Revised Common Lectionary (Semicontinuous)
भाग दुसरा
(स्त्रोतसंहिता 42-72)
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटूंबाकडून मास्कील
42 हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते.
त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे.
2 माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे.
मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
3 रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?”
4 म्हणून मला या सर्व गोष्टी आठवू दे.
मला माझे मन रिकामे करु दे.
जमावाला मी देवाच्या मंदिरापर्यत नेल्याची मला आठवण आहे.
खूप लोकांबरोबर स्तुतीचे आनंदी गाणे गाऊन
सण साजरा केल्याची मला आठवण आहे.
5-6 मी दु:खी का व्हावे?
मी इतके का तळमळावे?
मी देवाकडून मदतीसाठी थांबले पाहीजे.
त्याची स्तुती करण्याची मला पुन्हा संधी मिळेल.
तो मला वाचवेल!
देवा, मी खूप दु:खी आहे म्हणूनच मी तुला बोलावले.
मी यार्देनच्या दरीपासून हर्मोनच्या डोंगरावर आणि मिसहारच्या टेकडीवर गेलो.
7 या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत मी तुझ्या लाटांचा आपटण्याचा आवाज ऐकला.
समुद्रातल्या लाटांसारखी संकटे माझ्यावर पुन्हा कोसळली,
परमेश्वरा तुझ्या लाटा माझ्यावर चहु बाजूंनी आदळत आहेत.
तुझ्या लाटांनी मला पूर्णपणे झाकले आहे.
8 दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून
माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे.
9 मी देवाशी माझ्या खडकाशी बोलतो मी म्हणतो,
“परमेश्वरा, तू मला का विसरलास?
माझ्या शत्रूच्या क्रूरतेमुळे मी इतके दु:ख का सहन करावे?”
10 माझ्या शत्रूंनी मला मारण्याचा प्रयत्न केला, “तुझा देव कुठे आहे?”
असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात.
11 मी इतका दु:खी का आहे?
मी इतका खिन्न का आहे?
मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे.
त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल.
तो मला वाचवेल.
देवाचे यरुशलेमला आशीर्वाद देण्याचे वचन
8 सर्व शक्तिमान परमेश्वराचा हा संदेश आहे. 2 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “माझे सियोनवर खरोखरीच प्रेम आहे. माझे तिच्यावर इतके प्रेम आहे की तिची माझ्यावरील श्रध्दा उडताच माझा संताप झाला.” 3 परमेश्वर म्हणतो, “मी सियोनला परत आलो आहे. मी यरुशलेमला रहात आहे. यरुशलेम निष्ठावान नगरी म्हणून ओळखली जाईल. सर्व शक्तिमान परमेश्वराचा पर्वत, ‘पवित्र पर्वत’ म्हणून ओळखला जाईल.”
4 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “वृध्द स्त्री-पुरुष यरुशलेमच्या सार्वजानिक ठिकाणी पुन्हा दिसू लागतील. लोक इतके दीर्घायुषी होतील की चालताना त्यांना काठीच्या आधाराची गरज भासेल. 5 रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी ती नगरी राजबजून जाईल. 6 देव म्हणतो, वाचलेल्यांना ह्याचे आश्चर्य वाटेल. आणि मलाही विस्मय वाटेल.”
7 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “पाहा! पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशांतून मी माझ्या माणसांची मुक्तता करीत आहे. 8 मी त्यांना परत येथे आणि ते यरुशलेममध्ये राहतील. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा कृपावंत वश्रध्दावान देव होईल.”
9 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “सामर्थ्यवान व्हा! सर्व शक्तिमान परमेश्वराने मंदिराच्या पुननिर्मितीच्या वेळी पाया घालताना, संदेष्ट्यांमार्फत जो संदेश दिला, तोच तुम्ही आज ऐकत आहात. 10 त्या वेळेपूर्वी, पगारी कामगार ठेवायला वा भाड्याने जनावरे घ्यायला लोकांजवळ पैसा नव्हता. दळणवळण सुरक्षित नव्हते. सर्वच अडचणीतून सुटका झाली नव्हती. मी प्रत्येकाला दुसऱ्याविरुध्द भडकविले होते. 11 पण आता तसे नाही. वाचलेल्यांची स्थिती तशी असणार नाही.” सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
12 “ते लोक शांततेत लागवड करतील. त्यांच्या द्राक्षवेलींना द्राक्षे लागतील. जमीन चांगली पिके देईल आणि आकाश पाऊस देईल. मी ह्या सर्व गोष्टी माझ्या ह्या लोकांना देईल. 13 शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल व यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलची व यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे म्हणजे आशीर्वचन बनतील तेव्हा घाबरु नका! सामर्थ्यवान. व्हा!”
14 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला संतापविले. म्हणून मी त्यांचा नाश करण्याचा निर्धार केला. माझा निश्चय बदलायचा नाही असे मी ठरविले.” सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणाला. 15 “पण आता मात्र माझे मनःपरिवर्तन झाले आहे. आणि म्हणून मी यरुशलेमवर व यहूदाच्या लोकांशी चांगले वागायचे ठरविले आहे. तेव्हा घाबरु नका! 16 पण तुम्हाला पुढील गोष्टी करणे भाग आहे! तुमच्या शेजाऱ्यांना सत्य सांगा. न्यायालयात निर्णय घेतेवेळी जे सत्य आणि योग्य अशाच गोष्टी करा. त्यामुळे शांतता येईल. 17 आपल्या शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी कट करु नका. खोटी आश्वासने देऊ नका. अशा वाईट गोष्टीत आनंद मानू नका. का? कारण या गोष्टींची मला चीड आहे.” परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
येशू अनेकांना बरे करतो(A)
14 मग येशू पेत्राच्या घरी आला. तेथे पेत्राची सासू तापाने आजारी पडली आहे, असे येशूने पहिले. 15 त्याने तिच्या हाताला स्पर्श केला तेव्हा तिचा ताप निघाला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली.
16 त्या संध्याकाळी लोकांनी भूतबाधा झालेल्या पुष्कळ लोकांना त्याच्याकडे आणले येशूने शब्द बोलून ती भुते घालविली व सर्व प्रकारच्या रोग्यांना बरे केले 17 यशया संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. यशयाने असे म्हटले होते:
“त्याने आमच्या व्याधी स्वतःवर घेतल्या,
त्याने आमचे रोग वाहिले.” (B)
येशू दोन माणसांमधून भूते काढतो(A)
28 मग येशू समुद्राच्या पलीकडे असलेल्या गरदेकरांच्या देशात आला, तेव्हा दोन भूतबाधा झालेली माणसे स्मशानातून येशूकडे आली. ही माणसे स्मशानातील कबरांध्ये राहत होती. ती फार भेसूर होती, त्यामुळे कोणीही त्यांच्या वाटेला जात नसे. 29 ती दोघे येशूकडे आली व म्हणाली, “देवाच्या पुत्रा, तुला आमच्याकडून काय पाहिजे? नेमलेल्या वेळेपूर्वीच तू आम्हांला शिक्षा करायला आलास काय?”
30 त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर डुकरांचा एक कळप चरत होता. 31 ती भुते त्याला विनंती करू लागली, ती म्हणाली, “जर तू आम्हाला ह्यांच्यामधून काढून टाकणार असशील तर आम्हांला त्या डुकरांच्या कळपात जाऊ दे.”
32 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जा.” मग ती त्यांच्यामधून निघून डुकरांमध्ये गेली. तेव्हा तो संपूर्ण कळप कड्यावरून खाली धावत जाऊन पाण्यात बुडाला. 33 मग त्यांना चारणारे पळाले व त्यांनी नगरात जाऊन सर्वांना हे वर्तमान, तसेच भूतबाधा झालेल्यांचे काय झाले तेही सांगितले. 34 तेव्हा सर्व शहर येशूला भेटायला निघाले; आणि जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा येशूने त्यांच्या प्रदेशातून निघून जावे अशी विनंती त्यांनी त्याला केली.
2006 by World Bible Translation Center