Revised Common Lectionary (Semicontinuous)
देव त्याच्या लोकांचे सांत्वन करील
35 शुष्क वाळवंट सुखी होईल. वाळवंट आनंदी होईल आणि फुलासारखे फुलेल. 2 वाळवंट फुलणाऱ्या फुलांनी भरून जाईल आणि आपला आनंद दाखवेल. त्या वेळी वाळवंट जणू आनंदाने नाचत असल्याचे भासेल. लेबानोनचे बन, कर्मेलची टेकडी व शारोनची दरी ह्यांच्याप्रमाणे ते सुंदर होईल. सर्व लोकांनी परमेश्वराचे गौरव पाहिल्यामुळे हे सर्व घडेल. लोक आमच्या देवाचे लावण्य पाहतील.
3 दुर्बल हात बळकट करा. दुर्बळ पाय घट्ट करा. 4 लोक घाबरले व गोंधळले आहेत. त्यांना सांगा, “सामर्थ्यवान व्हा. भीऊ नका.” तुमचा देव येऊन तुमच्या शत्रूला शिक्षा करील. तो येईल आणि तुमच्या वर कृपा करील. परमेश्वर तुमचे रक्षण करील. 5 मग आंधळे पुन्हा डोळस होतील. त्यांचे डोळे उघडतील. बहिरे ऐकू शकतील. त्यांना श्रवणशक्ती मिळेल. 6 पंगु हरणांप्रमाणे नाचतील. मुके आनंदगीते गाऊ लागतील. वाळवंटात झरे वाहू लागतील, तेव्हा असे होईल. कोरड्या जमिनीतून झरे वाहतील. 7 आता लोक मृगजळे पाहतात. पण त्या वेळेला खऱ्या पाण्याची तळी दिसतील. कोरड्या जमिनीत विहिरी खोदलेल्या असतील. जमिनीतून पाणी वाहील. जेथे एकेकाळी जंगली जनावरे वावरले, तेथे मोठ्या पाणवनस्पती वाढतील.
8 त्या वेळेला तेथे रस्ता असेल. ह्या महामार्गाला “पवित्र मार्ग” असे नाव मिळेल. पापी लोकांना त्या रस्त्यावरून जाण्यास परवानगी नसेल. कोणीही मूर्ख त्या मार्गाकडे जाणार नाही. फक्त सज्जन माणसेच त्या मार्गावरून चालतील. 9 त्या मार्गावर कोणताही धोका असणार नाही. तेथे लोकांना मारणारे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे नसतील. देवाने रक्षिलेले त्या मार्गावरून चालतील.
10 देव त्याच्या लोकांना मुक्त करील आणि ते लोक त्याला शरण येतील. सियोनमध्ये येताना लोक गात येतील. त्यांना कायमचा आनंद मिळेल. तो आनंद त्यांच्या डोक्यावरील मुकुटाप्रमाणे असेल. ते आनंदाने व हर्षांने भारून जातील. दु:ख आणि शोक दूर सरेल.
5 पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात.
ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
6 परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.
परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या.
परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील.
7 जे लोक दु:खी कष्टी आहेत.
त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो.
तो भुकेल्यांना अन्न देतो.
तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.
8 परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो.
संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो.
परमेश्वराला चांगले लोक आवडतात.
9 परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो.
परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो.
परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
10 परमेश्वर सदैव राज्य करील
सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील
परमेश्वराची स्तुती करा.
मरीया देवाची स्तुति करते
46 आणि मरीया म्हणाली,
47 “माझा आत्मा प्रभूची स्तुति करतो;
माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो.
48 कारण त्याने त्याच्या नम्र दासीची काळजी वाहिली होय,
येथून पुढे सर्व लोक मला धन्य म्हणतील.
49 कारण सर्वसमर्थाने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत,
त्याचे नाव पवित्र आहे.
50 जे त्याचे भय धरतात,
त्यांच्यावर तो पिढ्यानपिढ्या दया करतो.
51 त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले;
गर्विष्ठ लोकांना त्यांच्या बढाईखोर विचारांसह विखरुन टाकले आहे.
52 सत्ताधीशांना त्याने त्यांच्या सिंहासनावरुन खाली आणले आहे,
आणि नम्र जनांना त्याने उंच केले आहे.
53 त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी समाधान दिले आहे.
श्रीमंत लोकांना त्याने रिकामे पाठविले आहे.
54 त्याचा सेवक जो इस्राएल याला
मदत करण्यास तो आला आहे.
55 त्याने आपल्या पूर्वजांना जे अभिवचन दिले होते त्याप्रमाणे
अब्राहाम व त्याच्या वंशजांवर दया करण्याचे तो लक्षात ठेवतो.”
धीर धरा
7 यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो. 8 तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. धैर्य धरा, कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे. 9 बंधूंनो, एकमेकांविरुद्ध कुरकुर करण्याचे थांबवा, यासाठी की तुम्ही दोषी ठरू नये. पहा! न्यायाधीश दाराजवळ आत येण्यासाठी तयारीत उभा आहे.
10 बंधूंनो, दु:ख सहन करीत देवाच्या नावाने लोकांशी धीर धरून बोलणाऱ्या संदेष्ट्याचे उदाहरण तुम्ही आपल्यासमोर ठेवा.
2 बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या गोष्टीविषयी ऐकले. तेव्हा योहानाने काही शिष्यांना येशूकडे पाठविले. 3 आणि त्याला विचारले, “जो येणार होता, तो तूच आहेस? किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
4 येशूने उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. 5 आंधळे पाहू शकतात. पांगळे चालताल. कुष्ठरोगी शुद्ध केले जातात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. 6 धन्य तो पुरूष जो माझ्यामुळे अडखळत नाही.”
7 मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, “तुम्ही वैराण प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय? 8 तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्र घातलेल्या माणसाला पाहायला गेला होता काय? तलम वस्त्र घालणारे राजांच्या राजवाड्यात असतात. 9 तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेष्ट्याला पाहायला काय? होय. मी तुम्हांला सांगतो, आणि संदेष्ट्यांपेक्षा अधिक असा योहान होता. 10 त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे:
‘पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवितो
तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.’ (A)
11 “मी तुम्हांला खरे सांगतो की, स्त्रीयांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे.
2006 by World Bible Translation Center