Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 2:1-10

हन्नाचे धन्यवाद

हन्नाने परमेश्वराला धन्यवाद देणारे गीत म्हटले;

“परमेश्वराबद्दल माझ्या मनात आनंद मावत नाही.
    त्याच्यामुळे मला सामर्थ्य आले [a]
माझ्या शत्रुंना मी हसते. [b]
    माझ्या विजयाचा मला आनंद आहे!

परमेश्वरासारखा पवित्र कोणी देव नाही.
    देवा, तुझ्यावाचून कोणी नाही.
    आमच्या देवासारखा अभेद्य दुर्ग दुसरा नाही.

लोकहो, बढाया मारु नका.
    गर्वाने बोलू नका.
कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे.
    तोच लोकांचे नेतृत्व करतो आणि त्यांना न्याय देतो.
शूरांची धनुष्यं भंगतात
    आणि दुर्बळ लोक शक्तीशाली होतात.
पूर्वी ज्यांच्याकडे अन्नाधान्याचे मुबलक साठे होते
    त्यांना आज अन्नासाठी मोल मजुरी करावी लागत आहे.
आणि जे पूर्वी भुकेकंगाल होते
    ते आता आराम करत आहेत.
आजपर्यंत नि:संतान होती
    तिला आता सात मुलं आहेत.
पण मुलबाळ असलेली दु:खी आहे.
    कारण तिची मुलं तिच्यापासून लांब गेली आहेत.

परमेश्वर लोकांना मरण देतो
    आणि परमेश्वरच त्यांना जीवन देतो.
तोच अधोलोकाला नेतो
    आणि वरही आणतो.
परमेश्वरच काहीना दरिद्री तर
    काहींना श्रीमंत करतो.
काही लोकांना लाचार करतो
    तर काहींचा सन्मान परमेश्वरच करतो.
गरीबांना धुळीतून उचलून
    त्यांचे दु:ख हरण [c] त्यांचा गौरव करुन
त्यांना राजपुत्रांच्या बरोबरीने बसवतो,
    मानाचे स्थान देतो.
जगाची निर्मिती परमेश्वरानेच केली.
    सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे. [d]

सज्जनांना तो आधार देतो.
    त्यांना लटपटू देत नाही.
पण दुर्जनांचा संहार करतो.
    त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ
    अशा वेळी कुचकामी ठरते.
10 शत्रूंचा तो नाश करुन
    त्याच्यावर गर्जेल.
दूरदूरच्या प्रदेशांचाही तो न्याय करील.
    राजाला सामर्थ्य देईल.
    आपल्या खास राजाला बलवान करील.”

1 शमुवेल 3:1-18

परमेश्वराची शमुवेलला हाक

लहानगा शमुवेल एलीच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत मग्न होता. त्या काळी परमेश्वराने लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फार क्वचित येत असत. तो सहसा दृष्टांत देत नसे.

एलीची दृष्टी आता अधू झाल्यामुळे तो जवळजवळ आंधळाच झाला होता. एकदा तो रात्री झोपला होता. परमेश्वराचा पवित्र कोश परमेश्वराच्या पवित्र मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपलेला होता. परमेश्वरापुढचा दिवा अजून जळत होता. तेव्हा परमेश्वराने शमुवेलला हाक मारली. शमुवेल म्हणाला, “मी येथे आहे.” एली आपल्याला बोलवत आहे असे वाटल्याने तो लगबगीने एलीजवळ गेला. त्याला म्हणाला, “मला बोलावलत ना? हा मी आलो.”

पण एली म्हणाला, “मी नाही हाक मारली जा, जाऊन झोप.”

शमुवेल झोपायला गेला. पुन्हा परमेश्वराने हाक मारली. “शमुवेल.” शमुवेल परत धावत एलीकडे गेला आणि आपण आल्याचे त्याने सांगितले.

एली म्हणाला, “मी कोठे बोलावलं तुला? जा, झोप.”

परमेश्वर अजून शमुवेलशी कधी प्रत्यक्ष बोलला नव्हता, त्याला त्याने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे शमुवेलने परमेश्वराला ओळखले नाही.

परमेश्वराने शमुवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. शमुवेल पुन्हा उठून एलीकडे गेला. मला बोलवलेत म्हणून मी आलो असे त्याने सांगितले.

परमेश्वरच या मुलाला हाक मारत आहे हे आता एलीच्या लक्षात आले. तो शमुवेलला म्हणाला, “जाऊन झोप. पुन्हा हाक आली तर म्हण, ‘हे परमेश्वरा, बोल हा तुझा सेवक ऐकत आहे.’”

तेव्हा शमुवेल परत जाऊन झोपला. 10 परमेश्वर आला आणि तिथे उभा राहिला. पहिल्या सारखीच त्याने “शमुवेल, शमुवेल”, म्हणून हाक मारली.

शमुवेल म्हणाला, “बोल, मी तुझा दास ऐकत आहे.”

11 तेव्हा परमेश्वराने शमुवेलला सांगितले, “इस्राएलामध्ये मी आता लौकरच काहीतरी करणार आहे. ते ऐकून लोकांना धक्का बसेल. 12 एली आणि त्याच्या कुटुंबियाबद्दल मी जे बोललो होतो ते सर्व मी अथ पासून इतिपर्यंत करुन दाखवणार आहे. 13 त्याच्या घराण्याचे पारिपत्य करीन असे मी एलीला म्हणालो होतो. आपल्या बहकलेल्या मुलांचे वागणे बोलणे परमेश्वराविरुध्द आहे हे त्याला माहीत असून त्यांना तो ताळ्यावर आणू शकलेला नाही, म्हणून मी हे करणार आहे. 14 आता यज्ञ आणि अर्पण यांनी त्याच्या घरच्यांची पापे धुतली जाणार नाहीत अशी मी शपथ वाहिली आहे.”

15 रात्र सरेपर्यंत शमुवेल आपल्या बिछान्यावर पडून राहिला. सकाळ होताच उठून त्याने मंदिराची दारे उघडली. आपल्याला झालेल्या दृष्टांताची हकीकत एलीला सांगायची त्याला भीती वाटली.

16 पण एलीनेच शमुवेलला प्रेमाने हाक मारुन जवळ बोलावले.

तेव्हा शमुवेल आज्ञाधारकपणे जवळ उभा राहिला.

17 एली म्हणाला, “परमेश्वर तुझ्याशी काय बोलला? मोकळेपणाने सर्व सांग. काही लपवलेस तर परमेश्वर तुला शिक्षा करील.”

18 तेव्हा काहीही न लपवता एलीला शमुवेलने सर्व काही सांगितले.

एली म्हणाला, “तो परमेश्वर आहे. त्याला योग्य वाटेल ते तो करो.”

मार्क 12:1-12

देव त्याचा पुत्र पाठवितो(A)

12 येशू त्यांना बोधकथा सांगून शिकवू लागला, “एका मनुष्याने द्राक्षाचा मळा लावला व त्याच्याभोवती कुंपण घातले. त्याने द्राक्षारसासाठी कुंड खणले, आणि टेहळणीसाठी माळा बांधला. त्याने तो शेतकऱ्यास खंडाने दिला व तो दूर प्रवासास गेला.

“हंगामाच्या योग्य वेळी शेतकऱ्याकडून द्राक्षमळ्यातील फळांचा योग्य हिस्सा मिळावा म्हणून त्याने एका नोकरास पाठविले. परंतु त्यांनी नोकरास धरले, मारले आणि रिकामे पाठवून दिले. नंतर त्याने दुसऱ्या नोकरास पाठविले. त्यानी त्याचे डोके फोडले आणि त्याला अपमानकारक रीतीने वागविले. मग धन्याने आणखी एका नोकराला पाठविले. त्यांनी त्याला जिवे मारले त्याने इतर अनेकांना पाठविले. शेतकऱ्यांनी काहींना हाणमार केली तर काहींना ठार मारले.

“धन्याजवळ पाठविण्यासाठी आता फक्त त्याचा प्रिय मुलगा उरला होता. त्याने त्याला सर्वात शेवटी पाठविले. तो म्हणाला, ‘खात्रीने ते माझ्या मुलाला मान देतील.’ तो त्याचा आवडता मुलगा होता म्हणून शेवटी त्याने त्याला त्या शेतकऱ्यांकडे पाठाविले.

“परंतु ते शेतकरी एकमेकांस म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण याला जिवे मारू म्हणजे वतन आपले होईल!’ मग त्यांनी त्याला धरले, जिवे मारले, आणि द्राक्षमऴ्याबाहेर फेकून दिले.

“तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येईल आणि शेतकऱ्यांना जिवे मारील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. 10 तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय?

‘जो दगड बांधणारांनी नाकारला
    तो कोनशिला झाला.
11 हे प्रभुने केले.
    आणि ते आमच्यासाठी आश्चर्य कारक आहे.’” (B)

12 मग ते येशूला अटक करण्याचा मार्ग शोधू लागले. परंतु त्यांना लोकांची भीति वाटत होती. त्याला अटक करण्याची त्यांची इच्छा होती कारण त्यांना माहीत होते की, ही बोधकथा त्याने त्यांनाच उद्देशून सांगितली होती. मग ते त्याला सोडून निघून गेले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center