Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
ईयोब 12-15

ईयोब उत्तर देतो

12 नंतर ईयोबाने उत्तर दिले:

“तुम्हीच फक्त शहाणे आहात
    असे तुम्हाला वाटते याबद्दल माझी खात्री आहे.
तुम्ही मेल्यानंतर तुमच्याबरोबरच शहाणपणाही जाईल
    असे तुम्हाला वाटते.
माझेही मन तुमच्या मनाइतकेच चांगले आहे,
    मीही तुमच्या इतकाच हुशार आहे.
    कोणालाही दिसेल की सत्य आहे.

“माझे मित्र मला आता हसत आहेत.
    ते म्हणतात, ‘त्याने देवाची प्रार्थना केली आणि त्याला उत्तर मिळाले.
    केवळ त्यामुळेच एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी त्याच्या बाबतीत घडल्या.’
मी चांगला आहे मी निष्पाप आहे,
    पण तरीही ते मला हसतात.
ज्यांच्यावर संकटे येत नाहीत तेच लोक संकटे कोसळलेल्या लोकांना हसतात.
    तेच लोक खाली पडलेल्याला मारतात.
परंतु चोरांचे तंबू समृध्द होतात.
    जे लोक देवाला क्रोध आणतात ते शांततेने राहातात.
    केवळ त्यांची स्वतःची शक्तीच त्यांचा देव असतो.

“तुम्ही प्राण्यांना विचारा,
    ते तुम्हाला शिकवतील किंवा
हवेत उडणाऱ्या पक्ष्यांना विचारा
    ते तुम्हाला सांगतील.
किंवा पृथ्वीला विचारा,
    ती तुम्हाला शिकवेल.
समुद्रातल्या माशांना त्यांचे
    शहाणपण सांगू द्या.
या सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या आहेत
    हे सर्वांना ठाऊक आहे.
10 जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा
    प्रत्येक माणूस देवाच्या अधिपत्याखाली असतो.
11 ज्याप्रमाणे तोंडाला आवडत्या आणि नावडत्या अन्नातील फरक कळतो
    त्याप्रमाणे कानालाही शहाणपणाच्या आणि मूर्खपणाच्या शब्दातील फरक कळतो.
12 ‘वृध्द् माणसे शहाणी असतात.
    दीर्घायुष्याने समजुतदारपणा येतो.’
13 ईयोब आणखी म्हणाला, देवाच्या ठायी विद्वत्ता आणि सामर्थ्य आहेत.
    त्याच्याजवळ चांगला उपदेश आणि समजूतदारपणाही आहे.
14 देव जेव्हा एखादी गोष्ट उध्वस्त करतो तेव्हा लोकांना ती परत उभारता येत नाही.
    देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करु शकत नाहीत.
15 देवाने जर पाऊस पडू दिला नाही तर पृथ्वी सुकून जाईल
    आणि जर त्याने पावसाला मोकळे सोडले तर सारी पृथ्वी जलमय होऊन जाईल.
16 देव सर्वशक्तीमान आहे आणि तो नेहमीच जिंकतो.
    जिंकणारे आणि हरणारे सर्वच देवाचे आहेत.
17 देव उपदेशकांना त्यांच्या विद्वत्तेपासून वंचित करतो
    आणि पुढाऱ्यांना मूर्खासारखे वागायला लावतो.
18 राजांनी जरी लोकांना तुरुंगात डांबले तरी देव त्यांची सुटका करतो.
    आणि त्यांना सामर्थ्यवान बनवतो.
19 तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो
    आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही.
20 देव विश्र्वासू उपदेशकांना गप्प बसवतो
    आणि वृध्दांची विद्वत्ता काढून घेतो.
21 तो पुढाऱ्यांचे महत्व कमी करतो
    आणि शासकांची सत्ता काढून घेतो.
22 देवाला काळीकुटृ रहस्ये माहित असतात.
    मृत्युलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो.
23 तो राष्ट्रांना महान आणि सामर्थ्यवान बनवतो
    आणि नंतर तो ते नष्ट करतो.
तो देशांना मोठे होऊ देतो
    आणि नंतर त्यांतील लोकांना विखरवून टाकतो.
24 देव नेत्यांना मूर्ख बनवतो.
    तो त्यांना वाळवंटात इकडे तिकडे मार्गहीन भटकायला लावतो.
25 हे नेते अंधारात वाट शोधणाऱ्या माणसाप्रमाणे असतात.
    दारु प्यायलेल्या माणसाला जसे आपण कुठे जात आहोत ते कळत नाही, तसे ते असतात.”

13 ईयोब म्हणाला: “हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे,
    तू जे म्हणालास ते सर्व मी आधीच ऐकले आहे.
    त्या सर्व गोष्टी मला समजतात.
तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मलाही माहीत आहे.
    मी तुझ्या इतकाच हुशार आहे.
परंतु मला तुझ्याशी वाद घालायचा नाही.
    मला सर्वशक्तीमान देवाशी बोलायचे आहे.
    मला देवाबरोबर माझ्या संकटांविषयी बोलायचे आहे.
तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवीत आहात.
    ज्या वैद्याला कुणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात.
तुम्ही गप्प बसावे अशी माझी इच्छा आहे.
    ती तुम्हाला करता येण्याजोगी सर्वात शहाणपणाची गोष्ट असेल.

“आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या
    मी काय म्हणतो ते ऐका.
तुम्ही देवासाठी खोटे बोलाल का?
    तुमचे खोटे बोलणे देवाच्या इच्छेनुसार आहे असे तुम्हाला वाटते का?
तुम्ही माझ्याविरुध्द देवाचा बचाव करीत आहात का?
    तुम्ही मुळीच न्यायाने वागत नाहीत तो देव आहे
    म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आहात.
जर देवाने अगदी जवळून तुमची तपासणी केली तर,
    त्याला काही तरी चांगले आढळेल का?
तुम्ही लोकांना जसे मूर्ख बनवू शकता तसेच
    देवालाही बनवू शकाल असे तुम्हाला वाटते का?
10 तुम्ही जर एखादा माणूस महत्वाचा आहे म्हणून न्यायालयात त्याची बाजू घेतलीत
    तर देव तुमच्यावर टीका करेल हे तुम्हाला माहीत आहे.
11 देवाचे मोठेपण तुम्हाला घाबरवते.
    तुम्ही त्याला भीता.
12 तुमचे युक्तिवाद कुचकामाचे आहेत.
    तुमची उत्तरे कवडीमोलाची आहेत.

13 “आता जरा गप्प बसा आणि मला बोलू द्या!
    माझे जे काही होईल ते मला मान्य आहे.
14 मी मलाच संकटात लोटीन
    आणि माझ्याच हातात माझेच जीवन धरीन? [a]
15 देवाने मला मारुन टाकले तरी मी देवावरच विश्वास ठेवीन.
    पण मी त्याच्या समोर माझा बचाव करीन.
16 आणि देवाने जर मला जिवंत राहू दिले तर ते मी बोलण्याइतका धीट होतो म्हणूनच असेल.
    पापी माणूस देवाच्या डोळ्याला डोळा भिडवू शकणार नाही.
17 मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका.
    मला नीट सांगू द्या.
18 मी आता माझ्या बचावाला सिध्द् झालो आहे.
    मी माझे मुद्दे काळजीपूर्वक मांडीन.
    मला माहीत आहे की मी बरोबर आहे हे मी दाखवून देईन.
19 माझे चुकले आहे असे जर कुणी दाखवून दिले
    तर मी गप्प बसेन.

20 “देवा, तू मला फक्त दोन गोष्टी दे,
    मग मी तुझ्यापासून लपणार नाही.
21 मला शिक्षा देणे बंद कर
    आणि तुझ्या भयानक गोष्टींनी मला भयभीत करण्याचे थांबव.
22 नंतर मला हाक मार.
    मी तुला ओ देईन किंवा मला बोलू दे आणि तू मला उत्तर दे.
23 मी किती पापे केली आहेत?
    मी काय चुका केल्या आहेत?
    तू मला माझी पापे आणि माझ्या चुका दाखव.
24 देवा, तू मला का चुकवीत आहेस?
    आणि मला शत्रूसारखे का वागवीत आहेस?
25 तू मला घाबरवतो आहेस का?
    मी वाऱ्यावर उडणारे एक पान मात्र आहे.
    तू गवताच्या एका काडीवर आक्रमण करीत आहेस.
26 देवा, तू माझ्याबद्दल फार कटू बोलतोस.
    मी तरुणपणात जी पापे केली त्याबद्दल तू मला कष्ट भोगायला लावतो आहेस का?
27 तू माझ्या पायात बेड्या घातल्या आहेस.
    माझ्या प्रत्येक पावलावर तू पाळत ठेवतोस,
    माझी प्रत्येक हालचाल तू टिपतोस.
28 म्हणून मी कुजलेल्या लाकडासारखा,
    कसरीने खाल्लेल्या कापडासारखा क्षीण होत चाललो आहे”

14 ईयोब म्हणाला:

“आपण सर्व मनुष्यप्राणी आहोत.
    आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टांनी भरलेले आहे.
माणसाचे आयुष्य फुलासारखे आहे.
    तो लवकर वाढतो आणि मरुन जातो.
माणसाचे आयुष्य छायेसारखे आहे.
    ती थोडा वेळ असते आणि नंतर नाहीशी होते.
ते खरे आहे पण देवा, माझ्याकडे एका माणसाकडे तू लक्ष देशील का?
    आणि तू माझ्याबरोबर न्यायालयात येशील का?
    आपण दोघेही आपापली मते मांडू या का?

“परंतु एखाद्या घाणेरड्या वस्तूचे स्वच्छ वस्तूशी काय साम्य असू शकते काहीच नाही.
माणसाचे आयुष्य मर्यादित आहे देवा,
    माणसाने किती जगायचे ते तूच ठरवतोस.
    तूच त्याची मर्यादा निश्र्चित करतोस आणि ती कुणीही बदलू शकत नाही.
देवा, म्हणून तू आमच्यावर नजर ठेवणे बंद कर.
    आम्हाला एकटे सोड.
    आमची वेळ संपेपर्यंत आमचे हे कष्टप्रद आयुष्य आम्हाला भोगू दे.

“वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्याबाबतीत आशा असते.
    ते पुन्हा वाढू शकते त्याला नवीन फांद्या फुटतच राहतात.
त्याची मुळे जरी जमिनीत जुनी झाली
    आणि त्याचे खोड जमिनीत मरुन गेले.
तरी ते पाण्यामुळे पुन्हा जिवंत होते.
    आणि त्याला नवीन रोपासारख्या फांद्या फुटतात.
10 परंतु माणूस जेव्हा मरतो तेव्हा तो संपतो.
    माणूस मरतो तेव्हा तो कायमचा जातो.
11 नद्या सुकून जाईपर्यंत तुम्ही समुद्रातील पाणी घेऊ शकता.
    तरीही माणूस मरुन जातो.
12 माणूस मरतो तेव्हा तो झोपतो
    आणि पुन्हा कधीही उठत नाही.
आकाश नाहीसे होईपर्यंत मेलेला माणूस उठणार नाही.
    मनुष्यप्राणी [b] त्या झोपेतून कधीच जागा होत नाही.

13 “तू मला माझ्या थडग्यात लपवावेस असे मला वाटते.
    तुझा राग निवळेपर्यंत तू मला तिथे लपवावेस.
    नंतर तू तुझ्या सोयीने माझी आठवण करु शकतोस.
14 मेलेला माणूस पुन्हा जिवंत होऊ शकतो का?
    मी माझी सुटका होईपर्यंत वाट बघत राहीन.
15 देवा तू मला हाक मारशील
    आणि मी तुला उत्तर देईन.
मग जे तू मला निर्माण केलेस तो
    मी तुला महत्वाचा वाटेन.
16 तू माझी प्रत्येक हालचाल निरखशील.
    पण माझ्या पापांची तुला आठवण होणार नाही.
17 तू माझी पापे एखाद्या पिशवीत बांधून ठेवावीस अंसे मला वाटते.
    ती पिशवी मोहोरबंद कर आणि फेकून दे.

18 “डोंगर पडतात आणि नष्ट होतात.
    मोठमोठे खडक फुटतात आणि त्यांच्या ठिकऱ्या होतात.
19 खडकावरुन वाहणारे पाणी त्यांची झीज करते.
    पुरामुळे जमिनीवरची माती वाहून जाते.
    त्याचप्रमाणे देवा, तू माणसाची आशा नष्ट करतोस.
20 तू त्याचा संपूर्ण पराभव करतोस
    आणि मग तू तेथून निघून जातोस.
तू त्याला दु:खी करतोस
    आणि त्याला नेहमीसाठी मृत्यूलोकात पाठवून देतोस.
21 त्यांच्या मुलांना मानसन्मान प्राप्त झाला तर ते त्याला कळत नाही.
    त्याच्या मुलांनी काही चुका केल्या तर त्या त्याला कधी दिसत नाहीत.
22 त्या माणसाला फक्त त्याच्या स्वतःच्या शारीरिक दु:खाची जाणीव असते.
    आणि तो केवळ स्वतःसाठीच रडतो.”

अलीफज ईयोबला उत्तर देतो

15 नंतर तेमानच्या अलीफजने ईयोबला उत्तर दिले:

“ईयोबा, जर तू खरोखरच शहाणा
    असशील तर तू पोकळ शब्दांनी उत्तर देणार नाहीस.
    शहाणा माणूस गरम हवेने इतका भरलेला नसतो.
विद्वान निरुपयोगी शब्दांनी
    आणि निरर्थक बोलण्याने वाद घालत बसेल असे तुला वाटते का?
ईयोबा तुला जर तुझ्या मनाप्रमाणे वागू दिले तर कोणीही माणूस देवाला मान देणार नाही
    आणि त्याची प्रार्थना करणार नाही.
तुझ्या बोलण्यावरुन तुझे पाप चांगले कळते.
    ईयोबा तू हुशारीने बोलून तुझे पाप लपवायचा प्रयत्न करीत आहेस.
तू चुकत आहेस हे सिध्द करण्याची मला आवश्यकता वाटत नाही.
    का? कारण तू तुझ्या तोंडाने जे बोलतोस ते तू चुकात असल्याचे सिध्द करतात.
    तुझे स्वतःचेच ओठ तुझ्याविरुध्द बोलतात.

“ईयोबा, जन्माला येणारा तू पहिलाच माणूस आहेस असे तुला वाटते का?
    टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?
तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का?
    केवळ तूच एक शहाणा माणूस आहेस असे तुला वाटते का?
ईयोब, तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे.
    तुला न कळणाऱ्या गोष्टी आम्हाला समजतात.
10 केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत.
    होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्या बाजूला आहेत.
11 देव तुझे सांत्वन करतो
    पण ते तुला पुरेसे वाटत नाही.
देवाचा निरोप आम्ही तुला अगदी हळुवारपणे दिला आहे.
12 ईयोबा, तू का समजून घेत नाहीस?
    तू सत्य का पाहात नाहीस?
13 तू हे रागाचे शब्द उच्चारतोस
    तेव्हा तू देवाच्या विरुध्द जातोस.

14 “मनुष्य कधीही निष्कलंक असू शकत नाही.
    मनुष्यप्राणी देवापेक्षा अधिक बरोबर असू शकत नाही.
15 देव त्याच्या पवित्र दूतांवर विश्र्वास ठेवत नाही.
    देवाशी तुलना करता स्वर्गसुध्दा निर्मळ नाही.
16 मनुष्यप्राणी सर्वांत वाईट आहे,
    तो अशुध्द् आणि कुजलेला आहे.
    तो वाईट गोष्टी पाण्यासारख्या पितो.

17 “ईयोबा, तू माझे ऐक मी तुला नीट सांगतो.
    मला जे माहीत आहे ते मी तुला सांगतो.
18 विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगीतल्या,
    त्या मी तुला सांगतो.
    विद्वानांच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगीतल्या.
त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.
19 ते त्यांच्या देशात एकटे राहात होते, तिथून दुसऱ्या देशांतील लोक जात नसत.
    त्यामुळे इतरांनी कुणी त्यांना काही विचित्र कल्पना सांगितल्या नाहीत.
20 हे विद्वान लोक म्हणाले, दुष्ट माणूस जीवनभर यातना भोगतो.
    क्रूर माणूस मरण येईपर्यंत भीतीने कापत असतो.
    (क्रूर माणसाचे दिवस भरलेले असतात. तो त्या दिवसांत ही यातना भोगतो.)
21 त्याला प्रत्येक आवाजाची भीती वाटते.
    जेव्हा आपण सुरक्षित आहोत असे त्याला वाटते तेव्हा त्याचा शत्रू त्याच्यावर हल्ला करतो.
22 दुष्ट माणूस निराश झालेला असतो.
    व त्याला अंधारातून सुटका होण्याची आशा नसते.
    त्याला मारण्यासाठी तलवार टपून बसलेली असते.
23 तो इकडे तिकडे भटकत राहातो परंतु त्याचे शरीर गिधाडांचे अन्न असते.
    आपला मृत्यू अगदी जवळ आला आहे हे त्याला माहीत असते.
24 त्याला काळजी आणि यातना भयभीत करतात.
    एखाद्या राजाप्रमाणे त्याला नष्ट करण्यासाठी त्या त्याच्यावर हल्ला करतात.
25 का? कारण दुष्ट मनुष्य देवाची आज्ञा मानायला तयार नसतो.
    तो त्याच्या मुठी देवासमोर नाचवतो.
    तो सर्वशक्तिमान देवाचा पराभव करायचा प्रयत्न करतो.
26 दुष्ट माणूस अतिशय हट्टी असतो.
    तो जाड आणि मजबूत ढालीने देवावर हल्ला करतो.
27 माणूस श्रीमंत आणि धष्टपुष्ट असू शकतो.
28     पण त्याचे शहर धुळीला मिळेल.
त्याच्या घराचा नाश होईल.
    त्याचे घर रिकामे होईल.
29 दुष्ट माणूस फार दिवस श्रीमंत राहू शकत नाही.
    त्याची संपत्ती खूप दिवस टिकत नाही.
    त्याची पिके जास्त वाढत नाहीत.
30 दुष्ट माणसाची काळोखापासून सुटका नसते.
    तो त्या झाडासारखा असतो ज्याची पाने रोगामुळे मरतात
    आणि वारा त्यांना दूर उडवून नेतो.
31 निरुपयोगी गोष्टींवर विश्वास ठेवून दुष्ट माणसाने स्वतःचीच फसवणूक करुन घेऊ नये, का?
    कारण त्याला त्यातून काहीही मिळणार नाही.
32 आयुष्य संपायच्या आधीच दुष्ट माणूस म्हातारा आणि शुष्क झालेला असेल.
    तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फांदीसारखा असेल.
33 दुष्ट माणूस द्राक्ष न पिकता गळून गेलेल्या द्राक्षाच्या वेलीसारखा असेल.
    तो फूल गळून गेलेल्या जैतून झाडाप्रमाणे असेल.
34 का? कारण ज्यांच्या जवळ देव नसतो त्यांच्याजवळ काहीही नसते.
    जे लोक पैशावर प्रेम करतात त्यांची घरे आगीत भस्मसात होतात.
35 दुष्ट माणसे सतत दुष्टपणा करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी योजना आखत असतात.
    ते लोकांना फसविण्यासाठी योजना तयार करतात.”

1 करिंथकरांस 15:29-58

29 नाहीतर, मेलेल्यांसाठी व त्यांची पुन्हा भेट होईल या आशेने ज्यांनी बाप्तिस्मा घेलला आहे ते काय करतील? जर मेलेले उठविले जात नाहीत तर त्यांच्यासाठी लोक बाप्तिस्मा का घेतात?

30 आम्हीसुद्धा प्रत्येक घटकेला धोक्याला का तोंड देतो? 31 बंधूजनहो, मी शपथपूर्वक सांगतो की, ख्रिस्त येशूमध्ये माझा तुमच्याविषयी अभिमान आहे, मी दररोज मरतो 32 इफिसात मी रानटी प्राण्याबरोबर लढलो, तर मी काय मिळविले? जर मेलेले उठविले जात नाहीत तर “आपण खाऊ पिऊ, कारण आपण उद्या मरुन जाऊ!”

33 फसू नका, “वाईट सोबती चांगल्या सवयी बिघडवितात.” 34 शुद्धीवर या. जसे तुम्ही यायला पाहिजे आणि पाप करीत जाऊ नका. कारण तुम्हांपैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हांस लाजविण्यासाठी बोलतो.

आपले शरीर कोणत्या प्रकारचे असेल?

35 परंतु कोणीतरी म्हणेल? “मेलेले कसे उठविले जातात? कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात?” 36 तू किती मूर्ख आहेस? तू जे पेरतोस ते प्रथम मेल्याशिवाय जिवंत होत नाही. 37 आणि तू लावतोस (पेरतोस) त्यासंबंधी तू जे जमिनीत पेरतोस ते वाढलेले रोपटे नसून जे वाढतच राहणार आहे, ते नव्हे तर फक्त धान्य (दाणा). तो गव्हाचा किंवा इतर कोठला तरी असेल. 38 आणि मग देवाने निवडल्याप्रमाणे तो त्याला आकार देतो. तो प्रत्येक दाण्याला त्याचे स्वतःचे “शरीर” देतो. 39 जिवंत प्राणीमात्रांचे सर्वांचे देह सारखेच नसतात. त्याऐवजी मनुष्याचे शरीर एक प्रकारचे असते. प्राण्यांचे शरीर दुसऱ्या प्रकारचे असते, पक्ष्यांचे वेगळ्या प्रकारचे असते; आणि माशांचे आणखी वेगळ्या प्रकारचे असते. 40 तसेच स्वर्गीय शरीरे आहेत आणि पृथ्वीवरील शरीरे आहेत, पण स्वर्गीय शरीराचे वैभव एक प्रकारचे असते, तर जगिक शरीराला दुसरे असते. 41 सूर्याचे तेज वेगळ्या प्रकारचे तर चंद्राचे तेज वेगळ्या प्रकाचे असते. ताऱ्याचे तेज वेगळ्या प्रकारचे असते. आणि तेजाबाबत एक तारा दुसऱ्या ताऱ्यांहून निराळा असतो.

42 म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणारे आहे, जे शरीर उठविण्यात येते ते आविनाशी आहे. 43 जे शरीर जमिनीत पुरले आहे, ते अपमानात पुरलेले असते. ते अशक्त असते पण उठविले जाते ते सशक्त शरीर असते 44 जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे जे उठविले जाते ते आध्यात्मिक शरीर आहे.

जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरेसुद्धा असतात. 45 आणि तेच पवित्र शास्त्र सांगते, “पाहिला मनुष्य, आदाम हा जिवंत प्राणी झाला,” पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला. 46 परंतु जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, जे जगिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक आहे ते. 47 पाहिला मनुष्य मातीतून आला म्हणजे तो धुळीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला. 48 ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत. 49 ज्याप्रमाणे तयार केलेल्या माणसाची प्रतिमा आपण धारण केली आहे, तशी आपणसुद्धा स्वर्गीय माणसाची प्रतिमा धारण करु.

50 बंधूनो, मी तुम्हांला सांगतो, आपल्या मांस व रक्त असलेल्या जगिक शरीराला देवाच्या राज्यात वाटा मिळू शकत नाही. तसेव विनाशीपण अविनाशीपणाचा वारसा मिळवू शकत नाही. 51 पाहा! मी तुम्हांला एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ.

52 क्षणात, डोळ्यांची उघडझाप होते इतक्या लवकर, जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल, कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशीपणात उठविले जातील आणि आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ. 53 कारण या विनाशी शरीराने अविनाशीपण धारण करावे आणि या मर्त्य शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे. 54 जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल.

“विजयात मरण गिळले गेले आहे.” (A)

55 “अरे मरणा तुझा विजय कोठे आहे?
    मरण, तुझी नांगी कोठे आहे?” (B)

56 मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमाशास्त्रापासून येते. 57 पण देवाला धन्यावाद असो, जो प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला विजय देतो!

58 म्हणून माझ्या प्रिय बंधूनो, स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यसाठी वाहून घ्या. कारण तुम्ही जाणता की प्रभुमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.

स्तोत्रसंहिता 39

प्रमुख गायकासाठी यदुथुनासाठी दावीदाचे स्तोत्र

39 मी म्हणालो, “मी जे बोलेन त्याबद्दल काळजी घेईन
    मी माझ्या जिभेला पाप करु देणार नाही.”

मी दुष्टांबरोबर असलो की माझे तोंड बंद ठेवीन.
    मी बोलायला नकार दिला मी काही चांगलेसुध्दा बोललो नाही.
    मी फार चिडलो होतो.
मी फार रागावलो होतो
    आणि मी जितका जास्त त्याचा विचार करत गेलो तितका अधिक मी रागावत गेलो.
    म्हणून मी काही तरी बोललो.

माझे काय होईल?
    हे परमेश्वरा, मला सांग मी किती दिवस जगेन?
    ते मला सांग, माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
परमेश्वरा, तू मला अगदी कमी आयुष्य दिलेस.
    माझे आयुष्य म्हणजे तुझ्या दृष्टीने काहीच नाही.
प्रत्येकाचे आयुष्य केवळ ढगासारखे असते.
    कुणीही सदासर्वकाळ जगत नाही.

आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते.
    आपली सगळी संकटे निष्कारणच असतात.
आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो
    पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्याला माहीत नसते.

तेव्हा प्रभु, मला काही आशा आहे का?
    तूच माझी आशा आहेस!
परमेश्वरा, तूच मला मी केलेल्या पापांपासून वाचव. तू
    मला दुष्ट माणसाला वागवितात तसे वागवू नकोस.
मी माझे तोंड उघडणार नाही.
    मी काही बोलणार नाही.
    परमेश्वरा जे करायला हवे होते ते तू केलेस.
10 देवा, आता मला शिक्षा करणे सोडून दे जर
    तू ते सोडून दिले नाहीस तर तू माझा नाश करशील.
11 परमेश्वरा, तू चूक केल्याबद्दल शिक्षा करतोस.
    त्या रीतीने तू लोकांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवतोस आमची शरीरे म्हातारी होऊन
    कसरीने खाल्लेल्या कापडासारखी जीर्ण होतात तसेआमचे आयुष्य चटकन् नाहीसा होणाऱ्या ढगासारखे आहे.

12 परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक,
    मी तुझ्यासाठी जे शब्द आकांताने बोलतो ते ऐक माझे अश्रू बघ.
    या आयुष्यात तुझ्या बरोबर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे.
माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे मी येथे
    केवळ थोड्याकाळासाठी राहाणार आहे.
13 परमेश्वरा, माझ्याकडे बघू नकोस.
    मरण्याच्या आधी मला आनंदी राहू दे.
    मी थोड्याच वेळात जाणार आहे.

नीतिसूत्रे 21:30-31

30 परमेश्वर ज्याच्या विरुध्द् आहे अशी योजना यशस्वी करुन दाखविणारा एकही शहाणा माणूस नाही.

31 लोक युध्दासाठी घोड्यांसकट सर्व तयारी करु शकतात, पण परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिल्याखेरीज ते युध्द् जिंकू शकत नाहीत.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center