Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the GW. Switch to the GW to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 29-30

मवाबातील करार

29 इस्राएलांशी होरेब पर्वताजवळ परमेश्वराने पवित्र करार केला होता. त्याखेरीज, मवाबात आणखी एक पवित्र करार करायची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली. तो हा पवित्र करार होय.

मोशेन सर्व इस्राएलांना जवळ बोलावले. तो त्यांना म्हणाला, “मिसरमध्ये परमेश्वराने जे जे केले ते सर्व तुम्ही पाहिले आहे. फारो, त्याचे सेवक आणि त्याचा देश यांचे परमेश्वराने काय केले ते तुम्ही पाहिले आहे. ती संकटे, चमत्कार आणि विस्मयकारक गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. पण नेमके काय झाले हे तुम्हांला आजही समजू शकलेले नाही. तुम्ही जे पाहिलेत आणि ऐकलेत त्याचे खरे आकलन परमेश्वराने तुम्हाला होऊ दिलेले नाही. परमेश्वराने तुम्हांला वाळवंटातून चाळीस वर्षे चालवले. पण एवढ्या कालावधीत तुमचे कपडे विरले नाहीत की जोडे झिजले नाहीत. तुम्हीं भाकरी खाल्ली नाही की द्राक्षारस अथवा मद्य प्यायले नाही. पण परमेश्वराने तुमची काळजी वाहिली. हा परमेश्वरच तुमचा देव आहे हे तुम्हांला कळावे म्हणून त्याने असे केले.

“तुम्ही येंथे आलात आणि हेशबोनचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग आपल्यावर चढाई करुन आले. पण आपण त्यांचा पराभव केला. त्यांचा देश आपण घेऊन तो रऊबेनी, गादी व मनश्शेचे अर्धे घराणे यांना ते इनाम म्हणून दिला. या करारातील सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात तर तुम्हाला सर्व कार्यात असेच यश मिळत राहील.

10 “आज तुम्ही सर्वजण म्हणजेच तुमच्यातील अंमलदार वडीलधारे, प्रमुख आणि सर्व इस्राएल तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभे आहात. 11 तुमची बायकामुले तसेच लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्यातील सर्व उपरे हे ही इथे आहेत. 12 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी करारबद्ध व्हायला तुम्ही इथे जमलेले आहात. परमेश्वर तुमच्याशी पवित्र करार करणार आहे. 13 त्याद्वारे तो तुम्हांला आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हांला आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे. 14-15 हा शपथपूर्वक पवित्र करार फक्त आपल्याशी-आज इथे उपस्थित असलेल्यांबरोबरच नव्हे तर आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर नसलेल्या आपल्या वंशजांसाठीही आहे. 16 आपण मिसरमध्ये कसे राहात होतो ते तुम्हांला आठवत आहेच. वेगवेगळ्या राष्ट्रातून येथपर्यंतचा आपण प्रवास कसा केला याचीही तुम्हांला आठवण आहे. 17 त्या लोकांच्या लाकूड, पाषाण, चांदी, सोने यापासून बनवलेल्या आपल्याला तिरस्करणीय असलेल्या मूर्तीही पाहिल्यात. 18 आपल्या परमेश्वर देवापासून परावृत होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, बाई, एखादे कुटुंब किंवा कूळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विषवल्लीसमान असतात.

19 “एखादा हे बोलणे ऐकूनही, ‘मी मला हवे तेच करणार. माझे काहीही वाकडे होणार नाही’ असे स्वतःचे समाधान करुन घेत असेल. पण त्याने हे लक्षात ठेवावे की त्याचा त्याला त्रास तर होईलच पण सुक्याबरोबर ओले ही जळते या न्यायाने निरपराध्यांनाही त्रास होईल. 20-21 परमेश्वर अशा माणसाला क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर कोप होईल. इतर सर्व इस्राएलापासून अलग करुन परमेश्वर त्याची नावनिशाणी पुसून टाकील. या ग्रंथातील सर्व शापांचा प्रत्यय त्या माणसाला स्वतःच्या बाबतीत येईल. या नियमशास्त्राच्या ग्रंथातील कराराचा हा एक भाग आहे.

22 “या देशाची कशी वाट लागली हे पुढे तुमचे वंशज आणि दूरदूरच्या देशातील परकीय पाहतील. या देशातील विपत्ती आणि परमेश्वराने पसरवलेले रोग ते पाहतील. 23 येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयीम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल.

24 “‘परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?’ असे इतर राष्ट्रातील लोक विचारतील. 25 त्याचे उत्तर असे की, आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांना बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला. 26 हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते. 27 म्हणून त्यांच्यावर तो क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्या बाबतीत खरी करुन दाखवली. 28 क्रोधायमान होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?

29 “काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.

इस्राएलांचे आपल्या भूमीत पुनरागमन

30 “मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील. आशीर्वाद तसेच शापही खरे होतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला इतर राष्ट्रांमध्ये हद्दपार करील. तेव्हा तुम्हांला या सर्व गोष्टींची आठवण होईल. तेव्हा तुम्ही तुमचे वंशज तुमचा देव परमेश्वर ह्याचा धावा कराल. त्याला मनःपूर्वक शरण जाल. आणि मी आज दिलेल्या सर्व आज्ञांचे नीट पालन कराल. 3-4 तेव्हा तुमचा देव परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल, आणि तो तुम्हांला मुक्त करील. तुमची त्याने जेथे जेथे पांगापांग करुन टाकली होती तेथून तो तुम्हाला परत आणील. मग ते देश किती का लांबचे असेनात! पुन्हा आपल्या पूर्वजांच्या देशात तुम्ही याल आणि तो देश तुमचा होईल. परमेश्वर तुमचे कल्याण करील आणि पूर्वजांना मिळाले त्यापेक्षा कितीतरी अधिक तुम्हांला मिळेल. पूर्वी कधी नव्हती एवढी तुमची लोकसंख्या वाढेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना आपल्याकडे वळवील आणि त्याच्यावर तुम्ही मनःपूर्वक प्रेम कराल व सुखाने जगाल.

“मग त्या संकटांनी तुमचा देव परमेश्वर तुमच्या शत्रूंना जेरीला आणील. कारण ते तुमचा द्वेष करुन तुम्हाला अडचणीत आणायचा प्रयत्न करतील. आणि तुम्ही पुन्हा परमेश्वराचे ऐकाल. आज मी देत असलेल्या सर्व आज्ञा तुम्ही पाळाल. मी तुम्हाला सर्व कार्यात यश देईल. त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर संतती होईल. गायांना भरपूर वासरे होतील. शेतात भरघोसपीक येईल. तुमचा देव परमेश्वर तुमचे भले करील. तुमच्या पूर्वजांप्रमाणेच तुमचे कल्याण करण्यात त्याला आनंद वाटेल. 10 पण तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवले पाहिजे. नियमशास्त्रातील ग्रंथात सांगितलेल्या आज्ञा व नियम यांचे कसोशीने पालन केले पाहिजे. संपूर्ण अंतःकरणाने व संपूर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याला अनुसरले पाहिजे. तर तुमचे कल्याण होईल.

जीवन की मरण

11 “जी आज्ञा मी आता तुम्हांला देत आहे ती पाळायला फारशी अवघड नाही. ती तुमच्या आवाक्याबाहेर नाही. 12 ती काही स्वर्गात नाही, की आम्ही ती पाळावी म्हणून कोण स्वर्गात जाऊन ती आमच्यापर्यंत आणील व आम्हांला ऐकवील? असे तुम्हांला म्हणावे लागणार नाही. 13 ती समुद्रापलीकडे नाही. ‘आम्ही ती पाळावी म्हणून कोण समुद्र पार करुन जाईल व तेथून आणून आम्हांला ऐकवील?’ असे म्हणावे लागणार नाही. 14 हे वचन तर अगदी तुमच्याजवळ आहे. ते तुमच्याच मुखी आणि मनी वसत आहे. म्हणून तुम्हांला ते पाळता येईल.

15 “आज मी तुमच्यापुढे जीवन आणि मृत्यू, चांगले आणि वाईट हे पर्याय ठेवले आहेत. 16 तुमच्या परमेश्वर देवावर प्रेम करा, त्याच्या मार्गाने जा व त्याच्या आज्ञा, नियम पाळा अशी माझी तुम्हांला आज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जो प्रदेश आपलासा करायला जात आहात तेथे दीर्घकाळ राहाल, तुमच्या देशाची भरभराट होईल, तुम्हांला तुमचा देव परमेश्वर ह्याचे आशीर्वाद मिळतील. 17 पण तुम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवलीत, त्याचे ऐकले नाहीत, इतर दैवतांचे भजनपूजन केलेत तर 18 मात्र तुमचा नाश ठरलेलाच हे मी तुम्हांला बजावून सांगतो. यार्देन नदी पलीकडच्या प्रदेशात मग तुम्ही फार काळ राहणार नाही.

19 “आज स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने मी तुम्हाला जीवन आणि मृत्यू या दोहोतून एकाची निवड करायला सांगत आहे. जीवनाचा पर्याय स्वीकारलात तर आशीर्वाद मिळेल. दुसऱ्याची निवड केलीत तर शाप मिळेल. तेव्हा जीवनाची निवड करा म्हणजे तुम्ही व तुमची मुलेबाळे जिवंत राहातील. 20 तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा. त्याच्या आज्ञा पाळा. त्याला सोडू नका. कारण परमेश्वर म्हणजेच जीवन. तसे केलेत तर अब्राहाम, इसहाक, व याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे परमेश्वर तुम्हांला त्या प्रदेशात दीर्घायुष्य देईल.”

लूक 11:37-12:7

येशू परुश्यांवर टीका करतो(A)

37 जेव्हा येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परुश्याने त्याला आपलल्याबरोबर जेवायला बोलाविले. तो आत गेला आणि आपल्या जागी रेलून बसला. 38 परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परुश्याला फार आश्चर्य वाटले. 39 तेव्हा प्रभु त्याला म्हणाला, “तुम्ही परुशी प्याला व ताट बाहेरुन स्वच्छ करता पण तुम्ही आतून अधाशीपणाने व फसवणुकीच्या दुष्टतेने भरले आहात. 40 तुम्ही मूर्ख लोक! ज्याने बाहेरील बाजू बनवली तो आतली बाजू बनवणार नाही का? 41 पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या. आणि नंतर सर्व काही तुमच्यासाठी स्वच्छ होईल.

42 “परुश्यांनो तुम्हाला धिक्कार असो कारण तुम्ही पश्चात्ताप करता व पुदिन्याचा व प्रत्येक वनस्पतीचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही या गोष्टी प्रथम काराव्यात व मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये.

43 “परुश्यांनो तुमचा धिक्कार असो, कारण तुम्हांला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते. 44 तुमचा धिक्कार असो कारण तुम्ही खुणा न केलेल्या कबरांसारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.”

45 नियमशास्त्राचा एक शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.”

46 तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही. 47 तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या भविष्यवाद्यांसाठी तुम्ही कबरा बांधता. 48 अशा प्रकारे तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता. 49 यामुळे देवाचे ज्ञानसुद्धा असे म्हणाले, ‘मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठवीन. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’

50 “तेव्हा या पिढीस भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दल दंड भरुन द्यावा लागेल. 51 म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून ते जखऱ्या जो देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मराला गेला. खरोखर मी तुम्हांस सांगतो या पिढिला ते भरुन द्यावे लागेल.

52 “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचा धिक्कार असो. कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वतःही आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही जाऊ दिले नाही.”

53 येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी फार विरोध करु लागले व त्याला अनेक गोष्टीविषयी प्रश्न विचारु लागले. 54 तो जे बोलेल त्यामध्ये त्याला एखाद्या सावजाप्रमाणे पकडण्यासाठी टपून बसले.

परुश्यांसारखे होऊ नका

12 आणि म्हणून हजारो लोकांचा समुदाय जमला होता. इतके लोक जमले होते की, ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोलला: “परुश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे जे ढोंग आहे त्याविषयी जपा. उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुप्त नाही. यास्तव जे काही तुम्ही अंधारत बोलाल ते उजेडात ऐकले जाईल आणि जे काही तुम्ही कोणाच्या कानात एकांतात सांगाल ते घराच्या छपरावरुन घोषित केले जाईल.”

फक्त देवाची भीति बाळगा(B)

“परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नये, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही. तुम्ही कोणाची भीति बाळगावी हे मी तुम्हांला सांगतो. तुम्हांला ठार मारल्यांनतर तुम्हांस नरकात टाकून देण्यास जो समर्थ आहे, त्याची भीति धरा. होय, मी तुम्हांस सांगतो त्यालाच भ्या.

“पाच चिमण्या दोन पैशांना विकतात की नाही? आणि त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही. पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही मूल्यवान आहात.”

स्तोत्रसंहिता 78:1-31

आसाफाचे मास्कील.

78 लोकहो! माझी शिकवण ऐका,
    मी काय सांगतो ते ऐका!
मी तुम्हांला ही गोष्ट सांगेन.
    मी तुम्हांला ही जुनी गोष्ट सांगेन.
आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे.
    आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती.
आणि आम्ही ती विसरणार नाही.
    आमचे लोक शेवटच्या पिढीपर्यंत ती गोष्ट सांगत राहातील.
आम्ही परमेश्वराची स्तुती करु
    आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगत राहू.
परमेश्वराने याकोबा बरोबर करार केला.
    देवाने इस्राएलला कायदा दिला.
    देवाने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या.
    त्याने आमच्या पूर्वजांना त्यांच्या वंशजांना नियम शिकवायला सांगितला.
नवीन मुले जन्माला येतील, तीच पुढे मोठी होतील आणि ती त्यांच्या मुलांना गोष्टी सांगतील
    या प्रमाणे लोकांना अगदी शेवटच्या पिढीपर्यंत नियम समजेल.
म्हणून ते सगळे लोक देवावर विश्वास ठेवतील.
    देवाने जे केले ते ते विसरणार नाहीत.
    ते अत्यंत सावधगिरीने त्याच्या आज्ञा पाळतील.
जर लोकांनी त्यांच्या देवाच्या आज्ञा त्यांच्या मुलांना शिकविल्या तर ती मुले त्यांच्या पूर्वजांसारखी होणार नाहीत.
    त्यांचे पूर्वज देवाविरुध्द गेले.
त्यानी देवाच्या आज्ञा पाळायचे नाकारले.
    ते लोक फार हट्टी होते ते देवाच्या आत्म्याशी प्रामाणिक नव्हते.

एफ्राइमच्या लोकांजवळ शस्त्रे होती.
    परंतु ते रणांगणावरुन पळून गेले.
10 त्यांनी देवाबरोबर झालेला त्यांचा करार पाळला नाही.
    त्यांनी त्याची शिकवण आचरायला नकार दिला.
11 एफ्राईमचे लोक देवाने केलेल्या महान गोष्टी विसरले.
    देवाने दाखवलेल्या अद्भुत गोष्टी ते विसरले.
12 मिसर देशातल्या सोअन प्रांतात देवाने
    त्यांच्या वाडवडिलांना त्याची महान शक्ती दाखवली.
13 देवाने लाल समुद्र दुभंगला आणि लोकांना पलिकडे नेले.
    पाणी एखाद्या भिंतीसारखे त्यांच्या दोन्ही बाजूला उभे होते.
14 देव रोज त्यांना उंच मेघाच्या साहायाने दिवसा
    व रात्री अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवीत नेत असे.
15 देवाने वाळवंटात पाषाण फोडला
    त्याने लोकांना पृथ्वीच्या गर्भातून पाणी दिले.
16 देवाने खडकातून नदीसारखे
    खळखळणारे पाणी बाहेर आणले.
17 परंतु लोकांनी देवाविरुध्द पाप करणे चालूच ठेवले.
    ते वाळवंटात सुध्दा सर्वशक्तिमान परमेश्वराच्या विरुध्द गेले.
18 नंतर त्या लोकांनी देवाची परीक्षा घ्यायचे ठरवले.
    त्यांनी त्यांची भूक भागवण्यासाठी देवाकडे अन्नाची मागणी केली.
19 त्यांनी देवाविरुध्द तक्रारी केल्या.
    ते म्हणाले, “देव आम्हांला वाळवंटात अन्न देऊ शकेल का?
20 त्याने दगडाला प्रहार केला आणि त्यातून पुरासारखे पाणी बाहेर येऊ लागले
    तो आम्हांला भाकरी आणि मांस नक्कीच देईल.”
21 त्या लोकांनी म्हटलेले परमेश्वराने ऐकले.
    देव याकोबावर फार रागावला देव इस्राएलवर फार रागावला.
22     का? कारण लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
देव त्यांना वाचवील यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
23-24 पण नंतर देवाने ढग बाजूला केले
    आणि त्यातून त्याने त्यांच्यावर अन्नासाठी मान्नाचा वर्षाव केला.
आकाशाचे दरवाजे उघडावेत तसा हा प्रकार होता
    आणि आकाशातील गोदामातून धान्याचा वर्षाव होत राहिला.
25 लोकांनी देवदूताचे अन्न खाल्ले.
    देवाने त्यांचे समाधान करण्यासाठी भरपूर अन्न पाठवले.
26-27 देवाने पूर्वेकडचा घोंगावणारा वारा पाठवला
    आणि त्यांच्यावर लावे पक्षी पावसाप्रमाणे कोसळले
देवाने दक्षिणेकडून वारा वाहायला लावला
    आणि निळे आकाश काळे झाले कारण आकाशात खूप पक्षी होते.
28 ते पक्षी छावणीच्या अगदी मध्य भागी,
    त्या लोकांच्या तंबूच्या अवती भोवती पडले.
29 त्यांच्याकडे भरपूर खायला होते
    परंतु त्यांनी त्यांच्या भुकेलाच पाप करायला लावले.
30 त्यांना त्यांची भूक आवरली नाही,
    म्हणून त्यांनी ते पक्षी रक्त काढल्याशिवायच खाल्ले.
31 देव त्यांच्यावर खूप रागावला आणि त्याने त्यांतल्या अनेकांना मारुन टाकले.
    त्यातल्या अनेक निरोगी तरुण माणसांना देवाने मारले.

नीतिसूत्रे 12:19-20

19 जर माणूस खोटे बोलला तर त्याचे शब्द लगेचच वाया जातात. पण सत्य मात्र सदैव राहाते.

20 दुष्ट लोक नेहमी संकटे आणतात. पण जे लोक शांततेसाठी काम करतात ते आनंदी असतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center