Revised Common Lectionary (Semicontinuous)
धन्यवाद स्तोत्र.
100 हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
2 परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा.
परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या.
3 परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या.
त्यानेच आपल्याला निर्माण केले.
आपण त्याची माणसे आहोत.
आपण त्याची मेंढरे आहोत.
4 त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या.
त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या.
त्याला मान द्या.
त्याच्या नावाचा जयजयकार करा.
5 परमेश्वर चांगला आहे.
त्याचे प्रेम चिरंजीव आहे.
आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.
यहुदा व इस्राएल यांचे एकीकरण
15 मला परमेश्वराचे शब्द पुन्हा ऐकू आले. तो म्हणाला, 16 “मानवपुत्रा, एक काठी घे आणि तिच्यावर पुढील संदेश लिही. ‘ही काठी यहूदा आणि त्याचे मित्र [a] इस्राएलचे लोक यांच्या मालकीची आहे.’ मग दुसरी काठी घेऊन तिच्यावर लिही ‘ही एफ्राईमची काठी योसेफ व त्याचे मित्र इस्राएलचे लोक यांच्या मालकीची आहे.’ 17 मग त्या दोन काठ्या एकत्र जोड. तुझ्या हातांत ती एकच काठी असेल.
18 “तुझे लोक तुला ह्याचा अर्थ विचारतील. 19 त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘मी एफ्राईमच्या आणि त्याच्या मित्रांच्या म्हणजेच इस्राएलच्या लोकांच्या हातांत असलेली योसेफाची काठी घेईल. मग ती मी यहुदाच्या काठीबरोबर ठेवीन. माझ्या हातांत त्या दोन काठ्यांची एकच काठी होईल.’
20 “त्या काठ्या हातांत तुझ्या पुढे धर. त्यांच्यावर तू नांवे लिहिली आहेस. 21 लोकांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो: ‘इस्राएल लोक वेगवेगळ्या राष्टांत गेले आहेत. तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सगळीकडून आणून, एकत्र गोळा करीन आणि त्यांना त्यांच्या देशात परत आणीन. 22 इस्राएलच्या पर्वतीय क्षेत्रात मी त्यांचे एकच राष्ट्र करीन. त्या सर्वांचा मिळून एकच राजा असेल. यापुढे ती वेगवेगळी दोन राष्ट्रे असणार नाहीत, त्याचे दोन राज्यात विभाजन होणार नाही. 23 ते यापुढे स्वतःला त्या मूर्ती मुळे वा पुतळ्यांमुळे अमंगळ होणार नाहीत. त्यांनी पापे केलेल्या सर्व ठिकाणापासून मी त्यांना सुरक्षित ठेवीन. त्यांना धुवून शुद्ध करीन. मग ते माझे होतील व मी त्यांचा देव होईन.
24 “‘माझा सेवक, दावीद, हा त्यांचा राजा होईल. त्या सर्वांना मिळून एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमाप्रमाणे वागतील आणि माझ्या कायद्यांचे पालन करतील. मी त्यांना करायला सांगितलेल्या गोष्टी ते करतील. 25 माझा सेवक, याकोब, याला मी दिलेल्या भूमीवर ते राहतील. तुमचे पूर्वज तेथेच राहात होते. आता माझी माणसे तेथे राहतील. ते, त्यांची मुले, नातवंडे कायमची तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा कायमचा नेता असेल. 26 मी त्यांच्याबरोबर शांतता करार करीन. तो करार कायमस्वरुपी असेल. मी त्यांना त्यांची जमीन देण्यास, त्यांची संख्या वाढवून देण्यास, त्यांच्या तेथेच कायमचे माझे पवित्र स्थान ठेवण्यास कबूल आहे. 27 त्यांच्यामध्येच माझा पवित्र तंबू असेल. हो! मी त्यांचा देव असेल व ते माझे लोक असतील. 28 मग इतर राष्ट्रांना कळून येईल की मी परमेश्वर आहे आणि इस्राएलमध्ये चिरंतन असे माझे पवित्र स्थान करुन त्या लोकांना मी माझी कायमची खास माणसे बनविली आहेत.’”
शेवटच्या पीडेसह देवदूत
15 मग मी आणखी एक अदभुत चिन्ह स्वर्गात पाहिले. ते महान आणि चकित करणारे होते. तेथे सात देवदूतांनी सात पीडा आणल्या होत्या. या शेवटच्या पीडा होत्या कारण त्यानंतर देवाचा क्रोध नाहीसा होणार आहे.
2 मी अग्नि काचेच्या समुद्रात मिसळल्यासारखा पाहिला, सर्व लोकांनी ज्यांनी त्या प्राण्यावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय मिळविला होता ते सर्व समुद्राजवळ उभे होते. या लोकांकडे देवाने दिलेली वीणा होती. 3 त्यांनी देवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकऱ्याचे गीत गाईले:
“प्रभु देवा, सर्वसमर्था तू महान
आणि अदभुत गोष्टी करतोस.
राष्ट्रांच्या राजा,
तुझे मार्ग योग्य व खरे आहेत
4 हे प्रभु, सर्व लोक तुला घाबरतील
सर्व लोक तुझ्या नावाची स्तुति करतील.
फक्त तूच पवित्र आहेस
सर्व लोक येऊन तुझी उपासना करतील
कारण तुझी नीतीमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.”
2006 by World Bible Translation Center