Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 1:1-2:21

एलकाना आणि त्याचे कुटुंबीय यांची शिलोह येथे भक्ती

एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील रामा येथला, एलकाना नावाचा एक गृहस्थ होता. हा एलकाना सूफ घराण्यातला असून यरोहाम (किंवा यरामील) याचा मुलगा. यरोहाम एलिहूचा मुलगा आणि एलिहू तोहूचा. तोहू, एफ्राईम घराण्यातील सूफचा मुलगा होय.

एलकानाला दोन बायका होत्या. एकीचे नाव हन्ना आणि दुसरीचे पनिन्ना. पनिन्नाला मुलंबाळं होती, पण हन्नाला मात्र अजून मूल झाले नव्हते.

एलकाना दरवर्षी रामा या आपल्या गावाहून शिलोह येथे जात असे. तेथे तो यज्ञ आणि सर्वशक्तीमान परमेश्वराची भक्ती करत असे. तेथे हफनी आणि फिनहास हे एलीचे मुलगे याजक म्हणून पौरोहित्य करीत होते. एलकाना दर यज्ञाच्या वेळी पनिन्ना आणि तिची मुले यांना त्यांच्या वाटचे अन्न देई. हन्नालाही तो समान वाटा देई. परमेश्वराने तिची कूस उजवलेली नसतानाही तो देई, कारण हन्नावर त्याचे खरेखुरे प्रेम होते.

हन्नाचा पाण उतारा

पनिन्ना दर वेळी काहीतरी बोलून हन्नाला दु:खवी. मूलबाळ नसल्यावरुन दूषणे देई. असे दरवर्षी चालायचे. शिलो येथील परमेश्वराच्या मंदिरात सर्व कुटुंबीय जमले की पनिन्नाच्या बोलण्यामुळे हन्ना कष्टी होई. एकदा असेच एलकाना यज्ञ करीत असताना हन्ना दु:खीकष्टी होऊन रडू लागली. ती काही खाईना. एलकाना ते पाहून म्हणाला, “तू का रडतेस? तू का खात नाहीस? तू का दु:खी आहेस? तुला मी आहे-मी तुझा नवरा आहे. तू असा विचार कर की मी दहा मुलांपेक्षा अधिक आहे.”

हन्नाची प्रार्थना

सर्वांचे खाणे पिणे झाल्यावर हन्ना गूपचूप उठली आणि परमेश्वराची प्रार्थना करायला गेली. एली हा याजक तेव्हा परमेश्वराच्या पवित्रस्थानाच्या दरवाजाजवळ आपल्या आसनावर बसला होता. 10 हन्ना अतिशय खिन्न होती. परमेश्वराची प्रार्थना करताना तिला रडू कोसळले. 11 परमेश्वराला ती एक नवस बोलली. ती म्हणाली, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझे दु:ख तू बघतोच आहेस. माझा विसर पडू देऊ नकोस. तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. तो परमेश्वराचा नाजीर होईल. तो मद्यपान करणार नाही. त्याचे आम्ही जावळ काढणार नाही.”

12 हन्नाची प्रार्थना बराच वेळ चालली होती. त्यावेळी एलीचे तिच्या तोंडाकडे लक्ष होते. 13 ती मनोमन प्रार्थना करत होती त्यामुळे तिचे ओठ हलत होते पण शब्द बाहेर फुटत नव्हते. त्यामुळे ती दारुच्या नशेत आहे असे एलीला वाटले. 14 एली तिला म्हणाला, “तू फार प्यायलेली दिसतेस. आता मद्यापासून दूर राहा.”

15 हन्ना म्हणाली, “महाशय, मी कोणतेही मद्य घेतलेले नाही. मी अतिशय त्रासलेली आहे. परमेश्वराला मी माझी सर्व गाऱ्हाणी सांगत होते. 16 मी वाईट बाई आहे असे समजू नका. मी फार व्यथित आहे, मला फार दु:खं आहेत म्हणून मी खूप वेळ प्रार्थना करीत होते इतकंच.”

17 तेव्हा एली म्हणाला, “शांतीने जा. इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो तुला देवो.”

18 “तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात अशी आशा आहे.” असे त्याला म्हणून हन्ना निघाली. तिने नंतर थोडे खाल्लेही. आता तिला उदास वाटत नव्हते.

19 दुसऱ्या दिवशी पहाटे उठून परमेश्वराची भक्ती करुन एलकानाचे कुटुंबीय रामा येथे आपल्या घरी परतले.

शमुवेलचा जन्म

पुढे एलकाना आणि हन्नाचा संबंध आला तेव्हा परमेश्वराला तिचे स्मरण झाले. 20 यथावकाश तिला दिवस राहिले व मुलगा झाला. हन्नाने त्याचे नाव शमुवेल ठेवले. ती म्हणाली, “मी परमेश्वराकडे त्याला मागितले म्हणून त्याचे नाव शमुवेल.”

21 एलकाना त्या वर्षी यज्ञ करण्यासाठी आणि देवाला बोललेले नवस फेडण्यासाठी शिलो येथे सहकुटुंब गेला 22 हन्ना मात्र गेली नाही. ती म्हणाली, “मुलगा जेवण खाऊ शकेल इतपत मोठा झाला की मी त्याला शिलोहला घेऊन जाईन. त्याला परमेश्वराला वाहीन. तो नाजीर होईल. मग तो तिथेच राहील.”

23 हन्नाचा पती एलकाना त्यावर म्हणाला, “तुला योग्य वाटेल तसे कर. तो खायला लागेपर्यंत तू हवी तर घरीच राहा. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद खरा ठरो.” तेव्हा हन्ना घरीच राहिली कारण शमुवेल अंगावर पीत होता. त्याचे दूध तुटेपर्यंत ती राहिली.

हन्ना शमुवेलला घेऊन सिलो येथे एलीकडे जाते

24 तो पुरेसा मोठा झाल्यावर हन्ना त्याला शिलोहे येथे परमेश्वराच्या मंदिरात घेऊन आली. तिने तीन वर्षाचा एक गोऱ्हा वीस पौंड पीठ आणि द्राक्षरसाचा बुधला हे ही आणले.

25 ते सर्व परमेश्वरासमोर गेले. एलकानाने नेहमी प्रमाणे परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचा बळी दिला. [a] मग हन्नाने मुलाला एलीच्या स्वाधीन केले. 26 ती एलीला म्हणाली “महाशय, माझ्यावर कृपादृष्टी असू द्या मी खरे तेच सांगते. मीच इथे तुमच्याजवळ बसून पूर्वी परमेश्वराजवळ याचना केली होती. 27 परमेश्वराकडे मी मुलगा मागितला आणि परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. परमेश्वराने हा मुलगा मला दिला. 28 आता मी तो परमेश्वराला अर्पण करते. तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करील.”

हन्नाने मग मुलाला तिथेच ठेवले [b] आणि परमेश्वराची भक्ती केली.

हन्नाचे धन्यवाद

हन्नाने परमेश्वराला धन्यवाद देणारे गीत म्हटले;

“परमेश्वराबद्दल माझ्या मनात आनंद मावत नाही.
    त्याच्यामुळे मला सामर्थ्य आले [c]
माझ्या शत्रुंना मी हसते. [d]
    माझ्या विजयाचा मला आनंद आहे!

परमेश्वरासारखा पवित्र कोणी देव नाही.
    देवा, तुझ्यावाचून कोणी नाही.
    आमच्या देवासारखा अभेद्य दुर्ग दुसरा नाही.

लोकहो, बढाया मारु नका.
    गर्वाने बोलू नका.
कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे.
    तोच लोकांचे नेतृत्व करतो आणि त्यांना न्याय देतो.
शूरांची धनुष्यं भंगतात
    आणि दुर्बळ लोक शक्तीशाली होतात.
पूर्वी ज्यांच्याकडे अन्नाधान्याचे मुबलक साठे होते
    त्यांना आज अन्नासाठी मोल मजुरी करावी लागत आहे.
आणि जे पूर्वी भुकेकंगाल होते
    ते आता आराम करत आहेत.
आजपर्यंत नि:संतान होती
    तिला आता सात मुलं आहेत.
पण मुलबाळ असलेली दु:खी आहे.
    कारण तिची मुलं तिच्यापासून लांब गेली आहेत.

परमेश्वर लोकांना मरण देतो
    आणि परमेश्वरच त्यांना जीवन देतो.
तोच अधोलोकाला नेतो
    आणि वरही आणतो.
परमेश्वरच काहीना दरिद्री तर
    काहींना श्रीमंत करतो.
काही लोकांना लाचार करतो
    तर काहींचा सन्मान परमेश्वरच करतो.
गरीबांना धुळीतून उचलून
    त्यांचे दु:ख हरण [e] त्यांचा गौरव करुन
त्यांना राजपुत्रांच्या बरोबरीने बसवतो,
    मानाचे स्थान देतो.
जगाची निर्मिती परमेश्वरानेच केली.
    सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे. [f]

सज्जनांना तो आधार देतो.
    त्यांना लटपटू देत नाही.
पण दुर्जनांचा संहार करतो.
    त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ
    अशा वेळी कुचकामी ठरते.
10 शत्रूंचा तो नाश करुन
    त्याच्यावर गर्जेल.
दूरदूरच्या प्रदेशांचाही तो न्याय करील.
    राजाला सामर्थ्य देईल.
    आपल्या खास राजाला बलवान करील.”

11 एलकाना आणि त्याचे कुटुंबीय रामा येथे परतले. मुलगा मात्र शिलोह येथे एली याजकाच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत राहिला.

एलीचे कुपुत्र

12 एलीची मुले वाईट होती. त्यांना परमेश्वराची पर्वा नव्हती. 13 याजकांनी लोकांना जशी वागणूक द्यावी तशी ते देत नव्हते. खरी रीत अशी होती की लोकांनी यज्ञासाठी बळी आणल्यावर याजकांनी ते मांस शिजत ठेवायचे. याजकाच्या नोकराने तीन काटे असलेली आकडी आणायची. 14 तपेल्यात तो त्रिशूल खुपसून त्यावर येईल तेवढेच मांस याजकाने स्वीकारायचे. शिलोह येथे यज्ञासाठी येणाऱ्या सर्व इस्राएलीच्या बाबतीत याजकांनी असेच करायला हवे होते. 15 पण एलीची मुले मात्र असे करत नसत. वेदीवर चरबीचे हवन करण्याआधीच त्यांचा नोकर लोकांजवळ येऊन म्हणे, “याजकांसाठी म्हणून थोडे मांस भाजायला द्या. शिजलेले मांस ते घेणार नाहीत.”

16 “हवान तर होऊ दे, मग हवे तेवढे त्यातून काढून घे,” असे कोणी म्हणालेच तर तो नोकर म्हणे, “नाही, आत्ताच द्या नाहीतर मी जबरदस्तीने काढून घेईन.”

17 परमेश्वराला देण्यात येणाऱ्या यज्ञबली विषयी हफनी आणि फिनेहास यांना कोणताही आदरभाव नव्हता हेच यातून दिसून येई. हे परमेश्वराविरुध्द असलेले मोठे पाप होते.

18 पण शमुवेल मात्र परमेश्वराची सेवा करत असे. एफोद घालून तो मदत करी. 19 त्याची आई दरवर्षी त्याच्यासाठी लहानसा अंगरखा शिवत असे. दरवर्षी नवऱ्याबरोबर शिलोह येथे यज्ञासाठी जाताना ती तो घेऊन जाई.

20 एलकाना आणि त्याची बायको यांना एली मनापासून आशीर्वाद देई. तो म्हणे, “हन्नापासून तुला आणखी संतती होवो. परमेश्वराच्या आशीर्वादाने झालेला मुलगा तुम्ही परमेश्वराला दिलात, तेव्हा तुम्हाला आणखी मुले होवोत.”

हन्ना आणि एलकाना मग घरी परतली. 21 परमेश्वराने हन्नावर कृपा केली आणि तिला नंतर तीन मुलगे आणि दोन मुली झाल्या. शमुवेल परमेश्वराच्या पवित्र सान्निध्यात वाढत होता.

योहान 5:1-23

तळ्याकाठच्या रोग्याला येशू बरे करतो

नंतर एका यहुदी सणासाठी येशू यरुशलेमला गेला. यरुशलेमात एक तळे आहे. त्या तळ्याला लागून पाच पडव्या आहेत. (होत्या) यहूदिभाषेत। [a] त्या तळ्याला बेथेझाथा [b] म्हणत. हे तळे मेंढरे नावाच्या वेशीजवळ आहे. तव्व्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी पडून असत. त्यात काही आंधळे, लंगडे व काही पांगळे होते. [c] कारण की देवदूत वेळोवेळी तव्व्यात उतरुन पाणी हालवीत असे आणि पाणी हालविल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक रोगी पडून होता. येशूने त्याला तेथे पडलेला पाहिले, तो मनुष्य तेथे बराच काळ पडून असावा हे येशूने ओळखले. म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले. “तुला बरे व्हावयाला पाहिजे का?”

त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले, “महाराज, पाणी हालते तेव्हा त्यात घेऊन जाण्यासाठी माझ्याजवळ कोणीच व्यक्ति नाही. सर्वांत अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी निघालो की, माझ्या अगोदर दुसराच रोगी पाण्यात उतरतो.”

मग येशू म्हणाला, “उठून उभा राहा! आपली खाट उचल आणि चालू लाग.” तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला, तो आपली खाट उचलून चालू लागला.

हे सर्व ज्या दिवशी घडले तो शब्बाथाचा दिवस होता. 10 म्हणून बऱ्या झालेल्या त्या मनुष्याला यहुदी म्हणाले, “आज शब्बाथाचा दिवस आहे. शब्बाथाच्या दिवशी तू आपली खाट उचलून नेणे आपल्या नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”

11 परंतु तो मनुष्य म्हणाला, “ज्याने मला बरे केले, त्यानेच मला सांगितले की, तू आपली खाट उचल आणि चालू लाग.”

12 यहुदी लोकांनी त्या मनुष्याला विचारले. “तुला आपली खाट उचलून चालायला कोणी सांगितले?”

13 परंतु तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला माहीत नव्हते त्या ठिकाणी बरेच लोक होते, आणि येशू तेथून निघून गेला होता.

14 त्यानंतर तो मनुष्य येशूला मंदिरात भेटला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “पाहा, आता तू बरा झाला आहेस. पण पाप करण्याचे सोडून दे. नाही तर तुझे अधिक वाईट होईल!”

15 नंतर तो मनुष्य तेथून निघाला आणि त्या यहूदी लोकांकडे परत गेला. त्याने त्यांना सांगितले की, ज्याने त्याला बरे केले तो येशू आहे.

16 येशू शब्बाथ दिवशी या गोष्टी करीत होता म्हणून यहूदी लोक येशूशी दुष्टपणे वागू लागले. 17 परंतु येशू यहूदी लाकांना म्हणाला, “माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करतो”.

18 यावरुन यहूदी लोकांचा येशूला जिवे मारण्याचा पक्का निश्चय झाला. ते म्हणाले, “पहिली गोष्ट ही की, येशू शब्बाथासंबंधीचा नियम मोडतो. दुसरे, ‘देव माझा पिता आहे!’ असे तो म्हणाला. तो स्वतःची देवाशी बरोबरी करतो”.

येशूला देवाचा अधिकार आहे

19 परंतु येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे सांगतो. पुत्र जरी सर्व करु शकत असला, तरी पित्याच्या इच्छेला डावलून एकटा काही करु शकत नाही. पिता करतो त्या गोष्टी पुत्रही करतो. 20 पिता पुत्रावर प्रीति करतो आणि ज्या गोष्टी पिता करतो त्या सर्व तो पुत्राला दाखवितो. हा मनुष्य बरा झाला, परंतु यापेक्षाही मोठमोठ्या गोष्टी करण्याचे पिता पुत्राला दाखवील. तेव्हा तुम्ही सर्व जण चकित व्हाल. 21 पिता लोकांना मेलेल्यांतून उठवितो आणि जीवन देतो. तसेच पुत्रही त्याला, ज्यांना द्यायला पाहिजे, त्यांना जीवन देतो.

22 “याशिवाय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही. परंतु न्याय करण्याचा सर्व अधिकार पित्याने पुत्राला दिलेला आहे. 23 देवाने हे अशासाठी केले की, लोक जसा पित्याचा सन्मान करतात, तसा त्यांनी पुत्राचाही करावा. जर कोणी पुत्राचा मान राखीत नाही, तर तो पित्याचाही मान राखीत नाही. पित्यानेच पुत्राला पाठविले आहे.

स्तोत्रसंहिता 105:37-45

37 नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले.
    त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली.
    देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.
38 देवाचे लोक गेल्याचे पाहून मिसरला आनंद झाला.
    कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती.
39 देवाने ढग पांघरुणासारखे पसरले.
    देवाने अग्नीच्या खांबाचा रात्री प्रकाशासाठी उपयोग केला.
40 लोकांनी अन्नाची मागणी केली आणि देवाने लावे आणले.
    देवाने त्यांना स्वर्गातली भाकरी भरपूर दिली.
41 देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले.
    वाळवटांत नदी वाहू लागली.

42 देवाला त्याच्या पवित्र वचनाची आठवण होती.
    देवाला त्याचा सेवक अब्राहाम याला दिलेल्या वचनाची आठवण आली.
43 देवाने त्याच्या माणसांना मिसरमधून बाहेर आणले.
    लोक आनंदाने नाचत बागडत, गाणी म्हणत बाहेर आले.
44 देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला.
    देवाच्या माणसांना इतरांनी काम करुन मिळवलेल्या वस्तू मिळाल्या.
45 देवाने असे का केले?
त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची
    शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून,

परमेश्वराची स्तुती करा.

नीतिसूत्रे 14:28-29

28 जर राजा खूप लोकांवर राज्य करत असला तर तो महान असतो. पण जर तिथे लोकच नसले तर त्या राजाची काहीच किंमत नसते.

29 सहनशील माणूस खूप हुशार असतो. ज्या माणसाला चटकन् राग येतो तो आपण मूर्ख आहोत, हे सिध्द् करतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center