Revised Common Lectionary (Semicontinuous)
शलमोनाचे वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
127 जर परमेश्वर घर बांधीत नसेल
तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत.
जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल
तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.
2 भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि
रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.
देव ज्या लोकांवर प्रेम करतो
त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.
3 मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत.
आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.
4 तरुण माणसाची मुले सैनिकाच्या
भात्यातील बाणांसारखी आहेत.
5 जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल.
त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची मुले सार्वजानिक ठिकाणी [a] त्याच्या शत्रूंविरुध्द त्याचे रक्षण करतील.
बवाज आणि दुसरा आप्त
4 बवाज मग वेशीजवळ चावडीपाशी गेला. तो नातलग दिसेपर्यंत तिथे थांबला. त्याला पाहिल्यावर बवाजने त्याला प्रेमाने बोलावले. आणि जवळ बसायला सांगितले, तो माणूस आला आणि बवाजच्या जवळ बसला.
2 बवाजने मग काही साक्षीदांरानाही गोळा केले. गावातील दहा ज्येष्ठ मंडळींना बोलावले. त्यांनाही बसवून घेतले.
3 मग बवाज त्या नातेवाईकाला म्हणाला, “हे पाहा, नामी मवाबच्या डोंगराळ प्रदेशातून आली आहे. अलीमलेखच्या मालकीची जमीन तिने विकायला काढली आहे. 4 हे पंच आणि ज्येष्ठ मंडळी यांच्या साक्षीने तुला हे मी सांगायचे ठरवले आहे. ही जमीन तुला परत विकत घ्यायची असल्यास तू घेऊ शकतोस. पण नसेल तर तसे मला सांग ही जमीन परत विकत घेण्याचा तुझ्यानंतर माझाच हक्क आहे. तेव्हा तू ती विकत घेणार नसलास तर मी घेईन.”
5 पूढे बवाज म्हणाला, “नामीची जमीन घेतलीस तर मवाबहून आलेली विधवा रूथसुद्धा तुझी पत्नी होईल. तिला मुल झाले की जमीन त्याच्या ताब्यात जाईल. म्हणजे जमीनीचा ताबा तिच्या मृत पतीच्याच कुटुंबात राहील.”
6 यावर तो आप्त म्हणाला, “मी काही ती जमीन घेत नाही. मीच खरे तर ती घ्यायला हवी, पण मला ते शक्य नाही कारण त्यामुळे कदाचित् मी माझ्या स्वतःच्या जमिनीला मुकेन. [a] तेव्हा तू ती खुशाल घेऊ शकतोस.” 7 (पूर्वी इस्राएलमध्ये गहांण टाकलेल्या जमिनीची ती सोडवून घेण्याचे व्यवहार करताना खरेदीचा पुरावा म्हणून तो माणूस पायातला जोडा काढून दूसऱ्याला देत असे.) 8 त्यानुसार तो नातलग म्हणाला, “जमीन तूच विकत घे” आणि आपला जोडा काढून त्याने बवाजला दिला.
9 बवाज मग तेथील सर्व श्रेष्ठवडीलधाऱ्या साक्षीदारांना म्हणाला, “आज तुमच्या साक्षीने मी अलीमलेख, खिल्योन, महलोन यांच्या मालकीचे सर्व काही नामीकडून विकत घेत आहे. 10 रूथलाही बायको म्हणून मी विकत घेतो. म्हणजे या मृत व्यक्तींची मिळकत त्यांच्याच घराण्यात राहिल. त्यांचे नाव त्यांच्या कुळातून, वतनातून पुसले जाणार नाही. तुम्ही या सगळ्याला साक्षी आहात.”
6 आम्ही जेव्हा आमचे स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला. 7 आता नीतिमान मनुष्यासाठी सुध्दा कदाचित कोणी मरणार नाही. एखादा मनुष्य चांगला असेल तर त्याच्यासाठी मरण्याचे धाडस कदाचित कोणीतरी करील. 8 परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो आमच्यावर फार प्रेम करतो.
9 तर मग आता आपण ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत, म्हणून ख्रिस्ताद्वारे देवाच्या रागापासून आपण वाचले जाणार आहोत. 10 आम्ही देवाचे शत्रू असताही त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे त्याने आमच्याशी समेट केला. त्यामुळे आता आम्ही देवाचे मित्र असल्यामुळे देव आम्हांला त्याच्या पुत्राच्या जीवनाद्वारे रक्षील. 11 इतकेच नव्हे तर ज्याच्याद्वारे आमचा देवाबरोबर समेट झाला त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हीसुद्धा देवाविषियी अभिमान बाळगतो.
2006 by World Bible Translation Center