Readings for Lent and Easter
देवाशी नीतिमान
5 ज्याअर्थी विश्वासाने आपल्याला नीतिमान ठरविले आहे त्याअर्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांति मिळाली आहे. 2 आता आपण ज्या कृपेमध्ये आहोत, त्यात त्याच्याद्धारे विश्वासाने आम्हीसुद्धा प्रवेश मिळविला आहे. आणि आम्ही देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या आशेने अभिमान बाळगतो. 3 याशिवाय आम्ही संकटांतही अभिमान बाळगतो; कारण आम्हांस ठाऊक आहे की, या संकटांमुळे आम्हांला अधिक धीर येतो. 4 आणि धीराने आम्ही कसोटीस उतरतो आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्र होते. 5 आणि आशा लाजवित नाही. कारण आपणांस दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीति ओतली आहे.
6 आम्ही जेव्हा आमचे स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला. 7 आता नीतिमान मनुष्यासाठी सुध्दा कदाचित कोणी मरणार नाही. एखादा मनुष्य चांगला असेल तर त्याच्यासाठी मरण्याचे धाडस कदाचित कोणीतरी करील. 8 परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो आमच्यावर फार प्रेम करतो.
9 तर मग आता आपण ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत, म्हणून ख्रिस्ताद्वारे देवाच्या रागापासून आपण वाचले जाणार आहोत. 10 आम्ही देवाचे शत्रू असताही त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे त्याने आमच्याशी समेट केला. त्यामुळे आता आम्ही देवाचे मित्र असल्यामुळे देव आम्हांला त्याच्या पुत्राच्या जीवनाद्वारे रक्षील. 11 इतकेच नव्हे तर ज्याच्याद्वारे आमचा देवाबरोबर समेट झाला त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हीसुद्धा देवाविषियी अभिमान बाळगतो.
2006 by World Bible Translation Center