Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 16-17

हागार दासी

16 अब्राम व त्याची बायको साराय यांना मुलबाळ नव्हते. साराय हिची हागार नावाची एक मिसरी म्हणजे मिसर देशाची एक दासी होती. साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून रोखले आहे तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा, तिच्यापोटी जन्मलेले मूल माझेच मूल आहे असे समजून मी ते स्वीकारीन.” अब्रामाने आपली बायको साराय हिचे म्हणणे मान्य केले.

कनान देशात अब्राम दहा वर्षे राहिल्यावर हे झाले आणि सारायने आपली मिसरी मोलकरीण हागार आपला नवरा अब्राम याला बायको म्हणून दिली.

हागार अब्रामापासून गरोदर राहिली; आपण गरोदर आहो हे पाहून आपण आपली मालकीण साराय हिच्यापेक्षा अधिक चांगल्या आहो असे हागारेला वाटू लागले व तिला गर्व झाला; परंतु साराय अब्रामाला म्हणाली, “माझी दासी हागार आता मला तुच्छ लेखते; त्या बद्दल मी तुम्हाला दोष देते, कारण मीच स्वतः तिला तुमची उपपत्नी होण्याचा मान दिला म्हणून ती गरोदर राहिली आणि आता ती माझ्यापेक्षा चांगली व विशेष आहे असे तिला वाटू लागले; परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो.”

परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा सारायने तिचा छळ केला म्हणून हागार पळून गेली.

हागारेचा मुलगा

शूर गांवाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार एका परमेश्वराच्या देवदूताला आढळलीं. देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?”

हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”

परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “साराय तुझी मालकीण आहे, तू तिच्याकडे घरी परत जा आणि तिच्या आज्ञेत राहा.” 10 परमेश्वराचा दूत आणखी म्हणाला, “तुझ्यापासून इतकी संतती होईल की ती मोजणे शक्य होणार नाहीं.”

11 परमेश्वराचा दूत पुढे आणखी म्हणाला,

“तू आता गरोदर आहेस
    आणि तुला मुलगा होईल
त्याचे नांव तू इश्माएल म्हणजे
    ‘परमेश्वर एकतो’ असे ठेव कारण प्रभूने तुझ्या दु:खविषयी ऐकले आहे; (तो तुझे सहाय्य करील.)
12 इश्माएल जंगली गाढवासारखा रानटी
    आणि स्वतंत्र असेल.
तो सर्वाविरुद्द व सर्व त्या विरुद्ध होतील;
    तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
आपल्या भावांच्या जवळ तळ देत फिरेल,
    परंतु तो त्यांच्या विरुद्व असेल.”

13 परमेश्वर हागारेशी बोलला; हागारेने देवासाठी नवे नाव वापरायला सुरवात केली. ती म्हणाली, "तू मला पाहणारा देव आहेस, कारण मला समजते की या ठिकाणीही देव मला भेटतो व माझी काळजी करतो.” 14 तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई [a] असे नांव पडले; ती विहीर कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.

15 हागारेला अब्रामापासून मुलगा झाला; अब्रामाने त्याचे नाव इश्माएल ठेवले. 16 त्या वेळी अब्राम शह्यांशी वर्षांचा होता.

सुंता-कराराची खूण

17 अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला परमेश्वर म्हणाला, “मी सर्वशक्तिमान देव आहे; माझ्यासाठी पुढील प्रमाणे गोष्टी कर: माझ्या आज्ञा पाळ, आणि योग्य मार्गाने चाल व सात्विकतेने राहा. तू असे करशील तर मी आपणामध्ये एक करार करीन; मी तुला अगणित पटीत वाढवीन असे अभिवचन देतो.”

मग अब्रामाने देवाला लवून नमन केले; देव त्याला म्हणाला, “आपल्या करारातील माझा भाग हा असा; मी तुला अनेक राष्ट्रांचा महान पिता करीन; मी तुझे नाव बदलतो; तुझे नाव अब्राम असणार नाहीं तर तुझे नाव अब्राहाम होईल; मी तुला हे नाव देत आहे कारण तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील. मी तुला भरपूर संतती देईन; तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास येतील, आणि राजे उत्पन्न होतील. आणि मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये एक करार करतो. हा करार तुझ्या वंशजानांही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहिल; मी तुझा व तुझ्या वंशजांचा देव होईन. ज्या प्रदेशामधून तू जात आहेस तो म्हणजे कनान देश मी तुला व तुझ्या वंशजाला कायमचा देईन आणि मी तुमचा देव होईन.”

आणि देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता ह्या करारतील तुझा भाग हा असा: तू व तुझ्या वंशजांनी पाळावयाचा माझा करार हा 10 की तुझ्या वंशजात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करुन घ्यावी. 11 तू हा करार पाळीत असल्याची खूण म्हणून आपली सुंता करुन घ्यावीस. 12 जन्मलेला लहान मुलगा आठ वर्षांचा होईल तेव्हा तू त्याची सुंता करावी; तुझ्या कुटुंबात जन्मलेल्या तसेच दुझ्या दासाच्या किंवा गुलामांच्या कुटुंबात जन्मलेल्या हरएक पुरुषाची सुंता करावी; 13 अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरुन कायम राहील; 14 ज्या कोणाची सुंता झाली नाही त्याला समाजातून बाहेर टाकावे; कारण त्याने माझा करार मोडला आहे.”

इसहाक-वचनाचा पुत्र

15 देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी बायको साराय हिला मी नवीन नाव देतो, तिचे नाव सारा असे होईल. 16 मी तिला आशीर्वादीत करीन; मी तिला मुलगा देईन आणि तू बाप होशील. सारा अनेक राष्ट्रांची माता होईल राष्ट्रांचे राजे तिच्या पासून निपजतील.”

17 अब्राहामाने देवाला लवून नमन केले, परंतु स्वतःशीच हसून तो म्हणाला, “मी शंभर वर्षांचा आहे; मला मुलगा होणे शक्य नाहीं; आणि सारा नव्वद वर्षांची आहे; तिला मूल होऊ शकणार नाहीं.”

18 मग अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल जगेल व तुझी सेवा करील अशी मला आशा वाटते.”

19 देव म्हणाला, “नाही, मी सांगितले की तुझी बायको सारा हिला मुलगा होईल; त्याचे नाव तू इसहाक ठेव; मी त्याच्याशी करार करीन; तो करार त्याच्या वंशजांसाठी चिरंतर असेल.

20 “तू मला इश्माएल विषयी विचारलेस ते मी ऐकले; मी त्याला आशीर्वाद देईन; त्याला भरपूर संतती होईल; बारा महान सरदारांचा तो पिता होईल; त्याचे कुटुंब म्हणजे एक मोठे राष्ट्र होईल; 21 पण मी इसहाका बरोबर माझा करार करीन, साराला मुलगा होईल तो इसहाक असेल; तो मुलगा पुढल्या वर्षी याचवेळी जन्मेल.”

22 देवाचे अब्राहामाशी बोलणे संपल्यावर देव अब्राहामाला सोडून वर (स्वर्गात) गेला, व अब्राहाम तेथे एकटाच राहीला; 23 तेव्हा अब्राहामाने आपला मुलगा इश्माएल व आपल्या घरी जन्मलेल्या गुलामांना व मोल देऊन विकत घेतलेल्या मुलानां एकत्र केले, आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातले सर्वपुरुष व मुलगे यांची त्याच दिवशी सुंता करण्यात आली.

24 अब्राहाम नव्याण्णव वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली; 25 आणि त्याचा मुलगा इश्माएल तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली. 26 सगळ्या गुलामांची एकाच दिवशी सुंता झाली; 27 आणि त्याच्या घरी जन्मलेले व त्याने विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्या बरोबर सुंता झाली.

मत्तय 5:27-48

लैंगिक पापाविषयी येशूची शिकवण

27 “‘व्यभिचार करू नको’ [a] असे पूर्वी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे, 28 परंतु मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. 29 जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून दे. संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवयव गमावलेला बरा. 30 जर तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करतो, तर तो तोडून फेकून दे, कारण संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक अवयव गमावलेला बरा.

घटस्फोटाविषयी येशूची शिकवण(A)

31 “‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तर त्याने तिला घटस्फोटाची लेखी सूचना द्यावी.’ [b] असे सांगितल्याचे तुम्ही जाणता. 32 पण मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो, तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कोणी अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो.

शपथ घेण्याविषयी येशूची शिकवन

33 “जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको. जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरी कर, [c] असे सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे. 34 परंतु मी तुम्हाला सांगतो की, शपथ वाहूच नका, आकाशाची शपथ वाहू नका कारण ते देवाचे आसन आहे. 35 पृथ्वीचीही शपथ वाहू नका कारण ती त्याच्या पायाचे आसन आहे; आणि यरूशलेमाचीही शपथ वाहू नका, कारण त्या नगरीचा राजा देव आहे. 36 आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण त्याचा एखादा केसही पांढरा किंवा काळा होणे तुमच्या हाती नाही. 37 म्हणून तुमचे बोलणे ‘होय’ तर होय किंवा ‘नाही’ एवढेच असावे. त्यापेक्षा जास्त जर असेल तर ते सैतानापासून आहे.

सुडासंबंधी येशूची शिकवण(B)

38 “तुम्ही ऐकले आहे की असे सांगितले होते, ‘डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात.’ [d] 39 पण मी तुम्हांला सांगतो, जो दुष्ट आहे त्याला अडवू नका, जर कोणी तुमच्या उजव्या गालावर तुम्हांला मारील त्याच्यासमोर दुसराही गाल पुढे करा. 40 आणि जो कोणी फिर्याद करून तुमचा अंगरखा घेऊ पाहतो त्याला तुमचा झगाही द्या. 41 जर कोणी तुम्हांला सक्तीने त्याच्याबरोबर कांही अंतर घेऊन जाऊ इच्छितो तर त्याच्याबरोबर त्याच्या दुप्पट अंतर जा. 42 जो तुमच्याजवळ मागतो त्याला द्या आणि जो तुमच्याकडून उसने घेऊ इच्छितो त्याला नकार देऊ नका.

सर्वांवर प्रेम करा(C)

43 “असे सांगिलते होते की, ‘आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा [e] अणि आपल्या शत्रूचा द्वेष करा,’ असे तुम्ही ऐकले आहे. 44 पण मी तुम्हांला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रेम करा. तुमचे जे वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 45 जर तुम्ही असे कराल, तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो. 46 कारण जे तुमच्यावर प्रीति करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीति करीत असाल तर तुम्हांला प्रतिफळ मिळणार नाही. जकातदारही असेच करतात. 47 आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांशी चांगले वागत असाल तर तुम्ही इतरांपेक्षा फार चांगले आहात असे समजू नका. देवाला न मानणारे लोकही असेच करतात. 48 म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center