Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 30

इस्राएलांचे आपल्या भूमीत पुनरागमन

30 “मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील. आशीर्वाद तसेच शापही खरे होतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला इतर राष्ट्रांमध्ये हद्दपार करील. तेव्हा तुम्हांला या सर्व गोष्टींची आठवण होईल. तेव्हा तुम्ही तुमचे वंशज तुमचा देव परमेश्वर ह्याचा धावा कराल. त्याला मनःपूर्वक शरण जाल. आणि मी आज दिलेल्या सर्व आज्ञांचे नीट पालन कराल. 3-4 तेव्हा तुमचा देव परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल, आणि तो तुम्हांला मुक्त करील. तुमची त्याने जेथे जेथे पांगापांग करुन टाकली होती तेथून तो तुम्हाला परत आणील. मग ते देश किती का लांबचे असेनात! पुन्हा आपल्या पूर्वजांच्या देशात तुम्ही याल आणि तो देश तुमचा होईल. परमेश्वर तुमचे कल्याण करील आणि पूर्वजांना मिळाले त्यापेक्षा कितीतरी अधिक तुम्हांला मिळेल. पूर्वी कधी नव्हती एवढी तुमची लोकसंख्या वाढेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना आपल्याकडे वळवील आणि त्याच्यावर तुम्ही मनःपूर्वक प्रेम कराल व सुखाने जगाल.

“मग त्या संकटांनी तुमचा देव परमेश्वर तुमच्या शत्रूंना जेरीला आणील. कारण ते तुमचा द्वेष करुन तुम्हाला अडचणीत आणायचा प्रयत्न करतील. आणि तुम्ही पुन्हा परमेश्वराचे ऐकाल. आज मी देत असलेल्या सर्व आज्ञा तुम्ही पाळाल. मी तुम्हाला सर्व कार्यात यश देईल. त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर संतती होईल. गायांना भरपूर वासरे होतील. शेतात भरघोसपीक येईल. तुमचा देव परमेश्वर तुमचे भले करील. तुमच्या पूर्वजांप्रमाणेच तुमचे कल्याण करण्यात त्याला आनंद वाटेल. 10 पण तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवले पाहिजे. नियमशास्त्रातील ग्रंथात सांगितलेल्या आज्ञा व नियम यांचे कसोशीने पालन केले पाहिजे. संपूर्ण अंतःकरणाने व संपूर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याला अनुसरले पाहिजे. तर तुमचे कल्याण होईल.

जीवन की मरण

11 “जी आज्ञा मी आता तुम्हांला देत आहे ती पाळायला फारशी अवघड नाही. ती तुमच्या आवाक्याबाहेर नाही. 12 ती काही स्वर्गात नाही, की आम्ही ती पाळावी म्हणून कोण स्वर्गात जाऊन ती आमच्यापर्यंत आणील व आम्हांला ऐकवील? असे तुम्हांला म्हणावे लागणार नाही. 13 ती समुद्रापलीकडे नाही. ‘आम्ही ती पाळावी म्हणून कोण समुद्र पार करुन जाईल व तेथून आणून आम्हांला ऐकवील?’ असे म्हणावे लागणार नाही. 14 हे वचन तर अगदी तुमच्याजवळ आहे. ते तुमच्याच मुखी आणि मनी वसत आहे. म्हणून तुम्हांला ते पाळता येईल.

15 “आज मी तुमच्यापुढे जीवन आणि मृत्यू, चांगले आणि वाईट हे पर्याय ठेवले आहेत. 16 तुमच्या परमेश्वर देवावर प्रेम करा, त्याच्या मार्गाने जा व त्याच्या आज्ञा, नियम पाळा अशी माझी तुम्हांला आज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जो प्रदेश आपलासा करायला जात आहात तेथे दीर्घकाळ राहाल, तुमच्या देशाची भरभराट होईल, तुम्हांला तुमचा देव परमेश्वर ह्याचे आशीर्वाद मिळतील. 17 पण तुम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवलीत, त्याचे ऐकले नाहीत, इतर दैवतांचे भजनपूजन केलेत तर 18 मात्र तुमचा नाश ठरलेलाच हे मी तुम्हांला बजावून सांगतो. यार्देन नदी पलीकडच्या प्रदेशात मग तुम्ही फार काळ राहणार नाही.

19 “आज स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने मी तुम्हाला जीवन आणि मृत्यू या दोहोतून एकाची निवड करायला सांगत आहे. जीवनाचा पर्याय स्वीकारलात तर आशीर्वाद मिळेल. दुसऱ्याची निवड केलीत तर शाप मिळेल. तेव्हा जीवनाची निवड करा म्हणजे तुम्ही व तुमची मुलेबाळे जिवंत राहातील. 20 तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा. त्याच्या आज्ञा पाळा. त्याला सोडू नका. कारण परमेश्वर म्हणजेच जीवन. तसे केलेत तर अब्राहाम, इसहाक, व याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे परमेश्वर तुम्हांला त्या प्रदेशात दीर्घायुष्य देईल.”

स्तोत्रसंहिता 119:73-96

योद

73 परमेश्वरा, तूच मला निर्माण केलेस
    आणि तू मला तुझ्या हाताचा आधार देतोस.
    तुझ्या आज्ञा शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मला मदत कर.
74 परमेश्वरा, तुझे भक्त मला पाहातात आणि मला मान देतात.
    तू जे सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो म्हणून ते आनंदी आहेत.
75 परमेश्वरा, तुझे निर्णय योग्य असतात हे मला माहीत आहे
    आणि तू मला शिक्षा केलीस तेही योग्यच होते.
76 आता तुझ्या खाऱ्या प्रेमाने माझे सांत्वन कर.
    तू वचन दिल्याप्रमाणे माझे सांत्वन कर.
77 परमेश्वरा, माझे सांत्वन कर आणि मला जगू दे.
    मला तुझी शिकवण मनापासून आवडते.
78 जे लोक स्वत:ला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याविषयी खोटं सांगितलं त्या लोकांना आता लाज वाटेल अशी मी आशा करतो.
    परमेश्वरा, मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
79 तुझे भक्त माझ्याकडे परत येतील अशी मी आशा करतो.
    म्हणजे मग ते तुझ्या कराराचा अभ्यास करु शकतील.
80 परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञा पूर्णपणे पाळू दे.
    म्हणजे मला लाज वाटणार नाही.

काफ

81 परमेश्वरा, तू माझा उध्दा्र करशील म्हणून वाट बघता बघता मी आता मरुन जाणार आहे.
    पण परमेश्वरा, तू जे सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
82 तू ज्या गोष्टींचे वचन दिले होतेस त्या शोधता शोधता माझे डोळे अगदी थकून गेले आहेत.
    परमेश्वरा, तू कधी माझे सांत्वन करणार आहेस?
83 मी जरी उकिरड्यावरच्या द्राक्षारसाच्या बुधलीसारखा झालो असलो
    तरी मी तुझे नियम विसरणार नाही.
84 मी किती काळ जगणार आहे?
    परमेश्वरा, जे लोक मला तुरुंगात माझा छळ करतात.
    त्यांना तू कधी शिक्षा करणार आहेस?
85 काही गर्विष्ठ लोकांनी खोटे बोलून माझ्या शरीरात सुरा खुपसला
    आणि ते तुझ्या शिकवणी विरुध्द आहे.
86 परमेश्वरा, लोक तुझ्या सगळ्या आज्ञांवर विश्वास ठेवू शकतात.
    माझ्यावर खटला भरण्याची चूक त्यांनी केली.
    मला मदत कर.
87 त्या लोकांनी जवळ जवळ माझा सर्वनाश केला.
    पण मी तुझ्या आज्ञा पाळणे बंद केले नाही.
88 परमेश्वरा, मला तुझे खरे प्रेम दाखव आणि मला जगू दे.
    तू जे सांगशील ते मी करेन.

लामेद

89 परमेश्वरा, तुझा शब्द सदैव चालू असतो.
    तुझा शब्द स्वर्गात सदैव चालू असतो.
90 तू सदा सर्वदा इमानदार असतोस, परमेश्वरा.
    तू पृथ्वी निर्माण केलीस आणि ती अजूनही आहे.
91 तुझ्या नियमांमुळे ती अजूनही आहे
    आणि ती गुलामाप्रमाणे तुझे नियम पाळते.
92 जर तुझी शिकवण मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटली नसती
    तर माझ्या दु:खाने माझा सर्वनाश झाला असता.
93 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा कधीच
    विसरणार नाही कारण त्यांनी मला जगू दिले.
94 परमेश्वरा, मी तुझा आहे म्हणून माझा उध्दार कर.
    का? कारण तुझ्या आज्ञा पाळण्याची मी शिकस्त करतो.
95 दुष्टांनी माझा नाश करायचा प्रयत्न केला.
    पण तुझ्या कराराने मला शहाणे बनवले.
96 तुझ्या नियमांखेरीज इतर गोष्टींना मर्यादा असतात.

यशया 57

इस्राएल देवाला अनुसरत नाही

57 सर्व सज्जन माणसे नष्ट झाली.
    ह्याची कोणी साधी दखलही घेतली नाही.
सज्जन लोक एकत्र जमले
    पण का ते त्यांना कळत नाही.

तेव्हा संकटापासून वाचविण्यासाठी सज्जनांना दूर नेले गेले
    हे कोणालाही समजले नाही.
पण शांती येईल, लोक स्वतःच्या खाटल्यावर विश्रांती घेतील.
    आणि देवाच्या इच्छेप्रमाणे ते जीवन जगतील.

“चेटकिणीच्या मुलांनो, इकडे या.
    तुमच्या वडिलांनी व्यभिचार केला.
त्यामुळे ते अपराधी आहेत.
    तुमची आई देहविक्रय करते.
    तुम्ही इकडे या.
तुम्ही दुष्ट आणि खोटारडी मुले आहात.
    तुम्ही माझी चेष्टा करता.
तुम्ही मला वेडावून दाखविता.
    तुम्ही मला जीभ काढून दाखविता.
तुम्हाला प्रत्येकाला हिरव्या झाडाखाली फक्त खोट्या
    देवांची पूजा करायची आहे.
प्रत्येक झऱ्याकाठी तुम्ही मुले ठार मारता
    आणि खडकाळ प्रदेशात त्यांचे बळी देता.
नदीतल्या गुळगुळीत गोट्यांची पूजा करायला तुम्हाला आवडते.
    त्यांची पूजा करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर मद्य ओतता, त्यांना बळी अर्पण करता.
पण तुम्हाला त्या दगडांशिवाय काही मिळत नाही.
    ह्यामुळे मला आनंद होतो असे तुम्हाला वाटते का? नाही.
मला ह्यामुळे अजिबात आनंद होत नाही.
    प्रत्येक टेकडीवर व उंच डोंगरावर तुम्ही तुमचे अंथरूण तयार करता. [a]
तुम्ही ह्या ठिकाणी जमता
    आणि बळी अर्पण करता.
मग तुम्ही त्या अंथरूणात शिरता आणि त्या खोट्या देवांवर प्रेम करता.
    अशाप्रकारे वागणे हे माझ्याविरूध्द् आहे.
असे वागून तुम्ही पापे करता.
    तुम्ही त्या देवांवर प्रेम करता.
त्यांची नग्न शरीरे पाहायला तुम्हाला आवडते.
    प्रथम तुम्ही माझ्याबरोबर होता.
पण त्यांच्यासाठी तुम्ही मला सोडले.
    माझी आठवण तुम्हाला करून देणाऱ्या वस्तू तुम्ही लपवून ठेवता.
तुम्ही अशा वस्तू दारामागे वा दाराच्या खांबामागे लपवून ठेवता
    व मग त्या खोट्या देवांकडे जाऊन त्यांच्याबरोबर करार करता.
तुम्ही मोलेखला चांगले दिसावे म्हणून तेले
    आणि अत्तरे वापरता.
तुम्ही तुमचे दूत अती दूरच्या देशांत पाठविले.
    हे तुमचे कृत्य तुम्हाला अधोलोकात पोहोचवील.
10 ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली.
    पण तुम्ही कधीच दमला नाहीत.
तुम्हाला या गोष्टींमुळे आनंद मिळत असल्याने
    तुम्हाला नवीन शक्ती प्राप्त झाली.
11 तुम्हाला माझी आठवण झाली नाही.
    तुम्ही माझी दखलही घेतली नाही.
मग तुम्ही कोणाची काळजी करीत होता?
    तुम्ही कोणाला भीत होता?
    तुम्ही खोटे का बोललात?
पाहा! मी बराच वेळ गप्प बसलो
    आणि तुम्ही माझा मान ठेवला नाहीत.
12 मी तुमच्या ‘चांगुलपणाबद्दल’ आणि सर्व ‘धार्मिक’ कृत्यांबद्दल सांगू शकलो असतो
    पण त्या गोष्टीत काही अर्थ नाही.
13 जेव्हा तुम्हाला मदतीची जरूर असते,
    तेव्हा तुम्ही तुमच्याभोवती जमविलेल्या खोट्या
    देवांची करूणा भाकता.
पण मी तुम्हाला सांगतो की वाऱ्याची फुंकर सुध्दा्
    त्या देवाना दूर उडवून देईल.
झंझावात त्यांना तुमच्यापासून दूर नेईल.
    पण माझ्यावर विसंबणाऱ्याला जमीन मिळेल.
    माझा पवित्र डोंगर त्याचा होईल.”

परमेश्वर त्याच्या लोकांना वाचवेल

14 रस्ता मोकळा करा! रस्ता मोकळा करा!
    माझ्या लोकांकरिता रस्ता मोकळा करा!

15 देव अती उच्च व परम थोर आहे.
    देव चिरंजीव आहे.
    त्याचे नाव पवित्र आहे.
देव म्हणतो, “मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे
    पण मी दुखी: आणि लीन यांच्याबरोबरही असतो.
मनाने नम्र असलेल्यांना
    आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.
16 मी अखंड लढाई करीत राहणार नाही.
    मी नेहमी रागावणार नाही.
मी सतत रागावलो तर माणसाचा
    आत्मा मी त्याला दिलेले जीवन-माझ्यासमोर मरून जाईल.
17 ह्या लोकांनी पापे केली म्हणून मला राग आला.
    मग मी इस्राएलला शिक्षा केली.
मी रागावलो असल्याने त्यांच्यापासून तोंड फिरविले.
    इस्राएलने मला सोडले त्याला पाहिजे त्या ठिकाणी तो गेला.
18 इस्राएल कोठे गेला ते मी पाहिले म्हणून मी त्याला बरे करीन.
    (क्षमा करीन.) मी त्याचे दु:ख हलके करीन आणि त्याला बरे वाटावे म्हणून शब्दांची फुंकर घालीन.
मग त्याला व त्याच्या लोकांना वाईट वाटणार नाही.
19 मी त्यांना ‘शांती’ हा नवा शब्द शिकवीन.
    माझ्या जवळ वा दूर असणाऱ्यांना मी शांती देईन.
    मी त्या लोकांना बरे करीन.
त्यांना क्षमा करीन.”
    परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या

20 पण पापी हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे असतात.
    ते गप्प बसत नाहीत, शांत राहत नाही.
ते रागावतात आणि खवळलेल्या
    समुद्रप्रमाणेच चिखल ढवळून काढतात.
21 माझा देव म्हणतो,
    “पाप्यांना कधी शांती मिळत नाही.”

मत्तय 5

येशू लोकांना शिकवितो(A)

येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले. म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला, मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. आणि त्याने त्यांना शिकविण्यास सरुवात केली. तो म्हणाला,

“जे आत्म्याने दीन ते धन्य,
    कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
जे शोक करतात ते धन्य,
    कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल.
जे नम्र ते धन्य,
    कारण त्यांना वचनदत्त भूमीचे वतन मिळेल.
ज्यांना नीतीने वागण्याची तहान व भूक लागली आहे ते धन्य,
    कारण ते तृप्त होतील.
जे दयाळू ते धन्य,
    कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल.
जे अंतः करणाचे शुद्ध ते धन्य
    कारण ते देवाला पाहतील.
जे शांति करणारे ते धन्य,
    कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल.
10 नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य,
    कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

11 “जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात. 12 आनंद करा आणि उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.

तुम्ही मिठासारखे तसेच प्रकाशासारखे आहात(B)

13 “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा खारट बनवता येणार नाही व ते निरूपयोगी बनेल. ते फेकून देण्याच्या लायकीचे बनेल. माणसे ते पायदळी तुडवतील.

14 “तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. 15 आणि दिवा लावून तो कोणी भांड्याखाली लपवून ठेवीत नाही. उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. 16 तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.

येशू आणि जुन्या करारातील संदर्भ

17 “मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्याचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे. 18 मी तुम्हांला सत्य तेच सांगतो की, आकाश आणि पृथ्वीचा शेवट होईपर्यंत नियमशात्रातील एका शब्दात देखील फरक होणार नाही.

19 “म्हणून प्रत्येक व्यक्तीने लहानातील लहानाने सुद्धा आज्ञा पाळावी व जर त्याने पाळली नाही व इतरांनाही तसे करण्यास शिकविले नाही तर तो स्वर्गाच्या राज्यात लहान गणला जाईल, पण जो आज्ञा पाळील व इतरांना तसे करण्यास शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल. 20 कारण मी तुम्हांस सांगतो की परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही.

रागासंबंधी येशूची शिकवण

21 “तुम्ही ऐकले असले की, फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की, ‘खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल.’ [a] 22 पण मी तुम्हांस सांगतो की, जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावाला, अरे वेड्या, असे म्हणेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.

23 “म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले, 24 तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदीपुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे.

25 “वाटेत तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी लगेच सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाकडे नेईल व न्यायाधीश अधिकाऱ्याकडे नेईल आणि अधिकारी तुला तुरुंगात टाकील. 26 मी तुला खरे सांगतो तू शेवटचा पैसा देईपर्यंत तुझी सुटका मुळीच होणार नाही.

लैंगिक पापाविषयी येशूची शिकवण

27 “‘व्यभिचार करू नको’ [b] असे पूर्वी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे, 28 परंतु मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. 29 जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून दे. संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवयव गमावलेला बरा. 30 जर तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करतो, तर तो तोडून फेकून दे, कारण संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक अवयव गमावलेला बरा.

घटस्फोटाविषयी येशूची शिकवण(C)

31 “‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तर त्याने तिला घटस्फोटाची लेखी सूचना द्यावी.’ [c] असे सांगितल्याचे तुम्ही जाणता. 32 पण मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो, तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कोणी अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो.

शपथ घेण्याविषयी येशूची शिकवन

33 “जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको. जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरी कर, [d] असे सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे. 34 परंतु मी तुम्हाला सांगतो की, शपथ वाहूच नका, आकाशाची शपथ वाहू नका कारण ते देवाचे आसन आहे. 35 पृथ्वीचीही शपथ वाहू नका कारण ती त्याच्या पायाचे आसन आहे; आणि यरूशलेमाचीही शपथ वाहू नका, कारण त्या नगरीचा राजा देव आहे. 36 आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण त्याचा एखादा केसही पांढरा किंवा काळा होणे तुमच्या हाती नाही. 37 म्हणून तुमचे बोलणे ‘होय’ तर होय किंवा ‘नाही’ एवढेच असावे. त्यापेक्षा जास्त जर असेल तर ते सैतानापासून आहे.

सुडासंबंधी येशूची शिकवण(D)

38 “तुम्ही ऐकले आहे की असे सांगितले होते, ‘डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात.’ [e] 39 पण मी तुम्हांला सांगतो, जो दुष्ट आहे त्याला अडवू नका, जर कोणी तुमच्या उजव्या गालावर तुम्हांला मारील त्याच्यासमोर दुसराही गाल पुढे करा. 40 आणि जो कोणी फिर्याद करून तुमचा अंगरखा घेऊ पाहतो त्याला तुमचा झगाही द्या. 41 जर कोणी तुम्हांला सक्तीने त्याच्याबरोबर कांही अंतर घेऊन जाऊ इच्छितो तर त्याच्याबरोबर त्याच्या दुप्पट अंतर जा. 42 जो तुमच्याजवळ मागतो त्याला द्या आणि जो तुमच्याकडून उसने घेऊ इच्छितो त्याला नकार देऊ नका.

सर्वांवर प्रेम करा(E)

43 “असे सांगिलते होते की, ‘आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा [f] अणि आपल्या शत्रूचा द्वेष करा,’ असे तुम्ही ऐकले आहे. 44 पण मी तुम्हांला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रेम करा. तुमचे जे वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 45 जर तुम्ही असे कराल, तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो. 46 कारण जे तुमच्यावर प्रीति करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीति करीत असाल तर तुम्हांला प्रतिफळ मिळणार नाही. जकातदारही असेच करतात. 47 आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांशी चांगले वागत असाल तर तुम्ही इतरांपेक्षा फार चांगले आहात असे समजू नका. देवाला न मानणारे लोकही असेच करतात. 48 म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center