New Testament in a Year
देव आणि यहूदी लोक
9 मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. पवित्र आत्म्याने बोध केलेला माझा विवेक मजविषयी साक्ष देतो 2 की, मला मोठे दु:ख आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत वेदना आहेत. 3 कारण माझे भाऊ, वंशाने माझे नातेवाईक यांच्याकरिता शापित व्हावे आणि ख्रिस्तापासून मी वेगळा केलेला असावा अशी मी इच्छा करतो. 4 इस्राएली कोण आहेत? ते देवाचे निवडलेले लोक आहेत. या लोकांकडे देवाचे गौरव आणि देवाने त्यांच्याशी केलेला करार आहे. देवाने त्यांना नियमशास्त्र दिले. आणि उपासना करण्याचा योग्य मार्ग दिला. आणि देवाने त्यांना त्याचे अभिवचन दिले आहे. 5 त्यांचे पूर्वज थोर आहेत. मानवी दृष्टीने सांगताना ख्रिस्त त्यांच्यापासून आला, जो सदासर्वकाळ सर्व लोकांवर धन्यवादित देव आहे. आमेन.
6 परंतु देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही. कारण सर्व जण जे इस्त्रएलापासून आले आहेत ते खरोखरच इस्राएली आहेत असे नाही. 7 याचा अर्थ असाही नाही की, ते अब्राहामापासून आलेले आहेत, म्हणून खरोखरच ती अब्राहामाची मुले आहेत, तर देवाने म्हटल्याप्रमाणे, “इसहाकाच्या वंशातील लोकांना तुझे संतान म्हटले जाईल.” [a] 8 म्हणजे देहदृष्ट्या जन्मली ती देवाची मुले आहेत असे नाही तर वचनाच्या मुलांना संतान म्हटले आहे. 9 “नेमलेल्या वेळी मी परत येईन त्यावेळेला सारेला पुत्र होईल.” [b] आणि हे ते वचन आहे.
10 इतकेच नव्हे तर रिबेकासुद्धा एकाकडून म्हणजे आपला पूर्वज इसहाक याच्याकडून गरोदर झाली. 11 मुले जन्माला येण्यापूर्वी आणि त्यांनी काही बरे किंवा वाईट केले नव्हते, तेव्हा निवडीवरुन असणारा देवाचा पूर्वसंकल्प कायम राहावा, म्हणजे कर्मावरुन नाही तर बोलावणाऱ्याच्या इच्छेवरुन घडावे. 12 म्हणून तिला सांगितले होते की, “वडील धाकट्याची सेवा करील.” [c] 13 पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “मी याकोबावर प्रेम केले आणि एसावाचा द्वेष केला.” [d]
14 तर मग आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय नाही. आहे काय? खात्रीने नाही. 15 कारण तो मोशेला म्हणाला, “ज्याच्यावर मला दया करायची त्यावर मी दया करीन, आणि ज्याच्यावर करुणा करायची त्याच्यावर करुणा करीन.” [e]
2006 by World Bible Translation Center