Revised Common Lectionary (Semicontinuous)
2 इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत?
ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत?
2 त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी
आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले.
3 ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुध्द आणि त्याने निवडलेल्या राजाविरुद्ध उभे राहू
आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ.”
4 परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा
त्या लोकांना हसतो.
5-6 देव रागावला आहे आणि तो
त्या लोकांनाच सांगत आहे, “मी या माणसाची राजा म्हणून निवड केली
तो सियोन पर्वतावर राज्य करेल सियोन हा माझा खास पर्वत आहे.”
यामुळे ते दुसरे पुढारी भयभीत झाले आहेत.
7 आता मी तुम्हाला परमेश्वराच्या कराराविषयी सांगतो
परमेश्वर मला म्हणाला, “आज मी तुझा बाप झालो!
आणि तू माझा मुलगा झालास.
8 जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन
या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील.
9 लोखंडाची कांब जशी मातीच्या भांड्याचा [a] नाश करते
तसा तू त्या राष्ट्रांचा नाश करू शकशील.”
10 म्हणून राजांनो तुम्ही शहाणे व्हा
राज्यकर्त्यांनो हा धडा शिका.
11 परमेश्वराच्या आज्ञांचे भीतीयुक्त पालन करा.
12 तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा.
तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात.
पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे.
तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.
फुटलेले मडके
19 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, जा आणि कुंभाराकडून एक मातीचे मडके विकत घे. 2 खापराच्या प्रवेशद्वाराजवळच्या बेन हिन्नोनच्या दरीकडे जा. काही वडीलधाऱ्यांना नेत्यांना आणि याजकांना तुझ्या बरोबर घे. मी तुला सांगतो त्या गोष्टी तेथे तू त्यांना सांग. 3 तुझ्याबरोबर असलेल्या लोकांना सांग, ‘यहूदाच्या राजांनो आणि यरुशलेमच्या लोकांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका. सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएल लोकांचा देव म्हणतो, मी ह्या ठिकाणी लवकरच काहीतरी भयंकर घडवून आणिन हे ऐकणारा प्रत्येकजण विस्मित होईल व घाबरुन जाईल. 4 यहूदातील लोकांनी मला अनुसरायचे सोडल्यामुळे मी हे घडवून आणीन. त्यांनी ही जागा परक्या दैवतांना दिली. त्यांनी येथे दुसऱ्या दैवतांना होमबली अर्पण केले. पूर्वी हे लोक त्या दैवतांना पूजत नव्हते. त्यांच्या पूर्वजांनीही ह्या दैवतांची पूजा केली नाही. हे दुसऱ्या देशातून आलेले दैवते आहेत. यहूदाच्या राजाने हे ठिकाण अश्राप बआलकांच्या रक्ताने भिजवून टाकले आहे. 5 यहूदाच्या राजाने बआल दैवतासाठी उच्चासने बांधली. लोक ह्या जागांचा उपयोग आपल्या मुलांना अग्नीत जाळण्यासाठी करतात. बआल दैवताला होमबली अर्पण केल्याप्रमाणे ते आपली मुले जाळतात. मी त्यांना असे करायला सांगितलेले नाही. मी तुमच्याजवळ तुमच्या मुलांचे बळी मागितलेले नाहीत. अशा गोष्टी कधीही माझ्या मनातही आल्या नाहीत. 6 हल्ली हिन्नोनच्या दरीला तोफेत म्हणतात. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की अशी वेळ येईल की, हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, त्या वेळी ह्या दरीला लोक कत्तलीची दरी म्हणून ओळखतील. 7 येथेच मी यहूदातील व यरुशलेममधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्या लोकांचा शत्रू पाठलाग करतील. मी ह्या ठिकाणी यहूदातील लोकांना तलवारीच्या घावांनी मरु देईन. त्यांची प्रेते गिधाडे व वन्य पशू ह्यांचे भक्ष्य होईल. 8 ह्या नगरीचा मी पूर्णपणे नाश करीन. यरुशलेम जवळून जाताना लोक निराशेने माना हलवतील व सुस्कारे सोडतील अशा तऱ्हेने नगरीचा नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल. 9 नगरीला शत्रूसैन्याचा वेढा पडेल. ते सैन्य नगरीची रसद तोडेल. मग नगरीतील लोकांची उपासमार सुरु होईल. लोकांना एवढी भूक लागेल की ते स्वतःच्याच मुलांना खातील आणि एकमेकांना खायला लागतील.’
10 “यिर्मया, ह्या गोष्टी तू लोकांना सांग आणि लोक पाहत असतानाच हे मडके फोड. 11 त्या वेळी पुढील गोष्टी सांग: ‘सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, कोणीतरी मातीचे मडके फोडावे त्याप्रमाणे मी यहूदा व यरुशलेमला फोडीन; हे मडके परत जोडता येणार नाही. यहूदाच्या बाबतही असेच होईल. तोफेतमध्ये इतक्या मृतांना पुरण्यात येईल की आणखी प्रेतांना पुरण्यास तेथे जागाच राहणार नाही. 12 मी हे ह्या लोकांच्या बाबतीत ह्याच जागेवर घडवून आणीन. मी ह्या नगरीला तोफेतप्रमाणे करीन.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 13 ‘यरुशलेममधील घरे तोफेतप्रमाणे अपवित्र होतील. राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. का? कारण लोकांनी त्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि त्यांच्याबद्दल आदर दाखविण्यासाठी हवी अर्पण केले. दैवतांना त्यांनी पेयेही अर्पण केली.’”
14 परमेश्वराने यिर्मयाला ज्या जागी प्रवचन देण्यास सांगितले होते ती जागा म्हणजे तोफेत यिर्मयाने सोडली. तो मग परमेश्वराच्या मंदिराकडे गेला आणि मंदिराच्या प्रांगणात उभा राहिला. यिर्मया सर्व लोकांना म्हणाला, 15 “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव काय म्हणतो पाहा: ‘मी यरुशलेमवर आणि त्याच्या आजूबाजूच्या खेड्यांवर खूप अरिष्टे आणीन. लवकरच मी हे घडवून आणीन. का? कारण लोक फार हट्टी झाले आहेत. ते माझे ऐकत नाहीत आणि माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारतात.’”
ख्रिस्त येशूचा चांगला सेवक हो
6 तेव्हा बंधू, जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधुभगिनींना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. 7 परंतु देवहीन गोष्टी, ज्या म्हाताऱ्या स्त्रियांचे लक्षण आहे ते टाळ आणि स्वतःला सतत देवाच्या भक्तीमध्ये गुंतवण्याची सवय ठेव. 8 कारण शारीरिक शिकवणुकीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे, कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे. 9 हे सत्य वचन आहे जे सर्वथा स्वीकारावयास योग्य आहे. 10 म्हणून आम्ही जास्त काम करतो आणि धडपड करतो. कारण आम्ही, जो सर्व लोकांचा व विशेषेकरून जे विश्वास ठेवतात, अशा विश्वासणाऱ्यांचा विशेषकरुन तारणारा आहे त्या जिवंत देवावर आशा ठेवली आहे.
11 आज्ञा कर आणि या गोष्टी शिकव. 12 तू तरुण आहेस म्हणून कोणी तुला तुच्छ मानू नये. त्याऐवजी, विश्वासणाऱ्यांसाठी तू तुझ्या बोलण्याने, तुझ्या वागण्याने, तुझ्या प्रेम दर्शविण्याने, तुझ्या असलेल्या विश्वासाने व तुझ्या शुद्ध जीवनाने त्यांचा आदर्श हो.
13 मी येईपर्यंत लोकांमध्ये देवाचे वचन वाचण्यात, बोध करण्यात व शिकविण्यात स्वतःला वाहून घे. 14 जेव्हा वडीलजनांनी तुझ्यावर हात ठेवला त्यावेळी भविष्याच्या संदेशाचा परिणाम म्हणून तुला मिळालेली देणगी जी तुझ्यामध्ये आहे, त्याविषयी निष्काळजी राहू नको. 15 या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यात पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांना दिसून यावी. 16 आपणांकडे व आपल्या शिकवणुकीकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे तारण करशील.
2006 by World Bible Translation Center