा.
अमावस्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
    पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
    याचवेळी आपला सण सुरु होतो.
हा इस्राएल देशाचा नियम आहे.
    देवाने याकोबाला हीच आज्ञा केली.
जेव्हा देवाने त्याला मिसरमधून दूर नेले
    तेव्हा त्याने योसेफाबरोबर हा करार केला.
मिसरमध्येच आम्ही आम्हाला न समजणारी भाषा ऐकली.
देव म्हणतो, “मी तुमच्या खांद्यावरचे ओझे उचलले.
    तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली.
तुम्ही लोक संकटात होता.
    तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली.
मी वादळी ढगात लपलो होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले.
    मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.”

“लोकहो! माझे ऐका, मी तुम्हाला माझा करार देईन
    इस्राएल कृपा करुन माझे ऐक.
परदेशी लोक ज्या चुकीच्या देवाची पूजा करतात
    त्यापैकी कुठल्याही देवाची पूजा करु नकोस.
10 मी, परमेश्वरच तुमचा देव आहे
    मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले.
इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”

11 “परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही.
    इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.
12 म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले.
    इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले.
13 जर माझ्या लोकांनी माझे ऐकले,
    जर इस्राएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला,
14 तर मी त्यांच्या शत्रूंचा पराभव करीन.
    जे लोक इस्राएलवर संकटे आणतात त्यांना मी शिक्षा करीन.
15 परमेश्वराचे शत्रू भीतीने थरथर कापतील.
    त्यांना कायमची शिक्षा होईल.
16 देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल.
    देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”

नीतिसूत्रे 13:1

13 शहाण्या माणसाला त्याचे वडील काही सांगत असले तर तो लक्षपूर्वक ऐकतो. पण अभिमानी माणूस लोक त्याला योग्य ते सांगायला लागले तर तो ते ऐकत नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center