Revised Common Lectionary (Semicontinuous)
शांतीचा राजा येत आहे
11 इशायाच्या बुंध्याला (वंशाला) अंकुर (मूल) फुटून वाढू लागेल. ती फांदी इशायाच्या मुळाची असेल. 2 परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सुज्ञपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रध्दा ठेवण्यास त्या मुलाला शिकवील. 3 परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल. तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते वा कानांनी जे ऐकू येते, त्याच्यावरून निर्णय घेणार नाही.
हा मुलगा गोष्टी जशा दिसतात त्या वरून लोकांची पारख करणार नाही. तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही. 4-5 तो गरिबांना प्रामाणिकपणे व सरळपणे न्याय देईल. ह्या देशातील गरिबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुध्दीने करील. त्याने जर काही लोकांना फटकावयाचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील. त्याने दुष्टांना मारायचे ठरविले, तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल. चांगुलपणा व प्रामाणिकपणा ह्या मुलाला सामर्थ्य देईल. ते त्याचे संरक्षक कवच असतील.
6 त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील, वाघ कोकरांबरोबर शांतपणे झोपेल. वासरे, सिंह, आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील. 7 गायी आणि अस्वले एकत्र गुण्यागोविंदाने राहतील. सगळ्यांची पिल्ले एकत्र राहतील आणि कोणीच कोणाला इजा करणार नाही. सिंह गाईसारखे चारा खातील. एवढेच नव्हे तर सापही माणसाला दंश करणार नाहीत. 8 तान्हे मूलसुध्दा नागाच्या वारूळाजवळ खेळू शकेल. ते सापाच्या बिळात त्याचा हात घालू शकेल.
9 ह्या सगळ्या गोष्टीवरून, तेथे शांती नांदेल, हेच दिसते. कोणीही माणूस दुसऱ्याला दुखविणार नाही. माझ्या पवित्र डोंगरावर राहणारे लोक वस्तूंचा नाश करू इच्छिणार नाहीत. का? कारण लोकांना परमेश्वराची खरी ओळख पटेल. समुद्रात जसे अथांग पाणी असते, तसेच त्यांना परमेश्वराबद्दल खूपच ज्ञान झालेले असेल.
10 त्या वेळेला इशायाच्या घराण्यात एक विशेष व्यक्ती असेल ती व्यक्ती ध्वजाप्रमाणे असेल हा “ध्वज” सर्व राष्ट्रांना त्याच्याभोवती जमण्याचे आवाहन करील. सर्व राष्ट्रे, त्यांनी करायच्या कार्याबद्दल ह्या “ध्वजाकडे” विचारणा करतील तो जेथे असेल तेथे वैभव नांदेल.
शलमोनासाठी स्तोत्र
72 देवा, तू राजाला तुझ्यासारखे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर.
आणि राजाच्या मुलाला तुझ्या चांगुलपणा विषयी शिकायला मदत कर.
2 तुझ्या लोकांना चांगला न्याय मिळावा म्हणून राजाला मदत कर
तुझ्या गरीब लोकांसाठी चांगले आणि शहाणपणाचे निर्णय घेण्यासाठी त्याला मदत कर.
3 पृथ्वीवर सगळीकडे शांती,
आणि न्याय नांदू दे.
4 राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे.
त्याला असहाय लोकांना मदत करु दे.
त्यांना जे त्रास देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करु दे.
5 जो वर सूर्य चमकतो आहे आणि चंद्र आकाशात आहे तोवर लोकांनी राजाला मान द्यावा आणि त्याची भीती बाळगावी असे मला वाटते.
लोक त्याला सदैव मान देतील आणि त्याची भीती बाळगतील अशी आशा मी करतो.
6 राजाला शेतात पडणाऱ्या पावसासारखे असू दे,
त्याला पृथ्वीवर पडणाऱ्या पर्जन्यासारखे असू दे.
7 तो जो पर्यंत राजा आहे तो पर्यंत चांगुलपणा उमलू दे.
जो पर्यंत चंद्र आहे तो पर्यंत शांती नांदू दे.
18 परमेश्वर देवाची, इस्राएलाच्या देवाची स्तुती करा.
फक्त देवच अशा अद्भूत गोष्टी करु शकतो.
19 त्याच्या गौरवपूर्ण नावाची सदैव स्तुती करा.
त्याच्या गौरवाने सारे जग भरु द्या.
आमेन आमेन.
4 आता पवित्र शास्त्रत पूर्वी जे लिहिले होते ते आपल्या शिक्षणाकरिता लिहिले होते यासाठी की, शास्त्रापासून मिळणारे उतेजन आणि धीर यांची आपण आशा धरावी म्हणून शिकवितो. 5 आणि देव जो धीराचा आणि उतेजनाचा उगम आहे, तो तुम्ही ख्रिस्त येशूच्या उदाहरणाप्रमाणे एकमेकांबरोबर एकमताने राहावे असे करावे. 6 म्हणजे तुम्ही सर्व जण एक मुखाने देव जो आपला प्रभु येशू ख्रिस्ताचा पिता याला गौरव द्यावे. 7 म्हणून ख्रिस्ताने देवाच्य गौरवासाठी तुम्हाल स्वीकारले. तसे तुम्ही एकमेकांचा स्वीकार व स्वागत करा. 8 मी तुम्हांस सांगतो देवाच्या सत्यतेसाठी ख्रिस्त सुंती लोकांचा, यहूदी लोकांचा सेवक झाला यासाठी की पूर्वजांना दिलेली वचने निश्चित व्हावीत. 9 यासाठी की यहूदीतर लोक देवाने त्यांच्यावर दाखविलेल्या दयेबद्दल गौरव करतील, पवित्र शास्त्रात लिहिले आहे:
“म्हणून विदेशी लोकांमध्ये मी तुझे उपकार मानीन.
आणि तुझ्या नावाची स्तुति करीन.” (A)
10 आणि पुन्हा शाश्त्र असे म्हणते,
“विदेशी लोकांनो, देवाच्या निवडलेल्या लोकांबरोबर आनंद करा.” (B)
11 आणि पुन्हा शास्त्र असे म्हणते
“अहो सर्व विदेशी लोकांनो, प्रभूचे स्तवन करा
आणि सर्व लोक त्याची स्तुति करोत.” (C)
12 यशयासुद्धा असे म्हणतो,
“इशायाचे मूळ प्रगट होईल,
ते राष्ट्रावर राज्य करावयास उत्पन्र होईल.
ती राष्ट्रे त्याच्यावर आपला विश्वास ठेवतील.” (D)
13 देव जो सर्व आशेचा उगम, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला तो आनंदाने व शांतीने भरो, यासाठी की, तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशेत विपुल व्हावे.
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे कार्य(A)
3 त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान आला आणि यहूदीयाच्या वैराण प्रदेशात उपदेश करू लागला; तो म्हणाला, 2 “तुमची अंतःकरणे व जीवने वाईटपणाकडून चांगुलपणामध्ये बदला कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आह्रे” 3 यशया हा संदेष्टा ज्याच्याविषयी बोलत होता तो हाच बाप्तिस्मा करणारा योहान. त्याविषयीचे यशयाचे भविष्य असे होते:
“वैराण प्रदेशात एक मनुष्य ओरडून सांगत आहे;
‘प्रभु देवासाठी मार्ग तयार करा,
त्याच्या वाटा सरळ करा.’” (B)
4 योहानाचे कपडे उंटाच्या केसांपासून बनविलेले होते. कातड्याचा कमरपट्टा त्याच्या कमरे भोवती होता. अन्न म्हणून योहान टोळ आणि रानमध खात असे. 5 लोक योहानाचा उपदेश ऐकण्यास जात होते. यरूशलेम, सर्व यहूदीया प्रांत आणि यार्देन नदीच्या भोवतालच्या प्रदेशातून लोक येत होते. 6 आपण केलेली पापे लोक त्याला सांगत होते आणि योहान त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मा [a] देत होता.
7 योहान जेथे लोकांना बाप्तिस्मा देत होता तेथे अनेक परूशी [b] आणि सदूकी [c] आले. जेव्हा योहानाने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो, सापाच्या पिल्लांनो, देवाचा जो राग ओढवणार आहे त्याच्यापासून दूर पळण्याचे तुम्हांला कोणी सुचविले? 8 म्हणून पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या. 9 अणि ‘अब्राहाम माझा पिता आहे.’ अशी फुशारकी तुम्हांला मारता येईल असे समजू नका; मी तुम्हांस सांगतो की, देव अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करू शकतो. 10 झाडे तोडण्यासाठी कुऱ्हाड तयार आहे. चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड कापून अग्नीत टाकले जाईल.
11 “तुम्ही तुमची अंतःकरणे आणि जीवने वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहेत हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण माझ्यानंतर माझ्यापेक्षाही महान असा एक येत आहे, ज्याच्या वहाणा उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील. 12 तो धान्य निवडायला येईल. तो भुसा बाजूला काढील व धान्य वेगळे करील. तो चांगले धान्य कोठारात साठविल व जे चांगले नाही ते जाळून टाकील. तो भुसा कधीही न विझणाऱ्या आगीमध्ये जाळून टाकील.”
2006 by World Bible Translation Center