Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the EHV. Switch to the EHV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 20-21

योनाथान आणि दावीद यांच्या मधला करार

20 दावीद रामा येथील शिबिरापासून दूर पळून गेला. योनाथानकडे येऊन तो म्हणाला, “माझं काय चुकल? माझा अपराध तरी काय? तुझे वडील का माझ्या जिवावर उठले आहेत?”

योनाथान म्हणाला, “हे काय भलतेच? ते कशाला तुझ्या जिवावर उठतील? मला सांगितल्या शिवाय ते कधीच कुठली गोष्ट करत नाहीत. कोणतीही महत्वाची किंवा क्षुल्लक गोष्ट असो, ते ती मला सांगतातच. मग तुझा वध करायची बाब ते कशी माझ्यापासून लपवून ठेवतील? तेव्हा हे काही खरं नव्हे!”

तेव्हा दावीद म्हणाला, “आपण मित्र आहोत ही गोष्ट तुझे वडील चांगली जाणून आहेत. ते स्वतःशी म्हणाले, ‘योनाथानला हे कळता कामा नये. त्याला कळले तर तो हे दावीदला सांगेल.’ पण परमेश्वराची आणि तुझ्या जीविताची शपथ घेवून सांगतो, मृत्यू माझ्याभोवती घोटाळतो आहे.”

योनाथान मग दावीदाला म्हणाला, “तू काय म्हणशील ते करायला मी तयार आहे.”

मग दावीद म्हणाला, “उद्या अमावस्ये निमित्त मेजवानी आहे. तेव्हा राजाच्या पंक्तीला मी असायला हवे. पण संध्याकाळपर्यंत मी शेतात लपून बसतो मी नसल्याचे तुझ्या वडीलांच्या लक्षात आले तर त्यांना सांग, ‘दावीदला बेथलहेमला तातडीने जायचे होते. त्याच्या सगळ्या कुटुंबाचा मासिक यज्ञ तेथे आहे. त्यात हजर राहायला जाण्यासाठी त्याने माझी परवानगी मागितली.’ तुझ्या वडीलांनी हे सहजगत्या मान्य केले तर मला काही धोका नाही. पण ते संतापले तर मात्र माझ्या जिवाला धोका आहे हे तू ओळख. योनाथान, माझ्यावर कृपा कर. मी तुझा दास आहे. परमेश्वराच्या साक्षीने तू माझ्याशी करार केला आहेस. मी अपराधी आढळल्यास खुशाल तू माझा वध कर. पण मला तुझ्या वडीलांकडे नेऊ नको.”

यावर योनाथान म्हणाला, “अस घडणार नाही. ते तुझ्या वाईटावर आहेत असं माझ्या लक्षात आलं तर मी तूला तसं सांगीन.”

10 दावीद म्हणाला, “तुझ्याशी ते कठोरपणे वागले तर मला कोण खबर देईल?”

11 तेव्हा योनाथानने सुचवले, “चल आपण शेताकडे जाऊ.” आणि ते दोघे ही शेतात गेले.

12 तिथे योनाथान दावीदला म्हणाला, “देव जो, इस्राएलचा परमेश्वर या समोर मी तुला वचन देतो. माझ्या वडीलांच्या तुझ्याबद्दल काय भल्याबुऱ्या भावना आहेत ते मी जाणून घेईन. मग तीन दिवसात तुला तसं इथे याच शेतात कळवीन. 13 त्यांच्याकडून तुला काही घातपात होणार असेल तर तुला त्याची कल्पना देईन. तुला सुखरुप निसटू देईन. माझ्याहातून यात हयगय झाल्यास परमेश्वर मला त्याची शिक्षा देवो. माझ्या वडीलांना परमेश्वराची साथ आहे तशीच तुला मिळो. 14 मी हयात असेपर्यंत तुझा माझ्यावर लोभ असू दे. मी गेल्यावरही 15 माझ्या कुटुंबावरील तुझ्या लोभात खंड न पडो. परमेश्वर तुझ्या वैऱ्यांचा पृथ्वीतलावरुन नि:पात करील. 16 मग त्या वेळी योनाथानच्या कुटुंबाला दावीदपासून वेगळे व्हावे लागले तरी बेहत्तर. देव दावीदाच्या शत्रूंना शासन करो.” मग योनाथानने दावीदाच्या घराण्याशी करार केला.

17 योनाथानने मग दावीदला परस्परांवरील प्रेमाच्या आणाभाका परत घ्यायला लावल्या. दावीदावर त्याचे स्वतः इतकेच प्रेम होते म्हणून त्या प्रेमापोटी त्याने असे केले.

18 योनाथान दावीदला म्हणाला, “उद्या अमावास्येची मेजवानी आहे. पंक्तीतील तुझे आसन रिकामे असेल त्यामुळे तुझी अनुपस्थिती माझ्या वडीलांच्या लक्षात येईल. 19 या सगळ्यांला सुरुवात झाली तेव्हा तू जिथे लपला होतास त्याच ठिकाणी तू तिसऱ्या दिवशी थांब. त्या टेकडी जवळ माझी वाट पाहा. 20 तिसऱ्या दिवशी मी तिथे येईन आणि नेमबजी चालली आहे असे भासवीन. काही बाण मी मारीन. 21 आणि हाताखालच्या मुलाला बाण शोधून आणायला पाठवीन. सर्वकाही ठीक असेल तर त्या मुलाला मी म्हणेन, ‘तू खूप लांब गेलास बाण माझ्या जवळ आहेत. तर ये व तो घे.’ जर मी असा म्हणालो तर तू खुशाल बाहेर ये मग, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या सुरक्षिततेची हमी माझ्यावर, कोणताही धोका तेव्हा नसेल. 22 पण काही धोका असल्यास मी म्हणेन, ‘बाण आणखी पुढे आहेत. जा, जाऊन आण.’ तसे मी म्हटले तर मात्र तू निघून जा. प्रत्यक्ष परमेश्वरच तुला लांब पाठवत आहे असे समज. 23 आपल्या दोघांमधला हा करार लक्षात ठेव. परमेश्वर याला साक्ष आहे.”

24 त्यानंतर दावीद शेतात लपून बसला.

मेजवानीच्या प्रसंगी शौलचा दृष्टिकोण

अमावास्येच्या मेजवानीची वेळ झाली आणि राजा भोजनासाठी बसला. 25 भिंती जवळच्या आपल्या नेहमीच्या आसनावर राजा बसला. त्याच्या समोर योनाथान होता. आबनेर शौलजवळ होता. दावीदाचे आसन मात्र रिकामे होते. 26 त्यादिवशी शौल काहीच बोलला नाही. त्याला वाटले, “काही कारणाने आज तो शुचिर्भूत नसेल.”

27 दुसऱ्या दिवशी पुन्हा दावीदाचे आसन रिकामेच राहिले. तेव्हा मात्र शौल योनाथानला म्हणाला, “इशायचा मुलगा या प्रंसगी दिसत नाही. कालही नव्हता, आजही नाही. असे का?”

28 योनाथानने सांगितले, “त्याने माझ्याजवळ बेथलहेमला जायची परवानगी मागितली. 29 तो म्हणाला, ‘मला जायला हवे. बेथलहेमला आमच्या कुटुंबात यज्ञ आहे. माझ्या भावाने मला यायची आज्ञा केली आहे. आपल्या मैत्रीला स्मरुन तू मला भावांना भेटायला जायची परवानगी दे.’ दावीद आज राजाच्या पंक्तीला नाही याचे हे कारण आहे.”

30 शौल योनाथानवर संतापला. तो म्हणाला, “अरे दासीपुत्रा, तू माझी अवज्ञा करतोस? आणि तू तिच्यासारखाच निपजलास. तू दावीदाच्या बाजूचा आहेस हे मला माहीत आहे. तू तुला आणि तुझ्या आईला लाज आणली आहेस. 31 हा इशायचा मुलगा जिवंत असेपर्यंत तू राज्यावर येणार नाहीस. आत्ताच्या आत्ता दावीदला आणून हजर कर. त्याला मेलेच पाहिजे.”

32 योनाथान आपल्या वडीलांना म्हणाला, “त्याने काय केले? का म्हणून त्याने मेले पाहिजे?”

33 यावर शौलाने योनाथानवर आपला भाला फेकला आणि त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा, दावीदाला मारायचा आपल्या वडीलांनी निश्चय केला आहे हे योनाथानच्या लक्षात आले. 34 संतापाने तो पंक्तीतून चालता झाला. त्या रागात त्याने अन्नाला स्पर्शसुध्दा केला नाही. शौलाने आपल्याला शरमिंदे केले आणि दावीदाला मारायचे ठरवले म्हणून त्याला फार राग आला.

दावीद आणि योनाथान निरोप घेतात

35 दुसऱ्या दिवशी सकाळी योनाथान शेतावर आला. ठरल्याप्रमाणे दावीदला भेटायला तो आला. आपल्याबरोबर त्याने मदतनीस मुलालापण आणले. 36 त्याला तो म्हणाला, “धावत पुढे हो. मी बाण मारतो तो आण.” मुलगा धावत जायला लागल्यावर योनाथानने त्याच्या डोक्यावरुन बाण मारले. 37 बाण पडले त्या ठिकाणी तो मुलगा पोचल्यावर योनाथान म्हणाला, “बाण आणखी पुढेच आहेत.” 38 मग तो म्हणाला, “जा धावत जा, लौकर आणि नुसता उभा राहू नको.” मुलाने मग बाण उचलून गोळा करुन आणले. 39 काय चालले आहे याची त्या मुलाला अजिबात कल्पना नव्हती. फक्त योनाथान आणि दावीदला ते कळत होते. 40 योनाथानने धनुष्यबाण त्या मुलाकडे दिले आणि त्याला तो म्हणाला, “आता तू गावात परत जा.”

41 मुलगा दिसेनासा झाल्यावर दावीद डोंगराच्या पलीकडे लपला होता तिथून बाहेर आला. त्याने योनाथानला तीनदा वाकून अभिवादन केले. मग त्यांनी परस्परांचे मुके घेतले. दोघेही रडू लागले. पण दावीदाचा आक्रोश योनाथानपेक्षा जास्त होता.

42 योनाथान दावीदला म्हणाला, “शांत चित्ताने जा. परमेश्वराची शपथ घेऊन आपण मैत्रीच्या आणाशपथा घेतल्या आहेत. आपण आणि आपले वंशज यांना परमेश्वर, चिरंतन साक्षी आहे.”

दावीद अहीमलेख याजकाकडे जातो

21 मग दावीद निघून गेला आणि योनाथान आपल्या गावी परत आला. दावीद नोब नामक गावी अहीमलेख या याजकाला भेटायला गेला.

अहीमलेख त्याला भेटायला चार पावले पुढे चालून गेला. अहीमलेखला भीतीने कापरे भरले होते. दावीदला त्याने विचारले, “तू एकटाच का? तुझ्याबरोबर कोणीच नाही हे कसे?”

दावीदाने सांगितले, “राजाच्या खास आज्ञेवरुन मी आलो आहे. त्यानुसार हे काम गुप्त ठेवायचे आहे. त्याबद्दल कोणालाही काही कळू द्यायचे नाही. माझी माणसे विशिष्ट संकेतस्थळी मला भेटणार आहेत. आता आधी तुझ्या जवळ खायला द्यायला काय आहे ते सांग. पाच भाकरी किंवा जे असेल ते दे.”

तेव्हा याजक म्हणाला, “साधी भाकर तर आत्ता नाही पण पवित्र भाकर आहे. तुझ्या अधिकाऱ्यांचा बायकांशी संबंध आला नसेल तर त्यांना ती चालेल.”

दावीद म्हणाला, “आमचा बायकांशी संपर्क आलेला नाही. युध्दावरच काय पण अगदी सामान्य मोहिमेवर निघालो तरी आमची माणसे शुचिर्भूत असतात. मग या खास कामाबद्दल तर बोलायलाच नको.”

पवित्र भाकरी खेरीज दुसरी भाकर नव्हतीच. तेव्हा याजकाने दावीदला तीच दिली परमेश्वरापुढच्या पवित्र मेजावर याजक रोजच्या रोज ताजी भाकर ठेवत, त्यातली ही होती.

दवेग नावाचा शौलाचा एक अधिकारी त्या दिवशी तेथे होता. तो अदोमी असून शौलाच्या मेंढपाळांचा प्रमुख होता. परमेश्वरासमोर त्याला थांबवून ठेवलेले [a] होते.

दावीदाने अहीमलेखला विचारले, “इथे भाला किंवा तलवार आहे का? राजाचे काम फार निकडीचे असल्यामुळे मला तातडीने निघावे लागले. त्यामुळे मी माझे शस्त्र बरोबर आणू शकलो नाही.”

पुरोहित म्हणाला, “गल्याथ या पलिष्ट्याला तू एलाच्या खोऱ्यात मारलेस तेव्हा त्याची तलवार काढून घेतलीस. तीच काय ती इथे आहे. एफोदच्या मागे एका कापडात ती गुंडाळून ठेवलेली आहे. हवीतर ती घे.”

दावीद म्हणाला, “तीच दे. तिच्यासारखी दुसरी तलवार नाही.”

गथ येथील शत्रुकडे दावीद पळ काढतो

10 शौलाकडून दावीद पळाला, तो गथचा राजा आखीश याच्याकडे आला. 11 आखीशच्या अधिकाऱ्याला हे आवडले नाही. त्याचे अधिकारी म्हणाले, “हा दावीद, इस्राएल भूमीचा राजा. इस्राएल याचे गुणगान गातात. नाचत गात ते याच्याविषयी म्हणतात,

“शौलाने हजार शत्रूंना मारले
    तर दावीदाने लाखोंचा वध केला.”

12 दावीदाने त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. गथचा राजा आखीश याला सामोरे जायची त्याला भीती वाटली. 13 म्हणून राजा व त्याचा दरबार यांच्यापुढे त्याने वेड्याचे सोंग वठवले. प्रवेशद्वारावर थुंकला, दाढीवर लाळ ओघळू दिली.

14 आखीश हे पाहून आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “पाहा, हा माणूस वेडा आहे. याला इथे कशाला येऊ दिलेत? 15 वेड्यांची इथे कमतरता आहे की काय? माझ्यासमोर याचे वेडेचाळे चालायचे नाहीत. त्याला पुन्हा इथे येऊ देऊ नका.”

योहान 9

जन्मापासून आंधळा असलेल्या मनुष्याला येशू दृष्टि देतो

येशू चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला. हा मनुष्य त्याच्या जन्मापासून आंधळा होता. येशूच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरुजी, हा मनुष्य आंधळा जन्मला. परंतु तो कोणाच्या पापामुळे आंधळा जन्मला? त्याच्या स्वतःच्या का त्याच्या आईवडिलांच्या पापामुळे?”

येशूने उत्तर दिले, “त्याच्या स्वतःच्या पापामुळे अगर त्याच्या आईवडीलांच्या पापामुळे हा आंधळा झाला नाही. मी याला बरे करताना लोकांना देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा आंधळा जन्मला. दिवस आहे तोपर्यंत, ज्याने मला पाठविले त्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे. रात्र येत आहे आणि रात्री कोणी काम करु शकत नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”

असे बोलल्यानंतर, येशू मातीवर थुंकला. त्याने त्या थुंकीने चिखल केला, आणि त्या चिखलाचा गोळा करुन त्याने त्या माणसाच्या डोळ्यांवर ठेवला. मग येशूने त्या मनुष्याला सांगितले, “जाऊन शिलोह तळ्यात डोळे धू.” (शिलोह म्हणजे पाठविलेला) म्हणून तो मनुष्य त्या तळ्यापाशी गेला. त्याने डोळे धुतले आणि तो परत आला, तेव्हा त्याला चांगले दिसू लागले होते.

काही लोकांनी त्याला भीक मागताना पूर्वी पाहिले होते. ही माणसे आणि त्याचे शेजारी म्हणाले, “पाहा! येथे बसून भीक मागत असे तो मनुष्य हाच आहे ना?”

काही लोक म्हणाले, “होय! हा तोच आहे.” परंतु दुसरे काही म्हणाले, “नाही हा तो मनुष्य नाही. हा फक्त त्याच्यासारखा दिसतो.”

मग तो माणूस स्वतः होऊनच म्हणाला, “अहो, मीच तो पूर्वीचा आंधळा आहे.”

10 लोकांनी विचारले, “अरे असे घडले तरी काय? तुला कसे दिसू लागले?”

11 त्या मनुष्याने उत्तर दिले. “लोक ज्याला येशू म्हणतात त्याने थोडा चिखल केला. त्याने तो चिखल माझ्या डोळ्यांवर लावला. मग येशूने मला शिलोह तळ्याकडे जाऊन धुण्यास सांगितले. म्हणून मी शिलोह तळ्यावर जाऊन डोळे धुतले. आणि मग मला दिसू लागले.”

12 लोकांनी त्या मनुष्याला विचारले, “तो मनुष्य कोठे आहे?”

त्या मनुष्याने उत्तर दिले, “मला माहीत नाही.”

येशूने बरे केलेल्या मनुष्याची परुश्यांकडून चौकशी

13 मग लोकांनी परुशी लोकांकडे त्या मनुष्याला नेले. हाच पूर्वी आंधळा मनुष्य होता. 14 येशूने चिखल करुन त्या मनुष्याचे डोळे बरे केले होते. ज्या दिवशी येशूने हे केले तो शब्बाथ दिवस होता. 15 म्हणून आता परुशी लोक त्या मनुष्याला विचारु लागले, “तुला कसे काय दिसू लागले?”

त्या मनुष्याने उत्तर दिले, “त्याने माझ्या डोळ्यांवर चिखल लावला. मी डोळे धुतले आणि आता मी पाहू शकतो.”

16 परुश्यांतील काही लोक म्हणाले, “हा मनुष्य शब्बाथाचा नियम पाळीत नाही. म्हणून तो देवापासून नाही.”

दूसरे लोक म्हणाले, “परंतु एखादा मनुष्य पापी असेल तर त्याला असे चमत्कार करताच येणार नाहीत.” याविषयी त्या यहूदी लोकांचे एकमत होईना.

17 मग यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला पुन्हा विचारले, “त्या मनुष्याने तुला बरे केले, आणि आता तुला दिसते, तर त्याच्याविषयी तुला काय म्हणायचे आहे?”

त्या मनुष्याने उत्तर दिले, “तो एक संदेष्टा आहे.”

18 हे या माणसाच्या बाबतीत घडले आहे यावर यहूदी लोकांचा विश्वासच बसेना, हा मनुष्य आंधळा होता आणि आता त्याला दिसते या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसत नव्हता. नंतर त्यांनी त्या मनुष्याच्या आईवडिलांना बोलावून घेतले. 19 यहुदी लोकांनी त्याच्या आईवडिलांना विचारले, “हा तुमचाच मुलगा आहे काय? तुम्ही म्हणता हा जन्मापासून आंधळा होता तर आता याला कसे काय दिसू लागले?”

20 त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिले, “हा आमचाच मुलगा आहे. आणि तो आंधळाच जन्माला आला हे आम्हांला माहीत आहे. 21 परंतु त्याला आता कसे दिसायला लागले आणि त्याचे डोळे कोणी बरे केले हे आम्हांला माहीत नाही. त्यालाच विचारा. तो स्वतः बद्दल सांगण्याइतका सुज्ञ झाला आहे.” 22 त्याचे आईवडील असे म्हणाले कारण त्यांना यहूदी धर्मपुढाऱ्यांची फार भीति वाटत होती. येशू हा ख्रिस्त आहे, असे जो कोणी म्हणेल, त्याला शिक्षा करायची असे यहूदी पुढाऱ्यांनी अगोदरच ठरवून ठेवलेले होते. अशा लोकांना यहूदी पुढारी सभास्थानाबाहेर घालवू शकत होते. 23 म्हणून “त्यालाच विचारा तो आता मोठा झाला आहे” असे त्या मनुष्याचे आईवडील म्हणाले.

24 मग जो जूर्वी आंधळा होता त्याला यहूदी पुढाऱ्यांनी पुन्हा बोलाविले. ते त्याला म्हणाले, “तुला बरे केले म्हणून तू देवाला गौरव द्यावे. हा मनुष्य पापी आहे हे आम्हांला माहीत आहे.”

25 त्या मनुष्याने उत्तर दिले, “तो पापी आहे की नाही हे मला माहीत नाही. परंतु हे मला नक्की माहीत आहे की, मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते.”

26 यहूदी पुढाऱ्यांनी विचारले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे बरे केले?”

27 त्या मनुष्याने उत्तर दिले. “ते मी तुम्हांला अगोदरच सांगितले आहे. परंतु तुम्ही माझे ऐकत नाही. पुन्हा तुम्हांला ते ऐकावेसे वाटते काय? तुम्हांलाही त्याचे शिष्य व्हावयाची इच्छा आहे काय?”

28 यहूदी पुढारी फार संतापले आणि त्याला फारच वाईट रीतीने बोलू लागले. ते त्याला म्हणाले, “तू त्याचा शिष्य आहेस. आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत. 29 देव मोशेशी बोलत असे हे आम्हांला माहीत आहे. परंतु हा मनुष्य कोण, कोठून आला हे आम्हांला माहीत नाही.”

30 त्या मनुष्याने उत्तर दिले, “ही फारच विचित्र गोष्ट आहे. येशू कोठून आला हे तुम्हांला माहीत नाही. परंतु त्याने माझे डोळे बरे केले. 31 देव पापी लोकांचे ऐकत नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण जो त्याची उपासना करतो आणि त्याची आज्ञा पाळतो त्याचेच तो ऐकेल. 32 जो मनुष्य जन्मजात आंधळा होता, त्याला दृष्टी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 33 हा मनुष्य देवाकडूनच आला असला पाहिजे. जर तो देवाकडूल आला नसता तर त्याला असे काहीच करता आले नसते.”

34 यहूदी पुढाऱ्यांनी उतर दिले, “तू तर पापात जन्मला आहेस तू आम्हांला शिकवू पाहतोस काय?” आणि यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला तेथून हुसकून लावले.

आध्यात्मिक आंधळेपणा

35 यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला बळजबरीने हुसकावून लावले, हे येशूने ऐकले, म्हणून येशू त्या मनुष्याला भेटला आणि म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”

36 त्या मनुष्याने विचारले, “महाराज, हा मनुष्याचा पुत्र कोण? मला सांगा, म्हणजे मला त्याच्यावर विश्वास ठेवता येईल.”

37 येशू त्याला म्हणाला, “तू त्याला अगोदरच पाहिले आहेस. मनुष्याचा पुत्र आता तुझ्याशी बोलत आहे.”

38 “होय, प्रभु, मी विश्वास ठेवतो.” त्या मनुष्याने उत्तर दिले. मग त्या मनुष्याने खाली वाकून येशूला वंदन केले.

39 येशू म्हणाल, “जगाचा न्याय व्हावा म्हणून मी जगात आलो आहे. मी आलो आहे तो यासाठी की, जे आंधळे आहेत त्यांना दिसावे. आणि आम्हांला पाहता येते असे वाटणारे आंधळे व्हावेत.”

40 परुश्यांतील काही जण येशूच्या आजूबाजूला होते. त्यांनी येशूला हे बोलताना ऐकले. आणि त्यांनी विचारले, “काय, आम्हीसुद्धा आंधळे आहोत असे तुला म्हणायचे आहे काय?”

41 येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच आंधळे (समज नसलेले) असता, तर तुम्ही पापाबद्दल दोषी ठरला नसता. परंतु ‘आम्हांस दिसते’ असे तुम्ही म्हणता (तुम्ही काय करता हे जाणता) म्हणून तुम्ही दोषी आहात.”

स्तोत्रसंहिता 113-114

113 परमेश्वराची स्तुती करा.

परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा.
    परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा.
परमेश्वराचे नाव आता आणि
    सदैव धन्य व्हावे असे मला वाटते.
पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत
    परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते.
परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे.
    त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते.
कुणीही माणूस आमचा देव, जो परमेश्वर आहे त्याच्यासारखा नाही.
    देव स्वर्गात उंच बसतो.
देव आमच्या वर इतका उंच आहे की त्याला आकाश
    आणि पृथ्वी यांकडे खाली वाकून बघावे लागते.
देव गरीब लोकांना घाणीतून वर उचलतो.
    देव भिकाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगातून काढतो.
आणि देव त्या लोकांना महत्व देतो.
    देव त्या लोकांना महत्वाचे नेते बनवतो.
स्त्रीला मूल होत नसेल तर देव तिला मुले देईल
    आणि तिला आनंदी करेल.

परमेश्वराची स्तुती करा.

114 इस्राएलने मिसर देश सोडला.
    याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला.
यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इस्राएल त्याचे राज्य झाले.
लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला.
    यार्देन नदी वळली आणि पळाली.
पर्वत मेंढ्यांसारखा नाचला.
    टेकड्या कोकरासारख्या नाचल्या.

लाल समुद्रा, तू का पळून गेलास?
    यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस?
पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात?
    आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात?

पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या
    देवासमोर थरथर कापली.
देवानेच खडकातून पाणी वहायला लावले.
    देवानेच कठीण खडकातून झरे वाहायला लावले.

नीतिसूत्रे 15:15-17

15 काही गरीब लोक नेहमी खिन्न असतात. पण मनातून आनंदी असलेल्या लोकांसाठी जीवन म्हणजे एक मोठा समारंभ असतो.

16 गरीब राहून परमेश्वराचा आदर करणे हे श्रीमंत होऊन खूप संकटे भोगण्यापेक्षा चांगले असते.

17 प्रेम असते त्या ठिकाणी थोडेसे खाणे हे तिरस्कार असलेल्या ठिकाणी भरपूर खाण्यापेक्षा चांगले असते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center