Revised Common Lectionary (Semicontinuous)
भाग दुसरा
(स्त्रोतसंहिता 42-72)
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटूंबाकडून मास्कील
42 हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते.
त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे.
2 माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे.
मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
3 रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?”
4 म्हणून मला या सर्व गोष्टी आठवू दे.
मला माझे मन रिकामे करु दे.
जमावाला मी देवाच्या मंदिरापर्यत नेल्याची मला आठवण आहे.
खूप लोकांबरोबर स्तुतीचे आनंदी गाणे गाऊन
सण साजरा केल्याची मला आठवण आहे.
5-6 मी दु:खी का व्हावे?
मी इतके का तळमळावे?
मी देवाकडून मदतीसाठी थांबले पाहीजे.
त्याची स्तुती करण्याची मला पुन्हा संधी मिळेल.
तो मला वाचवेल!
देवा, मी खूप दु:खी आहे म्हणूनच मी तुला बोलावले.
मी यार्देनच्या दरीपासून हर्मोनच्या डोंगरावर आणि मिसहारच्या टेकडीवर गेलो.
7 या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत मी तुझ्या लाटांचा आपटण्याचा आवाज ऐकला.
समुद्रातल्या लाटांसारखी संकटे माझ्यावर पुन्हा कोसळली,
परमेश्वरा तुझ्या लाटा माझ्यावर चहु बाजूंनी आदळत आहेत.
तुझ्या लाटांनी मला पूर्णपणे झाकले आहे.
8 दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून
माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे.
9 मी देवाशी माझ्या खडकाशी बोलतो मी म्हणतो,
“परमेश्वरा, तू मला का विसरलास?
माझ्या शत्रूच्या क्रूरतेमुळे मी इतके दु:ख का सहन करावे?”
10 माझ्या शत्रूंनी मला मारण्याचा प्रयत्न केला, “तुझा देव कुठे आहे?”
असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात.
11 मी इतका दु:खी का आहे?
मी इतका खिन्न का आहे?
मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे.
त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल.
तो मला वाचवेल.
मंदिरातून वाहणारे पाणी
47 त्या माणसाने मला पुन्हा मंदिराच्या दाराशी नेले. मंदिराच्या पूर्वेकडील उंबऱ्याच्या खालून पाणी वाहताना मला दिसले (मंदिराचे तोंड पूर्वेला होते.) मंदिराच्या दक्षिणेच्या भागाखालून पाणी वेदीच्या दक्षिणबाजूने वाहात होते. 2 त्या माणसाने मला उत्तरेच्या दाराने बाहेर आणले आणि फिरवून पूर्वेकडील बाहेरच्या दाराकडे नेले. पाणी दाराच्या दक्षिणेकडून येत होते.
3 हातात मोजमापाची फीत घेऊन तो माणूस पूर्वेला गेला. त्याने 1,000 हात (1/3 मैल) अंतर मोजले मग त्याने मला त्या अंतरापर्यंत पाण्यातून जायला सांगितले. पाणी फक्त घोट्यापर्यंत होते. 4 मग त्याने आणखी 1,000 हाताचे (1/3 मैलाचे) अंतर मोजले. पुन्हा मला पाण्यातून तेथपर्यंत चालण्यास सांगितले. तेथे पाणी माझ्या गुडघ्यापर्यंत आले. मग त्याने पुन्हा 1,000 हाताचे (1/3 मैलाचे) अंतर मोजून, तेथपर्यंत मला पाण्यातून चालण्यास सांगितले. तेथे पाणी कमरेइतक्या खोलीचे होते. 5 त्या माणसाने पुढे आणखी 1,000 हात (1/3 मैल) अंतर मोजले. पण येथे पाणी खूपच खोल असल्याने त्यातून चालणे शक्य नव्हते. त्याची नदी झाली होती. पाणी पोहता येईल इतके खोल होते. पार करता येणार नाही इतक्या खोलीची ती नदी होती. 6 तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुला दिसलेल्या गोष्टी तू लक्षपूर्वक पाहिल्यास ना?”
मग त्याने मला नदीच्या काठाने परत आणले. 7 नदीच्या काठाने परत येताना नदीच्या दोन्ही तीरांवर मला दाट झाडी दिसली. 8 तो माणूस मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेला वाहते. हे अरब दरीतून जाऊन मृत समुद्राला मिळते. त्यामुळे त्या समुद्राचे पाणी ताजे होते. 9 हे पाणी मृत समुद्राला मिळत असल्याने तेथील पाणी ताजे व स्वच्छ होते. तेथे खूप मासे मिळतात. ह्या नदीकाठच्या प्रदेशात सर्व प्रकारचे प्राणी आहेत. 10 एन-गेदीपासून एन-इग्लाइमपर्यंत तुला मच्छीमार नदीकाठी उभे असलेले दिसू शकतील. आपापली जाळी टाकून अनेक प्रकारचे मासे ते पकडत असल्याचे तुला दिसेल. भूमध्य समुद्रात जितक्या प्रकारचे मासे आहेत, तितक्याच प्रकारचे मासे मृतसमुद्रात आहेत. 11 पण दलदल आणि पाणथळीच्या लहान लहान जागा मिठासाठी तशाच ठेवल्या जातील. 12 नदीच्या दोन्ही काठावर सर्व प्रकाराची फळझाडे वाढतात. त्यांची पाने कधीच सुकून गळत नाहीत. त्या झाडांवर नेहमीच फळे असतात. दर महिन्याला झाडांना बहर येतो का? कारण झाडांना मंदिरातून येणारे पाणी मिळते. झाडांची फळे खाण्यासाठी उपयोगी पडतील व पाने औषधी असतील.”
सावधानतेचा इशारा आणि करावयाच्या गोष्टी
17 पण, तुम्ही प्रियजनहो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेले शब्द आठवा. 18 त्यांनी सांगितले, “काळाच्या शेवटी देवाविषयी थट्टेने बोलणारे लोक असतील, ते त्यांच्या स्वतःच्याच अधार्मिक इच्छांच्या मागे जातील.” 19 असे लोक फूट पाडतात. ते त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे चालतात. त्यांना आत्मा नाही.
20 पण तुम्ही प्रिय मित्रांनो, आपल्यापवित्र शिकविण्यात आलेल्या विश्वासात परस्परांना आध्यात्मिक रीतीने बळकट करा. पवित्र आत्म्याने युक्त होऊन प्रार्थना करा. 21 आणि तुम्हांला अनंतकाळच्या जीवनात घेऊन जाणाऱ्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या कृपेची वाट पाहत, देवाच्या प्रीतीत स्वतःला राखा.
22 विश्वासात डळमळीत असलेल्या लोकांवर दया करा. 23 त्यांना अग्नीतून ओढून काढून वाचवा. पण दया दाखविण्याच्या वेळी काळजी घ्या. आणि त्यांच्या दैहिक पापामुळे मळीन झालेल्या कपड्यांचा तिरस्कार करा.
देवाची स्तुति करा
24 आता, तुम्ही पडू नये म्हणून तुम्हाला राखावयास जो समर्थ आहे आणि तुम्हाला आपल्या गौरवी समक्षतेत शुद्ध असे सादर करायला जो मोठ्या आनंदाने तयार आहे, त्याला आणि आपले तारण करणारा जो 25 एकच देव आहे, त्याला आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे गौरव, मान, पराक्रम आणि अधिकार काल, आज आणि अनंतकाळ असो. आमेन.
2006 by World Bible Translation Center