Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
रूथ 2-4

रूथ आणि बवाज यांची भेट

बेथलेहेममध्ये बवाज नावाचा एक श्रीमंत गृहस्थ राहात असे. तो अलीमलेखच्या कुळातला म्हणजे नामीचा जवळचा नातलगच होता.

एकदा रूथ नामीला म्हणाली, “मी आज शेतावर जाऊ का? कोणी दयाळू माणूस भेटला तर त्याच्या शेतात राहिलेले धान्य वेचून आणीन.”

नामीने तिला बरं म्हणून अनुमती दिली.

रूथ शेतावर गेली कापणी करणाऱ्यांच्या मागे फिरत उरले सुरले धान्य ती वेचू लागली योगायोग असा की हे शेत अलीमलेखाचा नातेवाईक बवाज याच्याच मालकीचे होते.

थोडया वेळाने बवाज बेथलेहेमहून शेतावर आला. परमेश्वर तुमच्याबरोबर असो असे म्हणून त्याने आपल्या मजुरांचा समाचार घेतला. मजुरांनीही परमेश्वर तुमचे भले करो असे म्हणून त्याचे उलट अभिष्टचिंतन केले.

मजुरांवर देखरेख करणाऱ्या मुकादमाजवळ मग बवाजने ही मुलगी कोण म्हणून चौकशी केली.

मुकादम म्हणाला, “नामीबरोबर मवाबातून आलेली तरूण स्त्री ती हीच. ती आज सकाळी इथे आली आणि कापणी करणाऱ्यांच्या मागून धान्य वेचायची परवानगी तिने मागितली. सकाळपासून ती येथे आहे.तिचे घर त्या तिकडे आहे.” [a]

हे ऐकून बवाज तिला म्हणाला, “मुली, माझ्या शेतात राहून तुझ्यासाठी धान्य गोळा कर. दुसऱ्या कोणाच्या शेतावर जायची तुला गरज नाही. इथल्या कामावरच्या बायकांना धरून. त्यांच्या मागोमाग जा. तुला त्रास द्यायचा नाही असे मी माझ्या माणसांना बजावले आहे. तहान लागेल तेव्हा या लोकांसाठी पाणी भरून ठेवले आहे त्यातूनच पी.”

10 रूथने यावर बवाजला वाकून अभिवादन केले अणि ती म्हणाली, “माझ्याकडे तुमचे लक्ष गेले हे आश्चर्यच म्हणायचे, मी खरे तर परकी बाई पण तुम्ही माझ्यावर मोठीच दया केलीत.”

11 बवाज तिला म्हणाला, “तू आपल्या सासूला कशी मदत करतेस हे मी ऐकले आहे. आपला नवरा वारल्यावरही तू तिला धरून राहिली आहेस. आपले आई वडील आपला देश सोडून तू इथे, या देशात आलीस.इथले लोक तुला परकेच,पण तू आलीस, 12 तुझ्या या वागणुकीचे तुला चांगले फळ मिळेल. इस्राएलाचा परमेश्वर देव तुझ्यावर कृपादृष्टी ठेवील. त्याच्या आश्रयाला [b] तू आली आहेस तेव्हा तो तुझा सांभाळ करील.”

13 रूथ म्हणाली, “माझ्यावर तुमची मोठीच कृपा आहे. मी निव्वळ एक दासी, तुमच्या नोकराएवढीही माझी लायकी नाही. असे असूनही गोड बोलून तुम्ही माझ्या मनावर फुंकर घातली आहे.”

14 जेवायची वेळ झाली तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “चल, थोडी भाकर आमच्या बरोबर खाऊन घे. या रसात बुडवून खा.”

तेव्हा रूथ सर्व मजुरांबरोबर बसली. बवाजने तिला हुरडाही दिला. तिने पोटभर खाल्ले. अगदी ताटात उरेपर्यंत खाल्ले. 15 मग ती उठली आणि राहिलेले धान्य गोळा करू लागली.

बवाज आपल्या मजुरांना म्हणाला, “कापलेल्या पेंढ्यां मधूनही रूथला धान्य गोळा करू द्या आडकाठी करू नका. 16 तसेच मुद्दाम तिच्यासाठी दाणे भरलेली कणसेही टाकत जा. तिला हवे तेवढे घेऊ द्या,पुरे म्हणू नका.”

नामी बवाजबद्दल ऐकते

17 रूथ संध्याकाळपर्यंत शेतात होती. गोळा केलेल्या धान्याची तिने झोडणी केली. भुश्श्यातून दाणे बाहेर काढले. अर्धा बुशेले सातू निघाले. 18 घरी आणून तिने ते सासूला दाखवले. उरलेले दुपारचे जेवणही तिला दिले.

19 सासूने तिला विचारले, “कुठून एवढे धान्य गोळा केलेस? काम कोठे केलेस? तुझी दखल घेणाऱ्याचे भले होवो.”

२० मग रूथने तिला सर्व हकीकत सांगितली. बवाज नावाच्या माणसाकडे आपण काम केल्याचे तिने सांगितले. नामी सुनेला म्हणाली, “परमेश्वर त्याचे भले करो. मेलेल्यांना आणि हयात असलेल्यांना दया दाखवायचे त्याने चालू ठेवलेले आहे.”

बवाज आपल्या नातेवाईकांपैकी असून आपला त्राता असल्याचे तिने रूथला सांगितले.

21 तेव्हा रूथ म्हणाली, “त्याने मला पून्हा यायला सांगितले आहे. कापणी होईपर्यंत मजुरांबरोबर राहून धान्य गोळा कर असे तो म्हणाला आहे.”

22 नामी आपल्या सुनेला म्हणाली, “त्याच्याच कडल्या बायकांबरोबर तू शेतात गेलीस तर बरे. इतर कुठे गेलीस तर पुरूषांचा तुला उपद्रव होईल.” 23 अशा प्रकारे रूथ बवाजकडे तिथल्या बायकांबरोबर काम करत राहिली. सातूचा हंगाम संपेपर्यंत तिने धान्य गोळा केले. पुढे गव्हाच्या हंगामातही ती तेथे जात राहिली. अशा तऱ्हेने ती आपल्या सासूबरोबर म्हणजे नामी बरोबरच राहिली.

धान्याचे खळे

काही दिवसांनी रूथची सासू नामी रूथला म्हणाली, “मुली, आता मला तुझ्यासाठी नवरा आणि चांगले घर शोधून काढायला हवें. त्यातच तुझे भले आहे. बवाज त्यासाठी योग्य आहे तो आपला जवळचा आप्तच [c] आहे. त्याच्याकडच्या कामकरी बायकांबरोबर तू काम केले आहेस. आज रात्री तो खळ्यात मळणीसाठी मुक्कामाला असेल. त न्हाऊन माखून तयार हो. चांगले ठेवणीतले कपडे घाल आणि रात्री खव्व्यावर जा. बवाजचे जेवणखाण होईपर्यंत त्याच्या नजरेला पडू नको. जेवण झाल्यावर तो विश्रांती घ्यायला आडवा होईल. लक्ष असू दे म्हणजे तो कुठे आहे ते तुला कळेल. तेव्हा तू पुढे हो आणि त्याच्या पायावरचे पांधरूण काढून [d] तिथेच त्याच्याजवळ पड लगेच काय करायचे ते तोच मग तुला सांगेल.”

तेव्हा रूथने सासूच्या म्हणण्याप्रमाणे वागायचे कबूल केले.

ती खव्व्याकडे गेली. सासूने सांगितले होते त्याप्रमाणे वागली. जेवणखाण झाल्यावर बवाज समाधानाने सुस्तावला. धान्याच्या राशीजवळच झोपायला गेला. तेव्हा अजिबात चाहूल लागू न देता रूथ तिथे गेली आणि त्याच्या पायावरचे पांघरूण तिने दूर सारले. मग त्याच्या पायाशी पडून राहिली.

मध्यरात्रीच्या सुमाराला बवाज झोपेतच कुशीवर वळला आणि जागा झाला. आपल्या पायाजवळ एका बाईला पाहून तो डचकला. ती कोण, काय हे त्याने विचारले.

ती म्हणाली, “मी रूथ तुमची दासी. तुम्ही आपले पंख माझ्यावर पसरा [e] तुम्हीच माझे त्राते [f] आहात.”

10 तेव्हा बवाज म्हणाला, “परमेश्वर तुझे भले करो. माझ्यावर तुझ्या प्रेमाची पाखर तू घातली आहेस. तू नामीशी आधी वागलीस त्यापेक्षाही भलेपणाने तू माझ्याशी वागते आहेस. तू तूझ्या जोगा गरीब, श्रीमंत अशा कोणत्याही तरूण मनुष्याबरोबर गेली असतीस. पण तू तसे केले नाहीस. 11 तेव्हा आता घाबरू नकोस. तू म्हणशील तसे मी करतो. तू एक चांगली बाई आहेस हे गावातील लोकांना ठाऊक आहे. 12 शिवाय, मी तुमचा जवळचा नातलग आहे हेही खरे. पण माझ्याहीपेक्षा जवळचा असा तुमचा एक आप्त आहे. 13 आजची रात्र तू इथेच राहा. तो तुला मदत करतो का ते मी सकाळी त्याला विचारून बघतो. तो तयार झाला तर उत्तमच. पण त्याने नकार दिला तर परमेश्वरची शपथ मी तुझ्याशी लग्न करीन. अलीमलेखची गेलेली जमीन तुम्हाला परत मिळवून देईन [g] तेव्हा सकाळपर्यंत इथेच थांब.”

14 त्याप्रमाणे रूथ सकाळपर्यंत बवाजच्या पायाजवळ पडून राहिली. फटफटायच्या आधीच अजून अंधार असतानाच लोक एकमेकांना ओळखायला लागण्यापूर्वीच ती उठली.

बवाज तिला म्हणाला, “कालची रात्र तू इथे होतीस हे कोणाला कळू द्यायचे नाही.” 15 पुढे तो म्हणाला, “तू पांघरलेला रूमाल काढ आणि समोर पसर.”

तिने तो पसरल्यावर त्याने एक बुशेल माप सातू त्यात टाकले. तिच्या सासूसाठी ती भेट होती. नीट गाठोडे बांधून त्याने ते तिच्या हवाली केले.मग तो शहरात निघून गेला.

16 रूथ सासूकडे गेली. सासूने दाराशी येऊन कोण आहे ते पाहिले.

रूथने घराते येऊन बवाज बरोबर जे जे घडले ते सांगितले. 17 ती म्हणाली, “त्याने तुमच्यासाठी भेट म्हणून हे सातू दिले आहे. रिकाम्या हाताने तुमच्याकडे यायचे नाही असे त्याने मला बजावले.”

18 नामी म्हणाली, “मुली, पुढे काय होणार आहे हे आपल्याला कळेपर्यंत धीर धर. अंगावर घेतलेले काम पार पडेपर्यंत तो स्वस्थ बसणार नाही. दिवस मावळायच्या आतच काय ते आपल्याला कळेल.”

बवाज आणि दुसरा आप्त

बवाज मग वेशीजवळ चावडीपाशी गेला. तो नातलग दिसेपर्यंत तिथे थांबला. त्याला पाहिल्यावर बवाजने त्याला प्रेमाने बोलावले. आणि जवळ बसायला सांगितले, तो माणूस आला आणि बवाजच्या जवळ बसला.

बवाजने मग काही साक्षीदांरानाही गोळा केले. गावातील दहा ज्येष्ठ मंडळींना बोलावले. त्यांनाही बसवून घेतले.

मग बवाज त्या नातेवाईकाला म्हणाला, “हे पाहा, नामी मवाबच्या डोंगराळ प्रदेशातून आली आहे. अलीमलेखच्या मालकीची जमीन तिने विकायला काढली आहे. हे पंच आणि ज्येष्ठ मंडळी यांच्या साक्षीने तुला हे मी सांगायचे ठरवले आहे. ही जमीन तुला परत विकत घ्यायची असल्यास तू घेऊ शकतोस. पण नसेल तर तसे मला सांग ही जमीन परत विकत घेण्याचा तुझ्यानंतर माझाच हक्क आहे. तेव्हा तू ती विकत घेणार नसलास तर मी घेईन.”

पूढे बवाज म्हणाला, “नामीची जमीन घेतलीस तर मवाबहून आलेली विधवा रूथसुद्धा तुझी पत्नी होईल. तिला मुल झाले की जमीन त्याच्या ताब्यात जाईल. म्हणजे जमीनीचा ताबा तिच्या मृत पतीच्याच कुटुंबात राहील.”

यावर तो आप्त म्हणाला, “मी काही ती जमीन घेत नाही. मीच खरे तर ती घ्यायला हवी, पण मला ते शक्य नाही कारण त्यामुळे कदाचित् मी माझ्या स्वतःच्या जमिनीला मुकेन. [h] तेव्हा तू ती खुशाल घेऊ शकतोस.” (पूर्वी इस्राएलमध्ये गहांण टाकलेल्या जमिनीची ती सोडवून घेण्याचे व्यवहार करताना खरेदीचा पुरावा म्हणून तो माणूस पायातला जोडा काढून दूसऱ्याला देत असे.) त्यानुसार तो नातलग म्हणाला, “जमीन तूच विकत घे” आणि आपला जोडा काढून त्याने बवाजला दिला.

बवाज मग तेथील सर्व श्रेष्ठवडीलधाऱ्या साक्षीदारांना म्हणाला, “आज तुमच्या साक्षीने मी अलीमलेख, खिल्योन, महलोन यांच्या मालकीचे सर्व काही नामीकडून विकत घेत आहे. 10 रूथलाही बायको म्हणून मी विकत घेतो. म्हणजे या मृत व्यक्तींची मिळकत त्यांच्याच घराण्यात राहिल. त्यांचे नाव त्यांच्या कुळातून, वतनातून पुसले जाणार नाही. तुम्ही या सगळ्याला साक्षी आहात.”

11 अशाप्रकारे वेशीपाशी जमलेले सर्व लोक आणि वडीलधारी माणसे म्हणाले, परमेश्वर कृपेने तुझ्याकडे येणारी स्त्री, इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेआ यांच्यासारखी होवो. एफ्राथा येथे तू कर्ता पुरूष हो. बेथलेहेममध्ये प्रख्यात हो. 12 तामारने यहूदापासून पेरेसला जन्म दिला त्याचे कूळ थोर झाले तशीच तुलाही परमेश्वराच्या कृपेने रूथपासून भरपूर संतती होवो. त्याच्यासारखेच तुझे घराणे मोठे होवो.

13 त्यानंतर बवाजने रूथशी लग्न केले. तिला परमेश्वराच्या दयेने दिवस राहून मुलगा झाला. 14 गावातील बायका नामीला म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे त्याने तुला हा मुलगा. [i] दिला तो इस्राएलमध्ये किर्तिवंत होईल. 15 तुमचे तो पुनरूज्जीवन करेल वृध्दापकाळी तो तुमची काळजी घेईल तुझ्या सुनेमुळे हे झाले तिने तुला हा मुलगा दिला तिचे तुझ्यावर प्रेम आहे. सात मुलांपेक्षाही तिची थोरवी आधिक आहे.

16 नामीने बाळाला घेतले, आपल्या कुशीत घेतले. त्याचे संगोपन केले. 17 शेजाऱ्यांनी त्याचे नाव ठेवले. बायका म्हणाल्या, “नामीलाच हा मुलगा झाला आहे.” मग शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. ओबेद इशायचा पिता झाला. इशाय राजा दावीदचा पिता झाला.

रूथ आणि बवाजची वंशावळ

18 पेरेसची वंशावळ खालील प्रमाणे:

हस्तोनचा पिता पेरेस.

19 हेस्तोन रामचा पिता.

राम अम्मीनादाबचा पिता.

20 अम्मीनादाब नहशोनचा पिता.

नहशोन सल्मोनचा पिता.

21 सल्मोन बवाजचा पिता.

बवाज ओबेदचा पिता.

22 ओबेद इशायचा पिता.

इशाय दावीदचा पिता.

योहान 4:43-54

येशू अधिकाऱ्याच्या मुलाला बरे करतो(A)

43 दोन दिवसांनी येशू तेथून निघाला आणि गालील प्रांतात गेला. 44 (पुर्वीच येशू म्हणाला होता की, संदेष्ट्याला त्याच्या देशात मान मिळत नाही.) 45 येशू जेव्हा गालीलात आला तेव्हा तेथील लोकांनी त्याचे स्वागत केले. वल्हांडण सणाच्या दिवसात यरुशलेम येथे येशूने केलेली सर्व कामे लोकांनी पाहिली होती. कारण ते लोकही सणानिमित तेथे गेले होते.

46 येशू पुन्हा गालीलातील काना गावाला भेट देण्यास गेला. काना गावीच येशूने पाण्याचे द्राक्षारसात रुपांतर केले होते. तेथे राजाचे जे मुख्य आधिकारी होते त्यापैकी एक आधिकारी कफर्णहूम नगरात राहत होता, या माणसाचा मुलगा आजारी होता. 47 येशू यहूदीयातून आला आहे आणि आता तो गालीलातच आहे हे त्या अधिकाऱ्याने ऐकले. म्हणून तो मनुष्य येशूकडे काना गावी गेला. येशूने कफर्णहूम तेथे येऊन आपल्या मुलाला बरे करावे म्हणून त्याने याचना केली. कारण त्याचा मुलगा जवळजवळ मेला होता. 48 येशू त्याला म्हणाला, “चमत्कार आणि अदभुत कामे पाहिली तरच तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवाल.”

49 राजाचा अधिकारी म्हणाला, “महाराज, माझा लहान मुलगा मरण्यापूर्व माझ्या घरी चला.”

50 येशूने उत्तर दिले, “जा, तुझा मुलगा वाचेल.”

येशूने सांगितले त्यावर विश्वास ठेवून तो मनुष्य घरी गेला. 51 तो घरी चाललेला असताना वाटेतच त्याचे नोकर त्या माणसाला भेटले. त्यांनी त्याला सांगितले, “तुमचा मुलगा बरा आहे.”

52 त्या मनुष्याने विचारले, “माझ्या मुलाला कधीपासून बरे वाटू लागले?”

नोकर म्हणाले, “काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप उतरला.”

53 “तुझा मुलगा वाचेल” असे एक वाजण्याच्या सुमारासच येशूने सांगितले होते, हे त्या मुलाच्या वडिलांना माहीत होते. म्हणून त्याने व त्याच्या घरातील सर्वांनी येशूवर विश्वास ठेवला.

54 यहुदीयातून गालील प्रांतात आल्यानंतर येशूने केलेला हा दुसरा चमत्कार.

स्तोत्रसंहिता 105:16-36

16 देवाने त्या देशात दुष्काळ आणला.
    लोकांना खायला पुरेसे अन्न नव्हते.
17 पण देवाने योसेफ नावाच्या माणसाला त्यांच्या पुढे पाठवले.
    योसेफ गुलामा सारखा विकला गेला.
18 त्यांनी योसेफाच्या पायाला दोर बांधले.
    त्यांनी त्याच्या मानेभोवती लोखंडी कडे घातले.
19 योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला.
    परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द् झाले.
20 तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले.
    राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुरुंगातून बाहेर काढले.
21 त्याने योसेफाला आपल्या घराचा मुख्य नेमले.
    योसेफाने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.
22 योसेफाने इतर प्रमुखांना सूचना दिल्या.
    योसेफाने वृध्दांना शिकवले.
23 नंतर इस्राएल मिसरमध्ये आला.
    याकोब हामच्या देशातच राहिला.
24 याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले.
    ते त्यांच्या शत्रूंपेक्षा खूप बलवान झाले.
25 म्हणून मिसरचे लोक याकोबाच्या कुटुंबाचा द्वेष करु लागले.
    त्यांनी त्याच्या गुलामांविरुध्द योजना आखल्या.
26 म्हणून देवाने त्याचा सेवक मोशे आणि
    देवाने निवडलेला त्याचा याजक अहरोन यांना पाठविले.
27 देवाने मोशे आणि अहरोन यांचा हामच्या देशात
    अनेक चमत्कार करण्यात उपयोग करुन घेतला.
28 देवाने अतिशय दाट काळोख पाठवला,
    पण मिसरमधल्या लोकांनी त्याचे ऐकले नाही.
29 म्हणून देवाने पाण्याचे रक्तात रुपांतर केले
    आणि सगळे मासे मेले.
30 त्यांचा देश बेडकांनी भरुन गेला.
    राजाच्या शयनकक्षात देखील बेडूक होते.
31 देवाने आज्ञा केली आणि
    माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती.
32 देवाने पावसाचे गारात रुपांतर केले.
    सर्व देशांत विजा पडल्या.
33 देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली.
    देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले.
34 देवाने आज्ञा केली आणि टोळ व नाकतोडे आले.
    ते संख्येने इतके होते की ते मोजता येत नव्हते.
35 टोळ व नाकतोड्यांनी देशातली सर्व झाडे खाऊन टाकली.
    त्यांनी शेतातली सर्व पिके खाल्ली.
36 आणि नंतर देवाने त्यांच्या देशातल्या सर्व पहिल्या अपत्यांना ठार मारले.
    देवाने त्यांच्या मोठ्या मुलांना मारले.

नीतिसूत्रे 14:26-27

26 जो परमेश्वराचा आदर करतो तो सुरक्षित असतो आणि त्याची मुलेही सुरक्षितपणे जगतात.

27 परमेश्वराबद्दलची आदर युक्त भीती खरे जीवन देते. त्यामुळे माणूस मरणाच्या जाळ्यातून वाचतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center