Revised Common Lectionary (Semicontinuous)
15 “आज मी तुमच्यापुढे जीवन आणि मृत्यू, चांगले आणि वाईट हे पर्याय ठेवले आहेत. 16 तुमच्या परमेश्वर देवावर प्रेम करा, त्याच्या मार्गाने जा व त्याच्या आज्ञा, नियम पाळा अशी माझी तुम्हांला आज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जो प्रदेश आपलासा करायला जात आहात तेथे दीर्घकाळ राहाल, तुमच्या देशाची भरभराट होईल, तुम्हांला तुमचा देव परमेश्वर ह्याचे आशीर्वाद मिळतील. 17 पण तुम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवलीत, त्याचे ऐकले नाहीत, इतर दैवतांचे भजनपूजन केलेत तर 18 मात्र तुमचा नाश ठरलेलाच हे मी तुम्हांला बजावून सांगतो. यार्देन नदी पलीकडच्या प्रदेशात मग तुम्ही फार काळ राहणार नाही.
19 “आज स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने मी तुम्हाला जीवन आणि मृत्यू या दोहोतून एकाची निवड करायला सांगत आहे. जीवनाचा पर्याय स्वीकारलात तर आशीर्वाद मिळेल. दुसऱ्याची निवड केलीत तर शाप मिळेल. तेव्हा जीवनाची निवड करा म्हणजे तुम्ही व तुमची मुलेबाळे जिवंत राहातील. 20 तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा. त्याच्या आज्ञा पाळा. त्याला सोडू नका. कारण परमेश्वर म्हणजेच जीवन. तसे केलेत तर अब्राहाम, इसहाक, व याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे परमेश्वर तुम्हांला त्या प्रदेशात दीर्घायुष्य देईल.”
आलेफ
119 शुध्द आयुष्य जगणारे लोक सुखी आहेत.
ते लोक परमेश्वराची शिकवण पाळतात.
2 जे लोक परमेश्वराचा करार पाळतात ते सुखी आहेत.
ते परमेश्वराच्या आज्ञा मनापासून पाळतात.
3 ते लोक वाईट गोष्टी करीत नाहीत.
ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात.
4 परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या आज्ञा दिल्यास
आणि त्या आज्ञा पूर्णपणे पाळायला तू आम्हाला सांगितलेस.
5 परमेश्वरा, मी जर नेहमी तुझे नियम पाळले.
6 तर मी जेव्हा तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन
तेव्हा मला कधीही लाज वाटणार नाही.
7 मी जेव्हा तुझा चांगलुपणा आणि
न्यायीपणा यांचा अभ्यास करीन तेव्हा मी तुला खरोखरच मान देईन.
8 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा पाळेन.
तेव्हा कृपाकरुन मला सोडून जाऊ नकोस.
माणसांना अनुसरणे चुकीचे आहे
3 परंतु बंधूंनो आध्यात्मिक लोक म्हणून मी तुमच्याशी बोलू शकत नव्हतो. त्याऐवजी मला तुमच्याशी देहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकासारखे बोलावे लागले. 2 मी तुम्हांला पिण्यासाठी दूध दिले, जड अन्र दिले नाही. कारण तुम्ही जड अन्र खाऊ शकत नव्हता. व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही. 3 कारण तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात. कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाही काय, व जगातील लोकांसारखे वागत नाही काय? 4 कारण जेव्हा काही म्हणतात, “मी पौलाचा आह,” आणि इतर दुसरे म्हणतात, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही जगिक लोकांसारखे वागत नाही काय?
5 तर मग अपुल्लोस कोण आणि पौल कोण? आम्ही केवळ सेवक आहोत, ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वासणारे झाला आणि आम्हा प्रत्येकाला देवाने जे काम नेमून दिले ते काम आम्ही केले. 6 मी बी लावले, अपुल्लोसाने त्याला पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली. 7 म्हणून जो बी पेरतो तो किंवा जो पाणी घालतो तो महत्त्वाचा नाही, तर देव जो त्याची वाढ करतो तो महत्त्वाचा आहे. 8 जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत व प्रत्येकाला त्याच्या फळावर आधारित अशी मजूरी मिळेल 9 कारण देवा समवेत आपण सर्वजण कामगार आहोत.
तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.
रागासंबंधी येशूची शिकवण
21 “तुम्ही ऐकले असले की, फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की, ‘खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल.’ [a] 22 पण मी तुम्हांस सांगतो की, जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावाला, अरे वेड्या, असे म्हणेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.
23 “म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले, 24 तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदीपुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे.
25 “वाटेत तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी लगेच सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाकडे नेईल व न्यायाधीश अधिकाऱ्याकडे नेईल आणि अधिकारी तुला तुरुंगात टाकील. 26 मी तुला खरे सांगतो तू शेवटचा पैसा देईपर्यंत तुझी सुटका मुळीच होणार नाही.
लैंगिक पापाविषयी येशूची शिकवण
27 “‘व्यभिचार करू नको’ [b] असे पूर्वी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे, 28 परंतु मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. 29 जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून दे. संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवयव गमावलेला बरा. 30 जर तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करतो, तर तो तोडून फेकून दे, कारण संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक अवयव गमावलेला बरा.
घटस्फोटाविषयी येशूची शिकवण(A)
31 “‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तर त्याने तिला घटस्फोटाची लेखी सूचना द्यावी.’ [c] असे सांगितल्याचे तुम्ही जाणता. 32 पण मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो, तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कोणी अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो.
शपथ घेण्याविषयी येशूची शिकवन
33 “जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको. जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरी कर, [d] असे सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे. 34 परंतु मी तुम्हाला सांगतो की, शपथ वाहूच नका, आकाशाची शपथ वाहू नका कारण ते देवाचे आसन आहे. 35 पृथ्वीचीही शपथ वाहू नका कारण ती त्याच्या पायाचे आसन आहे; आणि यरूशलेमाचीही शपथ वाहू नका, कारण त्या नगरीचा राजा देव आहे. 36 आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण त्याचा एखादा केसही पांढरा किंवा काळा होणे तुमच्या हाती नाही. 37 म्हणून तुमचे बोलणे ‘होय’ तर होय किंवा ‘नाही’ एवढेच असावे. त्यापेक्षा जास्त जर असेल तर ते सैतानापासून आहे.
2006 by World Bible Translation Center