New Testament in a Year
24 मग जो जूर्वी आंधळा होता त्याला यहूदी पुढाऱ्यांनी पुन्हा बोलाविले. ते त्याला म्हणाले, “तुला बरे केले म्हणून तू देवाला गौरव द्यावे. हा मनुष्य पापी आहे हे आम्हांला माहीत आहे.”
25 त्या मनुष्याने उत्तर दिले, “तो पापी आहे की नाही हे मला माहीत नाही. परंतु हे मला नक्की माहीत आहे की, मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते.”
26 यहूदी पुढाऱ्यांनी विचारले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे बरे केले?”
27 त्या मनुष्याने उत्तर दिले. “ते मी तुम्हांला अगोदरच सांगितले आहे. परंतु तुम्ही माझे ऐकत नाही. पुन्हा तुम्हांला ते ऐकावेसे वाटते काय? तुम्हांलाही त्याचे शिष्य व्हावयाची इच्छा आहे काय?”
28 यहूदी पुढारी फार संतापले आणि त्याला फारच वाईट रीतीने बोलू लागले. ते त्याला म्हणाले, “तू त्याचा शिष्य आहेस. आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत. 29 देव मोशेशी बोलत असे हे आम्हांला माहीत आहे. परंतु हा मनुष्य कोण, कोठून आला हे आम्हांला माहीत नाही.”
30 त्या मनुष्याने उत्तर दिले, “ही फारच विचित्र गोष्ट आहे. येशू कोठून आला हे तुम्हांला माहीत नाही. परंतु त्याने माझे डोळे बरे केले. 31 देव पापी लोकांचे ऐकत नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण जो त्याची उपासना करतो आणि त्याची आज्ञा पाळतो त्याचेच तो ऐकेल. 32 जो मनुष्य जन्मजात आंधळा होता, त्याला दृष्टी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 33 हा मनुष्य देवाकडूनच आला असला पाहिजे. जर तो देवाकडूल आला नसता तर त्याला असे काहीच करता आले नसते.”
34 यहूदी पुढाऱ्यांनी उतर दिले, “तू तर पापात जन्मला आहेस तू आम्हांला शिकवू पाहतोस काय?” आणि यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला तेथून हुसकून लावले.
आध्यात्मिक आंधळेपणा
35 यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला बळजबरीने हुसकावून लावले, हे येशूने ऐकले, म्हणून येशू त्या मनुष्याला भेटला आणि म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”
36 त्या मनुष्याने विचारले, “महाराज, हा मनुष्याचा पुत्र कोण? मला सांगा, म्हणजे मला त्याच्यावर विश्वास ठेवता येईल.”
37 येशू त्याला म्हणाला, “तू त्याला अगोदरच पाहिले आहेस. मनुष्याचा पुत्र आता तुझ्याशी बोलत आहे.”
38 “होय, प्रभु, मी विश्वास ठेवतो.” त्या मनुष्याने उत्तर दिले. मग त्या मनुष्याने खाली वाकून येशूला वंदन केले.
39 येशू म्हणाल, “जगाचा न्याय व्हावा म्हणून मी जगात आलो आहे. मी आलो आहे तो यासाठी की, जे आंधळे आहेत त्यांना दिसावे. आणि आम्हांला पाहता येते असे वाटणारे आंधळे व्हावेत.”
40 परुश्यांतील काही जण येशूच्या आजूबाजूला होते. त्यांनी येशूला हे बोलताना ऐकले. आणि त्यांनी विचारले, “काय, आम्हीसुद्धा आंधळे आहोत असे तुला म्हणायचे आहे काय?”
41 येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच आंधळे (समज नसलेले) असता, तर तुम्ही पापाबद्दल दोषी ठरला नसता. परंतु ‘आम्हांस दिसते’ असे तुम्ही म्हणता (तुम्ही काय करता हे जाणता) म्हणून तुम्ही दोषी आहात.”
2006 by World Bible Translation Center