Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.
80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
आम्हाला तुला बघू दे.
2 इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
ये आणि आम्हाला वाचव.
3 देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर
आणि आम्हाला वाचव.
4 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, तू आमच्या प्रार्थना कधी ऐकशील?
आमच्यावर तू सदैव रागावलेलाच राहाणार आहेस का?
5 तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस.
तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.
6 तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त केलेस.
आमचे शत्रू आम्हाला हसतात.
7 सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.
17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
18 तो तुला सोडून परत जाणार नाही.
त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये.
आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.
दावीदाचा मंदिर बांधायचा बेत
7 राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्याला भोवतालच्या सर्व शत्रूपासून विसावा दिला. 2 एकदा नाथान या संदेष्ट्यास दावीद म्हणाला, “इथे मी गंधसरुच्या लाकडापासून केलेल्या डौलदार घरात राहतोय आणि परमेश्वराचा पवित्र कोश मात्र अजूनही राहुटीतच आहे. त्या पवित्र कोशा साठी आता चांगला निवारा बांधायाला हवा.”
3 नाथान राजाला म्हणाला, “आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हाला साथ आहे.”
4 पण त्यादिवशी रात्री नाथानला परमेश्वराचे वचन ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,
5 “दावीद या माझ्या सेवकाला जाऊन सांग: ‘परमेश्वराचा निरोप असा आहे. माझ्यासाठी निवासस्थान बांधणारा तू नव्हेस. 6 इस्राएल लोकांना मिसरमधून मी बाहेर काढले,त्यावेळी मी कुठल्या ही घरात राहात नव्हतो, मी राहूटीतूनच फिरलो. तेच माझे घर. 7 इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणालाही मी कधीही. माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस? असे विचारले नाही.’
8 “शिवाय दावीदाला हे ही सांग: ‘सर्वशक्तीमान परमेश्वर असे म्हणतो. तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले आहे. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा नेता केले. 9 तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन. 10-11 माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली. त्यांना रुजवले. त्यांना जागोजाग भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले. पूर्वी मी त्यांच्यावर शास्ते नेमले पण दुर्जनांनी त्यांना त्रास दिला. आता तसे घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल.
12 “तुझे जीवन संपुष्टात आले म्हणजे मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या मुलांपैकीच कोणालातरी राजा करीन. 13 तो माझ्या नावाप्रीत्यर्थ घर (मंदिर) बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन. 14 मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर लोकाकडून मी त्याला शासन घडवीन. तेच माझे चाबूक 15 पण माझे त्याच्यावरचे प्रेम खंडित होणार नाही. त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील. शौलावरील माझा लोभ आणि प्रेम संपुष्टात आले. मी तुझ्याकडे वळलो तेव्हा तुझ्यासमोर मी त्याला दूर ढकलले. पण तुझ्या घराण्याच्या बाबतीत मी असे करणार नाही. 16 राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे सिंहासन टिकून राहील.”
17 नाथानने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले.
23 हा विश्वास येण्याअगोदर नियमशास्त्राने आपणांस कैद्याप्रमाणे पहाऱ्यात ठेवले होते. आणि हा येणारा विश्वास आम्हांला प्रगट होईपर्यंत आम्हांला कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. 24 त्यामुळे आपल्या विश्वासाच्या आधारे आपण नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र जे आपणांला ख्रिस्ताकडे घेऊन येणारे होते, ते आपले पालक होते. 25 पण आता हा विश्वास आलाच आहे, तर यापुढे आम्ही या कडक पालकाच्या अधीन नाही.
26-27 कारण तुम्ही सर्व सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुम्ही जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. 28 तेथे यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. 29 आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि देवाने अब्राहामाला दिलेल्या वचनानुसार वारस आहात.
2006 by World Bible Translation Center