Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the GW. Switch to the GW to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 16-17

वल्हांडण सण

16 “अबीब महिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण हा सण साजरा करा. कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला रात्रीच्या वेळी मिसरमधून बाहेर काढले. परमेश्वराने आपल्या निवासासाठी निवडलेल्या जागी जा. तेथे वल्हांडणाचा यज्ञपशू परमेश्वराला अर्पण करा. शेळ्या मेंढ्या किंवा गाय बैल यापैकी हा पशू असावा. त्यावेळी खमीर घातलेली भाकर खाऊ नका. बेखमीर भाकरी तुम्ही सात दिवस खावी. ही भाकरी म्हणजे ‘संकटाची भाकर’ होय. त्याने तुम्हाला मिसरमधील संकटांची जन्मभर आठवण राहील. किती गडबडीने तुम्हाला तो देश सोडावा लागला होता! त्याचा तुम्ही आमरण विसर पडू देऊ नका. तेव्हा या सात दिवसात देशभर कुणाच्याही घरी खमीर असता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बळी द्याल तो उजाडायाच्या आत खाऊन संपवून टाका.

“वल्हांडणाच्या पशूचे यज्ञार्पण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला वस्तीसाठी दिलेल्या कोणत्याही नगराच्या आत करु नका. देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सुर्य अस्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हाला बाहेर काढल्याप्रित्यर्थ हा सण आहे. परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच हा यज्ञपशू शिजवून खा. मग सकाळी आपापल्या घरी परत जा. सहा दिवस खमीर विरहीत भाकर खा. सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करु नये. या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याप्रित्यर्थ पवित्र मेळा भरवावा.

सप्ताहांचा (किंवा पन्नासाव्या दिवसाचा) सण

“पीक काढल्यापासून सात आठवडे मोजा. 10 मग, आपल्या इच्छेनुसार एखादी विशेष भेटवस्तू आणून आपला देव परमेश्वर याच्यासाठी सप्ताहांचा सण साजरा करा. आपल्याला परमेश्वर देवाच्या कृपेने किती मिळाले याचा अंदाज घेऊन किती द्यायचे ते ठरवा. 11 परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या विशेष निवासस्थानी जा. तेथे तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात सहकुटुंब सहपरिवार आनंदात वेळ घालवा. आपली मुलेबाळे, दास, लेवी गावातील पांथस्थ, अनाथ, विधवा या सर्वांना बरोबर घ्या. 12 तुम्ही मिसरमध्ये दास होता हे विसरु नका. तेव्हा हे नियम न चुकता पाळा.

मंडपाचा सण

13 “खळयातील आणि द्राक्षकुंडांमधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसांनी मंडपाचा सण साजरा करा. 14 हा सणही मुलंबाळं, नोकरचाकर, लेवी, शहरातील वाटसरु, अनाथ, विधवा, यांच्यासह साजरा करा. 15 तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या निवासस्थानी, त्याच्या सन्मानार्थ सात दिवस हा सण साजरा करा. तुमच्या पिकांवर आणि तुम्ही घेतलेल्या कष्टांवर तुमचा देव परमेश्वर याची कृपादृष्टि आहे. तेव्हा आनंदात राहा.

16 “तुमचा देव परमेश्वर याच्या पवित्र निवासस्थानी तुम्हातील सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा एकत्र जमले पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मंडपाचा सण हे ते तीन प्रसंग होत. येताना प्रत्येकाने भेटवस्तू आणली पाहिजे. 17 प्रत्येकाने यथाशक्ति दिले पाहिजे परमेश्वराने आपल्याला काय दिले याचा विचार करुन आपण काय द्यायचे ते ठरवावे.

लोकांसाठी न्यायाधीश व अधिकारी

18 “तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेल्या नगरांमध्ये आपापल्या वंशाप्रमाणे न्यायाधीश व अधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात. या व्यक्तींनी नीतीने न्यायदान करावे. 19 त्यांनी नेहमी नि:पक्षपाती असले पाहिजे. त्यांनी लाच घेऊन न्यायनिवाडा करता कामा नये. पैसे पाहून भल्या भल्यांचेही डोळे फिरतात व ते निरपराध लोकांच्या म्हणण्याचा विपर्यास करतात. 20 चांगुलपणा आणि नि:पक्षपातीपणा यांचीच नेहमी कास धरावी. म्हणजे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेला हा प्रदेश संपादन करुन तेथे तुम्ही सुखाने राहाल.

परमेश्वर मूर्तीचा तिरस्कार करतो

21 “जेव्हा तुमचा देव परमेश्वर यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्याशेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारु नका. 22 कोणत्याही खोट्या दैवतांसाठी स्तंभ उभारु नका. तुमचा देव परमेश्वर ह्याला अशा गोष्टींचा तिरस्कार वाटतो.

यज्ञपशू निर्दोष असावा

17 “यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरु यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा तिटकारा आहे.

मूर्तिपूजकांना शासन

“तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या प्रदेशात राहायला लागल्यावर एखाद्या नगरात दृष्कृत्ये घडल्याचे तुमच्या कानावर येईल. परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या बाईच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळेल. परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध त्याने इतर दैवतांची पूजा केली, किंवा सूर्य, चंद्र, तारे यांना देवपण दिले अशा स्वरुपाचे ते असेल. मी जी परमेश्वराची आज्ञा तुम्हाला दिली त्याच्या हे विरुद्ध आहे. अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची बालंबाल खात्री झाली पाहिजे. हे खरे असल्याचे सिद्ध झाले तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मारा. त्या व्यक्तिच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका. प्रथम साक्षीदारांनी मारायला हात उचलावा, मग इतरांनी मारावे. अशाप्रकारे आपल्यामधून अमंगळपणा निपटून काढावा.

अवघड न्यायनिवाडे

“एखादे खुनाचे प्रकरण, दोन व्यक्तीमधील वाद, किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायानिवाडा करणे तुम्हाला आवाक्या बाहेरचे वाटेल. या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल. अशा वेळी परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे. तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्या. या समस्येची सोडवणूक ते करतील. 10 परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी ते आपला निर्णय तुम्हाला सांगतील. त्यांचे म्हणणे ऐकून तसे करा. ते जे जे करायला सांगतील ते ते सर्व कुचराई न करता अंमलात आणा. 11 त्यांचा निवाडा शिरोधार्य मानून त्यांच्या सूचनांमध्ये काडीमात्र बदल न करता त्यांच्या सूचना पाळा.

12 “जो याजकाचे व न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्याला चांगले शासन करा. त्याला मृत्युदंड द्या. इस्राएलमधून या नीच माणसाचे उच्चाटन करा. 13 हे ऐकून इतरांना दहशत बसेल व घाबरुन ते पुढे उन्मत्तपणा करणार नाहीत.

राजाची निवड

14 “तुमचा देव परमेश्वर देत असलेल्या प्रदेशात तुम्ही जात आहात. त्याचा ताबा घेऊन तुम्ही तेथे राहाल. मग इतर राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा असे तुम्हाला वाटेल. 15 तेव्हा परमेश्वराने निवड केलेल्या व्यक्तिची तुम्ही राजा म्हणून नेमणूक करा. राजा हा तुमच्यापैंकीच असला पाहिजे, परदेशी असता कामा नये. 16 त्याने स्वतःसाठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, ‘तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये,’ असे परमेश्वराने बजावले आहे. 17 तसेच त्याला बऱ्याच बायका असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.

18 “राज्य करायला लागल्यावर त्याने स्वतःसाठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्या जवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे. 19 नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने परमेश्वर देवाचा आदर ठेवावा. 20 म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्याला स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो व त्याचे वंशज इस्राएलांवर दीर्घकाळ राज्य करतील.

लूक 9:7-27

हेरोदाचा येशूविषयी गोंधळ होतो(A)

जेव्हा हेरोद राज्यपालाने जे सर्व काही घडत होते त्याविषयी ऐकले, तेव्हा तो घोटाळ्यात पडला. कारण काही जणांनी असे म्हटले की, “योहान मेलेल्यांतून उठविला गेला आहे.” इतर काही जण असे म्हणत होते की, “एलीया पुन्हा आला आहे.” इतर काही जणांनी असे सांगितले की, “फार पूर्वीच्या संदेष्ट्यांपैकी एक जण मेलेल्यांतून पुन्हा जिवंत झाला आहे.”

परंतु हेरोद म्हणाला, “मी योहानाचा शिरच्छेद केला आहे, मग ज्याच्याविषयी अशा गोष्टी ऐकत आहे, तो कोण आहे?” म्हणून हेरोदाने येशूला पाहण्याचा प्रयत्न केला.

येशू पाच हजारांपेक्षा अधिक लोकांना जेवू घालतो(B)

10 शिष्य परत आले तेव्हा त्यांनी येशूला आपण केलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. नंतर येशू त्यांना घेऊन बेथसैदा नावाच्या नगरास गुप्तपणे गेला. 11 पण लोकसमुदायाला हे कळले व ते त्याच्यामागे गेले. त्याने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना स्वर्गराज्याविषयी सांगितले. ज्यांना बरे होण्याची आवश्यकता होती, त्यांना त्याने बरे केले.

12 दिवस मावळत असता प्रेषित त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “लोकांना जाऊ द्या. म्हणजे ते आजूबाजूच्या शेतात आणि खेड्यात जातील व त्यांना खावयाला व राहण्यास मिळण्याची शक्यता आहे का ते पाहतील. कारण आपण दूर ठिकाणी आहोत.”

13 पण तो त्यांना म्हणाला, “तुम्ही त्यांना काही खावयास द्या.”

ते म्हणाले, “आम्ही जाऊन या सर्व लोकांसाठी अन्न विकत घ्यावे असे तुम्हांला वाटते काय? आमच्याजवळ फक्त पाच भाकरी आणि दोन मासे याशिवाय काही नाही.” 14 तेथे ते सुमारे पाच हजार पुरुष होते.

परंतु तो आपल्या शिष्यांस म्हणाला, “त्यांना सुमारे पन्नासाच्या गटाने बसवा.”

15 त्यांनी तसे केले व सर्वांना खाली बसविले. 16 नंतर त्याने पाच भाकरी व दोन मासे घेतले, मग स्वर्गाकडे बघून त्याने भाकरी व मासे याबद्दल देवाचे उपकार मानले. त्याचे तुकडे केले. नंतर लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिले. 17 लोक जेवले व सर्व तृप्त झाले. आणि जेवून झाल्यानंतर उरलेले गोळा करण्यात आले तेव्हा त्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरल्या.

येशू हा ख्रिस्त आहे(C)

18 मग असे झाले की एकदा येशू एकटाच प्रार्थना करीत असताना, त्याचे शिष्य त्याच्याबरोबर होते. त्याने त्यांना विचारले, “मी कोण आहे याबद्दल लोक काय म्हणतात?”

19 ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणारा योहान, इतर काही एलीया आणि काहीजण म्हणतात की, फार पूर्वी होऊन गेलेल्या संदेष्ट्यांपैकी कोणी तरी उठला आहे.”

20 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”

पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.”

21 तेव्हा ताकीद देऊन त्याने त्यांना सूचना दिली की, हे कोणालाही सांगू नका.

येशू म्हणतो की त्याने मेलेच पाहिजे(D)

22 येशू म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला पुष्कळ दु:ख सोसणे आवश्यक आहे, आणि वडिलांनी, मुख्य याजकांनी, नियमशास्त्राचे शिक्षक यांनी नाकारावे व त्यांच्याकडून मारले जावे व पुन्हा तिसऱ्या दिवशी उठावे हे आवश्यक आहे.”

23 नंतर तो त्या सर्वांना म्हणाला, “जर कोणा व्यक्तीला माझ्या मागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारले पाहिजे. व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे आले पाहिजे. 24 जो कोणी स्वतःचा जीव वाचवू पाहतो, तो त्याला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी जिवाला मुकेल तो त्याला बाचवील. 25 कोणी सर्व जग मिळविले परंतु स्वतःचा नाश करुन घेतला किंवा स्वतःला गमाविले तर त्याला काय लाभ? 26 जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या वैभवाने, पित्याच्या आणि पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा तोही त्याची लाज धरील. 27 परंतु मी तुम्हांला खरे सांगतो येथे उभे राहिलेल्यांमध्ये असे काही आहेत की, स्वार्गाचे राज्य पाहिल्याशिवाय त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”

स्तोत्रसंहिता 72

शलमोनासाठी स्तोत्र

72 देवा, तू राजाला तुझ्यासारखे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर.
    आणि राजाच्या मुलाला तुझ्या चांगुलपणा विषयी शिकायला मदत कर.
तुझ्या लोकांना चांगला न्याय मिळावा म्हणून राजाला मदत कर
    तुझ्या गरीब लोकांसाठी चांगले आणि शहाणपणाचे निर्णय घेण्यासाठी त्याला मदत कर.
पृथ्वीवर सगळीकडे शांती,
    आणि न्याय नांदू दे.
राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे.
    त्याला असहाय लोकांना मदत करु दे.
    त्यांना जे त्रास देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करु दे.
जो वर सूर्य चमकतो आहे आणि चंद्र आकाशात आहे तोवर लोकांनी राजाला मान द्यावा आणि त्याची भीती बाळगावी असे मला वाटते.
    लोक त्याला सदैव मान देतील आणि त्याची भीती बाळगतील अशी आशा मी करतो.
राजाला शेतात पडणाऱ्या पावसासारखे असू दे,
    त्याला पृथ्वीवर पडणाऱ्या पर्जन्यासारखे असू दे.
तो जो पर्यंत राजा आहे तो पर्यंत चांगुलपणा उमलू दे.
    जो पर्यंत चंद्र आहे तो पर्यंत शांती नांदू दे.
त्याचे राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत
    आणि युफ्रेटस नदीपासून पृथ्वीच्या दुसऱ्या टोकापर्यत वाढू दे. [a]
वाळवंटात राहाणाऱ्या सर्व लोकांना त्याच्या समोर मुजरे करु दे.
    त्याच्या सर्व शत्रूंना त्याच्यापुढे घाणीत तोंड घालून मुजरे करु दे.
10 तार्शीशच्या आणि दूरदूरच्या देशांच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणू दे.
    शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी खंडणी आणू दे.
11 सगळ्या राजांना आमच्या राजासमोर मुजरे करु दे
    सगळी राष्ट्रे त्याच्या सेवेत राहू दे.
12 आमचा राजा असहाय्याला मदत करतो.
    आमचा राजा गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करतो.
13 गरीब आणि असहाय्य लोक त्याच्यावर अवलंबून असतात.
    राजा त्यांना जिवंत ठेवतो.
14 जे दुष्ट लोक त्यांना दु:ख द्यायचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून राजा त्यांना वाचवतो.
    राज्याला त्या गरीबांचे आयुष्य खूप मोलाचे वाटते.
15 राजा चिरायु होवो!
    आणि त्याला शबाकडून सोने मिळू दे.
राज्यासाठी नेहमी प्रार्थना करा,
    त्याला रोज आशीर्वाद द्या.
16 शेतात खूप धान्य पिकू द्या,
    डोंगरावरही खूप धान्य उगवू द्या.
शेती लबानोन मधील शेतीसारखी सुपीक होऊ द्या
    आणि शहरे गवताने भरलेल्या शेतासारखी माणसांनी भरु द्या.
17 राजाला सदैव प्रसिध्द होऊ द्या.
    जो पर्यंत सूर्य तळपतो आहे तो पर्यत लोकांना त्याची आठवण राहू द्या.
त्याला लोकांना आशीर्वाद देऊ द्या
    आणि लोकांना त्याला आशीर्वाद देऊ द्या.

18 परमेश्वर देवाची, इस्राएलाच्या देवाची स्तुती करा.
    फक्त देवच अशा अद्भूत गोष्टी करु शकतो.
19 त्याच्या गौरवपूर्ण नावाची सदैव स्तुती करा.
    त्याच्या गौरवाने सारे जग भरु द्या.
आमेन आमेन.

20 (इशायाचा मुलगा दावीद याच्या प्रार्थना इथे संपल्या.)

नीतिसूत्रे 12:8-9

लोक विद्वानाची स्तुती करतात पण ते मूर्खांचा आदर करीत नाहीत.

खूप मोठा माणूस नसूनही खूप काम करणे हे खायला काही नसताना मोठेपणाचा आव आणण्यापेक्षा चांगले असते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center