Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

New Testament in a Year

Read the New Testament from start to finish, from Matthew to Revelation.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
योहान 11:30-57

30 आता तोपर्यंत येशू त्या खेड्याच्या आत आला नव्हता. तर मार्था त्याला भेटली, तेथेच अजूनपर्थंत होता. 31 तेव्हा जे यहूदी तिच्या घरात तिचे सांत्वन करीत होते ते, मरीया लगबगीने उठून बाहेर गेली असे पाहून, ती कबरेकडे शोक करायला गेली असे समजून तिच्यामागे गेले. 32 मग जेथे येशू होता तेथे मरीया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभु, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”

33 मग येशू तिला रडताना पाहून व तिच्याबरोबर असलेल्या यहूद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला. 34 तो म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?”

ते म्हणाले, “प्रभु, या आणि पाहा.”

35 येशू रडला.

36 तेव्हा यहूदी म्हणाले, “पहा! त्याला तो किती आवडत होता.”

37 पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्या या मनुष्याला लाजराला मरणापासून वाचविता येऊ नये काय?”

येशू लाजराला जिवंत करतो

38 मग येशू पुन्हा अंतःकरणात विव्हळ झाला असता कबरेकडे आला. ती गुहा होती, आणि तिच्यावर दगड लोटला होता. 39 येशूने म्हटले, “हा दगड काढा.”

मार्था म्हणाली, “पण प्रभु, लाजर मरुन चार दिवस झाले आहेत, त्याला आता दुर्गंधी येत असेल.” ती मृत लाजराची बहीण होती.

40 येशूने तिला म्हटले, “जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय?”

41 मग त्यांनी दगड बाजूला केला. तेव्हा येशू वर पाहून म्हणाला, “पित्या, तू माझे ऐकले, म्हणून मी तुझे उपकार मानतो. 42 आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे, पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो. यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठेवावा.” 43 असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लजरा, बाहेर ये.” 44 मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते.

येशू लोकांना म्हणाला. “त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या.”

यहूदी पुढारी येशूला ठार मारण्याचा कट करतात(A)

45 जे यहूदी मरीयेकडे आले होते, त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. 46 पण त्यांच्यातील काहींनी परुश्यांकडे जाऊन येशूने जे केले होते ते त्यांना सांगितले. 47 तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले, “हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे. 48 आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यार विश्वास ठेवतील आणि रोमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील.”

49 तेव्हा त्यांच्यातील कयफा नावाची व्यक्ति त्या वर्षी प्रमुख याजक होती. तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच माहिती नाही! 50 तुम्ही हे लक्षात घेत नाही की, सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे.”

51 तो हे स्वतः होऊन बोलला नाही तर त्यावर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे. 52 केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की, त्याने देवाच्या पांगलेल्यांना एकत्र करावे, म्हणून तो मरणार आहे.

53 म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याची मसलत केली. 54 यामुळे येशू तेव्हापासून उघडपणे यहूघांमध्ये फिरला नाही. त्याऐवजी तो रानाजवळच्या प्रदेशातील ऐफ्राईम नावाच्या नगरात गेला व तेथे शिष्यांसह राहिला.

55 तेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि सणाअगोदर पुष्कळ लोक आपणांस शुद्ध करायला देशातून वर यरुशलेमेस गेले. 56 ते येशूचा शोध करीत राहीले, आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? तो सणाला येणार नाही काय?” 57 पण मुख्य याजक व परुश्यांनी अशी आज्ञा केली होती की, येशू कोठे आहे हे ज्याला कळेल त्याने त्यांना कळवावे, म्हणजे ते त्याला पकडू शकतील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center