Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 124

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.

124 परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
    इस्राएल, मला उत्तर दे.
लोकांनी आपल्यावर हल्ला केला
    तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते
    तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.
आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते.
    नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे
    आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते.

परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना
    आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही.

जाळ्यात सापडलेल्या आणि
    नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत.
    जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो.
परमेश्वराकडून आपली मदत आली.
    परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.

यशया 54:1-10

देव त्याच्या लोकांना घरी आणेल

54 “स्त्रिये, सुखी हो.
तुला मुले नाहीत.
    पण तू सुखी असावेस. परमेश्वर म्हणतो,

“एकट्या असणाऱ्या बाईला. [a]
    नवरा असणाऱ्या बाईपेक्षा जास्त मुले होतील.”

“तुझा तंबू मोठा कर.
    तुझी दारे सताड उघड.
    तुझ्या घराचा आकार वाढव
तुझा तंबू मोठा आणि मजबूत कर.
    का? कारण तुझा पसारा खूप वाढणार आहे.
खूप राष्ट्रातील लोक तुझ्या मुलांना येऊन मिळणार आहेत.
    तुझे वंशज राष्ट्रांची व्यवस्था लावतील
    आणि नाश झालेल्या शहरातून पुन्हा तुझी मुले वस्ती करतील.
घाबरू नकोस.
    तुझी निराशा होणार नाही.
लोक तुझी निंदा करणार नाहीत.
    तुला ओशाळवाणे व्हावे लागणार नाही.
तू तरूण असताना तुला लज्जित व्हावे लागले.
    पण आता तू ते विसरशील.
पती गेल्यावर तुझी झालेली अप्रतिष्ठा
    तुला आठवणार नाही.
कारण तुझा पती हा तुझा निर्माता म्हणजेच देव आहे.
    त्याचे नाव सर्वशक्तिमान परमेश्वर आहे.
इस्राएलला वाचविणारा एक तोच आहे तो इस्राएलचा पवित्र देव आहे.
    आणि त्याला सर्व पृथ्वीचा पवित्र देव म्हटले जाईल.

“तू परित्यक्ता स्त्रीप्रमाणे होतीस.
    तू मनातून फार दुखी: होतीस.
    पण देवाने तुला आपली मानले.
पतीने तरूणपणीच सोडून दिलेल्या स्त्रीप्रमाणे तुझी अवस्था होती.
    पण परमेश्वराने तुला आपली मानले.”
देव म्हणतो, “मी तुला सोडले ते थोड्या वेळापुरतेच.
    मी तुला माझ्यात सामावून घेईन आणि तुझ्यावर कृपा करीन.
मला खूप राग आला होता म्हणून मी थोड्या वेळापुरता तुझ्यापासून लपून बसलो.
    पण मी तुझ्यावर अखंड कृपा करून तुझे दुख: हलके करीन.”
    परमेश्वर, तुझा तारणहार असे म्हणाला.

देव त्याच्या लोकांवर नेहमीच प्रेम करतो

देव म्हणतो, “नोहाच्या काळात प्रलय आणून मी जगाला शिक्षा केली होती ते आठव.
    पण, पुन्हा प्रलय घडवून जग नष्ट करणार नाही असे वचन मी नोहाला दिले होते.
त्याचप्रमाणे मी आता तुला वचन देतो की मी तुझ्यावर कधी रागावणार नाही
    आणि तुझी खरडपट्टी ही काढणार नाही.”

10 परमेश्वर म्हणतो, “एकवेळ डोंगर नाहीसे होतील,
    टेकड्यांचे रूपांतर धुळीत होईल.
पण माझी तुझ्यावरची कृपा कधीही नाहीशी होणार नाही.
    मी स्थापन केलेली
    शांती चिरंतन राहील.”
तुझ्यावर कृपा करणारा परमेश्वरच हे सगळे सांगत आहे.

मत्तय 24:23-35

23 “त्या वेळी जर एखाद्याने तुम्हांला म्हटले, ‘पहा! ख्रिस्त येथे आहे,’ किंवा ‘तो तेथे आहे’, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील. 25 या गोष्टी होण्या अगोदरच मी तुम्हांला सावध केले आहे.

26 “एखादा मनुष्य तुम्हांला सांगेल, ‘पाहा, मशीहा ओसाड रानात आहे.’ तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, ‘ख्रिस्त, आतल्या खोलीत लपला आहे’, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 27 मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वाना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणेदेखील असेल. 28 जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही असतील.

29 “छळानंतर लगेच, असे घडेल:

‘सूर्य अंधकारमय होईल
    व चंद्र प्रकाश देणार नाही.
आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील आकाशातील सर्व शक्ती डळमळतील.
    आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.’ (A)

30 “त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व लोक शोक करतील. मनुष्याच्या पुत्राला सर्व जण मेघावर बसून येताना पाहतील. तो महासामर्थ्य आणि वैभव यांच्यासह येईल. 31 मनुष्याचा पुत्र तुतारीचा मोठा नाद करून आपले दूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.

32 “अंजिराच्या झाडापासून शिका: अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हांला कळते. 33 मी तुम्हांला ज्याविषयी सांगितले त्याबाबतीतही असेच होईल जेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही पाहाल तेव्हा वेळ जवळ येत आहे हे तुम्ही ओळखाल. 34 मी तुम्हांला खरे सांगतो: या गोष्टी होत असताना आजची ही पिढी नाहीशी होणार नाही. 35 सर्व जग, आकाश, पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center