Revised Common Lectionary (Semicontinuous)
शलमोनासाठी स्तोत्र
72 देवा, तू राजाला तुझ्यासारखे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर.
आणि राजाच्या मुलाला तुझ्या चांगुलपणा विषयी शिकायला मदत कर.
2 तुझ्या लोकांना चांगला न्याय मिळावा म्हणून राजाला मदत कर
तुझ्या गरीब लोकांसाठी चांगले आणि शहाणपणाचे निर्णय घेण्यासाठी त्याला मदत कर.
3 पृथ्वीवर सगळीकडे शांती,
आणि न्याय नांदू दे.
4 राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे.
त्याला असहाय लोकांना मदत करु दे.
त्यांना जे त्रास देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करु दे.
5 जो वर सूर्य चमकतो आहे आणि चंद्र आकाशात आहे तोवर लोकांनी राजाला मान द्यावा आणि त्याची भीती बाळगावी असे मला वाटते.
लोक त्याला सदैव मान देतील आणि त्याची भीती बाळगतील अशी आशा मी करतो.
6 राजाला शेतात पडणाऱ्या पावसासारखे असू दे,
त्याला पृथ्वीवर पडणाऱ्या पर्जन्यासारखे असू दे.
7 तो जो पर्यंत राजा आहे तो पर्यंत चांगुलपणा उमलू दे.
जो पर्यंत चंद्र आहे तो पर्यंत शांती नांदू दे.
18 परमेश्वर देवाची, इस्राएलाच्या देवाची स्तुती करा.
फक्त देवच अशा अद्भूत गोष्टी करु शकतो.
19 त्याच्या गौरवपूर्ण नावाची सदैव स्तुती करा.
त्याच्या गौरवाने सारे जग भरु द्या.
आमेन आमेन.
इस्राएलची शिक्षा संपेल
40 तुमचा देव म्हणतो,
“माझ्या लोकांचे सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा.
2 यरुशलेमशी ममतेने बोला यरुशलेमला सांगा:
‘तुझ्या सेवेचा काळ संपला
तुझ्या पापांची किंमत तू मोजली आहेस.’
परमेश्वराने यरूशलेमला शिक्षा केली.
तिने केलेल्या प्रत्येक पापाकरिता दोनदा शिक्षा केली.”
3 ऐका! कोणीतरी ओरडत आहे,
“परमेश्वरासाठी वाळवंटातून मार्ग काढा.
आमच्या देवासाठी वाळवंटात सपाट रस्ता तयार करा.
4 प्रत्येक दरी भरून काढा.
प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट करा.
वेडेवाकडे रस्ते सरळ करा.
खडकाळ जमीन गुळगुळीत करा.
5 मग देवाची प्रभा फाकेल
आणि सर्व लोक एकत्रितपणे परमेश्वराचे तेज पाहतील.
हो! स्वतः परमेश्वराने हे सर्व सांगितले आहे.”
6 एक आवाज आला, “बोल!”
मग माणूस म्हणाला, “मी काय बोलू?”
आवाज म्हणाला, हे बोल: “सर्व माणसे गवतासारखी आहेत.
माणसाचा चांगुलपणा कोवळ्या गवताच्या पात्यासारखा आहे.
7 परमेश्वराकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्याने
हे गवत सुकते व मरते,
सर्व माणसे गवतासारखी आहेत हेच सत्य आहे.
8 गवत सुकते आणि फुले कोमेजतात
पण आमच्या देवाची वाणी सदासर्वकाळ राहते.”
तारण: देवाची सुवार्ता
9 सियोन, तुझ्याकडे सांगण्यासाठी एक सुर्वाता आहे.
उंच डोंगरावर चढून जा आणि ही सुवार्ता ओरडून सांग.
यरूशलेम, तुझ्यासाठी चांगली वार्ता आहे.
घाबरू नकोस.
मोठ्याने बोल.
यहुदातील सर्व शहरांना ही वार्ता सांग, “हा पाहा तुमचा देव!”
10 परमेश्वर, माझा प्रभू सर्व सामर्थ्यानिशी येत आहे
लोकांवर अधिकार चालविण्यासाठी तो त्याचे सामर्थ्य वापरील
तो आपल्या लोकांसाठी बक्षिस आणील.
तो त्यांचा मोबदला चुकता करील.
11 ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढ्या वळवतो त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या लोकांना वळवेल.
परमेश्वर आपल्या हाताने (सामर्थ्याने) त्यांना एकत्र गोळा करील.
तो लहान मेढ्यांना हातांत उचलून घेईल व त्या लहानग्यांच्या आया परमेश्वराच्या बाजूबाजूने चालतील.
योहान येशूविषयी लोकांना सांगतो(A)
19 यरूशलेम येथील यहूदी लोकांनी योहानाकडे काही याजक व लेवी [a] ह्यांना पाठविले. “तू कोण आहेस?” हे विचारण्यासाठी यहूदी लोकांनी त्यांना पाठविले. 20 योहान अगदी मोकळेपणाने बोलला. त्याने उत्तर देण्यास नकार दिला नाही. तो स्पष्टपणे म्हणाला, “मी ख्रिस्त [b] नाही.” योहानाने लोकांना तेच सांगितले.
21 यहूदी लोकांनी योहानाला विचारले, “तर मग तू कोण आहेस? तू एलीया [c] आहेस काय?”
योहानाने उत्तर दिले, “नाही, मी एलीया नाही.”
यहूदी लोकांनी विचारले, “तू संदेष्टा आहेस काय?”
योहानाने म्हटले, “नाही, मी संदेष्टा नाही.”
22 यावर यहूदी लोक म्हणाले, “तू कोण आहेस? तुझ्याविषयी आम्हांला सांग. ज्या लोकांनी आम्हांला पाठविले, त्यांना आम्ही काय उत्तर द्यावे हे तू आम्हांला सांग. तू स्वतःला कोण म्हणवितोस?”
23 योहानाने त्यांना यशया संदेष्ट्याच्या शब्दात सांगितले,
“मी वैराण रानात ओरडणाऱ्या मनुष्याची वाणी आहे:
‘प्रभूसाठी सरळ मार्ग तयार करा.’” (B)
24 परूशी लोकांनी या यहूदी लोकांना पाठविले होते. 25 हे लोक योहानाला म्हणाले, “तू म्हणतोस की, मी ख्रिस्त नाही; मी एलीया नाही किंवा मी संदेष्टाही नाही, मग तू लोकांचा बाप्तिस्मा का करतोस?”
26 योहानाने उतर दिले, “मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु तुम्हांला माहीत नाही असा एक मनुष्य येथे तुमच्यात आहे. 27 माझ्यानंतर येणारा तो हाच मनुष्य आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याइतकीही माझी लायकी नाही.”
28 यार्देन नदीपलीकडील बेथानी गावात या सर्व गोष्टी घडल्या. योहान तेथेच लोकांचा बाप्तिस्मा करीत असे.
2006 by World Bible Translation Center