Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तोत्र तो यहुदाच्या रानात होता त्या वेळचे
63 देवा, तू माझा देव आहेस
आणि तू मला खूप हवा आहेस.
माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क,
बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
2 होय, मी तुला तुझ्या मंदिरात पाहिले.
मी तुझी शक्ती आणि तुझे गौरव पाहिले.
3 तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे.
माझे ओठ तुझी स्तुती करतात.
4 होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन
तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन.
5 चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन,
आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.
6 अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल,
मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.
7 तू मला खरोखरच मदत केली आहेस.
तू माझे रक्षण केलेस म्हणून मी आनंदी आहे.
8 माझा आत्मा तुला धरुन ठेवतो
आणि तू माझा हात धरतोस.
9 काही लोक मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.
परंतु त्यांचा नाश होईल.
ते खाली त्यांच्या थडग्यात जातील.
10 त्यांना तलवारीने मारले जाईल.
रानटी कुत्री त्यांची प्रेते खातील.
11 परंतु राजा त्याच्या देवाबरोबर आनंदात असेल
आणि ज्या लोकांनी त्यांच्या आज्ञा पाळायचे वचन दिले ते त्याची स्तुती करतील का?
कारण त्याने त्या खोटे बोलणाऱ्यांचा पराभव केला.
दावीद आणि त्याचे लोक हेब्रोनला जातात
2 दावीदाने मग परमेश्वराला विचारले, “मी यहूदातील एखाद्या नगरात जाऊ का?”
तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हो खुशाल जा.”
दावीदाने विचारले, “कुठे जाऊ?”
देवाने सांगितले, “हेब्रोनला जा.”
2 तेव्हा दावीद आपल्या दोन्ही बायकांसह हेब्रोनला गेला. (इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन बायका) 3 आपल्या बरोबरच्या लोकांनाही दावीदाने त्यांच्या त्यांच्या परिवारासकट सोबत घेतले. हेब्रोन येथे आणि आसपासच्या गावांमध्ये या सर्वांनी वस्ती केली.
4 यहूदा येथील लोक मग हेब्रोनला आले आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करुन यहूदाचा राजा म्हणून घोषित केले. मग त्याला ते म्हणाले, “याबेश गिलादच्या लोकांनी शौलचा दफनविधी केला.”
5 तेव्हा दावीदाने याबेश गिलादच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविथी करुन तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो. 6 देव तुमच्याशी प्रामाणिक राहील, तुमच्यावर प्रेमाची पाखर घालील. मीही तुमच्याशी दयाळूपणाने वागेन. कारण तुम्ही हे काम केलेले आहे. 7 आता खंबीर राहा आणि धैर्याने वागा. आपला स्वामी शौल मरण पावला असला तरी यहूदा वंशातील लोकांनी मला राज्याभिषेक केला आहे.”
जगावर विजय
25 “जरी मी तुम्हांला रूपकाच्या भाषेत या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी मी आणखी अशा प्रकारची भाषा बोलणार नाही, पण साधेपणाने पित्याविषयी तुम्हांला सांगेन. 26 त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल, आणि मी तुमच्यासाठी पित्याकडे विनंति करीन असे मी म्हणत नाही. 27 कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीति करतो कारण तुम्ही माझ्यावर प्रीति केली व माझ्यावर विश्वास ठेवला की, मी देवापासून आलो. 28 मी पित्यापासून आलो आणि जगात प्रवेशलो आणि आता मी जग सोडत आहे, आणि पित्याकडे पुन्हा जात आहे.”
29 मग येशूचे शिष्य म्हणाले, “आता तुम्ही स्पष्टपणे बोलत आहात आणि रूपकाची भाषा वापरीत नाही. 30 आता आम्हांला पक्के समजले की, तुम्हांला सर्व माहीत आहे. आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारण्याचीसुद्वा आवश्यकता नाही, यामुळे आमचा विश्वास बसतो की, आपण देवापासून आला आहात.”
31 येशूने उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरू लागला काय? 32 पण अशी वेळ येत आहे आणि आली आहे, जेव्हा तुमची पांगापांग होईल. प्रत्येक जण त्याच्या घरी जाईल. तुम्ही मला एकटेच सोडाल, तरीही मी एकटा नाही कारण माझा पिता मजबरोबर आहे.”
33 “मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. यासाठी की माझ्यामध्ये तुम्हांला शांति मिळावी, या जगात तुम्हांला त्रास होईल, पण धीर धरा! मी जगावर मात केली आहे.”
2006 by World Bible Translation Center