Revised Common Lectionary (Semicontinuous)
5 परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे.
तुझी इमानदारी ढगांपेक्षा उंच आहे.
6 परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे
तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे.
परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस.
7 तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यांत किंमती आहे.
माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात.
8 परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो.
तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस.
9 परमेश्वरा जीवनाचे कारंजे तुझ्यातून उडते.
तुझा प्रकाश आम्हाला प्रकाश दाखवतो.
10 परमेश्वरा जे तुला खरोखरच ओळखतात त्यांच्यावर प्रेम करणे तू चालूच ठेव.
जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी तुझा चांगुलपणा असू दे. [a]
4 हा परमेश्वराचा संदेश आहे
“इस्राएल तुला परत यायचे असेल
तर माझ्याकडे परत ये.
तुझ्या मूर्ती फेकून दे.
माझ्यापासून दूर जाऊन भटकू नकोस.
2 तू ह्या गोष्टी केल्यास,
तर तू शपथ घेण्यासाठी माझे नाव वापरु शकशील.
‘परमेश्वर असे तो पर्यंत,’
असे तू म्हणू शकशील.
तू हे शब्द खऱ्या, प्रामाणिक आणि योग्य, तऱ्हेने वापरु शकशील.
तू ह्या गोष्टी केल्यास परमेश्वर राष्ट्रांना आशीर्वाद देईल.
ती राष्ट्रे परमेश्वराने केलेल्या
कृत्यांबद्दल बढाया मारतील.”
3 परमेश्वर यहूदा व यरुशलेम मधील लोकांना म्हणतो:
“तुमची शेते नांगरलेली नाहीत.
ती शेते नांगरा.
काट्यात बी पेरु नका.
4 परमेश्वराची माणसे व्हा.
तुमची ह्रदये बदला [a] यहुदातील आणि
यरुशलेममधील लोकांनो तुम्ही बदलला नाहीत,
तर मी खूप रागावेन.
माझा राग आगीप्रमाणे वेगाने पसरुन
तुम्हाला जाळून टाकील.
असे का घडेल?
तुम्ही केलेल्या दुष्कृंत्यांमुळे असे घडेल.”
येशूचे सामर्थ्य देवापासून आहे(A)
14 येशू एक भूत काढीत होता. ते मुके होते. मग असे झाले की, जो मनुष्य बोलू शकत नव्हता तो, भूत बाहेर आल्यावर, बोलू लागला व लोकांचा जमाव चकित झाला. 15 परंतु त्यांच्यातील काही लोक म्हणाले की, “भुतांचा प्रमुख जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भुते काढतो.”
16 काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले. 17 पण त्यांच्या मनात काय होत हे त्याला माहीत होते आणि तो त्यांना म्हणाला, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरात एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात. 18 आणि तुम्ही म्हणता तशी जर भुतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हांला हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो.. 19 पण जर मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे अनुयायी (तुमची मुले) कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील. 20 परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भुते काढतो, तर मग हे स्पष्ट आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे.
21 “जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो आणि स्वतःचे रक्षण करतो तेव्हा त्याची मालमता सुरक्षित राहते. 22 परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करुन त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्यांने भरंवसा ठेवला होता, ती तो घेऊन जातो व त्याला मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो.
23 “जो माझ्या पक्षाचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबरीने गोळा करीत नाही, तर तो उधळून टाकतो.
2006 by World Bible Translation Center