Revised Common Lectionary (Semicontinuous)
37 तू दुष्टांवर चिडू नकोस.
वाईट कर्म करणाऱ्यांचा हेवा करु नकोस.
2 वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या
आणि मरुन जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पती सारखे असतात.
3 तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास
तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील.
4 परमेश्वराची आनंदाने सेवा कर म्हणजे
तो तुला जे काही हवे ते आनंदाने देईल.
5 परमेश्वरावर अवलंबून राहा.
त्याच्यावर विश्वास ठेव.
आणि तो जे करणे आवश्यक असेल ते करेल.
6 परमेश्वर तुझा चांगुलपणा
आणि न्यायीपणा दुपारच्या उन्हासारखा तळपू देईल.
7 परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा
दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको सदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस.
8 रागावू नकोस, संताप करुन घेऊ नकोस.
तुला स्वत:ला दुष्कर्म करावेसे वाटेल इतका संतापू नकोस.
9 का? कारण दुष्टांचा नाश होणार आहे.
परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
10 थोड्याच काळानंतर इथे दुष्ट लोक राहाणार नाहीत.
तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करु शकतोस पण ते निघून गेलेले असतील.
11 विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
आणि ते शांती व समाधानात जगतील.
39 परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो
ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो.
40 परमेश्वर चांगल्या माणसांना मदत करतो आणि त्यांना तारतो चांगले
लोक परमेश्वरावर अवलंबून असतात आणि तो त्यांचे वाईट लोकांपासून रक्षण करतो.
योसेफ सापळा टाकतो
44 मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, “या लोकांच्या पोत्यात जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना देता येईल तेवढे भर; आणि त्या सोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव. 2 सर्वात धाकट्या भावाच्या पोत्यात पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव.” त्याच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही केले.
3 दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी त्या भावांना त्यांच्या गाढवांसहित त्यांच्या देशाला रवाना करण्यात आले. 4 त्यांनी नगर सोडल्यानंतर थोडया वेळाने योसेफ आपल्या कारभऱ्यास म्हणाला, “जा आणि त्या लोकांचा पाठलाग कर आणि त्यांना थांबवून असे म्हण, ‘आम्ही तुमच्याशी भलेपणाने वागलो! असे असता तुम्ही आमच्याशी अशा वाईट रीतीने का वागला. तुम्ही माझ्या स्वामीचा चांदीचा प्याला का चोरल? 5 हा प्याला खास माझा धनी पिण्याकरिता वापरतात; गुप्त गोष्टी समजून घेण्यासाठी तो वापरतात. तसेच देवाला प्रश्न विचारण्याकरिता माझा धनी हया प्यालाचा उपयोग करतात. हा प्याला चोरुन तुम्ही फार वाईट केले आहे.’”
6 तेव्हा तो कारभारी स्वार होऊन व त्यांना गाठून योसेफाने आज्ञा केल्याप्रमाणे बोलला.
7 परंतु ते भाऊ कारभाऱ्याला म्हणाले, “स्वामी असे का बरे बोलतात? आम्ही कधीच अशा गोष्टी करीत नाही! 8 मागे आमच्या पोत्यात मिळालेले पैसे आम्ही आता येताना आठवणीने आणले; तेव्हा खात्रीने आपल्या स्वामीच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी चोरणार नाही. 9 या उपर आम्हापैकी कोणाच्या पोत्यात तुम्हाला जर तो चांदीचा प्याला मिळाला तर तो भाऊ मरेल; तुम्ही त्याला मारून टाकावे आणि मग आम्ही सर्वजण आमच्या स्वामीचे गुलाम होऊ.”
10 कारभारी म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण करु. जर मला चांदीचा प्याला मिळाला तर मग तो माणूस माझ्या धन्याचा गुलाम होईल; इतर जण जाण्यास मोकळे राहतील.”
सापळा उघडतो; वन्यामीन त्यात अडकतो
11 नंतर हर एक भावाने लगेच आपली गोणी जमिनीवर उतरुन उघडली. 12 कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरवात करुन धाकटया भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले; तेव्हा त्याला बन्यामीनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला. 13 तेव्हा त्या भावांना भयंकर दु:ख झाले; अति दु:खामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले.
14 यहूदा व त्याचे भाऊ परत योसेफाच्या घरी गेले. योसेफ अजून घरातच होता. त्या भावांनी योसेफापुढे लोटांगण घातले. 15 योसफ त्यांना म्हणाला, “तुम्ही असे का केले? मला शकून पाहून गुप्त समजण्याचे विशेष ज्ञान आहे हे तुम्हाला माहीत नाही का? आणि या बाबतीत माझ्यापेक्षा अधिक चांगले ज्ञान इतर कोणालाही नाही!”
16 यहूदा म्हणाला, “महाराज! आम्ही आता काहीच बोलू शकत नाही, व याचा उलगडा करण्याचा दुसरा मार्ग नाही. आम्ही अपराधी नाही हे पटविण्यास दुसरा कोणताच मार्ग नाही. आमच्या दुसऱ्या कोणत्यातरी अपराधाबद्दल देवाने आम्हाला दोषी ठरवले आहे. म्हणून आता बन्यामीनासकट आम्ही सर्वजण महाराजांचे गुलाम झालो आहोत.”
17 परंतु योसेफ म्हणाला, “मी तुम्हा सर्वजणांना गुलाम करणार नाही! फक्त ज्याने चांदीचा प्याला चोरला तोच माझा गुलाम होईल. बाकीचे तुम्ही शांतीने आपल्या बापाकडे जाऊ शकता.”
12 प्रिय मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे,
कारण ख्रिस्तामुळे तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे.
13 वडिलांनो, मी तुम्हांला लिहितो
कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो,
मी तुम्हांला लिहीत आहे,
कारण दुष्टावर तुम्ही जय मिळविला आहे.
14 मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे,
कारण तुम्हांला पिता माहीत आहे.
वडिलांनो, मी तुम्हांला लिहिले,
कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे.
त्याची तुम्हांला ओळख झाली आहे.
तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले,
कारण तुम्ही सशक्त आहात;
देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते,
कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.
15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करु नका. जर कोणी जगावर प्रेम करतो, तर पित्याविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेम नाही. 16 कारण जगात जे सर्व काही आहे, ते म्हणजे पापी देहाला संतोषविणारी लैंगिक वासना, डोळ्यांची वासना, व संसाराविषयीची फुशारकी हे पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. 17 जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो अनंतकाळपर्यंत जगेल.
2006 by World Bible Translation Center