Revised Common Lectionary (Semicontinuous)
मरीया देवाची स्तुति करते
46 आणि मरीया म्हणाली,
47 “माझा आत्मा प्रभूची स्तुति करतो;
माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो.
48 कारण त्याने त्याच्या नम्र दासीची काळजी वाहिली होय,
येथून पुढे सर्व लोक मला धन्य म्हणतील.
49 कारण सर्वसमर्थाने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत,
त्याचे नाव पवित्र आहे.
50 जे त्याचे भय धरतात,
त्यांच्यावर तो पिढ्यानपिढ्या दया करतो.
51 त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले;
गर्विष्ठ लोकांना त्यांच्या बढाईखोर विचारांसह विखरुन टाकले आहे.
52 सत्ताधीशांना त्याने त्यांच्या सिंहासनावरुन खाली आणले आहे,
आणि नम्र जनांना त्याने उंच केले आहे.
53 त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी समाधान दिले आहे.
श्रीमंत लोकांना त्याने रिकामे पाठविले आहे.
54 त्याचा सेवक जो इस्राएल याला
मदत करण्यास तो आला आहे.
55 त्याने आपल्या पूर्वजांना जे अभिवचन दिले होते त्याप्रमाणे
अब्राहाम व त्याच्या वंशजांवर दया करण्याचे तो लक्षात ठेवतो.”
17 तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी राजाला (देवाला) त्याच्या सुंदर रूपात पाहाल. तुम्ही महान भूमी पाहाल. 18-19 तुम्ही तुमच्या भूतकाळातील संकटांबद्दल विचार कराल. तुम्ही विचार कराल, “ते दुसऱ्या देशातील लोक कोठे ओहेत? ते आम्हाला न समजणारी भाषा बोलत. दुसऱ्या देशातील ते अधिकारी आणि कर गोळा करणारे कोठे आहेत? आमच्या संरक्षक बुरूजांची मोजदाद करणारे हेर कोठे आहेत? ते सर्व नाहीसे झाले.”
देव यरुशलेमचे रक्षण करील
20 आमच्या धार्मिक सणांच्या नगरीकडे सियोनकडे पाहा, विश्राम करण्याच्या सुंदर जागेकडे, यरूशलेमकडे पाहा. यरूशलेम, कधीही न हालणाऱ्या तंबूसारखी आहे. त्याच्या घट्ट रोवलेल्या मेखा कधीही उखडल्या जाणार नाहीत. त्याच्या दोऱ्या कधीही कापल्या जाणार नाहीत. 21-23 का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर तेथे आहे. त्या भूमीवर झरे व रूंद पात्रांच्या नद्या आहेत. पण तेथे शत्रूंच्या नावा अथवा जहाजे नसतील. त्या नावांवर काम करणारे तुम्ही लोक दोऱ्या सोडतात तसेच काम सोडू शकाल. तुम्ही डोलकाठी पुरेशी घट्ट करू शकणार नाही. तुम्हाला शीड उभारता येणार नाही का? कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आमचे कायदे करतो. परमेश्वर आमचा राजा आहे. तो आमचे रक्षण करतो. म्हणून तो आम्हाला खूप संपत्ती देईल. पंगूनासुध्दा् युध्दात खूप धन मिळेल.
6 नंतर देवदूत मला म्हणाला, “हे शब्द विश्वासयोग्य आणि खरे आहेत. जो प्रभु संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा प्रभु आहे, त्याने आपला दूत पाठविला. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या आपल्या सेवकांना दाखवून देण्यासाठी त्याने आपला दूत पाठविला आहे.” 7 “पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य!”
18 या पुस्तकात भविष्याकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्याला मी गंभीरपणे सावधान करतो: जर कोणी ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणिल. 19 आणि जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील, त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.
20 जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.”
आमेन, ये प्रभु येशू, ये!
2006 by World Bible Translation Center