Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 130

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र

130 परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे
    म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.
माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे.
    माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.
परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या
    पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
    म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.

मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे.
    माझा आत्मा त्याची वाट बघत आहे.
    परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे.
    मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.
    केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते.
परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि
    परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.

1 शमुवेल 20:1-25

योनाथान आणि दावीद यांच्या मधला करार

20 दावीद रामा येथील शिबिरापासून दूर पळून गेला. योनाथानकडे येऊन तो म्हणाला, “माझं काय चुकल? माझा अपराध तरी काय? तुझे वडील का माझ्या जिवावर उठले आहेत?”

योनाथान म्हणाला, “हे काय भलतेच? ते कशाला तुझ्या जिवावर उठतील? मला सांगितल्या शिवाय ते कधीच कुठली गोष्ट करत नाहीत. कोणतीही महत्वाची किंवा क्षुल्लक गोष्ट असो, ते ती मला सांगतातच. मग तुझा वध करायची बाब ते कशी माझ्यापासून लपवून ठेवतील? तेव्हा हे काही खरं नव्हे!”

तेव्हा दावीद म्हणाला, “आपण मित्र आहोत ही गोष्ट तुझे वडील चांगली जाणून आहेत. ते स्वतःशी म्हणाले, ‘योनाथानला हे कळता कामा नये. त्याला कळले तर तो हे दावीदला सांगेल.’ पण परमेश्वराची आणि तुझ्या जीविताची शपथ घेवून सांगतो, मृत्यू माझ्याभोवती घोटाळतो आहे.”

योनाथान मग दावीदाला म्हणाला, “तू काय म्हणशील ते करायला मी तयार आहे.”

मग दावीद म्हणाला, “उद्या अमावस्ये निमित्त मेजवानी आहे. तेव्हा राजाच्या पंक्तीला मी असायला हवे. पण संध्याकाळपर्यंत मी शेतात लपून बसतो मी नसल्याचे तुझ्या वडीलांच्या लक्षात आले तर त्यांना सांग, ‘दावीदला बेथलहेमला तातडीने जायचे होते. त्याच्या सगळ्या कुटुंबाचा मासिक यज्ञ तेथे आहे. त्यात हजर राहायला जाण्यासाठी त्याने माझी परवानगी मागितली.’ तुझ्या वडीलांनी हे सहजगत्या मान्य केले तर मला काही धोका नाही. पण ते संतापले तर मात्र माझ्या जिवाला धोका आहे हे तू ओळख. योनाथान, माझ्यावर कृपा कर. मी तुझा दास आहे. परमेश्वराच्या साक्षीने तू माझ्याशी करार केला आहेस. मी अपराधी आढळल्यास खुशाल तू माझा वध कर. पण मला तुझ्या वडीलांकडे नेऊ नको.”

यावर योनाथान म्हणाला, “अस घडणार नाही. ते तुझ्या वाईटावर आहेत असं माझ्या लक्षात आलं तर मी तूला तसं सांगीन.”

10 दावीद म्हणाला, “तुझ्याशी ते कठोरपणे वागले तर मला कोण खबर देईल?”

11 तेव्हा योनाथानने सुचवले, “चल आपण शेताकडे जाऊ.” आणि ते दोघे ही शेतात गेले.

12 तिथे योनाथान दावीदला म्हणाला, “देव जो, इस्राएलचा परमेश्वर या समोर मी तुला वचन देतो. माझ्या वडीलांच्या तुझ्याबद्दल काय भल्याबुऱ्या भावना आहेत ते मी जाणून घेईन. मग तीन दिवसात तुला तसं इथे याच शेतात कळवीन. 13 त्यांच्याकडून तुला काही घातपात होणार असेल तर तुला त्याची कल्पना देईन. तुला सुखरुप निसटू देईन. माझ्याहातून यात हयगय झाल्यास परमेश्वर मला त्याची शिक्षा देवो. माझ्या वडीलांना परमेश्वराची साथ आहे तशीच तुला मिळो. 14 मी हयात असेपर्यंत तुझा माझ्यावर लोभ असू दे. मी गेल्यावरही 15 माझ्या कुटुंबावरील तुझ्या लोभात खंड न पडो. परमेश्वर तुझ्या वैऱ्यांचा पृथ्वीतलावरुन नि:पात करील. 16 मग त्या वेळी योनाथानच्या कुटुंबाला दावीदपासून वेगळे व्हावे लागले तरी बेहत्तर. देव दावीदाच्या शत्रूंना शासन करो.” मग योनाथानने दावीदाच्या घराण्याशी करार केला.

17 योनाथानने मग दावीदला परस्परांवरील प्रेमाच्या आणाभाका परत घ्यायला लावल्या. दावीदावर त्याचे स्वतः इतकेच प्रेम होते म्हणून त्या प्रेमापोटी त्याने असे केले.

18 योनाथान दावीदला म्हणाला, “उद्या अमावास्येची मेजवानी आहे. पंक्तीतील तुझे आसन रिकामे असेल त्यामुळे तुझी अनुपस्थिती माझ्या वडीलांच्या लक्षात येईल. 19 या सगळ्यांला सुरुवात झाली तेव्हा तू जिथे लपला होतास त्याच ठिकाणी तू तिसऱ्या दिवशी थांब. त्या टेकडी जवळ माझी वाट पाहा. 20 तिसऱ्या दिवशी मी तिथे येईन आणि नेमबजी चालली आहे असे भासवीन. काही बाण मी मारीन. 21 आणि हाताखालच्या मुलाला बाण शोधून आणायला पाठवीन. सर्वकाही ठीक असेल तर त्या मुलाला मी म्हणेन, ‘तू खूप लांब गेलास बाण माझ्या जवळ आहेत. तर ये व तो घे.’ जर मी असा म्हणालो तर तू खुशाल बाहेर ये मग, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या सुरक्षिततेची हमी माझ्यावर, कोणताही धोका तेव्हा नसेल. 22 पण काही धोका असल्यास मी म्हणेन, ‘बाण आणखी पुढे आहेत. जा, जाऊन आण.’ तसे मी म्हटले तर मात्र तू निघून जा. प्रत्यक्ष परमेश्वरच तुला लांब पाठवत आहे असे समज. 23 आपल्या दोघांमधला हा करार लक्षात ठेव. परमेश्वर याला साक्ष आहे.”

24 त्यानंतर दावीद शेतात लपून बसला.

मेजवानीच्या प्रसंगी शौलचा दृष्टिकोण

अमावास्येच्या मेजवानीची वेळ झाली आणि राजा भोजनासाठी बसला. 25 भिंती जवळच्या आपल्या नेहमीच्या आसनावर राजा बसला. त्याच्या समोर योनाथान होता. आबनेर शौलजवळ होता. दावीदाचे आसन मात्र रिकामे होते.

2 करिंथकरांस 8:1-7

ख्रिस्ती देणे

आणि आता, बंधूनो, आम्हांला असे वाटते की, तुम्ही हे जाणून घ्यावे की, मासेदिनियातील मंडळ्यांना देवाने कशी कृपा दिली. अत्यंत खडतर अशी संकटे असली तरी त्यांचा ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांचे आत्यांतिक दारिद्य विशाल उदारतेत उभे राहिले. कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले. आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे स्वतःला दिले. संतांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळावा म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हांला विनंति केली. आणि आम्ही अपेक्षा केली त्याप्रमाणे त्यांनी केले नाही, तर त्यांनी स्वतःला प्रथम देवाला दिले. आणि मग देवाच्या इच्छेला राखून आम्हांला दिले.

मग आम्ही तीताला विनंति केली, त्याने अगोदर जशी सुरुवात केली होती तशीच त्याने तुम्हामध्ये या कुपेची पूर्णताही करावी. म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हांवरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेतही फार वाढावे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center