Revised Common Lectionary (Semicontinuous)
देव येत आहे
60 “यरूशलेम, माझ्या ज्योती, ऊठ.
तुझा प्रकाश (देव) येत आहे.
परमेश्वराची प्रभा तुझ्यावर फाकेल.
2 आता अंधाराने जग व्यापले आहे
आणि लोक अंधारात आहेत.
पण परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर पडेल,
त्याची प्रभा तुझ्यावर पसरेल.
3 राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे (देवाकडे) येतील.
राजे तुझ्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
4 तुझ्या सभोवती पाहा! बघ,
लोक तुझ्या भोवती जमून तुझ्याकडे येत आहेत.
ती तुझी दूरवरून येणारी मुले आहेत
आणि त्याच्याबरोबर, तुझ्या मुलीही येत आहेत.
5 “हे भविष्यात घडून येईल.
त्यावेळी तू तुझ्या लोकांना पाहशील.
तुझा चेहरा मग आनंदाने उजळेल.
प्रथम तू घाबरशील.
पण नंतर तुझ्या भावना अनावर होतील.
समुद्रापलीकडील सर्व संपत्ती तुझ्यापुढे ठेवली जाईल.
राष्ट्रांचे सर्व धन तुला मिळेल.
6 मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप
तुझी भूमी ओलांडतील.
शेबातून उंटांची रीघ लागेल.
ते सोने आणि सुंगधी द्रव्ये आणतील.
लोक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
शलमोनासाठी स्तोत्र
72 देवा, तू राजाला तुझ्यासारखे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर.
आणि राजाच्या मुलाला तुझ्या चांगुलपणा विषयी शिकायला मदत कर.
2 तुझ्या लोकांना चांगला न्याय मिळावा म्हणून राजाला मदत कर
तुझ्या गरीब लोकांसाठी चांगले आणि शहाणपणाचे निर्णय घेण्यासाठी त्याला मदत कर.
3 पृथ्वीवर सगळीकडे शांती,
आणि न्याय नांदू दे.
4 राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे.
त्याला असहाय लोकांना मदत करु दे.
त्यांना जे त्रास देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करु दे.
5 जो वर सूर्य चमकतो आहे आणि चंद्र आकाशात आहे तोवर लोकांनी राजाला मान द्यावा आणि त्याची भीती बाळगावी असे मला वाटते.
लोक त्याला सदैव मान देतील आणि त्याची भीती बाळगतील अशी आशा मी करतो.
6 राजाला शेतात पडणाऱ्या पावसासारखे असू दे,
त्याला पृथ्वीवर पडणाऱ्या पर्जन्यासारखे असू दे.
7 तो जो पर्यंत राजा आहे तो पर्यंत चांगुलपणा उमलू दे.
जो पर्यंत चंद्र आहे तो पर्यंत शांती नांदू दे.
10 तार्शीशच्या आणि दूरदूरच्या देशांच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणू दे.
शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी खंडणी आणू दे.
11 सगळ्या राजांना आमच्या राजासमोर मुजरे करु दे
सगळी राष्ट्रे त्याच्या सेवेत राहू दे.
12 आमचा राजा असहाय्याला मदत करतो.
आमचा राजा गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करतो.
13 गरीब आणि असहाय्य लोक त्याच्यावर अवलंबून असतात.
राजा त्यांना जिवंत ठेवतो.
14 जे दुष्ट लोक त्यांना दु:ख द्यायचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून राजा त्यांना वाचवतो.
राज्याला त्या गरीबांचे आयुष्य खूप मोलाचे वाटते.
पौलाचे विदेशी लोकांसाठी कार्य
3 या कारणासाठी मी, पौल तुम्हा विदेशी लोकांसाठी ख्रिस्त येशूचा कैदी आहे. 2 देवाची कृपा तुमच्यापर्यंत पोचविण्याची व्यास्था करण्याचे काम माझ्यावर सोपवल्याचे तुम्ही जाणता 3 आणि जशी मी अगोदर तुम्हांला थोडक्यात लिहिली होती ती देवाची गूढ योजना मला प्रकटीकरणाच्या द्वारे कळविण्यात आली. 4 जर तुम्ही ती वाचाल तर तुम्हांला माझ्या ख्रिस्ताच्या रहरयाविषयीचे पूर्ण ज्ञान होणे शक्य होईल. 5 मागील पिढ्यांमध्ये हे रहस्य मनुष्यांच्या पुत्रांना सांगण्यात आले नव्हते, जसे आता त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणाऱ्यांना आत्म्याच्या द्वारे प्रकट करण्यात आले आहे. 6 हे रहस्य ते आहे की, सुवार्तेद्वारे विदेशी लोक हे यहूदी लोकांबरोबर सहवारसदार आहेत, ते एकाच शरीराचे अवयव आहेत. आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाने दिलेल्या अभिवचनामध्ये सहभागीदार आहेत.
7 देवाच्या प्रभावी कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी सुवार्ता सांगण्याची जबाबदारी दिलेला सेवक झालो. 8 जरी मी देवाच्या सर्व लोकांमध्ये लहानातील लहान आहे तरी मला हे देवाच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता यहूदीतरांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले, 9 आणि रहस्यमय योजना सर्व लोकांना कळविण्यास सांगितली, ज्या देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या, त्याच्याकडे काळाच्या सुरुवातीपासून ही रहस्यमय योजना देवामध्ये लपून अशी राहिली होती. 10 यासाठी की आता मंडळीद्धारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान व्हावे. 11 देवाच्या अनंतकाळच्या हेतूला अनुसरुन जे त्याने आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्णत्वास नेले. 12 त्या ख्रिस्तामध्ये आम्हांला देवाच्या समक्षतेत आमच्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे धैर्य आणि पूर्ण विश्वास आहे.
ज्ञानी लोक येशूला भेटण्यास येतात
2 यहूदीयातील बेथलहेम गावात येशूचा जन्म झाला. त्यावेळी हेरोद राजा राज्य करीत होता. येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडून काही ज्ञानी लोक यरूशलेमाला आले. 2 आणि त्यांनी विचारले, “यहूद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कोठे आहे? कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिशेस पाहिला म्हणून त्याला नमन करण्यास आलो आहोत.”
3 हे ऐकून हेरोद राजा तसेच यरुशलेम नगराचे रहिवासी घाबरुन गेले. 4 मग त्याने यहूदी लोकांचे सर्व मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांना बोलाविले आणि विचारले की, “ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार होता?” 5 त्यांनी उत्तर दिले, “यहूदीयातील बेथलेहेम गावात. कारण देवाच्या संदेष्टयांनी त्याविषयी असे लिहिले आहे की:
6 ‘हे बेथलहेमा, यहूद्यांच्या भूमिप्रदेशा,
तू यहूद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही
कारण माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील,
असा राज्यकर्ता तुझ्यातून येईल.’” (A)
7 मग हेरोदाने पूर्वेकडील ज्ञानी लोकांची गुप्तपणे भेट घेतली आणि तारा दिसल्याची नक्की वेळ माहीत करून घेतली. 8 नंतर त्याने त्यांना बेथलहेमला पाठविले. हेरोद त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन त्या बालकाचा नीट शोध करा. आणि तुम्हांला ते सापडल्यावर मला सांगायला या. म्हणजे मी सुद्धा जाऊन त्याला नमन करू शकेन.”
9 ज्ञानी लोकांनी राजाचे म्हणणे ऐकले व ते निघाले, त्यांनी जो तारा पूर्वेला पाहिला होता तोच त्यांना परत दिसला. ज्ञानी लोक त्या ताऱ्याच्या मागे गेले. जेथे बाळ होते ते ठिकाण येईपर्यंत तारा त्यांच्यासमोर जात होता. मग त्या ठिकाणावर तो थांबला. 10 ज्ञानी लोकांना ते पाहून फार आनंद झाला.
11 ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठ्यात आले. त्यांनी बाळ व त्याची आई मरीया हिला पाहिले. त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले. नंतर त्यांनी बाळासाठी आणलेल्या भेटवस्तु काढल्या. त्यांनी बाळाला सोने, ऊद व गंधरस ह्या बहुमोल वस्तु दिल्या. 12 पण देवाने स्वप्नाद्वारे त्या ज्ञानी लोकांना सावध केले आणि हेरोदाकडे परत जाऊ नका असे सांगितले. तेव्हा ते ज्ञानी लोक वेगळ्या मार्गाने आपल्या देशास परतले.
2006 by World Bible Translation Center