Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

New Testament in a Year

Read the New Testament from start to finish, from Matthew to Revelation.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
योहान 5:25-47

25 मी तुम्हांला खरे सांगतो. अशी महत्वाची वेळ येत आहे. ती वेळ जवळजवळ आलेलीच आहे. जे लोक पापामध्ये मृत आहेत ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि देवाच्या पुत्राकडून ऐकलेल्या गोष्टी जे लोक स्वीकारतील त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. 26 खुद्द पित्यापासून (देवापासून) जीवनाचा लाभ होतो. म्हणून पित्याने पुत्रालाही जीवन देण्याची देणगी दिली आहे. 27 आणि पुत्राने सर्व लोकांचा न्यायनिवाडा करावा असा अधिकार पित्याने पुत्राला दिला आहे. कारण तो पुत्र मनुष्याचाही पुत्र आहे.

28 “तुम्ही याचे आश्चर्य मानू नका. अशी वेळ येत आहे की, सर्व लोक जे मेलेले आहेत व आपल्या कबरेत आहेत ते त्याची वाणी ऐकतील. 29 मग ते आपल्या कबरेतून बाहेर येतील. ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली, ते उठतील आणि त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. परंतु ज्या लोकांनी वाइट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील.

30 “मी एकटा काहीच करु शकत नाही. मला सांगितल्याप्रमाणेच मी न्याय करतो, म्हणून माझा न्याय योग्य आहे. कारण मी स्वतःच्या समाधानासाठी नाही; परंतु ज्याने मला पाठविले त्याच्या समाधानासाठी न्याय करतो.”

येशू यहूदी लोकांशी बोलणे चालू ठेवतो

31 “जर मी स्वतःच माझ्याविषयी लोकांना सांगितले तर लोक त्या गोष्टी मानणार नाहीत. 32 परंतु लोकांना याविषयी सांगणारा दुसरा एक जण आहे. आणि तो माझ्याविषयी ज्या गोष्टी सांगतो त्या खऱ्या आहेत, हे मला माहीत आहे.”

33 “तुम्ही योहानाकडे काही लोकांना पाठविले आणि सत्याविषयी त्याने तुम्हांला सांगितलेच आहे. 34 माझ्याविषयी लोकांना सांगण्यास मला कोणाही माणसाची गरज नाही. परंतु तुमचे तारण व्हावे म्हणून मी या गोष्टी तुम्हांला सांगतो. 35 पेटलेला दिवा प्रकाश देतो, तसाच योहान होता आणि तुम्हांला त्याच्या प्रकाशाकडून काही काळ आनंद मिळाला.

36 “परंतु मजजवळ माझ्याविषयी योहानापेक्षाही मोठा पुरावा आहे. जी कामे मी करतो तीच माझा पुरावा आहेत. या गोष्टी माझ्या पित्याने मला करण्यासाठी दिलेल्या आहेत. त्या गोष्टींवरुन हे सिद्ध होते की, पित्याने मला पाठविले आहे. 37 आणि ज्या पित्याने मला पाठविले त्याने स्वतःही माझ्याविषयी साक्ष दिलेली आहे. परंतु तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही, तो कसा दिसतो हे तुम्ही कधी पाहिले नाही. 38 पित्याची शिकवण तुमच्यामध्ये राहात नाही. कारण पित्याने ज्या एकाला तुमच्याकडे पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, 39 तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता. त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला अनंतकाळचे जीवन मिळते, असे तुम्हांला वाटते, तेच शास्त्र माझ्याविषयी सांगते! 40 तरी तुम्ही अनंतकालचे जीवन मिळण्यासाठी मजकडे येण्यास नकार देता.”

41 “मला माणसांकडून स्तुति नको. 42 पण मी तुम्हांला ओळखतो- तुम्हांमध्ये देवाविषयी प्रीति नाही हे मला माहीत आहे. 43 मी माझ्या पित्यापासून आलो आहे- मी त्याच्यावतीने बोलतो. परंतु तरीही तुम्ही मला स्वीकारीत नाही. पण जर दुसरा कोणी मनुष्य फक्त स्वतःविषयी सांगत आला, तर मात्र तुम्ही त्याचे मानाल. 44 तुम्हांला एकमेकांकडून स्तुति करवून घ्यायला आवडते. परंतु एकाच देवाकडून होणारी स्तुति मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करीत नाही, मग तुम्ही माझ्यावर कसा काय विश्वास ठेवाल? 45 मी पित्यासमोर उभा राहून तुम्हांला दोषी ठरवीन असे समजू नका. तुमजे चुकते असे मोशेच तुम्हांला म्हणतो, आणि मोशे आपले तारण करील अशी तुम्हांला आशा आहे. 46 जर तुम्ही खरोखरच मोशेवर विश्वास ठेवला आहे, तर तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवाल. कारण खुद्द मोशेनेच माझ्याविषयी लिहिले आहे. 47 परंतु मोशेने जे लिहिले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, तर मी सांगतो त्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू शकणारच नाही.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center