M’Cheyne Bible Reading Plan
आदामाच्या वंशावळीचा हतिहास
5 आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला. 2 देवाने त्यांस नर व नारी असे उत्पन्न केले. देवाने त्यांस ज्या दिवशी उत्पन्न केले त्याच दिवशी देवाने त्यांस आशीर्वाद दिला व त्यांस “आदाम” म्हणजे मनुष्य हे नाव दिले.
3 आदाम एकशेतीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरुपाचा म्हणजे हुबेहूब त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले; 4 शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशें वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. 5 अशा रीतीने आदाम एकंदर नऊशेतीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
6 शेथ एकशेंपाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश नांवाचा मुलगा झाला. 7 अनोशच्या जन्मानंतर शेथ आठशेंसात वर्षे जगला, त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 8 शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
9 अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्याला केनान नावाचा मुलगा झाला; 10 केनान जन्मल्यानंतर अनोश आठशेंपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 11 अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
12 केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला महललेल नावाचा मुलगा झाला; 13 महललेल झाल्यावर केनान आठशेंचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 14 केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
15 महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला यारेद नावाचा मुलगा झाला; 16 यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेंतीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 17 महललेल एकंदर आठशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
18 यारेद एकशें बासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास हनोख नावाचा मुलगा झाला; 19 हनोख झाल्यावर यारेद आठशें वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 20 यारेद एकंदर नऊशे बासष्ट वर्षे जगला; त्या नंतर तो मरण पावला.
21 हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला; 22 मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशें वर्षे देवाबरोबर चालला व त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 23 हनोख एकंदर तीनशें पासष्ट वर्षे जगला; 24 एके दिवशी हनोख देवाबरोबर चालत होता; नंतर तो नाहिसा झाला कारण देवाने त्याला नेले.
25 मथुशलह एकशे सत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख नावांचा मुलगा झाला; 26 लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशेंब्याऐंशी वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 27 मथुशलह एकंदर नऊशें एकुणसत्तर वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
28 लामेख एकशें ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला एक मुलगा झाला; 29 त्याने त्याचे नाव नोहा (म्हणजे विसावा) असे ठेवले. लामेख म्हाणाला, “देवाने भूमिला शाप दिल्यामुळे आपल्याला शेतकरी म्हणून खूप काष्ट करावे लागतात; परंतु नोहा आपल्याला विसावा देईल.”
30 नोहा झाल्यावर लामेख पाचशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 31 लामेख एकंदर सातशें सत्याहत्तर वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
32 नोहा पाचशें वर्षांचा झाल्यावर त्याला शेम, हाम व याफेथ नावाचे मुलगे झाले.
येशू लोकांना शिकवितो(A)
5 येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले. म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला, मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. 2 आणि त्याने त्यांना शिकविण्यास सरुवात केली. तो म्हणाला,
3 “जे आत्म्याने दीन ते धन्य,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
4 जे शोक करतात ते धन्य,
कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल.
5 जे नम्र ते धन्य,
कारण त्यांना वचनदत्त भूमीचे वतन मिळेल.
6 ज्यांना नीतीने वागण्याची तहान व भूक लागली आहे ते धन्य,
कारण ते तृप्त होतील.
7 जे दयाळू ते धन्य,
कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल.
8 जे अंतः करणाचे शुद्ध ते धन्य
कारण ते देवाला पाहतील.
9 जे शांति करणारे ते धन्य,
कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल.
10 नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
11 “जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात. 12 आनंद करा आणि उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.
तुम्ही मिठासारखे तसेच प्रकाशासारखे आहात(B)
13 “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा खारट बनवता येणार नाही व ते निरूपयोगी बनेल. ते फेकून देण्याच्या लायकीचे बनेल. माणसे ते पायदळी तुडवतील.
14 “तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. 15 आणि दिवा लावून तो कोणी भांड्याखाली लपवून ठेवीत नाही. उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. 16 तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
येशू आणि जुन्या करारातील संदर्भ
17 “मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्याचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे. 18 मी तुम्हांला सत्य तेच सांगतो की, आकाश आणि पृथ्वीचा शेवट होईपर्यंत नियमशात्रातील एका शब्दात देखील फरक होणार नाही.
19 “म्हणून प्रत्येक व्यक्तीने लहानातील लहानाने सुद्धा आज्ञा पाळावी व जर त्याने पाळली नाही व इतरांनाही तसे करण्यास शिकविले नाही तर तो स्वर्गाच्या राज्यात लहान गणला जाईल, पण जो आज्ञा पाळील व इतरांना तसे करण्यास शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल. 20 कारण मी तुम्हांस सांगतो की परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही.
रागासंबंधी येशूची शिकवण
21 “तुम्ही ऐकले असले की, फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की, ‘खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल.’ [a] 22 पण मी तुम्हांस सांगतो की, जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावाला, अरे वेड्या, असे म्हणेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.
23 “म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले, 24 तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदीपुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे.
25 “वाटेत तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी लगेच सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाकडे नेईल व न्यायाधीश अधिकाऱ्याकडे नेईल आणि अधिकारी तुला तुरुंगात टाकील. 26 मी तुला खरे सांगतो तू शेवटचा पैसा देईपर्यंत तुझी सुटका मुळीच होणार नाही.
लैंगिक पापाविषयी येशूची शिकवण
27 “‘व्यभिचार करू नको’ [b] असे पूर्वी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे, 28 परंतु मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. 29 जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून दे. संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवयव गमावलेला बरा. 30 जर तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करतो, तर तो तोडून फेकून दे, कारण संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक अवयव गमावलेला बरा.
घटस्फोटाविषयी येशूची शिकवण(C)
31 “‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तर त्याने तिला घटस्फोटाची लेखी सूचना द्यावी.’ [c] असे सांगितल्याचे तुम्ही जाणता. 32 पण मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो, तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कोणी अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो.
शपथ घेण्याविषयी येशूची शिकवन
33 “जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको. जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरी कर, [d] असे सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे. 34 परंतु मी तुम्हाला सांगतो की, शपथ वाहूच नका, आकाशाची शपथ वाहू नका कारण ते देवाचे आसन आहे. 35 पृथ्वीचीही शपथ वाहू नका कारण ती त्याच्या पायाचे आसन आहे; आणि यरूशलेमाचीही शपथ वाहू नका, कारण त्या नगरीचा राजा देव आहे. 36 आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण त्याचा एखादा केसही पांढरा किंवा काळा होणे तुमच्या हाती नाही. 37 म्हणून तुमचे बोलणे ‘होय’ तर होय किंवा ‘नाही’ एवढेच असावे. त्यापेक्षा जास्त जर असेल तर ते सैतानापासून आहे.
सुडासंबंधी येशूची शिकवण(D)
38 “तुम्ही ऐकले आहे की असे सांगितले होते, ‘डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात.’ [e] 39 पण मी तुम्हांला सांगतो, जो दुष्ट आहे त्याला अडवू नका, जर कोणी तुमच्या उजव्या गालावर तुम्हांला मारील त्याच्यासमोर दुसराही गाल पुढे करा. 40 आणि जो कोणी फिर्याद करून तुमचा अंगरखा घेऊ पाहतो त्याला तुमचा झगाही द्या. 41 जर कोणी तुम्हांला सक्तीने त्याच्याबरोबर कांही अंतर घेऊन जाऊ इच्छितो तर त्याच्याबरोबर त्याच्या दुप्पट अंतर जा. 42 जो तुमच्याजवळ मागतो त्याला द्या आणि जो तुमच्याकडून उसने घेऊ इच्छितो त्याला नकार देऊ नका.
सर्वांवर प्रेम करा(E)
43 “असे सांगिलते होते की, ‘आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा [f] अणि आपल्या शत्रूचा द्वेष करा,’ असे तुम्ही ऐकले आहे. 44 पण मी तुम्हांला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रेम करा. तुमचे जे वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 45 जर तुम्ही असे कराल, तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो. 46 कारण जे तुमच्यावर प्रीति करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीति करीत असाल तर तुम्हांला प्रतिफळ मिळणार नाही. जकातदारही असेच करतात. 47 आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांशी चांगले वागत असाल तर तुम्ही इतरांपेक्षा फार चांगले आहात असे समजू नका. देवाला न मानणारे लोकही असेच करतात. 48 म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा.
5 त्यावेळी हाग्गय आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या हे संदेष्टे देवाच्या वतीने संदेश सांगू लागले. यहूदा व यरुशलेममधील यहूद्यांना त्यांनी उत्तेजन दिले. 2 तेव्हा शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकचा मुलगा येशूवा यांनी यरुशलेममधील मंदिराच्या कामाला सुरुवात केली, देवाच्या सर्व संदेष्ट्यांनी त्यांना याबाबतीत सहाय्य केले. 3 त्यावेळी ततनइ हा फरात नदीच्या पश्र्चिमेकडील प्रदेशाचा अधिकारी होता. तो, शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती जरुब्बाबेल, येशूवा आणि इतर जे बांधकाम करत होते त्यांच्याकडे गेले. त्यांना ततनइ व त्याच्याबरोबरच्या लोकांनी विचारले, “तुम्हाला हे मंदिर पुन्हा बांधायला परवानगी कोणी दिली? 4 हे बांधकाम करणाऱ्या माणसांची नावे काय?”
5 तरी पण यहूदी नेत्यांवर देवाची कृपादृष्टी होती. त्यामुळे राजा दारयावेशला ही खबर लेखी कळवून त्याचे उत्तर येईपर्यंत त्यांना मंदिराचे काम थांबवता आले नाही आणि बांधकाम चालूच राहिले.
6 फरात नदीच्या पश्र्चिमेकडील प्रदेशाचा अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांच्याबरोबरचे मान्यवर लोक यांनी राजा दारयावेशला जे पत्र पाठवले त्याची ही प्रत. 7 त्यात असे लिहिले होते:
राजा दारयावेशचे कुशल असो.
8 हे राजा, आम्ही यहूदाप्रांतात गेल्याचे तुम्हाला माहीत आहे. आम्ही महान परमेश्वराच्या मंदिराकडे गेलो. यहुदातील लोक मोठे दगड वापरुन हे मंदिर नव्याने बांधित आहेत. भिंतीत लांबरुंद लाकडे घालत आहेत. यहुदी लोक हे काम मोठया झपाट्याने आणि मेहनत घेऊन करत आहेत. ते झटून काम करीत असल्यामुळे लवकरच बांधकाम पुरे होईल.
9 या कामाच्या संदर्भात आम्ही तेथील वडीलधाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांना विचारले, “तुम्हाला हे मंदिराचे बांधकाम करायला कोणी परवानगी दिली?” 10 आम्ही त्यांची नावेही विचारुन घेतली. त्यांचे पुढारीपण करणाऱ्यांची नावे तुम्हाला कळावीत म्हणून आम्हाला ती टिपून ठेवायची होती.
11 त्यांनी आम्हाला पुढीलप्रमाणे उत्तर दिले:
“आम्ही आकाश आणि पृथ्वीच्या देवाचे सेवक आहोत. फार पूर्वी इस्राएलच्या एका थोर राजाने बांधून पूर्ण केलेल्या मंदिराचेच आम्ही पुन्हा बांधकाम करत आहोत. 12 आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने देवाचा कोप ओढवला. तेव्हा परमेश्वराने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाती दिले. नबुखद्नेस्सराने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकांना जबरदस्तीने कैद करुन बाबेलला नेले. 13 कोरेश बाबेलचा राजा झाल्यावर पहिल्या वर्षातच त्याने मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचा विशेष हुकूमनामा काढला. 14 तसेच, पूर्वीच्या मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे होती ती काढून बाबेलच्या खोट्या देवतेच्या देवळात ठेवली होती, ती कोरेशाने बाहेर काढली. नबुखद्नेस्सराने ती पूर्वी यरुशलेममधून काढून बाबेलच्या खोट्या देवतेच्या देवळात आणली होती. राजा कोरेशने ती शेशबस्सरच्या (म्हणजेच जरुब्बाबेलाच्या) स्वाधीन केली. त्याला कोरेशने अधिकारी म्हणून नेमले.”
15 नंतर कोरेश शेशबस्सरला (जरुब्बाबेलला) म्हणाला, “ही सोन्यारुप्याची पात्रे घे आणि यरुशलेममधील मंदिरात ठेव. मंदिर पूर्वी जिथे होते त्याचठिकाणी पुन्हा बांध”
16 तेव्हा शेशबस्सरने (जरुब्बाबेलने) यरुशलेममध्ये येऊन मंदिराचा पाया घातला तेव्हापासून आजतागायत ते काम चाललेले आहे पण अजून पूर्ण झालेले नाही.
17 तेव्हा आता हवे असल्यास राजाने अधिकृत कागदपत्रे नीट तपासून पाहावीत. यरुशलेममधील मंदिर पुन्हा बांधायची राजा कोरेशने खरोखरच आज्ञा दिली आहे का ते पडताळून पाहावे आणि या बाबतीत आपण काय ठरविले आहे ते राजाने आम्हाला कृपया लेखी कळवावे.
हनन्या आणि सप्पीरा
5 हनन्या नावाचा एक मनुष्य होता त्याच्या पत्नीचे नाव सप्पीरा होते. हनन्याने त्याच्याकडे जी काही जमीन होती ती विकली. 2 परंतु विकून आलेल्या पैशातून त्याने थोडेच पैसे प्रेषितांच्या हातात दिले, त्याने त्यातील काही पैसे गुपचूप काढून स्वतःसाठी ठेवले होते. त्याच्या पत्नीला हे माहीत होते. तिने या गोष्टीला संमति दिली होती.
3 पेत्र म्हणाला, “हनन्या, तू तुइया अंतःकरणावर सैतानाला का अधिकार चालूव देतोस? तू खोटे बोललास व पवित्र आत्म्याला फसाविण्याचा प्रयत्न केलास. तू जमीन विकलीस, पण त्यातील काही पैसे स्वतःसाठी का ठेवलेस? 4 ती जमीन विकण्यापूर्वी तुझी होती. आणि विकल्यानंतर सुद्धा ते पैसे तुला जसे पाहिजे तसे खर्च करता आले असते. अशी वाईट गोष्ट करावी असा विचार तू का केलास? तू मनुष्यांशी नाही, तर देवाशी खोटे बोललास!”
5-6 जेव्हा हनन्याने हे ऐकले तेव्हा तो खाली पडला आणि मरण पावला. काही तरुण लोकांनी त्याचे शरीर गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. ज्या प्रत्येक मनुष्याने हे ऐकले, तो अति भयभीत झाला.
7 सुमारे तीन तासांनंतर त्याची पत्नी आत आली, सप्पीरा तिच्या नवऱ्याच्या बाबतीत जे झाले ते काहीच माहीत नव्हते. 8 पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, तुमच्या शेतासाठी तुम्हांला किती पैसे मिळाले, (अमुक) इतक्याच पैशांना मिळाले काय?”
सप्पीरास उत्तर दिले, “होय, आम्हाला शेत विकून तेवढेच पैसे मिळाले.”
9 पेत्र म्हणाला, “देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहण्याचे तू व तुझ्यानवऱ्याने का ठरविले? ऐक! त्या पावलांचा आवाज ऐकतेस का? ज्या माणसांनी तुझ्या नवऱ्याला पुरले ते दाराजवळच आहेत! (तुझ्या नवऱ्याला जसे नेले) तसेच ते तुलाही नेतील.” 10 त्याच क्षणी सप्पीर त्याच्या पायाजवळ खाली पडली आणि मेली. तरुण माणसे आली, त्यांनी पाहिले की, ती मेलेली आहे. त्या माणसांनी तिला बाहेर नेले आणि तिच्या नवऱ्याजवळ पुरले. 11 सर्व विश्वासणारे आणि इतर दुसरे लोक ज्यांनी याविषयी ऐकले ते अतिशय भयभीत झाले.
देवाचे पुरावे
12 प्रेषितांनी पुष्कळसे चमत्कार व सामर्थ्यशाली गोष्टी केल्या. सर्व लोकांनी या गोष्टी पाहिल्या. आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत. 13 आणि इतर लोकांतील कोणी त्यांच्याजवळ उभे राहण्याचे धैर्य करीत नसत. परंतु सर्व प्रेषितांची स्तुति करीत; 14 आणि किती तरी लोक पुढे येऊन प्रभु येशूवर विश्वास ठेवीत. अशा रीतीने बरेच पुरुष व स्त्रिया येऊन त्यांना मिळाल्या. 15 त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला म्हणजे त्याची सावली रोगी व आजारी लोकांच्यावर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाट अगर अंथरुणावर ठेवीत असत. 16 लोक यरुशलेम सभोवतालच्या गावांगावातून येऊ लागले, आणि त्यांचे आजारी व भूतबाधा झालेले लोक यांना ते आणू लागले. तेव्हा ही सर्व माणसे बरी केली गेली.
यहूदी प्रेषितांना मना करण्याचा प्रयत्न करतात
17 प्रमुख याजक आणि त्याचे सर्व मित्र (सदूकी नावाचा एक गट) यांना फार हेवा वाट लागला. 18 त्यांनी प्रेषितांना धरले आणि तुरुंगात टाकले. 19 पण रात्रीच्या वेळी देवाच्या दूताने तुरुंगाचा दरवाजा उघडला. देवदूताने प्रेषितांना बाहेर आणले आणि म्हणाला, 20 “जा आणि मंदिरात उभे राहा. येशू ख्रिस्तामधील जे नवीन जीवन आहे त्याविषयी लोकांना सांगा.” 21 जेव्हा प्रेषितांनी हे ऐकले, त्यांनी ती आज्ञा पाळली आणि मंदिरात गेले. ती पहाटेची वेळ होती, आणि तेथे लोकांना शिक्षण देऊ लागले, प्रमुख याजक व त्याचे मित्र सभास्थानात आले.
त्यांनी यहूदी पुढाऱ्यांची सभा आणि सर्व वडीलजन, जे यहूदी लोकांचे नेते होते यांची एकत्र सभा बोलाविली. मग प्रेषितांना तेथे घेऊन येण्यासाठी काही जणांना तुरुंगात पाठविले. 22 जेव्हा शिपाई तुरुंगामध्ये त्यांना पाहावयास गेले, तेव्हा त्यांना आतमध्ये प्रेषित आढळले नाहीत. म्हणून त्यांनी परत जाऊन यहूदी पुढाऱ्यांना त्याविषयी सांगितले. 23 शिपाई म्हणाले, “तुरुंगाची दारे बंद केलेली व त्यांसा कुलुप लावलेले होते. तसेच पहारेकरीही दारावर पहारा देत आहेत. परंतु आम्ही जेव्हा दार उघडले, तेव्हा आतमध्ये कोणीच आढळले नाही!” 24 मंदिराच्या पहारेकऱ्यांच्या सरदाराने आणि प्रमुख याजकाने हे शब्द ऐकले. ते गोंधळात पडले, व यानंतर काय होईल याबद्दल बुचकळ्यात पडले.
25 नंतर कोणी एक आला आणि म्हणाला, “ज्या लोकांना तुम्ही तुरुंगात टाकले ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत!” 26 तेव्हा कप्तान व त्याचे लोक बाहेर गेले व प्रेषितांना पुन्हा घेऊन आले. त्यावेळी त्यांनी बळाचा वापर केला नाही, कारण त्यांना लोकांचे भय वाटले व असे वाटले की लोक कदाचित त्यांना दगडमार करतील.
27 त्यांनी प्रेषितांना आणून सभेपुढे उभे केले. प्रमुख याजकाने प्रेषितांना प्रश्न विचारले. 28 तो म्हणाला, “आम्ही तुम्हांला (येशू) या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती. आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणुकीचा प्रसार सर्व यरुशलेमभर केलात. आणि या मनुष्याच्या (येशूच्या) मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात.”
29 पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्हांला देवाची आज्ञा पाळलीच पाहिजे, तुमची नाही! 30 तुम्ही येशूला मारले. तुम्ही त्याला वधस्तंभावर खिळले. परंतु त्याच देवाने, जो आमच्या वाडवडिलांचा (पूर्वजांचा) देव होता, त्याने येशूला मरणातून उठविले! 31 देवाने त्याला उठविले व आपल्या उजवीकडे बसाविले. देवाने येशूला राजपुत्र व उद्धारकर्ता म्हणून उजवीकडे बसविले. देवाने हे यासाठी केले की, यहूदी लोकांनी त्यांची ह्रदये व जीविते बदलावीत. ह्या गोष्टी घडताना आम्ही पाहिल्या. 32 पवित्र आत्मासुद्धा हे खरे आहे हे दर्शवितो. जे लोक देवाची आज्ञा पाळतात त्या सर्वांना त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे.”
33 जेव्हा यहूदी सभेच्या पुढाऱ्यांनी हे शब्द ऐकले, तेव्हा ते खूप रागावले. त्यांनी प्रेषितांना जिवे मारण्यासंबधी विचार सुरु केला. 34 सभेमध्ये गमलीएल नावाचा एक परुशी उभा राहिला. नियमशास्त्राचा तो शिक्षक होता. आणि सर्व लोक त्याला मान देत असत, त्याने लोकांना सांगितले की, काही वेळासाठी प्रेषितांना बाहेर पाठवा. 35 नंतर तो त्यांना म्हणाला, “इस्राएलच्या लोकांनो, या लोकांना जे काही करण्याचा विचार तुम्ही करीत आहात त्याबद्दल सावधगिरी बाळगा. 36 काही काळापूर्वी थुदासचा जन्म झाला. आपण कोणी थोर असल्याचा दावा त्याने केला. सुमारे चारशे जण त्याला जाऊन मिळाले, पण त्याला ठार मारण्यात आले त्याचवेळी त्याचे अनुयायीही पांगले, ते काहीच करु शकले नाहीत. 37 नंतर, गालीलातून यहूदा नावाचा माणूस आला. ती वेळ जनगणनेची होती. त्यानेही काही अनुयायांचे नेतृत्व केले. त्यालासुद्धा मारण्यात आले. व त्याचे सर्व अनुयायी पांगले व पळून गेले. 38 म्हणून आता मी तुम्हांला सांगतो: या लोकांपासून दूर राहा. त्यांना एकटे सोडा. जर त्यांच्या योजना मनुष्यांच्या असतील तर ते अपयशी ठरतील. 39 पण जर हे देवापासून असतील तर तुम्ही त्यांना रोखू शकणार नाही. उलट तुम्ही देवाविरुद्ध लढत आहात असे होईल!”
यहूदी लोकांनी गमलीएलचा सल्ला मानला. 40 त्यांनी पेषितांना पुन्हा बोलाविले, त्यांना फटके मारले. आणि येशूच्या नावाने पुन्हा त्यांनी काही बोलू नये असा आदेश दिला. आणि त्यांनी प्रेषितांना सोडून दिले. 41 प्रेषित सभा सोडून गेले. येशूच्या नावासाठी आपण निंदानालस्ती सहन करण्याच्या योग्यतेचे ठरलो यामुळे ते आंनदी झाले. 42 आणि नंतर प्रेषितांनी लोकांना शिकविण्याचे सोडले नाही. प्रेषित लोकांना सातत्याने शुभवार्ता सांगत राहिले. येशू हा प्रभु आहे, हे ते दररोज मंदिरात व लोकांच्या घरांमध्ये सांगत असत.
2006 by World Bible Translation Center