Revised Common Lectionary (Semicontinuous)
मरीया देवाची स्तुति करते
46 आणि मरीया म्हणाली,
47 “माझा आत्मा प्रभूची स्तुति करतो;
माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो.
48 कारण त्याने त्याच्या नम्र दासीची काळजी वाहिली होय,
येथून पुढे सर्व लोक मला धन्य म्हणतील.
49 कारण सर्वसमर्थाने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत,
त्याचे नाव पवित्र आहे.
50 जे त्याचे भय धरतात,
त्यांच्यावर तो पिढ्यानपिढ्या दया करतो.
51 त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले;
गर्विष्ठ लोकांना त्यांच्या बढाईखोर विचारांसह विखरुन टाकले आहे.
52 सत्ताधीशांना त्याने त्यांच्या सिंहासनावरुन खाली आणले आहे,
आणि नम्र जनांना त्याने उंच केले आहे.
53 त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी समाधान दिले आहे.
श्रीमंत लोकांना त्याने रिकामे पाठविले आहे.
54 त्याचा सेवक जो इस्राएल याला
मदत करण्यास तो आला आहे.
55 त्याने आपल्या पूर्वजांना जे अभिवचन दिले होते त्याप्रमाणे
अब्राहाम व त्याच्या वंशजांवर दया करण्याचे तो लक्षात ठेवतो.”
दावीदाची प्रार्थना
18 यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला,
“हे प्रभो, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस?
23 “पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. (ती गुलाम होती) तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुकत केलेस. तिला आपली प्रजा मानलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भुत चमत्कार केलेस. 24 तू निरंतर त्यांना स्वतःच्या कवेत घेतलेस. तू त्यांचा देव झालास.
25 “आता तर, परमेश्वर देवा, या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करुन तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करु दे. 26 मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, ‘सर्वशक्तीमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे.’
27 “सर्वशक्तीमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस. तू म्हणालास, ‘मी तुझ्यासाठी घर बांधीन’ म्हणून मी, तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे. 28 प्रभो, परमेश्वरा तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास. 29 आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभो परमेश्वरा तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”
6 ते, अब्राहामाविषयी पवित्र शास्त्र सांगते तसे आहे: “त्याने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याच्यासाठी देवाकडून नीतिमत्त्व असे गणण्यात आले.” 7 मग तुम्हाला समजले पाहिजे की जे विश्वास ठेवतात, तेच अब्राहामाचे खरे वंशज आहेत. 8 पवित्र शास्त्राने आधीच सांगितले आहे की, देव विदेशी लोकांना त्यांच्या विश्वासाने नीतिमान ठरवील. त्याने अब्राहामाला पूर्वीच सुवार्ता सांगितली की, “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.” 9 म्हणून ज्यांचा विश्वास आहे त्यांना विश्वासणाऱ्या अब्राहामासह आशीर्वाद मिळेल.
10 परंतु नियमशास्त्राच्या कृतीवर जे अवलंबून राहतात ते शापित आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या सर्व गोष्टी करण्यात जो कोणी टिकून राहत नाही, तो शापित असो.” 11 नियमशास्त्रामुळे कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे. कारण शास्त्र सांगते की, “विश्वासामुळे नीतिमान मनुष्य जगेल.”
12 नियमशास्त्र विश्वासाचे नाही. त्याऐवजी पवित्र शास्त्र असे सांगते की, “जो कोणी ते पाळतो तो त्यामुळे जगेल.” 13 ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले आहे. आपणासाठी शाप होऊन त्याने हे केले. असे लिहिले आहे: “प्रत्येकजण जो कोणी झाडावर टांगला आहे तो शापित असो.” 14 ख्रिस्ताने आम्हाला मुक्त केले यासाठी की, अब्राहामाला मिळालेला आशीर्वाद ख्रिस्ताद्वारे विदेश्यांना मिळावा. यासाठी की विश्वासाद्वारे आम्हांला आत्म्याचे अभिवचन मिळावे.
2006 by World Bible Translation Center