New Testament in a Year
येशू आणि निकदेम
3 निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परूशी लोकांपैकी एक असून तो यहूदी लोकांचा एक महत्त्वाचा पुढारी होता. 2 एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला, “रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हांला माहीत आहे. कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत.”
3 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे सांगतो. प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखाद्या माणसाचा नव्याने जन्म झाला नाही, तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही.”
4 निकदेम म्हणाला. “जर एखादा माणूस म्हातारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल? तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही! म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही!”
5 येशूने उत्तर दिले. “मी तुम्हांला खरे सांगतो: मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही. 6 मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो. परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो. 7 तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हांला सांगितल्याबहल आश्चर्यचकित होऊ नका. 8 वाऱ्याला वहायला पाहिजे तिकडे तो वाहतो, वारा वाहताना तुम्हांला त्याचा आवाज ऐकू येतो. परंतु वारा कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही. आत्म्यापासून जन्म पावलेल्या प्रत्थेक माणसाचे असेच असते.”
9 निकदेम म्हणाला, “हे सारे कसे शक्य आहे?”
10 येशू म्हणाला, “तुम्ही इस्राएलाचे प्रमुख शिक्षक आहात. तरीही तुम्हांला या गोष्टी कळत नाहीत काय? 11 मी तुम्हांला खरे तेच सांगतो. आम्हांला जे माहीत आहे त्याविषयी आम्ही बोलतो, जे पाहिले त्याविष्यी आम्ही सांगतो. परंतु आम्ही जे सांगतो ते तुम्ही लोक मानीत नाही. 12 मी तुम्हांला जगातील गोष्टीविषयी सांगितले पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही. मग जर मी तुम्हांला स्वर्गातील गोष्टीविषयी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही! 13 मनुष्याचा पुत्र असा एकमेव आहे जो वर स्वर्गात जेथे होता तेथे गेला आणि स्वर्गातून उतरुन खाली आला.”
14 “मोशेने अरण्यात असताना सापाल उंच केले. [a] मनुष्याच्या पुत्रालाही तसेच उंच केले पाहिजे. 15 अशासाठी की जो कोणी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळू शकते.”
16 होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे. 17 देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. 18 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय (दोषी ठरविले जाणे) होणार नाही. परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही.
2006 by World Bible Translation Center