Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमूख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
19 स्वर्ग देवाचा महिमा गातात.
आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
2 प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो
आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
3 तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही.
तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
4 परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो
त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात.
आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
5 सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो.
सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या
एखाद्या धावपटू सारखी करतो.
6 सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो
आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो.
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.
7 परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे.
ती देवाच्या लोकांना शक्ती देते.
परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे.
त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
8 परमेश्वराचे नियम योग्य आहेत
ते लोकांना सुखी करतात.
परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत
त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
9 परमेश्वराची भीती शुध्द आहे.
ती अखंड सहन करावी लागेल.
परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत.
ते संपूर्णत बरोबर आहेत.
10 परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे.
ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
11 परमेश्वराच्या शिकवणी ने त्याच्या सेवकाला इशारा मिळतो.
चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.
12 कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत.
म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
13 परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस.
त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस.
तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईन आणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
14 माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मला वाचवणारा फक्त तूच आहेस.
नहेम्याची गरिबांना मदत
5 अनेक गरीब लोकांनी आपल्या यहुदी बांधवांविरुध्द तक्रार करायला सुरुवात केली. 2 त्यांच्यापैकी काहीजण म्हणू लागले, “आम्हाला बरीच मुले बाळे आहेत. आम्हाला खायला मिळावे आणि आम्ही जिवंत राहावे यासाठी आम्हांला धान्य तर मिळाले पाहिजे.”
3 इतर काही म्हणत होते, “सेध्या दुष्काळ आहे. धान्यासाठी आम्हाला आमची शेंत, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत.”
4 आणखी काही म्हणत, “आमची शेते आणि द्राक्षमळे यांच्यावर आम्हाला राजाचा कर लागत आहे. पण तो भरणे परवडत नसल्यामुळे आम्हाला पैसे उसने घ्यावे लागत आहेत. 5 ते श्रीमंत लोक पाहा! आम्ही त्यांच्यासारखेच तर आहोत. त्यांच्या मुलांसारखीच आमची मुले आहेत. पण आम्हांला आमची मुले मुली गुलाम म्हणून विकावी लागली. काहींना तर आपल्या मुलींना गुलाम म्हणून विकणे भाग पडलेले आहे. आम्ही असहाय आहोत. आमची शेती आणि द्राक्षमळे तर गेलेच. ते आता इतर लोकांच्या मालकीचे आहेत.”
6 या तक्रारी ऐकल्या तेव्हा मला अतिशय संताप आला. 7 पण मी स्वतःला शांत केले आणि मग श्रीमंत कुटुंबे आणि कारभारी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, “तुम्ही लोकांना जी रक्कम कर्जाऊ देता तिच्यावर व्याज द्यायची तुम्ही या आपल्याच माणसांना बळजबरी करत आहात. ते तुम्ही थांबवले पाहिजे.” मग मी सर्व लोकांना एकत्र बोलावले. 8 त्यांना मी म्हणालो, “आपले यहुदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. आणि आता पुन्हा तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!”
ते श्रीमंत लोक आणि अधिकारी गप्प राहिले. त्यांना काही बोलायला जागा उरली नाही. 9 तेव्हा मी त्यांच्याशी बोलत राहिलो. मी म्हणालो, “तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही. देवाविषयी भय आणि आदर बाळगावा हे तुम्ही जाणता. इतर लोकांसारखी लाजिरवाणी कृत्ये तुम्ही करु नयेत. 10 माझे लोक, माझे भाऊ आणि मी सुध्दा लोकांना पैसे आणि धान्य उधार देत आहोत. पण त्यावरचे व्याज त्यांना सक्तीने द्यायला लावणे थांबवले पाहिजे. 11 त्यांची शेती, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे आणि घरे तुम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता परत करा. त्यांना लावलेले व्याजही तुम्ही परत करा. त्यांना जे पैसे, धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल तुम्ही कर्जाऊ दिलेत त्यावर तुम्ही एक टक्का व्याज लावले आहे. ते तुम्ही त्यांना परत करा.”
12 यावर ते श्रीमंत लोक आणि अधिकारी म्हणाले, “आम्ही ते परत करु आणि आम्ही त्यांच्या कडून आधिक काही मागणार नाही. नहेम्या, आम्ही तुझ्या म्हणण्याबरहुकूम वागू.”
मग मी याजकांना बोलावून घेतले. श्रीमंत लोक आणि अधिकारी जे बोलले त्याप्रमाणे वागण्याचे मी त्यांना देवासमोर वचन द्यायला लावले. 13 मग मी माझ्या वस्त्रावरच्या चुण्या झटकत म्हणालो, “आपले वचन जो पाळत नाही त्या प्रत्येकाची गत देव अशीच करतो. देव त्यांना त्यांच्या घरातून झटकून टाकील. ज्यासाठी त्यांनी कामधंदा केला ते त्यांच्यापासून हिरावून घेतले जाईल. तो माणूस सर्वस्वाला मुकेल.”
माझे सांगून झाले. आणि सर्वजण त्याच्याशी सहमत झाले. ते सर्व म्हणाले, “आमेन!” मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले.
योसेफ आणि मरीया घरी येतात
39 प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांनी सर्व पूर्ण केले व नंतर ते गालीलातील त्यांच्या नासरेथ या गावी परतले. 40 बालक वाढत होता, तो बलवान झाला, तो ज्ञानाने परिपूर्ण झाला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.
येशूचे बालपण
41 प्रत्येक वर्षी त्याचे आईवडील वल्हांडण सणासाठी यरुशलेमाला जात. 42 जेव्हा तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी वर गेले. 43 सण संपल्यावर ते घरी परतत असता, येशू (मुलगा) मात्र यरुशलेमातच राहिला, पण त्याच्या आईवडिलांना हे माहीत नव्हते. 44 कुठल्या तरी प्रवाश्यांच्या घोळक्याबोरबर तो येत असावा असा विचार करुन पुढे एक दिवसाचा प्रवास केला. मग ते त्याला त्यांच्या नातेवाईकांमध्ये व मित्रांमध्ये शोधू लागले. 45 जेव्हा तो त्यानां सापडला नाही तेव्हा त्याला शोधण्यासाठी यरुशलेमास परत गेले.
46 असे घडले की, तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात सापडला, तो गुरुजनांच्यामध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारीत होता. 47 ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले. 48 जेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला पाहिले तेव्हा ते चकित झाले. त्याची आई त्याला म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का केले? तुला शोधत असताना तुझे वडील व मी अतिशय काळजीत होतो.”
49 मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का केलात? माझ्या पित्याचे कार्य जेथे आहे, तेथे मी असावे हे तुम्हांला माहीत नव्हते काय?” 50 परंतु त्याने हे जे उत्तर दिले ते त्यांना समजले नाही.
51 मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला. आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याची आई या सर्व गोष्टी अंतःकरणात ठेवीत होती. 52 येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढला.
2006 by World Bible Translation Center