Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
21 परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते
तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो.
2 राजाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तूच त्याला दिल्यास.
राजाने काही गोष्टींची मागणी केली आणि परमेश्वरा, त्याने जे मागितले ते तू त्याला दिलेस.
3 परमेश्वरा, तू राजाला खरोखरच आशीर्वाद दिलास.
तू त्याच्या मस्तकावर सोनेरी मुकुट ठेवलास.
4 त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू ते त्याला दिलेस,
देवा, तू राजाला कधीही न संपणारे चिरंजीव आयुष्य दिलेस.
5 तू राजाला विजयी केलेस आणि त्याला गौरव प्राप्त करुन दिलेस.
तू त्याला मान आणि स्तुती दिलीस.
6 देवा, तू राजाला अनंत काळासाठी आशीर्वाद दिलास.
राजा तुझा चेहरा पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो.
7 राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे,
सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला निराश करणार नाही.
8 देवा, तू तुझ्या सर्व शंत्रूना तू किती सामर्थ्यवान आहेस ते दाखवशील.
तुझ्या सामर्थ्याने तुझा तिरस्कार करणाऱ्यांचा पराभव होईल.
9 भट्टीतली आग अनेक वस्तू जाळू शकते.
परमेश्वरा, तू जेव्हा राजाबरोबर असतोस तेव्हा तो भट्टीसारखा असतो.
त्याचा क्रोध अग्नी सारखा जळतो
आणि तो त्याच्या शत्रूंचा नाश करतो.
10 त्याच्या शत्रूंच्या कुटुंबाचा नाश होईल
ते पृथ्वीवरुन निघून जातील.
11 का? कारण परमेश्वरा, त्या लोकांनी तुझ्याविरुध्द् वाईट गोष्टींची योजना आखली
परंतु ते यशस्वी झाले नाहीत.
12 परमेश्वरा, तू त्या लोकांना तुझे गुलाम बनवलेस तू त्यांना दोराने बांधून ठेवलेस.
तू त्यांच्या मानेभोवती दोर बांधलेस.
तू त्यांना गुलामाप्रमाणे वाकायला लावलेस.
13 हे देवा, तुझ्या सामर्थ्याने उच्चपदाला चढ
आपण परमेश्वराच्या महानतेचे गाणे गाऊ या.
देव इस्राएलला शिक्षा करील
24 पाहा! परमेश्वर ह्या देशाचा नाश करील. ही भूमी पूर्णपणे स्वच्छ करील. परमेश्वर लोकांना बळजबरीने दूर जायला लावील. 2 त्या वेळेला सामान्य लोक आणि याजक यांना एकाच मापाने मोजले जाईल. गुलाम व मालक हे सारखेच समजले जातील. दासी आणि मालकीण यांच्यात फरक केला जाणार नाही. खरीददार व विक्रेते, कर्ज घेणारे व कर्ज देणारे आणि धनको व ऋणको ह्यांत भेद केला जाणार नाही. 3 सर्व लोकांना देशातून बळजबरीने हाकलून दिले जाईल. सर्व संपत्ती लुटली जाईल. परमेश्वराच्या आज्ञेवरून हे घडेल. 4 देश ओस पडून त्याच्यावर शोककळा पसरेल. जग ओसाड व दु:खी होईल. ह्या देशातील महान नेते दुबळे होतील.
5 ह्या देशातील लोकांनी देशाला ओंगळ केले. हे कसे झाले? देवाच्या शिकवणुकी विरूध्द् जाऊन त्यांनी चुकीचे आचरण केले. देवाचे नियम त्यांनी मानले नाहीत. पूर्वी लोकांनी देवाबरोबर करार केला पण ती त्यांनीच मोडला. 6 ह्या देशात राहणारे लोक दुष्कृत्यांचे धनी आहेत. म्हणून देवाने हा देश नष्ट करायचा पण केला. लोकांना शिक्षा होईल. फारच थोडे वाचतील.
7 द्राक्षवेली सुकत चालल्या आहेत. नवीन मद्य खराब आहे. पूर्वी लोक सुखी होते. पण आता तेच लोक दु:खी झाले आहेत. 8 लोकांचे आनंदप्रदर्शन थांबले आहे. सगळे आनंददात थांबले आहेत. सांरगीतून आणि डफातून उठणारे आनंदसंगीत बंद पडले आहे. 9 लोक मद्य पिताना आनंदगीते म्हणत नाहीत. मद्याची चव कडू झाली आहे.
10 “संपूर्ण गोंधळ” हेच नाव या शहराला शोभेल. शहराचा नाश झाला आहे. लोक घरात प्रवेश करू शकत नाहीत. दारांना अडसर घातले आहेत. 11 बाजारात लोक अजूनही मद्याची मागणी करतात पण त्यात पूर्वीचा आनंद नाही. सगळीच मजा गेली आहे. 12 सर्वत्र पडझड झाली आहे. वेशीसुध्दा कोलमडून पडल्या आहेत.
13 सुगीच्या काळात, लोक जैतूनची फळे झाडावरून पाडतात.
पण काही झाडावर राहतातच.
अनेक देशांमध्ये असलेल्या ह्या देशाचे देखील असेच होईल.
14 वाचलेले लोक आरडाओरड सुरू करतील.
त्यांचा आवाज महासागराच्या गर्जनेपेक्षा मोठा असेल.
परमेश्वराची महानता पाहून ते आनंदित होतील.
15 ते लोक म्हणतील, “पूर्वेकडच्या लोकांनो, परमेश्वराचे स्तवन करा.
दूरच्या देशांतील लोकांनो,
इस्राएलच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा.”
16 जगाच्या कानाकोपऱ्यातून देवाचे स्तुतिस्तोत्र आपल्याला ऐकायला येतील.
ह्या गीतांतून खऱ्या देवाची स्तुती असेल.
पण मी म्हणतो, “पुरे पुष्कळ झाले.
मी ज्या गोष्टी पाहतो त्या भयानक आहेत.
लोकांच्या विरूध्द् विश्वासघातकी उठले आहेत.
व त्यांना त्रास देत आहेत.”
देवाला संतोषविणारे जीवन
4 बंधूंनो, मला आता तुम्हाला काही इतर गोष्टीविषयी सांगायचे आहे; प्रभु येशूचे अनुयायी या नात्याने आम्ही तुम्हाला विनंति करतो व बोध करतो की, देवाला कसे संतोषवायचे याचे शिक्षण तुम्हांला आमच्याकडून जसे मिळाले, तसे तुम्ही खरोखरच जगत आहात, आणि तुम्ही ते जास्तीत जास्त करा. 2 कारण तुम्हांला हे माहीत आहे की, प्रभु येशूच्या अधिकाराने कोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांस दिल्या होत्या. 3 आणि हेच देवाला पाहिजे आहे. तुम्ही पवित्र असावे ही त्याची इच्छा आहे. तुम्ही जारकर्मपासून दूर असावे ही त्याची इच्छा आहे. 4 त्याची अशी इच्छा आहे की, तुम्हातील प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर ताबा मिळविण्यास शिकावे. [a] 5 आणि ज्यांना देव माहीत नाही, ज्यांना देवाची ओळख नाही त्या विदेशी लोकांप्रमाणे कामवासनेने नव्हे. 6 त्याची हीसुद्धा इच्छा आहे की, तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या बंधूचा याबाबतीत गैरफायदा घेऊ नये. कारण जसा आम्ही पूर्वी इशारा देऊन सांगितले होते की, प्रभु या सर्व गोष्टींचा सूड घेणारा आहे. 7 कारण देवाने आम्हाला अमंगळ जीवनासाठी नव्हे, तर शुद्ध जीवनासाठी बोलाविले होते. 8 म्हणून जो कोणी हे शिक्षण नाकारतो, तो मनुष्याला नव्हे तर पवित्र आत्मा देणाऱ्या देवाला नाकारतो.
9 आता ख्रिस्तातील तुमच्या भाऊ बहिणीच्या प्रीतीविषयी आम्ही तुम्हाला लिहिण्याची गरज आहे असे नाही. कारण एकमेकावर प्रीति करावी असे देवानेच तुम्हांला शिकविले आहे. 10 आणि हे खरे पाहता, जे तुम्ही तुमच्या सर्व बंधूंबरोबर सर्व मासेदोनियाभर प्रीती करीत आहात. परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांस कळकळीने सांगतो की ती विपुलतेने करा.
11 आम्ही तुम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे शांततापूर्ण जीवन जगण्याची, आपले काम आपण करण्याची, आणि आपल्या स्वतःच्या हातांनी काम करण्याची इच्छा करा. 12 यासाठी की बाहेरचे लोक तुम्ही ज्या प्रकारे जगता ते पाहून तुमचा आदर करतील आणि यासाठी की, तुमच्या गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागू नये.
2006 by World Bible Translation Center