Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 5-7

पवित्र कोशामुळे पलिष्ट्यांवर संकटे

पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश घेतला. तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला. तो त्यांनी दागोनच्या मंदिरात दागोनच्या जवळ ठेवला. दुसऱ्या दिवशी अश्दोदचे लोक उठून पाहतात तो, दागेनची मूर्ती करार कोशा जवळ जमीनीवर पालथी पडलेली आढळली.

पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी ती जमिनीवर पडलेली आढळली अश्दोदच्या लोकांनी ती मूर्ती उचलून पूर्ववत ठेवली. यावेळी परमेश्वराच्या पवित्र करारकोशा जवळ पडताना दागोनचे शिर आणि हात तुटून उंबरठ्यावर पडले होते. धड तेवढे शाबूत होते. त्यामुळे अजूनही पुरोहित किंवा इतर लोक अश्दोदला दागोनच्या देवळात शिरतात तेव्हा उंबरठ्यावर पाऊल ठेवत नाही.

अश्दोद आणि त्याच्या आसपासचा प्रदेश यातील लोकांना परमेश्वराने सळो की पळो केले. त्यांना हर प्रकार त्रास दिला. लोकांच्या अंगावर गाठी, गळवे आले. शिवाय परमेश्वराने उंदीर सोडून त्यांना हैराण केले. जमीन, गलबतं यावर उंदरानी उच्छाद मांडला, गावातील लोक भयभीत झाले होते. या घटना पाहून अश्दोदचे लोक म्हणाले, “इस्राएलच्या परमेश्वराचा पवित्र करार कोश येथे ठेवण्यात अर्थ नाही. आपल्यावर आणि आपल्या देवावर त्या परमेश्वराचा कोप झाला आहे.”

अशदोदच्या लोकांनी पलिष्ट्यांच्या पाचही अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून या पवित्र कोशाचे काय करावे याविषयी सल्लामसलत केली.

अधिकाऱ्यांनी हा पवित्र कोश गेथ येथे हलवायला सांगितला. त्यानुसार पलिष्ट्यांनी तो पवित्र करारकोश हलवला.

गथ येथे तो नेऊन ठेवल्यावर त्या शहरावर परमेश्वराचा कोप ओढवला. त्यामुळे तेथील लोक भयभीत झाले. लहान मोठी सगळी माणसे वेगवेगळ्या व्याधींनी हैराण झाली. तेथील लोकांच्या अंगावर गळवे उठली. 10 तेव्हा पलिष्ट्यांनी हा पवित्र कोश एक्रोन येथे हलवला.

एक्रोन येथे हा पवित्र कोश येताच तेथील लोक तक्रार करु लागले. “इस्राएलच्या परमेश्वराचा हा पवित्र कोश आमच्या एक्रोनमध्ये आणून आमचा जीव द्यायचा आहे का?” असे ते विचारु लागले. 11 एक्रोनच्या लोकांनी सर्व पलिष्टी अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून सांगितले “तो पवित्र कोश आमचे बळी घ्यायच्या आधी तो कोश होता तेथे परत पाठवा.”

एक्रोनचे लोक फार घाबरले. परमेश्वराने त्यांना त्रस्त करुन सोडले. 12 अनेक लोक मरण पावले. जे जगले त्यांच्या अंगावर गळवे आली. एक्रोनच्या लोकांचा आक्रोश आकाशाला भिडला.

परमेश्वराच्या पवित्र कोशाची पाठवणी

पलिष्ट्यांनी हा पवित्र कोश आपल्या प्रदेशात सात महिने ठेवला. त्यांनी याजकांना आणि शकुन पाहणाऱ्यांना बोलावून विचारले “या कोशाचे आता काय करायचे? तो परत कसा पाठवायचा ते सांगा.”

याजक आणि शकुन पाहणारे म्हणाले, “तुम्ही हा कोश परत पाठवणार असाल तर तो तसाच पाठवू नका. त्याच्या बरोबर देणगीदाखल काही अर्पणे पाठवा म्हणजे इस्राएलांचा देव तुमच्या पापांचे हरण करील. तुम्ही बरे व्हाल. शुध्द व्हाल. त्याचा क्रोध मावळावा म्हणून तुम्ही एवढे करा.” [a]

पलिष्ट्यांनी विचारले, “इस्राएलच्या परमेश्वराने क्षमा करावी म्हणून आम्ही कोणत्या भेटी अर्पण कराव्यात?”

याजक आणि शकुन पाहणारे यांनी सांगितले, “प्रत्येक नगराचा एक असे तुम्ही पाच पलिष्टी अधिकारी आहात. तुम्ही सर्व सारखेच हैराण झालेले आहात. तेव्हा, गळवांसारख्या दिसणाऱ्या पाच सोन्याच्या प्रतिमा आणि पाच सोन्याचे उंदीर करा. अशा पाच पाच प्रतिमा करुन त्या इस्राएलींच्या देवाला भरपाई म्हणून द्या. मग कदाचित् तुमच्या प्रदेशाला, तुमच्या परमेश्वराला, व तुम्हाला होणारा त्रास तो थांबवेल. मिसरचे लोक आणि फारो यांच्यासारखे आडमुठेपणा करु नका. मिसरच्या लोकांना देवाने शिक्षा केली. म्हणूनच इस्राएल लोक मिसर सोडून जाऊ शकले.

“एक नवीन गाडी तयार करुन नुकत्याच व्यायलेल्या दोन गाई तिला जुंपा त्या गाईंनी शेतात कधीच काम केलेले नसावे. त्यांच्यावर जू चढवून मग त्यांची वासरे माघारी गोठ्यात आणून बांधा. त्यांना आपल्या आईच्या मागे जाऊ देऊ नका. [b] आता परमेश्वराचा पवित्र करारकोश गाडीत ठेवा. त्याच्याशेजारी एका थैलीत त्या सुवर्ण प्रतिमा ठेवा. तुमच्या पापक्षालनासाठी त्या परमेश्वराला अर्पण केलेल्या आहेत. मग गाडी सरळ जाऊ द्या. ती कशी जाते ते पाहा. गाडी बेथशेमेश कडे इस्राएलांच्या प्रदेशात गेली तर या व्याधी, हे अरिष्ट परमेश्वरामुळेच ओढवले होते असे समजू. पण गाई सरळ त्या दिशेने गेल्या नाहीत, तर हा इस्राएलच्या परमेश्वराचा कोप नव्हता, हे अरिष्ट असेच कोसळले असे आपण समजू.”

10 पलिष्ट्यांनी हा सल्ला मानून त्या प्रमाणे सर्व काही केले. नुकत्याच व्यालेल्या दोन गाई त्यांनी मिळवल्या. त्यांना गाडीला जुंपून वासरे गोठ्यात ठेवली. 11 मग करार कोश गाडीत चढवला. गळवे आणि उंदीर यांच्या सुवर्ण प्रतिमांची थैलीही त्याशेजारी ठेवली. 12 गाई सरळ बेथशेमेश कडे निघाल्या. त्या हंबरत चालल्या होत्या व मुख्य रस्ता सोडून इकडे तिकडे वळल्या नाहीत. बेथशेमेशच्या हद्दीपर्यंत पलिष्ट्यांचे अधिकारी गाईच्या मागोमाग होते.

13 बेथशेमेशमधले शेतकरी त्या खोऱ्यात गव्हाची कापणी करत होते. समोर पाहतात तो पवित्र करारकोश. कोशाचे दर्शन झाल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला आणि ते धावतच जवळ गेले. 14-15 बेथशेमेश येथील यहोशवाच्या शेतात येऊन एका मोठ्या खडकापाशी गाडी थांबली. स्थानिक लोकांनी त्या गाडीची लाकडे फोडली आणि गाईचा बळी दिला. परमेश्वराला तो अर्पण केला.

लेवींनी मग परमेश्वराचा पवित्र कोश उतरवला. तसेच सुवर्ण प्रतिमांची थैली घेतली. कोश आणि ती थैली त्या प्रचंड खडकावर ठेवली. बेथशेमेशच्या लोकांनी त्या दिवशी परमेश्वराला यज्ञार्पणे वाहिली.

16 त्या पाच पलिष्टी अधिकाऱ्यांनी हे सर्व नीट पाहिले आणि ते त्याच दिवशी एक्रोन येथे परतले.

17 अशाप्रकारे पलिष्ट्यांनी आपल्या पापक्षालनार्थ परमेश्वराला गळवांच्या पाच सुवर्ण प्रतिमा दिल्या. प्रत्येक पलिष्टी गावातर्फे एक अशा त्या होत्या. अश्दोद, गज्जा, अष्कलोन, गथ, एक्रोन ही ती पाच गावे होत. 18 सोन्याचे उंदीरही करुन पाठवले. पाच पलिष्टी अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत जेवढी गावे येत होती त्यांच्या संख्येच्या प्रमाणात ते होते. या प्रत्येक गावाभोवती तटबंदी असून सभोवार खेडी होती.

बेथशेमेशच्या लोकांनी परमेश्वराचा पवित्र कोश त्या खडकावर ठेवला. यहोशवाच्या शेतात तो खडक अजूनही आहे. 19 पण हा कोश दृष्टीस पडला तेव्हा तेथे याजक नव्हते. तेव्हा बेथशेमेश मधली सत्तर माणसे परमेश्वराने मारली. परमेश्वराने अशी कठोर शिक्षा करावी याबद्दल बेथशेमेशच्या लोकांनी आक्रोश केला. 20 ते म्हणाले, “त्या कोशाचे जतन करील असा याजक कोठे आहे? इथून हा कोश कोठे जायला पाहिजे?”

21 किर्याथ-यारीम येथे एक याजक होता. लोकांनी त्याच्याकडे संदेश पाठवला. “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा पवित्र कोश पाठवला आहे. तरी येऊन तो आपल्या नगरात घेऊन जा” असा त्याला निरोप पाठवला.

किर्याथ यारीमचे लोक आले आणि परमेश्वराचा तो पवित्र कोश घेऊन गेले. त्यांनी तो डोंगरावरील अबीनादाबच्या घरात ठेवला. त्या परमेश्वराच्या कोशाची जपणूक करण्यासाठी त्यांनी अबीनादाबचा मुलगा एलाजार याला विधिवत पवित्र केले. पुढे हा कोश किर्याथ यारीम येथे वीस वर्षे होता.

परमेश्वर इस्राएलींचे रक्षण करतो

इस्राएली लोक पुन्हा परमेश्वराची भक्ती करु लागले. शमुवेलने तेव्हा लोकांना सांगितले, “तुम्ही खरोखरच मनःपूर्वक परमेश्वराकडे वळला असाल तर इतर देव-देवता, अष्टरोथ यांना निग्रहाने दूर सारा. परमेश्वराचीच एकचित्ताने उपासना करा. केवळ त्याचीच सेवा करा. मग परमेश्वर तुमची पलिष्ट्यांच्या तावडीतून सोडवणूक करील.”

तेव्हा मग इस्राएली लोकांनी बाल आणि अष्टोरोथच्या मूर्तींचा त्याग करुन फक्त परमेश्वराची सेवा करायला सुरुवात केली.

शमुवेल त्यांना म्हणाला, “सर्व इस्राएली मिस्पा येथे एकत्र या. मी परमेश्वराकडे तुमच्या साठी प्रार्थना करीन.”

मग सर्व इस्राएल लोक मिस्पा येथे जमले. त्यांनी पाणी आणून परमेश्वरापुढे ओतले. मग त्यांच्या उपासाला सुरुवात झाली. अन्नापाणी वर्ज्य करुन त्यांनी परमेश्वरापुढे आपल्या पातकांची कबुली दिली. शमुवेल त्या वेळी इस्राएलमध्ये न्याय निवाडा करत असे.

मिस्पा येथील इस्राएलींच्या या मेळाव्याबद्दल पलिष्ट्यांनी ऐकले. त्यांनी इस्राएली विरुध्द लढण्याची तयारी केली. पलिष्टे येत आहेत ही बातमी ऐकून इस्राएलामध्ये घबराट पसरली. ते शमुवेलला म्हणाले, “आमच्यासाठी परमेश्वराकडे करायच्या प्रार्थनेत खंड पडू देऊ नकोस. पलिष्ट्यांपासून आमचे रक्षण व्हावे असे परमेश्वराकडे मागणे माग.”

तेव्हा शमुवेलने एक आख्खे कोकरु परमेश्वराला यज्ञात अर्पण केले. इस्राएलासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेला ओ दिली. 10 हा होम चालू असताना पलिष्ट्यांनी इस्राएलवर हल्ला केला. त्यावेळी प्रंचड गडगडाट करुन परमेश्वराने पलिष्ट्यांमध्ये गोंधळ माजवला. प्रंचड गर्जनेमुळे घाबरुन ते गोंधळले. सेनापतींचा सैन्यावरचा ताबा सुटला. त्यामुळे इस्राएलींनी त्यांचा पराभव केला. 11 मिस्पापासून पलिष्ट्यांचा पाठलाग करत बेथ-कारपर्यंत नेले आणि सैन्याला कापून आणले.

इस्राएलमध्ये शांतता

12 देवाने ही जी मदत केली तिचे स्मरण लोकांना राहावे म्हणून शमुवेलने मिस्पा आणि शेन यांच्या दरम्यान एका दगडाची स्थापना केली. “परमेश्वराने आपल्याला येथवर सहाय्य केले” असे म्हणून त्याने “सहाय्य दगड” असे त्याचे नामकरण केले.

13 पराभूत झाल्यावर पुन्हा म्हणून पलिष्ट्यांनी इस्राएलच्या भूमीत पाऊल टाकले नाही. शमुवेलच्या उर्वरित आयुष्यात परमेश्वर पलिष्ट्यांच्या विरुध्द होता. 14 पलिष्ट्यांनी इस्राएलची काही नगरे काबीज केली होती. एक्रोन पासून गथपर्यंतची ही नगरे आणि त्याच्या आसपासची गावे इस्राएलींनी पुन्हा ताब्यात घेतली.

इस्राएल आणि अमोरी यांच्यातही शांततेचा करार झाला.

15 शमुवेलने आयुष्यभर इस्राएलसाठी न्यायनिवाडा केला. 16 त्यासाठी तो जागोजाग हिंडला. बेथेल, गिलगाल, मिस्पा या सर्व ठिकाणी तो दरवर्षी जाई त्या ठिकाणच्या लोकांचा न्यायनिवाडा करी. 17 पण रामा येथे त्याचे घर असल्यामुळे तेथे त्याचे वारंवार जाणे होई. तेथूनच तो सर्व कारभार पाही. रामा येथे त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली.

योहान 6:1-21

येशू पाच हजारांहून अधिक लोकांना खावयास देतो(A)

नंतर येशू गालील (किंवा तिबिर्या) सरोवराच्या पलीकडे गेला. तेव्हा पुष्कळ लोक येशूच्या मागे गेले. कारण येशूने अनेक आजारी लोकांना बरे केले. व निरनिराळ्या मार्गांनी आपले जे सामर्थ्य दाखविले ते लोकांनी पाहिले. म्हणून ते त्याच्यामागे गेले. मग येशू टेकडीच्या वर चढून गेला. तो आपल्या शिष्यांसह तेथे बसला. त्याच सुमारास यहूदी लाकांचा वल्हांडण सण जवळ आला होता.

येशूने नजर वर करुन पाहिले तो लोकांचा मोठा समुदाय आपणांकडे येताना त्याला दिसला. येशू फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांना पुरेशा भाकरी कोठून विकत आणाव्या बरे?” (फिलिप्पची परीक्षा पाहण्यासाठी येशूने त्याला हा प्रश्न विचारला, कारण आपण काय करायचे याचा विचार येशूने अगोदरच करुन ठेवला होता.)

फिलिप्पने उत्तर दिले, “येथील प्रत्येकाला थोडी थोडी भाकर दिली तरी या सर्वांना पुरेशा भाकर विकत घेण्यासाठी आपणा सर्वांना महिनाभर काम करावे लागेल.”

आंद्रिया नावाचा दुसरा एक शिष्य तेथे होता. आंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ होता. आंद्रिया म्हणाला, “येथे असलेल्या एका लहान मुलाजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. परंतु इतक्या लोकांना त्या पुरणार नाहीत.”

10 येशू म्हणाला, “लोकांना खाली बसण्यास सांगा.” ती बरीच गवताळ अशी जागा होती. तेथे खाली बसलेले सुमारे पाच हजार पुरुष होते. 11 मग येशूने त्या भाकरी हातात घेतल्या; येशूने भाकरीबद्दल देवाचे उपकार मानले आणि त्या तेथे बसलेल्या लोकांना दिल्या. मासे घेऊन त्याने तसेच केले. येशूने लोकांना पाहिजे तितके खाऊ दिले.

12 सर्व लोकांना खाण्यासाठी भरपूर होते. जेवण झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “लोकांनी खाऊन उरलेले भाकरींचे व माशांचे तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.” 13 म्हणून शिष्यांनी उरलेले तुकडे जमा केले. लोकांनी जेवायाला सुरुवात केली, तेव्हा जवाच्या फक्त पाच भाकरी तेथे होत्या. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरल्या.

14 येशूने केलेला हा चमत्कार लोकांनी पाहिला, तेव्हा ते म्हणाले, “जगात येणारा संदेष्टा तो खरोखर हाच असला पाहिजे.”

15 आपण राजा बनावे असे लोकांला वाटते हे येशूला माहीत होते. येशूला आपला राजा करावे असा बेत लोकांनी केला. तेव्हा येशू तेथून निघून एकटाच डोंगराळ भागात गेला.

येशू पाण्यावरुन चालतो(B)

16 त्या संध्याकाळी येशूचे शिष्य (गालील) सरोवराकडे गेले. 17 शिष्य एका नावेत बसून सरोवरापलीकडील कफर्णहूम नगराकडे निघाले. आता अंधार पडला होता आणि येशू अजून त्यांच्याकडे आलेला नव्हता. 18 वारा फारच जोराने वाहत होता आणि सरोवरात मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या होत्या. 19 त्यांनी नाव तीन ते चार मैल वल्हवीत नेली तेव्हा त्यांना येशू नावेकडे येताना दिसला. तो सरोवराच्या पाण्यावरुन चालत होता, तो नावेकडेच येत होता. तेव्हा शिष्य घाबरले. 20 परंतु येशू त्यांना म्हणाला. “मी आहे, भिऊ नका.” 21 येशू असे बोलल्यावर त्यांनी आनंदाने येशूला नावेत घेतले. आणि त्यांना जायचे होते त्या ठिकाणी नाव लगेच येऊन काठाला लागली.

स्तोत्रसंहिता 106:13-31

13 परंतु आमचे पूर्वज लवकरच देवाने केलेल्या गोष्टी
    विसरले त्यांनी देवाचा उपदेश ऐकला नाही.
14 आमचे पूर्वज वाळवंटात भुकेले झाले
    आणि त्यांनी शुष्क झालेल्या भूमीत देवाची परीक्षा पाहिली.
15 परंतु देवाने त्यांना त्यांनी मागितलेल्या गोष्टी दिल्या.
    पण त्याने त्यांना भयानक रोगही दिला.
16 लोकांना मोशेचा मत्सर वाटला.
    त्यांनी अहरोनचा, परमेश्वराच्या पवित्र याजकाचा हेवा केला.
17 म्हणून देवाने त्या मत्सरी लोकांना शिक्षा केली.
    जमीन दुभंगली आणि तिने दाथानला गिळले.
नंतर ती मिटली आणि तिने अबिरामच्या समुदायाला झाकून टाकले.
18 नंतर अग्नीने त्या जमावाला जाळले.
    अग्नीने त्या दुष्टांना जाळून टाकले.
19 त्या लोकांनी होरेब पर्वतावर सोन्याचे वासरु केले.
    त्यांनी मूर्तीपूजा केली.
20 त्या लोकांनी त्याच्या वैभवशाली देवाची गवतखाणाऱ्या
    बैलाच्या मूर्तीबरोबर अदलाबदल केली.
21 देवाने आमच्या पूर्वजांना वाचवले.
पण ते मात्र त्याला पूर्णपणे विसरले.
    ज्या देवाने मिसरमध्ये चमत्कार केले त्या देवाला ते विसरले.
22 देवाने हामच्या देशात अद्भुत गोष्टी केल्या.
    देवाने लाल समुद्राजवळ भयानक गोष्टी केल्या.

23 देवाला त्या लोकांचा नाश करायची इच्छा होती.
    परंतु मोशेने त्याला थोपवले.
मोशे देवाचा निवडलेला सेवक होता.
देव खूप रागावला होता.
    पण मोशेने त्याचा मार्ग अडविला म्हणून देवाने लोकांचा नाश केला नाही. [a]

24 परंतु नंतर त्या लोकांनी कनानच्या सुंदर देशात जायला नकार दिला.
    त्या देशात राहाणाऱ्या लोकांचा पराभव करायला देव मदत करेल यावर विश्वास ठेवायला त्यांनी नकार दिला.
25 आमच्या पूर्वजांनी देवाचे
    ऐकायला नकार दिला.
26 म्हणून देवाने शपथ घेतली की
    ते वाळवंटात मरतील.
27 देवाने वचन दिले की मी दुसऱ्या लोकांना त्यांच्या वंशजांचा पराभव करु देईन.
    देवाने वचन दिले की मी आमच्या पूर्वजांना भिन्नभिन्न राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.

28 नंतर बआल पौर येथे देवाचे लोक बआलची पूजा करण्यास एकत्र जमले.
    ते जंगली भोजनावळीत सामील झाले आणि मेलेल्या [b] लोकांना अर्पण केलेले बळी त्यांनी खाल्ले.
29 देव त्याच्या माणसांवर खूप रागावला,
    देवाने त्यांना खूप आजारी पाडले.
30 पण फीनहासने देवाची प्रार्थना केली [c]
    आणि देवाने आजार थांबवला.
31 फीनहासने चांगली गोष्ट केली हे देवाला माहीत होते.
    व याची सदैव आठवण ठेवील.

नीतिसूत्रे 14:32-33

32 संकटाच्यावेळी दुष्ट माणसाचा पराभव होतो. पण चांगली माणसे मरणाच्या दारातही विजयी होतात.

33 शहाणा माणूस नेहमी शहाण्या गोष्टींचा विचार करतो. पण मूर्खाला शहाणपणाबद्दल काहीही माहिती नसते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center