Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 34 - यहोशवा 2

मोशेचा मृत्यू

34 मवाबातील यार्देन खोऱ्यातून पिसग पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व प्रदेश दाखवला. नफताली, एफ्राईम व मनश्शेचा सर्व प्रदेश दाखवला. पश्चिमेकडल्या भूमध्य समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश दाखवला. तसेच नेगेव आणि सोअरा पासून यरीहो या खजुराच्या झाडांच्या नगरापर्यंतचे खोरे हे ही दाखवले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना कबूल केलेला हाच तो प्रदेश. त्यांच्या वंशजांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला पण तू तेथे जाणार नाहीस.”

मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्याला सांगितले होतेच. मवाबात मोशेचे परमेश्वराने दफन केले. बेथ-पौरासमोरच्या खोऱ्यात हा भाग आला. पण मोशेची कबर नेमकी कोठे आहे हे आजतागायत कोणाला कळलेले नाही. मोशे वारला तेव्हा एकशेवीस वर्षाचा होता. तेव्हाही त्याची तब्बेत ठणठणीत होती व दृष्टी चांगली होती. इस्राएल लोकांनी त्याच्यासाठी तीस दिवस शोक केला. त्या काळात ते मवाबातील यार्देन खोऱ्यात राहिले.

नवा नेता यहोशवा

मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्याला नवा नेता म्हणून नेमले होते. त्यामुळे नूनचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले.

10 इस्राएलला मोशे सारखा दुसरा संदेष्टा मिळाला नाही. परमेश्वराला मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता. 11 मिसरमध्ये महान चमत्कार करुन दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले. मिसरमध्ये फारो, त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले. 12 मोशेने करुन दाखवले तसे चमत्कार व आश्चर्यकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करुन दाखवल्या नाहीत. इस्राएलच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली.

देव यहोशवाची नेमणूक करतो

मोशे परमेश्वराचा सेवक होता. नूनाचा पूत्र यहोशवा मोशेचा मदतनीस होता. मोशेच्या निधनानंतर परमेश्वर यहोशवाशी बोलला. परमेश्वर म्हणाला, “माझा सेवक मोशे मरण पावला आहे आता तू आणि हे लोक यार्देन नदी पलीकडे जा. मी इस्राएल लोकांना देणार असलेल्या प्रदेशात तू गेले पाहिजेस. तुम्हाला हा प्रदेश द्यायचे मी मोशेला कबूल केले आहे. तेव्हा ज्याठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले. वाळवंट व लबानोन पासून फरात महानदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व प्रदेश तुमचाच होईल. तसेच येथपासून पश्चिमेकडील भूमध्य समुद्रापर्यंत म्हणजेच मावळतीपर्यंतचा देश तुमच्या हद्दीत असेल. मोशेला दिली तशीच तुलाही मी साथ देईन. तुला आता कोणी तुझे आयुष्य असेपर्यंत अटकाव करू शकणार नाही. मी तुला सोडणार नाही, तुला अंतर देणार नाही.

“यहोशवा, तू खंबीर हो, हिंमत धर. या लोकांचे नेतृत्व कर म्हणजे ते तो देश घेऊ शकतील. हा देश त्यांना द्यायचे मी त्यांच्या पूर्वजांना कबूल केले आहे. पण आणखी एका गोष्टीबद्दल तू खंबीर आणि समर्थ असले पाहिजेस. माझा सेवक मोशे याने तुला दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळ. त्यांचे तंतोतंत पालन केलेस तर तू हाती घेतलेल्या सर्व कार्यात यशस्वी होशील. नियमशास्त्राच्या त्या ग्रंथात लिहिलेल्या सर्व गोष्टी नेहमी लक्षात ठेव. रात्रंदिवस त्या ग्रंथाचे मनन कर म्हणजे तुझ्या हातून त्याचे पालन होईल. असे वागलास तर अंगिकारलेल्या सर्व गोष्टीत सफल होशील. खंबीर आणि निर्भय राहण्याची मी तुला आज्ञा केली आहे ना? तेव्हा कचरू नकोस. परमेश्वर तू जेथे जाशील तेथे तुझ्या बरोबर आहे.”

यहोशवा नेतुत्व स्वीकारतो

10 तेव्हा यहोशवाने लोकांमधील अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. तो म्हणाला, 11 “छावणीतून फिरुन लोकांना अन्न वगैरेची तयारी करुन सज्ज व्हायला सांगा. तीन दिवसाच्या आत आपल्याला यार्देन नदी पार करायची आहे. परमेश्वर देव देत आहे तो देश ताब्यात घ्यायला आपण निघत आहोत.”

12 मग रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळांच्या या लोकांशी यहोशवा बोलला. तो म्हणाला, 13 “परमेश्वराचा सेवक मोशे याने काय सांगितले त्याची आठवण करा परमेश्वर देव तुम्हाला विसाव्याचे स्थान देणार असल्याचे त्याने सांगितले. परमेश्वर तो देश तुम्हाला देणार आहे. 14 यार्देन नदीच्या पूर्वेकडील ही जमीन खरे तर परमेश्वराने तुम्हाला आधीच दिली आहे. तुमच्या बायकामुलांना व जनावरांना येथेच राहू द्या. पण सर्व योध्द्यांनी सशस्त्र होऊन, आपल्या बांधवांबरोबर यार्देन पलीकडे जावे. तुम्ही युध्दाची तयारी करून तो देश घ्यायला त्यांना मदत करावी. 15 तुम्हाला परमेश्वराने विसाव्याची जागा दिली आहेच. आता तुमच्या या बांधवानाही तो ती देईल. पण परमेश्वर देव देणार असलेली ती जमीन त्यांच्या ताब्यात येईपर्यंत त्यांच्या मदतीला थांबा. मग तुम्ही यार्देनच्या पूर्वेकडील या तुमच्या देशात परत येऊ शकता. परमेश्वराचा सेवक मोशे याने तो तुम्हाला दिला आहे.”

16 तेव्हा लोक म्हणाले. “तू आज्ञा केली आहेस त्याप्रमाणे आम्ही वागू. तू म्हणशील तेथे आम्ही जाऊ. 17 मोशेचे म्हणणे ऐकले तसेच तुझेही सर्व ऐकू, परमेश्वर देवाकडे फक्त आम्ही एक मागतो. तो मोशे बरोबर राहिला तसाच तुझ्या बरोबरही राहो. 18 म्हणजे एखाद्याने तुझी आज्ञा पाळायला नकार दिला किंवा तुझ्याविरूध्द बंड केले तर तो मारला जाईल. तू मात्र बलवान व खंबीर राहा.”

यरीहो मध्ये हेर

नूनाचा मुलगा यहोशवा आणि सर्व लोक यांचा तळ शिट्टीम (अकेशिया) येथे होता. तेव्हा कोणाच्याही नकळत यहोशवारे दोन हेर पाठवले. “तुम्ही जाऊन तो देश व विशेषतः यरीहो पाहून या.” असे सांगून त्याने त्या दोन हेरांना पाठवले.

त्या प्रमाणे ती माणसे यरीहोला गेली. रहाब नावाच्या एका वेश्येच्या घरी ते जाऊन राहिले.

यरीहोच्या राजाला कोणीतरी सांगितले की, आज रात्री इस्राएलमधून काही माणसे येथे आपल्या देशातील दुर्बलता शोधण्यासाठी व टेहेळणीसाठी आली आहेत.

तेव्हा राजाने रहाबला निरोप पाठवला “तुझ्याकडे वस्तीला आलेल्या त्या व्यक्तींना लपवू नकोस त्यांना बाहेर काढ. ते हेर म्हणून आलेले आहेत.”

तिने खरे तर त्या दोघांना लपवले होते. पण ती म्हणाली, “दोघेजण इथे आले होते खरे,पण कुठून आले हे मला माहीत नाही. संध्याकाळी वेशीचे दरवाजे बंद व्हायच्या सुमाराला ते निघून गेले. लगेच पाठलाग केलात तर ते सापडू शकतील.” (पण प्रत्यक्षात तिने त्यांना घराच्या छपरावर नेऊन अंबाडीच्या गंजीत लपवले होते.)

त्यांच्या मागावर गेलेली माणसे वेशीच्या बाहेर पडली आणि लोकांनी वेशीचे दरवाजे लावून घेतले. त्या दोघांचा तपास करत ही माणसे यार्देन नदीपर्यंत गेली आणि नदी ओलांडायच्या सर्व जागांचा तपास करू लागली.

इकडे हे दोन हेर झोपायची तयारी करत होते, पण रहाब वर जाऊन त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे हे मला माहीत आहे. तुमची आम्हांला भीती वाटते. या देशातील सर्व लोक घाबरून गेले आहेत. 10 कारण परमेश्वराने तुम्हाला कशी कशी मदत केली हे आम्ही ऐकले आहे. तुम्ही मिसरदेशामधून बाहेर पडताना त्याने तांबडचा समुद्राचे पाणी कसे आटवले हे आम्ही ऐकून आहोत. यार्देनच्या पूर्वेकडे असलेल्या त्या सीहोन आणि ओग या दोन अमोरी राजांचा नाश तुम्ही कसा केलात हे आमच्या कानावर आले. 11 हे सर्व ऐकून आम्ही फार घाबरून गेलो आहोत. आता तुमच्याशी लढण्याचे शौर्य आमच्या कोणातच नाही. कारण वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर तुमच्या परमेश्वर देवाची सत्ता आहे. 12 तेव्हा तुम्ही मला एक वचव द्या. मी तुमच्यावर दया दाखवली आणि तुमच्या मदतीला आले. तेव्हा माझ्या कुटुंबाच्या बाबतीत तुम्ही दया दाखवा. तशी परमेश्वराची शपथ घ्या मला तसे वचन द्या. 13 माझे वडील, आई, बहीण, भावंडे आणी त्यांचे परिवार आम्हा सर्वांना तुम्ही जिवंत ठेवाल, जिवे मारणार नाही असे वचन द्या.”

14 याला ते तयार झाले. ते म्हणाले, “तुमच्या करता आम्ही प्राणही देऊ. कोणालाही आम्ही काय करत आहोत हे सांगू नका. परमेश्वराने आमचा देश आम्हाला दिला की आम्ही तुमच्याशी दयाळूपणाने वागू. आमच्यावर विश्वास ठेव.”

15 या स्त्रीचे घर तटबंदीच्या भिंतीतच बांधलेले होते. तेव्हा तिने दोराच्या साहाय्याने या दोघांना खिडकीतून खाली उतरवले. 16 मग ती म्हाणाली, “आता पश्चिमेला जाऊन टेकड्यांमध्ये तीन दिवस लपून राहा. म्हणजे राजांच्या तपास करणाऱ्या माणसांच्या हाती तुम्ही लागणार नाही ती माणसे परतली की तुम्ही आपल्या वाटेने जा.”

17 यावर ते म्हणाले, “आम्ही तुला वचन दिले आहे पण एक गोष्ट कर. नाहीतर दिलेला शब्द पाळायाची जबाबदारी आमच्यावर नाही. 18 आमच्या सुटकेसाठी तू हा लाल दोर वापरला आहेस. आम्ही येथे परत येऊ तेव्हा खिडकीला हाच लाल दोर बांधून ठेव. तसेच तुझे आई-वडील, भावंडे वगैरे सर्व कुटुंबिय यांना या घरी एकत्र बोलाव. 19 या घरात राहणाऱ्या सर्वांचे आम्ही रक्षण करू. त्यांच्यापैकी कोणालाही काही इजा झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर राहील. पण येथून कोणी बाहेर पडल्यास तो मारला जाऊ शकेल मग आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. ती त्याचीच चूक असेल. 20 तुझ्याशी अम्ही हा करार करत आहोत. पण तू आम्ही काय करत आहोत हे कोणाला सांगितलेस तर आम्ही या करारातून मुक्त होऊ.”

21 यावर ती म्हणाली, “तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल.” मग तिने त्यांना निरोप दिला. ते बाहेर पडले त्यानंतर तिने तो लाल दोर खिडकीला बांधला.

22 ती माणसे बाहेर पडून टेकड्यांमध्ये गेली. तेथे त्यांनी तीन दिवस मुक्काम केला. त्यांचा तपास करणाऱ्यांनी सर्वत्र शोध केला. व तीन दिवसांनंतर तपास सोडून देऊन ते लोक नगरात परत आले. 23 मग हे दोन हेर टेकड्यांमधून बाहेर पडून नदी ओलांडून नूनाचा पुत्र यहोशवाकडे आले. आपल्याला समजलेले सर्व काही त्यांनी यहोशवाच्या कानावर घातले. 24 व ते म्हणाले, “परमेश्वराने हा प्रदेश खरोखरच आपल्याला दिला आहे. तेथील सर्वांची गाळण उडाली आहे.”

लूक 13:22-14:6

अरुंद दरवाजा(A)

22 येशू गावागावांतून आणि खेड्यापाड्यांतून जात असता व यरुशलेमाच्या दिशेने वाटचाल करीत असता तो लोकांना शिकवीत होता. 23 कोणीतरी त्याला विचारले, “प्रभु, फक्त थोड्या लोकांचेच तारण होईल का?”

तो त्यांना म्हणाला, 24 “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हांला सांगतो की, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही. 25 जेव्हा घराचा मालक उठून दार बंद करील, तेव्हा तुम्ही बाहेर उभे राहाल व दार ठोठवाल. आणि म्हणाल, ‘प्रभु, आम्हांसाठी दार उघडा!’ परंतु तो तुम्हांला उत्तर देईल, ‘तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.’ 26 नंतर तुम्ही म्हणाल, ‘आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!’ 27 आणि तो तुम्हांला म्हणेल, ‘तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, जे तुम्ही दुष्टपणा करता ते सर्व माझ्यापासून निघून जा.’

28 “तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला, आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर फेकलेले असाल. 29 आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील. 30 लक्षात ठेवा की, जे शेवटचे आहेत ते पहिले होतील, व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील.”

येशू यरुशलेमामध्ये मरण पावेल(B)

31 त्यावेळी काही परुशी येशूकडे आले. आणि ते त्याला म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हांला ठार मारणार आहे.”

32 येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ‘ऐक, मी लोकांतून भुते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’ 33 तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टयांनी यरुशलेमाबाहेर मरणे ह्याचा विचार करणे चूक आहे.

34 “यरुशलेमे, यरुशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कितीतरी वेळा कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे तुम्हा लोकांना एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती. 35 पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हांला सांगतो, ‘देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असो [a] असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.’”

शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?

14 एका शब्बाथ दिवशी तो प्रमुख परुश्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे असणारे लोक येशूवर बारकाईने नजर ठेवीत होते. आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता. येशूने नियमशास्त्राच्या शिक्षकांना व परुश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की कसे?” पण ते गप्प राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी माणसाला धरुन त्याला बरे केले व त्याला पाठवून दिले. मग तो त्यांना म्हणाला, “जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?” आणि ह्या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही.

स्तोत्रसंहिता 79

आसाफाचे स्तोत्र

79 देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले.
    त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला.
    त्यांनी यरुशलेम उध्वस्त केले.
शत्रूंनी तुझ्या सेवकांची प्रेते रानटी पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवली
    त्यांनी तुझ्या भक्तांची प्रेते रानटी पशूंना खाण्यासाठी ठेवली.
देवा, शत्रूंनी तुझी इतकी माणसे मारली की रक्त पाण्यासारखे वाहायला लागले.
    प्रेते पुरायला एखादा माणूसही उरला नाही.
आमच्या भोवतालच्या लोकांनी आमचा पाणउतारा केला
    आमच्या भोवतालची माणसे आम्हाला पाहून हसली आणि त्यांनी आमची चेष्टा केली.
देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का?
    देवा, तुझे भावनोद्रेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का?
देवा, तू तुझा राग ज्या देशांना तू माहीत नाहीस अशा देशांकडे वळव.
    जे देश तुझी उपासना करीत नाहीत अशा देशांकडे तुझा राग वळव.
त्या देशांनी याकोबाचा नाश केला
    त्यांनी याकोबाच्या देशाचा सर्वनाश केला.
देवा, कृपा करुन आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करु नकोस.
    आम्हांला लवकरात लवकर तुझी दया दाखव.
    आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे.
देवा, रक्षणकर्त्या, आम्हाला मदत कर.
    आम्हाला वाचव त्यामुळे तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल.
    आमची पापे तुझ्या नावाच्या भल्यासाठी पुसून टाक.
10 इतर देशांना “कुठे आहे तुमचा देव?
    तो तुम्हाला मदत करु शकत नाही का?”
असे म्हणू देऊ नकोस.
    देवा, त्या लोकांना शिक्षा कर म्हणजे आम्ही ते बघू शकू.
तुझ्या सेवकांना मारल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
11 कैद्यांच्या कण्हण्याकडे लक्ष दे देवा,
    मारण्यासाठी ज्यांची निवड झाली होती त्या लोकांना तुझ्या सामर्थ्याने वाचव.
12 देवा, आमच्या भोवतालच्या माणसांनी आम्हांला
    जो त्रास दिला त्याबद्दल त्यांना सात वेळा शिक्षा दे.
    तुझा अपमान केल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
13 आम्ही तुझी माणसे आहोत, आम्ही तुझ्या कळपातल्या मेंढ्या आहोत.
    आम्ही सदैव तुझी स्तुती करु.
    देवा, आम्ही अगदी सर्वकाळ तुझी स्तुती करु.

नीतिसूत्रे 12:26

26 चांगला माणूस आपले मित्र काळजीपूर्वक निवडतो. पण दुष्ट माणूस नेहमी चुकीचे मित्र निवडतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center