Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the EHV. Switch to the EHV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 18:5-19:24

दावीदचे यश शौल पाहतो

शौलने मग दावीदला अनेक लढायांवर पाठवले. सगळीकडे त्याने विजय मिळवला. तेव्हा शौलाने दावीदला सेनापतिपद दिले. याने शौलच्या अधिकाऱ्यांसह सर्वजण खूश झाले. दावीद पलिष्ट्यांचा सामना करायला लढाईवर जाई तेव्हा मुक्कामावर परतताना इस्राएलमधल्या सर्व गावातल्या स्त्रिया त्याच्या स्वागताला समोर येत. त्या आनंदाने गात नाचत. डफ, वीणा वाजवत. शौलच्या समोरच हे चाले. त्या म्हणत,

“शौलाने हजार शत्रूंना ठार केले
    तर, दावीदाने लाखो मारले.”

या गीतामुळे शौलाची मर्जी फिरली आणि त्याला संताप आला. “दावीद लाखो शत्रूंना ठार करतो आणि मी फक्त हजारोंना मारतो असे या म्हणतात काय” तेव्हा पासून तो दावीदाकडे असूयेने आणि ईर्ष्येने पाहू लागला.

शौलला दावीदचे भय

10 दुसऱ्याच दिवशी शौला मध्ये दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल बेफाम होऊन बडबड करु लागला. दावीद तेव्हा नित्याप्रमाणे वीणा वाजवत होता. 11 शौलच्या हातात तेव्हा भाला होता. शौलला वाटले, “याला आपण भिंतीशी खिळवावे.” शौलने मग दोनदा भाला नेम धरुन मारला पण दोन्ही वेळा दावीद निसटला.

12 दावीदाला परमेश्वराची साथ होती. आणि शौलाचा त्याने त्याग केला होता. तेव्हा दावीदबद्दल शौलच्या मनात धास्ती होती. 13 शौलाने दावीदाला दूर पाठवले. हजार सैनिकांचा अधिकारी म्हणून त्याला नेमले. दावीदाने या सैन्याचे लढाईत नेतृत्व केले. 14 परमेश्वर दावीदाच्या पाठीशी होता. तेव्हा दावीदला सर्व ठिकाणी यश मिळाले. 15 जिकडे तिकडे त्याची सरशी होताना पाहून शौलाला दावीदची आणखीच धास्ती वाटू लागली. 16 पण इस्राएल आणि यहूदामधील सर्व लोकांचे मात्र दावीदवर प्रेम होते. युध्दात त्यांच्या पुढे राहून त्यांच्यासाठी त्याने लढाया केल्यामुळे त्यांचा दावीदवर जीव होता.

आपल्या मुलीचे दावीदशी लग्न्न करुन देण्याची शौलची इच्छा

17 शौल मात्र दावीदाच्या जिवावर उठला होता. त्याला पेचात पकडण्यासाठी शौलाने एक योजना आखली. तो दावीदाला म्हणाला, “ही मेरब माझी मोठी मुलगी. तू हवे तर हिच्याशी लग्न कर. मग तू आणखीन सामर्थ्यवान होशील. तू माझ्या मुलासारखाच होशील. मग तू परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” ही एक युक्ती होती. प्रत्यक्षात शौलाचा विचार वेगळाच होता. “आता मला त्याचा जीव घ्यायला नको. परस्पर पलिष्टीच त्याचा काटा काढतील” असा त्याचा बेत होता.

18 पण दावीद म्हणाला, “माझे घराणे तुमच्या तोलामोलाचे नाही. मीही काही मोठा माणूस नव्हे. तेव्हा मी राजकन्येशी कसा विवाह करु?”

19 त्यामुळे जेव्हा मेरबचा विवाह दावीदशी व्हायचा तो महोलाच्या अद्रीएलशी झाला.

20 शौलाची दुसरी मुलगी मीखल हिचे दावीदवर प्रेम होते. लोकांनी ही गोष्ट शौलाच्या कानावर घातली. तेव्हा त्याला फारच आनंद झाला.

21 त्याने विचार केला. “आता मीखलमुळे माझा बेत सफल होईल. तिचे लग्न मी दावीदाशी करुन देतो. मग पलिष्टी त्याचा वध करतील.” आणि दुसऱ्यांदा शौलाने दावीदाला लग्नाची अनुमती दिली.

22 शौलाने आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. त्यांना तो म्हणाला, “त्याला विश्वासात घेऊन हळूच सांगा, ‘राजाला तू आवडतोस. तू त्याच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतला आहेस. तेव्हा राजाच्या मुलीशी तू लग्न्न कर.’”

23 शौलाच्या अधिकाऱ्यांनी दावीदाला हे सर्व सांगितले. पण तो म्हणाला, “राजाचा जावई होणं सोपं आहे असं तुम्हाला वाटतं का? मी सामान्य, निर्धन माणूस, तिच्यासाठी खर्च कुठून करणार?”

24 दावीदाचे मनोगत शौलाच्या अधिकाऱ्यांनी शौलाला सांगितले. 25 शौल त्यांना म्हणाला, “त्याला सांगा, राजाला तुझ्याकडून हुंडा नको आहे. फक्त शत्रूंचा सूड उगवावा म्हणून त्याला पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा तेवढ्या हव्या आहेत.” हे अर्थात कपट होते. अशाने पलिष्टी दावीदाचा काटा काढतील असे त्याला वाटले.

26 अधिकाऱ्यांनी हे सर्व दावीदला सांगितले. दावीदाला राजाचा जावई होणे पसंत पडले. तेव्हा त्याने भराभर पावले उचलली. 27 तो काही लोकांना बरोबर घेऊन पलिष्ट्यांवर चालून गेला. त्याने दोनशे [a] पलिष्ट्यांना मारले. त्यांच्या अग्रत्वचा काढून दावीदाने त्या शौलाला दिल्या.

कारण राजाचा जावई व्हायचे त्याच्या मनात होते. 28 शौलाने दावीदाशी मीखलचे लग्न करुन दिले. दावीदला परमेश्वराची साथ आहे आणि आपल्या मुलीचे, मीखलचे, त्याच्यावर प्रेम आहे हे शौलच्या लक्षात आले. 29 तेव्हा तो मनातून आणखी धास्तावला. तो दावीदाला सतत पाण्यात पाहात होता.

30 पलिष्ट्यांचे सरदार सतत इस्राएलींवर चालून जात. पण दावीद दरवेळी त्यांना पराभूत करी. शौलाचा तो एक यशस्वी अधिकारी होता. त्यामुळे दावीदची ख्याती पसरली.

योनाथानची दावीदला मदत

19 शौलाने आपला मुलगा योनाथान आणि इतर अधिकारी यांना दावीदचा वध करायला सांगितले. पण योनाथानला दावीद अतिशय आवडत असे. 2-3 त्याने दावीदला सावध केले. त्याला सांगितले, “जपून राहा. शौल तुला मारायची संधी शोधत आहे. सकाळी तू शेतात जाऊन लप. मी ही वडीलांना घेऊन शेतात येतो. तू लपला असशील तेथे येऊन थांबतो. तुझ्याबद्दल मग मी वडीलांशी बोलेन. त्यांच्याकडून काही कळले की तुला सांगीन.”

योनाथान आपल्या वडीलांशी बोलला. दावीदबद्दल त्याने चांगले उद्गार आणले. तो म्हणाला, “तुम्ही राजे आहात. दावीद तुमचा सेवक. त्याने तुमचे काहीच वाकडे केलेले नाही. तेव्हा तुम्हीही त्याला इजा पोचू देऊ नका. तो तुमच्याशी चांगलाच वागत आलेला आहे. गल्याथ पलिष्ट्याचा वध करताना त्याने आपले प्राण पणाला लावले. परमेश्वराने इस्राएलला विजय मिळवून दिला. तुम्हालाही ते पाहून आनंद झाला. मग तुम्ही त्याला का दुखावता? तो निरपराध आहे. त्याला कशासाठी मारायचे?”

शौलाने योनाथानचे म्हणणे ऐकले आणि त्याला वचन दिले. तो म्हणाला, “परमेश्वर असेपर्यंत दावीदाच्या जिवाला धोका नाही.”

तेव्हा योनाथानने दावीदला बोलवून सर्व काही सांगितले. मग त्याला तो शौलाकडे घेऊन गेला. पूर्वीप्रमाणेच तो त्याच्याकडे राहू लागला.

पुन्हा दावीदाला मारायचा शौलाचा प्रयत्न

पुन्हा युध्द सुरु झाले आणि दावीद पलिष्ट्यांशी लढायला गेला. पलिष्ट्यांचा त्याने पराभव केला. त्यांनी पळ काढला. पण शौलवर परमेश्वराच्या दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल आपल्या घरात बसला होता. त्याच्या हातात भाला होता. दावीद वीणा वाजवत होता. 10 शौलने हातातील भाला फेकून दावीदला भिंतीत चिणायचा प्रयत्न केला. पण दावीद उडी मारुन निसटला. भाल्याचा नेम चुकून तो भिंतीत गेला. त्या रात्री दावीद पळून गेला.

11 शौलाने काही जणांना दावीदाच्या घरी पाठवले. त्यांनी त्याच्या घरावर पहारा दिला. रात्रभर ते बसून राहिले. सकाळी त्याला मारावे असा त्यांचा बेत होता. पण दावीदाच्या बायकोने, मीखलने. दावीदाला सावध केले. तिने त्याला रातोरात पळून जाऊन जीव वाचवायला सांगितले, नाही तर उद्या तुझा खून होईल असे ती त्याला म्हणाली. 12 तिने त्याला खिडकीतून पळून जायला मदत केली. दावीद निसटला आणि पळाला. 13 मीखलने घरातील देवतेची मूर्ती घेतली आणि पलंगावर ठेवून त्यावर पांघरुण घातले. बकरीचे केस डोक्याच्या ठिकाणी लावले.

14 दावीदाला पकडून आणण्यासाठी शौलाने जासूद पाठवले. पण मीखलने दावीद आजारी असल्याचे सांगितले.

15 जासूद परतले. त्यांनी राजाला वर्तमान सांगितले. राजाने त्यांना दावीदला पाहून यायला फर्मावले. शौल म्हणाला, “त्याला माझ्यापुढे हजर करा. त्याला शक्य नसेल तर पलंगावर झोपवूनच आणा. मग मीच त्याला मारतो.”

16 जासूद परत गेले, त्याच्या शोधार्थ आत शिरतात तर त्यांना पलंगावर पुतळा आढळला. बकरीचे केस लावल्याचेही त्यांच्या लक्षात आले.

17 शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसवलेस? तू माझ्या शत्रूला दाविदाला पळून जायला मदत केलीस.”

मीखल म्हणाली, “मी त्याला पळून जायला मदत केली नाही तर तो माझा जीव घेईल असे म्हणाला.”

दावीद रामा येथे जातो

18 दावीद जो पळाला तो रामा येथे शमुवेलकडे गेला. शमुवेलला त्याने शौलाने जे जे केले ते सर्व सांगितले. मग शमुवेल आणि दावीद संदेष्ट्यांच्या राहण्याच्या ठिकाणी गेले. दावीद तेथे राहिला.

19 दावीद रामा नजीकच्या छावणीवर असल्याचे शौलाला कळले. 20 त्याने दावीदाच्या अटकेसाठी माणसे पाठवली. पण ती माणसे तिथे पोहोंचली तेव्हा संदेष्टे संदेश देत होते. शमुवेल त्यांचे नेतृत्व करत उभा होता. शौलाच्या निरोप्यांवर ही परमेश्वराच्या आत्म्याचा संचार होवून ते ही संदेश देऊ लागले.

21 शौलाच्या हे कानावर आल्यावर त्याने दुसरे दूत पाठवले. त्यांचीही तीच गत झाली. तेव्हा शौलाने तिसऱ्यांदा जासूद पाठवले. तेही तसेच करु लागले. 22 शेवटी शौल स्वतःच रामा येथे आला. सेखू येथील खड्या जवळच्या मोठ्या विहिरीशी तो आला तेव्हा त्याने शमुवेल आणि दावीदाचा ठावठिकाणा विचारला.

लोक म्हणाले, “ते रामाजवळच्या तळावर आहेत.”

23 तेव्हा शौल तेथे पोचला. परमेश्वराच्या आत्म्याचा संचार शौलमध्येही होऊन तोही संदेश देऊ लागला. रामा येथे पोचेपर्यंत त्याचे तेच चालले होते. 24 नंतर त्याने अंगावरची वस्त्रे उतरवली. शमुवेलच्या समोर तो संदेश देऊ लागला.

दिवसभर आणि रात्रभर तो विवस्त्र अवस्थेत होता म्हणून लोक म्हणू लागले, “शौलही संदेष्टयांपैकी आहे की काय?”

योहान 8:31-59

पापापासून सुटका याविषयी येशू बोलतो

31 ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, त्या यहूदी लोकांना तो म्हणाला, “तुम्ही जर नेहमी माझ्या शिकवणुकीचे पालन कराल, तरच तुम्ही माझे खरे शिष्य आहात. 32 मग सत्य काय आहे हे तुम्हांला समजेल. आणि सत्य तुम्हांला मोकळे करील.”

33 यहूदी लोकांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे लोक आहोत आणि आम्ही कधीच गुलाम नव्हतो तर आम्ही मोकळे होऊ असे तुम्ही का म्हणता?”

34 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो, जो प्रत्येक पाप करतो तो गुलाम आहे. पाप त्याचा मालक आहे. 35 गुलाम कुटुंबात कायमचा राहत नाही. परंतु पुत्र कायमचा आपल्या कुटुंबात राहतो. 36 म्हणून जर पुत्र तुमजी सुटका करतो, तर तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल. 37 तुम्ही अब्राहामाचे लोक आहात हे मला माहीत आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारावयास टपलेले आहात. कारण तुम्हांला माझे शिक्षण स्वीकारायला नको आहे. 38 माझ्या पित्याने जे काही मला दाखवून दिले, तेच मी तुम्हांला सांगत आहे. परंतु तुमच्या पित्याने तुम्हांला सांगितले तेच तुम्ही करता.”

39 यहूदी लोकांनी उत्तर दिले. “आमचा पिता अब्राहाम आहे.”

येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच अब्राहामाची संतति असता तर अब्राहामाने केल्या त्याच गोष्टी तुम्ही केल्या असत्या. 40 देवाकडून जे सत्य ऐकले ते तुम्हांला सांगणारा मी एक मनुष्य आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारायला पाहता. अब्राहामाने तसे केले नाही. 41 पण अब्राहामाने जे केले नाही ते तुम्ही करता याचा अर्थ तुम्ही त्याची मुले नाहीत तर तुमचा पिता अब्राहाम नसून कोणी वेगळा आहे.”

परंतु यहूदी म्हणाले, “ज्या मुलांना आपला पिता कोण आहे ते माहीत नाही त्यांच्यासारखे आम्ही नाही! देव आमचा पिता आहे. तोच एक आमचा पिता आहे.”

42 येशू त्या यहूदी लोकांना म्हणाला, “जर देव खरोखरच तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीति केली असती. मी पित्याकडून आलो आणि आता मी येथे आहे. मी माझ्या स्वतःच्या अधिकारात आलो नाही. देवानेच मला पाठविले. 43 मी म्हणतो, मी देत असलेली शिकवण तुम्हांला समजत नाही का? कारण की तुम्हांला माझी शिकवण स्वीकारता येत नाही. 44 तुमचा पिता सैतान आहे. तुम्ही त्याचे आहात, त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता. सैतान सुरुवातीपासूनच खुनी आहे. सैतान सत्याच्या विरूद्ध आहे. आणि सैतानाच्या ठायी सत्य नाही. तो सांगतो त्या लबाड्याप्रमाणेच तो आहे. सैतान लबाड आहे. आणि तो असत्याचा पिता आहे.

45 “मी सत्य बोलतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवित नाही. 46 मी एखाद्या पापाविषयी दोषी आहे असे तुमच्यातील कोणी सिद्ध करु शकेल काय? जर मी सत्य सांगतो तर तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवीत नाही? 47 जो देवाचा आहे, तो देवाचे म्हणणे ऐकतो. परंतु तुम्ही देवाचे म्हणणे ऐकत नाही. कारण तुम्ही देवाचे लोक नाहीत.”

स्वतःविषयी व अब्राहामाविषयी येशू बोलतो

48 यहूदी म्हणाले, “तुम्ही शोमरोनी आहात, तुम्हांला भूताने पछाडले आहे, असे आम्ही म्हणालो तर आम्ही म्हणतो तेच बरोबर नाही काय?”

49 येशूने उत्तर दिले. “मला भूत लागले नाही, मी तर आपल्या पित्याचा मान राखतो. परंतु तुम्ही माझा मान राखीत नाही. 50 स्वतःला सन्मान मिळविण्याचा प्रयत्न मी करीत नाही. माझा सन्मान व्हावा असे एकाला (देवाला) वाटते. तोच न्यायाधीश आहे. 51 मी तुम्हांला खरे तेच सांगतो. जो कोणी माझ्या शिक्षणाचे पालन करतो तो कधीही मरणार नाही.”

52 यहूदी लोक म्हणाले, “तुमच्यात खरोखर भूत संचारले आहे. हे आता आम्हांला माहीत झाले. अब्राहाम आणि संदेष्टे मेले. परंतु तुम्ही म्हणता, ‘जो माझ्या शिकवणूकीचे पालन करतो तो कधीच मरणार नाही.’ 53 तुम्ही आमचा पिता अब्राहाम याच्यापेक्षाही थोर आहात असे तुम्हांला वाटते काय? अब्राहाम मेला, तसेच संदेष्टेही मेले. तुम्ही स्वतःला समजता तरी कोण?”

54 येशूने उत्तर दिले, “जर मी स्वतःच स्वतःचा सन्मान केला तर त्या सन्मानाला काहीच अर्थ नाही. माझा पिता माझा सन्मान करतो. तो आमचा देव आहे असे तुम्ही म्हणता. 55 परंतु तुम्ही खरोखर त्याला ओळखीत नाही. पण मी त्याला ओळखतो. तो सांगतो त्याचे पालन मी करतो. मी त्याला ओळखीत नाही असे जर मी म्हणालो, तर तुम्ही लबाड आहात तसा मीही लबाड ठरेन. परंतु मी त्याला नक्कीच ओळखतो. आणि तो जे काही सांगतो त्याचे पालन करतो. 56 माझ्या येण्याचा दिवस पाहण्याच्या आशेने तुमचा पिता अब्राहाम आनंदित झाला होता. त्याने तो दिवास पाहिला आणि त्याला आनंद झाला.”

57 यहूदी लोक येशूला म्हणाले. “तुम्ही अब्राहामाला कधीच पाहिले नाही. तुम्ही पन्नास वर्षांचेही नाही!”

58 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो: अब्राहामाच्या जन्मापूर्वि पासून मी आहे.” 59 जेव्हा येशू असे बोलला तेव्हा लोकांनी त्याला मारण्यासाठी दगड उचलले. पण येशू गुप्त झाला आणि नंतर मंदिरात निघून गेला.

स्तोत्रसंहिता 112

112 परमेश्वराची स्तुती करा.

जो माणूस परमेश्वराला भितो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील.
    त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात.
त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील.
    चांगल्या लोकाच्या वंशजांना खरोखरच आशीर्वाद लाभतील.
त्या माणसाचे कुटुंब श्रीमंत होईल
    आणि त्याचा चांगुलपणा सदैव राहील.
चांगल्या लोकांना देव म्हणजे अंधारात चमकणारा प्रकाश वाटतो.
    देव चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे.
माणसाने दयाळू आणि उदार असणे चांगले असते.
    माणसाने त्याच्या व्यापार उद्दोगात सचोटीने वागणे चांगले असते.
तो माणूस कधीही पडणार नाही.
    चांगला माणूस सदैव आठवणीत राहील.
त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही.
    त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.
ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे त्याला भीती वाटणार नाही.
    तो त्याच्या शत्रूचा पराभव करेल.
तो माणूस सहजपणे गरीबांना वस्तू देतो
    आणि त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
10 दुष्ट लोक हे बघतात आणि रागावतात.
    ते रागाने त्यांचे दांत खातील आणि
    नंतर ते नाहीसे होतील दुष्ट लोकांना जे खूप हवेहवेसे वाटते ते मिळणार नाही.

नीतिसूत्रे 15:12-14

12 मूर्खाला तो चुकत आहे हे सांगितलेले आवडत नाही. आणि तो माणूस शहाण्या माणसाला माहिती विचारायला नकार देतो.

13 माणूस जर आनंदी असला तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. पण जर एखादा मनातून दु:खी असला तर त्याचा आत्मा ते दुख: दाखवेल.

14 शहाणा माणूस अधिक ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतो. पण मूर्खाला अधिक मूर्खताच हवी असते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center